मनुष्य म्हणजे भल्यामोठ्या विश्वाच्या पसाऱ्यातील छोट्याश्या ग्रहावरील; आळवाच्या पानावरील, पाण्याचा थेंब.....!! सूर्याच्या किरणांमुळे काहीकाळ लकाकणारा, सोनेरी दिसणारा,..!! पण कितीकाळ सोनेरी..? अन् कितीवेळ अस्तित्व..?? याची कल्पना नसलेला जीव ....!! यात शब्दरूपी #जिंदगी_का_फ़ंडा�� चिरकाल राहील राहावा एवढीच भाबडी आशा.......!! 【काही चुकीचं वाटलं तर खुल्या मनाने आवश्य सांगा.. तुमचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी अमूल्य आहे..आणि हेच शब्द लिहिण्यास प्रेरणा देतील】
Saturday, December 25, 2021
सखे....!!
Sunday, November 28, 2021
पाऊलवाटा...!!!
Tuesday, October 19, 2021
चंद्र:-वेगळंपण जपणारा..!!
आयुष्याच्या वळणावर एक चंद्र असावा,
एकवेळ आंनदाच्या क्षणी आमावस्या बनून लुप्त होणारा,
पण दुःखाच्या रात्री पौर्णिमेचा चंद्र बनून लख्ख सोबत करणारा,
कितीही दूर असलातरी आपला भासणारा,
मध्यान्ह रात्री खिडकीतून दिसणारा,
आठवणींनीच्या आसवांना सोबत करणारा,
प्रत्येकाच्या आयुष्यात एक चंद्र असावा..!!
दिवसभर कडाक्याच्या उन्हात थिजल्यावर,
रात्री मंद प्रकाशात बाहूत विसावून घेणारा,
कातरवेळी सूर्य क्षितिजापल्याड जाताना,
हातातून रेती निसटावी तसं प्राणप्रिय क्षण निसटताना,
दुसरा हात घट्ट पकडून "मी आहे ना" म्हणणारा,
प्रत्येकाच्या आयुष्यात एक चंद्र असावा...!!
नेहमीच नाही पण कधीतरी आसवं ढाळायला,
हक्काने बोल लावायला एक चंद्र असावा,
काहीच न बोलता खूप सारं हितगुज करणारा,
चांदण्यांच्या गर्दीत आपलासा वाटणारा,
प्रत्येकाच्या आयुष्यात एक चंद्र असावा...!!
ज्याला ना मिळवण्याचा हव्यास,
ना गमावण्याची भीती,
पण पौर्णिमेला प्रेमाची भरती आणणारा,
अन् अमावास्येला विरह भासवणारा,
असा प्रत्येकाच्या आयुष्यात एक चंद्र असावा..!!
चांदण्यांच्या गर्दीत, मनाला भावनारा,
कोजागिरीचा चंद्र वेगळंपण जपणारा...!!
ज्याच्या सौंदर्यात सारं अंगण नटून जावं
दारातल्या पारिजातकाने अवेळीच दरवळावं,
पाहताना त्याच्याकडे तिने हळूच लाजावं...!!
निरभ्र आकाशात त्याने त्याचं वेगळंपण जपावं,
चांदणं शिंपलेल्या अंगणात तुझ्या साथीला त्याने असावं ...!!
असा चंद्र प्रत्येकाच्या आयुष्यात असावा,
अढळपणे अविरत साथ देणारा...!!❤️
#कोजागिरी❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Monday, September 27, 2021
कधी कधी...!!
कधी कधी
तुमच्या दोन चांगल्या शब्दांनी काही चांगलं होणार असेल,
तर ते बोलायचे असतात,
कधी कधी,
वाईट बोलल्याने काही चांगलं होणार असेल,
तर वाईट बोलायचं असतं,
कधी कधी
मनात खूप काही असताना,
काहीच नसल्याचा आव आणायचा असतो,
कधी कधी
काही चांगलं होणार असेल तर,
भळभळणारी आपली जखम लपवायची असते,
कधी कधी
तुमच्या "नाही" ने काही चांगलं होणार असेल,
तर 'हो' असताना ही 'नाही' म्हणायचं असतं,
कधी कधी
काही चांगलंच होणार असेल
तर जसे आपण नसतो, तसेच आहोत अस भासवायचं असतं,
कधी कधी
काही चांगलं होण्यासाठी,
स्वतःला वाईट म्हणूवून घ्यायचं असतं,
आज नाही पण उद्याच्या उज्वलतेसाठी आज स्वतःला जाळायच असतं,
कधी कधी
काही चांगलं घडणार असेल तर 'स्व' बाजूला ठेवायचा असतो,
कधी कधी
एकरूप पाण्याच्या प्रवाहाचा आपण दुभाजक बनत असेल,
तर नकळत स्वतः बाजूला व्हायचं असतं,
कधी कधी
लडखडणाऱ्या पायांना हात द्यायचा नसतो,
त्यांना त्यांच्याच पायावर उभं राहू द्यायचं असतं,
कधी कधी
काही चांगलं होणार असेल,
तर प्रवाहाच्या उलट दिशेने चालायचं असतं,
जखमा होणार असल्या तरीही....!!
#जगणं❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Thursday, September 23, 2021
एक दुःख हवंच..!!
एक दुःखं हवंच,
मखमली पाऊलवाटेवरून चालताना,
रक्ताळलेल्या ठेचांची आठवण देण्यासाठी..!
एक तरी दुःखं हवंच,
उंच शिखरावर गेल्यावर,
मागे वळून पाहण्यासाठी..!
एक तरी दुःखं हवंच,
जेव्हा कधी ठेच लागली,
आर्त हाक दिली,
त्या हाकेला साद दिलेल्यांच्या आठवणीसाठी..!!
एक तरी दुःखं हवंच,
जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी..!
एक तरी दुःखं हवंच,
आकाशात उंच भरारी घेतल्यावर,
जमिनीवर येण्याची जाणीव देण्यासाठी..!
एक तरी दुःखं हवंच,
समोरच्याच्या मनाचा ठाव घेण्यासाठी,
दुःखी माणसाच्या दुःखाची खोली कळण्यासाठी..!
एक तरी दुःखं हवंच,
मखमली गादीवर झोपल्यावर,
जमिनीवरच्या अंथरुणाची आठवण देण्यासाठी..!
एक तरी दुःखं तर हवंच,
वातानुकूलित गाडीत बसल्यावर,
भर उन्हात चालताना अनवाणी पायांना बसलेल्या चटक्यांची आठवण देण्यासाठी..!
एक तरी दुःखं हवंच,
पंचतारांकित हॉटेलात जेवताना,
आईने घाईघाईने बांधून दिलेल्या भाकरीची आठवण देण्यासाठी..!
एक तरी दुःखं हवंच,
सिग्नलला गाडी थांबल्यावर,
पोटासाठी भीक मागणाऱ्यांच्या वेदना कळण्यासाठी..!
एक तरी दुःखं हवंच,
अलिशान बंगल्यात राहताना,
गावाकडच्या झोपडीत आईच्या कुशीतल्या उबेची आठवण देण्यासाठी..!
एक तरी दुःखं हवंच,
आपलं छत सुरक्षित असताना,
ज्यांची घरं उध्वस्त झाली ना त्यांच्या हृदयाचा ठाव घेण्यासाठी..!
एक तरी दुःखं हवंच,
मॉलमध्ये किंमती ड्रेस घेताना,
बापाने शेतात केलेल्या कष्टाची आठवण देण्यासाठी..!!
एक तरी दुःखं हवंच,
यशाची शिखरं चढताना,
प्रवासात अंधारून गेलेल्या पाऊलवाटेवर दिलेल्या साथीची आठवण देण्यासाठी..!
एक तरी दुःखं हवंच,
कवितेच्या शब्दांसाठी,
त्या शब्दांना धार येण्यासाठी..!!
एक तरी दुःखं हवंच,
एकांतात सोबत करण्यासाठी,
कुरवाळत आसवं ढाळण्यासाठी..!
एक तरी दुःखं हवंच,
आपल्यापासून आपणच खूप दूर गेल्यावर,
पुन्हा एकदा मागे वळून स्वतः ला शोधण्यासाठी..!
एक तरी दुःखं हवंच,
सुखाची किंमत कळण्यासाठी,
समाधानी जगण्याचा अर्थ कळण्यासाठी..!!
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
भरून आलेल्या...!!
भरून आलेल्या आभाळाकडून,
कोसळणं शिकावं..!
विरहाने तापलेल्या पृथ्वीकडून,
वाट पाहणं शिकावं..!
प्रेम भरल्या सरींकडून,
तहान भागवनं शिकावं..!
दूरवरून आलेल्या वाऱ्याकडून,
पानासंग गीत गाणं शिकावं..!
उगवणाऱ्या सूर्याकडून,
काळोखावर मात देणं शिकावं..!
मावळत्या सूर्याकडून,
निरोपाचा मोल जाणावं..!
मातीत गाडलेल्या बीजाकडून,
नवनिर्मितीचं गमक घ्यावं..!
इवलूश्या कळीकडून,
उमलण्याचं धैर्य शिकावं,
त्याकळीच्या फुलाकडून,
सुगंधाचं देणं शिकावं,
अन् फुलता फुलता एक दिवस,
कोमेजून सहजतेने मातीतही मिसळावं...!!
फक्त इतकं सहजतेने जमावं..!!
#निसर्ग_गुरू❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
बरं झालं ईठ्ठला..!!
बरं झालं ईठ्ठला नजर अंधुक जाहली,
जे जे वाईट ते दिसायची ईपत टळली..!
बरं झालं ईठ्ठला नजर अंधुक जाहली,
डोळ्यादेखत अन्याय पहायची नौबत ना आली..!
बरं झालं ईठ्ठला बहिरा मी जाहलो,
अनिष्ठ ऐकण्यातून सुटका मज जाहली..!
बरं झालं ईठ्ठला बहिरा मी जाहलो,
काळजात घुसणारे शब्दबाण लांबूनच रोखू शकलो..!
बरं झालं ईठ्ठला गुडघे कुरबुरु लागले,
दूर जाऊन माणसांतही एकटा मी ना राहिलो..!
हे सर्व असते असह्य मज जाहले,
म्हणून म्हणतो,
बरं झालं ईठ्ठला गोष्टी इसरायला लागलो,
ओझ त्या जखमांचं उतरू चाललो..!
बरं झालं ईठ्ठला जे केलं ते खूप,
म्हणूनतर दुखःबरोबर चाखू शकलो सुख....!!
#कहाणी_जेष्ठत्वाची❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Thursday, September 9, 2021
माणूस एक बंद पुस्तक...!!
माणूस म्हणजे एक बंद पुस्तकंच. त्या पुस्तकाची सुरवात आणि शेवट जरी सारखाच असलातरी, आतमधील पानं मात्र खूप विभिन्न, काही फाटलेली, पण व्रण ठेऊन गेलेली. काही आयुष्याच्या भागदौड मध्ये गळून खूप दूर जाऊन पडलेली तर काही चुरगळुन गेलेली, अगदी जीर्ण झाली तरी प्राणप्रिय जपलेली....!!
काही पानांची कितीही पारायण झाली तरीकाही अनटोल्ड स्टोरी सम नव्यानेच भासनारी....
प्रत्येक पान प्रत्येकाला समजेलच असं नाही आणि वाचकाने त्याचा अट्टहास ही धरू नये...!!
काही कथा आणि व्यथा या ज्याच्या त्यालाच भोगायच्या असतात त्यामुळे शहाण्याने खोलात जायचं नसतं....
कितीतरी जखमांचे हुंदके, उसासे आतल्या आत प्रत्येक पानात दडलेले असतात प्रत्येक शब्दांची एक नवी कहाणी बनून. जसे उसासे-हुंदके तसेच कधीच कोणाला सांगता न येणारे असे असंख्य क्षण...!!
असे काही क्षण ज्यांची पुन्हा कधीच आठवण ही होऊ नये,
तर असे काही क्षण जे कधीच विसमूर्तितही जाऊ नये.
अन् असेेही काही क्षण, क्षणभर डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर हसू आणणारे...!
असे प्रत्येक माणसाचे असंख्य क्षण हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यात जाऊन पडलेले असतात, बंद दाराआड...!
हे तेच क्षण असतात जे करतात आपल्याबरोबर सोबत प्रत्येक वाटेवर काळोखातल्या असो किंवा प्रकाशातल्या अन् आपल्याबरोबरच जगाचा निरोपसुध्दा घेतात.
माणसाला जवळचं म्हणून असं कोणी नसतंच मुळी, ज्यांच्याशी तो सगळं-सगळं खरं सांगून टाकेल, काहीतरी कुठंतरी, कधीतरी असुरक्षिततेची पाल कायम पिच्छा पुरवत असते.
बोलताना-ऐकताना कुठंतरी,कधीतरी ही असुरक्षिततेची पाल लुकलूकतेच आणि मग सुरू होतो लपंडावाचा जीवघेणा खेळ.
कोणाचंतरी काही गुपित आपल्याकडे ठेऊन, आपलं काही गुपित त्याच्याकडे ठेऊन अव्यक्त करार होतो, व्यवहार होतो आणि त्या करारावर नाती कायम हेलकावे घेत राहतात ... अन् मग नात्यांमध्ये फरफट कोणाची तरी होणारंच हे ठरलेले असतं, कधी याची तर कधी त्याची ... कितीही नाही म्हंटलं तरी प्रत्येक नातं स्वार्थापोटीच बनलं जातं अन् राखलं सुध्दा जातं... कदाचित खुपजण या मताशी असहमत असतीलही पण हे मत नाकारले जाईल असं होणार नाही....
एकांतात मनाला नेहमी प्रश्न सतावत राहतो. हे जे बंद पुस्तक आहे, हे कधी उघडतं का..? ही बंद दारं खरंच कोण ठोठावतं का?
ठोठावलंच तर ही मनाच्या अडगळीची बंद दारं कधी उघडतील का..??
नाही म्हणजे उघडलीच तर ते कोणत्या स्वरूपात उघडतील...??
हा हा हा इथंसुद्धा असुरक्षितता😬😀 म्हणजे स्वतःच्या विचारांवर सुद्धा हे भूत स्वार असतं. याचपायी माणूस कायम धावत राहतो कधी खऱ्यागोष्टींपासून तर कधी खोट्यापासून...!
अन् यांतच हे बंद पुस्तक अजून कुलूप बंद करण्यासाठी माणूस नवनवे तंत्र अवगत करतो यात कधी घसरतो तर कधी क्षितिज गाठतो...!! अन् पुन्हा त्या बंद पुस्तकाची पान लिहीत राहतो, दिगंतरापर्यंत...!!
जे पुस्तक तो स्वतःसुद्धा वाचू शकत नाही पण मात्र त्या पुस्तकाची पानं वाढत जातात दिवसोंदिवस...!! पण कधीतरी काही क्षण का होईना पुस्तक उघडण्याचा मोह अनावर होतो आणि मग तेव्हा माणूस, माणूस राहत नाही तो एक विचार बनतो..
जो विचार कायम वाहत राहतो, पाषाणात सापडलेल्या जिंवत पाण्याच्या झऱ्यासारखा..तेव्हा त्याला नसते तमा कशाचीच, नसते पर्वा कडक दुष्काळाची, ना पाषाणाच्या दाहकतेची.
हे बंद पुस्तकाचं ओझं वागवता वागवता आयुष्याची संध्याकाळ होते.अशी संध्यावेळ जेव्हा सूर्य आयुष्यभराची दाहकता पोटात साठवून अस्तचलास निघालेला असतो..!!
आयुष्याच्या संध्याकाळी मंद,शांत कोमल किरणांचा आभास देऊन, कसलाही आततायीपणा न करता, कसलीही घाई न करता, जीवनाच्या मिथ्या असणाऱ्या मोह, लोभ, मत्सराच्या डोंगराला मागे सोडून सर्वांच्या दृष्टीआड होत, मंद पावलं टाकत माघारी फिरतो, क्षितिजापल्याड जातो.
आयुष्याच्या सकाळ धामधुमीत उत्साहात सुरू होऊन, आसमंत प्रकाशमय करून, कर्तृत्वाच्या प्रकाशाने तळपत राहून आजची ही संध्याकाळ झालेली असते.यात एक पुस्तक मिटून जात असतं न उघडताच, ज्या पुस्तकाची पुनरावृत्ती कधीच न होण्यासाठी...!!
हे अमूल्य, अतुलनीय पुस्तक एकाही वाचकाविना अमर होतं, बंद होतं अगदी कायमचं....!!!
#आयुष्याचं_पुस्तक❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Sunday, August 1, 2021
मैत्री..!!
Tuesday, July 20, 2021
बा विठुराया...!!
नजर रोखून त्या दिवे घाटावर,
यंदाही वाट पाहत उभा विटेवर,
नाही दिसला त्यास एकही वारकरी,
राहिले हात तसेच त्याचे कमरेवरी,
नाही आली ऐकू काकडा आरती,
नाही जमले यंदा वारकरी,
अन् तो मात्र तसाच उभा विटेवर,
नजर रोखून दिवे घाटावर,
बस्स झालं रे बा विठुराया,
संपुदे ही काया,
धाव घेण्यास पंढरी,
अवघा महाराष्ट्र तळमळतो...!
दर्शन घेण्यास,
आजही वाट तुझीच पाहतो,
तू गेला होता नारे,
जनीच्या घरी,
तूच वाचवलं ना,
गोऱ्याच लेकरू,
मग साकडं तुज मजकडून,
संपुदे हे संकट,
भेटुदे तुज परत,
बा विठुराया
माझा वारकरी,
राहिला यंदाही घरी,
तू तसाच विटेवरी,
हात तुझे कमरेवरी...!!
#वारकरी
#एकादशी
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Wednesday, June 2, 2021
उत्तररात्रीचा पाऊस...!!
दिवसभराच्या धावपळीने थकलेलं शरीर बेड वर पडताच झोपी गेलं होतं. पावसाळा सुरू होऊन दहा-एक दिवस उलटून गेले होते, पण अजूनतरी म्हणावा असा पाऊस सुरू झाला नव्हता. पण आज काही वेगळं भासत होतं. सांजवेळीचा सूर्य अगदी झाकोळून गेला होता. काळेकुट्ट ढग वाऱ्याबरोबर रुंदन घालत होते. यथावकाश धो-धो पाऊस कोसळेल असंच झालं होतं. पण तसं पाहायला गेलं तर त्याच्या कोसळण्याला अजून अवधी होता.
पण तश्यातच खिडकीतून आलेल्या वाऱ्याच्या थंडगार झोताने जाग आली. उठून, खिडकीत येऊन उतुंग आभाळाकडे पाहिलंतर कातरवेळेच्या काळ्याकुट्ट ढगांची जागा आता टिपूर चांदण्यांनीं घेतली होती. आताच पाऊस पडून गेल्यामुळे आभाळ अगदी रीतं झालं होतं.
हवेतला गारवा वाढला होता, रात्र जशी चढत गेली तसा गारवा पण वाढत जातोय असा भास होत होता. खिडकीतल्या रातराणीच्या झाडाच्या पानांवरचे पावसाचे इवलूसे थेंब वाऱ्याच्या झोताबरोबर चेहऱ्यावर पडले आणि त्याचक्षणी मी लोटला गेलो आठवणींच्या अखंड-अथांग सागरात.
जेवढ्या चांदण्या खुल्या आभाळात दिसत होत्या, त्यांच्या प्रत्येक लुकलूकण्यात आठवणींचे क्षण जमा झाल्याचा भास होत होता... या ओल्या रात्रीच्या एकांतात अगदी हरवून गेलो. आजूबाजूच्या परिस्थितीचा विसर पडला. थकवा-झोप दूर पळून गेली. लुकलूकणारी प्रत्येक चांदणी कधी बुडवत तर कधी तरंगवत आनंदाचे सप्तरंग उठवत होती.
मग सुरू झाला तो भूतकाळाची डायरी चाळण्याचा लपंडावाचा खेळ. प्रत्येक क्षणांची गोळाबेरीज-वजाबाकी म्हणजेच हिशोबाचा मेळ बसवणं सुरू झालं.बेरीज वजाबाकीतच रात्र सरत चालली होती. पण हिशोब काही लागत नव्हता.कधी पापण्या ओल्या झाल्याचा भास तर कधी स्मित हास्याची लहर सर्वांगातून जात होती.
ते पुण्यातले पावसाळी दिवस, कधी छत्री विसरली तर कधी मुद्दामच विसरवलेली छत्री, तर कधी आपल्याच धुंदीत विचारमग्न होऊन पावसाचा विसर पडून एकट्याने कोणाच्या आधाराविना केलेला प्रवास.तर कधी कोणी धावत येऊन खांद्यावर हात ठेवून छत्रीत घेतल्याच्या आठवणी. अश्या अनेक आठवणी होत्या या पावसाच्या...!!या सर्व आज जश्याच्या तश्या आठवत होत्या.
आज कसलेच भान राहीलं नव्हतं. आठवणींच्या गर्तेत बुडालो असतानाच, दूरच्या झाडावरच्या नेहमीच्या कोकिळेने शीळ वाजवली. त्यामुळे अचानक भानावर आलो, रातराणीचा दरवळ ही बहरला होता, तो दरवळ हृदयात साठवत गेलो, ती टपटप पडणारी फुलं सुद्धा आठवणी बनून राहणार होती चिरकाल...!!
रात्र आता रातराणीच्या शेंड्यावरून उतरणीला लागली होती. पूर्व क्षितिजावर काहीवेळाने तांबडं फुटणार होतं, पहाट होण्याची ती चाहूल होती.
घड्याळाच्या काट्याने तीनचा टोल देऊन, वेगाने पुढं सरकत होता. त्याला थांबवणं कोणाच्याच हातात नव्हतं, नसतं.
आजचे हे क्षणही उद्याची आठवण बनणार आहेत, हे माहीत असूनही यांना ही खुशी-खुशीने सोडण्यातच धन्यता असते.
पुनश्च एकदा आता रित्या आभाळात काळेकुट्ट ढग दाटून यायला लागलेत. पुन्हा एकदा अशीच रात्र कोसळणार आहे आभाळ रीतं करण्यासाठी....!!
जसं होतं मन रीतं ओल्या पापन्यांनी...!! तसं आभाळ होतं रीतं अश्या रात्रींनी....कोणाला कानोकान खबर न देता...!!
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Friday, May 28, 2021
रात्र...!!
. शांत वाटणारी तू ही,
न बोलता तू काही,
खूप सारे हितगुज करी,
तू सरताना येती आठवणींचे दाटून नभ
अन् करती न गर्जताही सर्वांग चिंब,
शहारे आणणारा दूरदेशीचा तो वारा,
वाटे मज सम कोणी मोरपीस फिरवला,
खिडकीतून येणारी चंद्राची ती छाया,
वाटे मज कोण आले अवेळी भेटाया,
दारातल्या बागेत बकुळ दरवळला,
वाटे कोण्या परीचा दूरदेशीचा अत्तर पसरला,
अश्यातच रात्र सरत गेली,
नव्याने पहाट पावलं टाकीत आली,
कोकिळेने नेहमीची इशारत केली,
ही शांत वाटणारी रात्र सरली,
आठवणींचे नभ रिकामे करत,
भूतकाळात विलीन झाली,
पुन्हा तू येशील,
पुन्हा नभ दाटतील,
पुन्हा भास होतील,
नव्याने....!!
#रात्र
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Sunday, May 23, 2021
श्रीकृष्णा...!!
तू दाखवला अर्थ प्रेमाचा,
तू नाही वाजवली फक्त बासरी,
तू बनवले विश्व आमुचे सप्तसुरी,
तू होता गोकुळातला गोपाळ,
अन् अधर्माचा कर्दनकाळ,
तू नाही हाकल्या फक्त गोकुळातल्या गाया,
तू दिली आम्हा भूतदया,
तू अर्जुनाच्या रथाचा होता सारथी,
पण जीवनाचा लगाम तर तुझ्याच हाती,
तू होता महानायक महाभारतातला,
तू श्रेष्ठ यादवकुळातला,
तू दिले वचन आम्हांस गीतेत,
'यदा यदा हि धर्मस्य' म्हणत ,
वाट पाहतो हा सुदामा,
कधी येईल त्याचा तो कान्हा,
कान्हा,
कसा नाही दिसत तुज अजून द्रौपदीचा छळ?
कसं नाही भेटत तुज येण्यास कारण प्रबळ?
का नाही दिसत तूज अजून ग्लानी धर्माची?
का नाही वाटत अजूनही तुज गरज येण्याची?
कान्हा,
आयुष्याच्या बासरीतील मधुर स्वर ऐकवायला ये,
गोमातेचा-गोपालांचा गोपाळ बनून ये,
कंसाचा(विकृतींचा) काळ बनून ये,
सुदामाचा यार बनून ये,
आजच्या अर्जुनाचा सारथी बनून ये,
द्रौपदीचा संकटमोचक सखा बनून ये,
अन् हो राधेचा कान्हा बनून अवश्य ये,
कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये!....
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
【 Sketch by Reshma】
Friday, May 21, 2021
मंतरलेले दिवस..!!!
विद्यापीठाची सैर करायचीय,
मंतरलेल्या दिवसांची अनुभूती घ्यायचीय.
हॉस्टेल मिळण्यासाठीची ती धावपळ पुन्हा करायचीय,
ज्यांना मिळालं नव्हतं त्यांना रेक्टरांची नजर चुकावून रूममध्ये घ्यायचंय,
नाहीतर कधी-कधी तर Tutorial Hall मध्येच झोपून जायचंय.
पुन्हा एकदा,
त्या रामण हॉलमध्ये लेक्चरला बसायचंय,
पाठक सरांचं Quantum Mechanics चं लेक्चर मात्र मन लावून ऐकायचंय, (डोक्यावरून जाणारं असलतरी....)
कधी लेक्चरला झोप आली तर हळूच एका चॉकलेटचे 2-3 भाग करून सर्वांमध्ये वाटून खायचेत...!
पुन्हा एकदा,
इंटर्नलच्या अगोदर त्या tutorial हॉल मध्ये बसून बेधुंद अभ्यास करायचाय.
न समजलेलं समजून घ्यायचंय, समजलेलं समजून सांगायचंय.
पुन्हा एकदा,
Experiment ची Viva देताना घाबरून जायचंय तर कधी-कधी सरांचीच viva घ्यायचीय,
सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6:15 पर्यंत तासन्तास बसून फिझिक्स डोक्यात साठवायचंय.
कधीच न पाहिलेले tutorial चे ते प्रॉब्लेम सोडवायचेत.
पुन्हा एकदा,
जयकरमध्ये 12-12 तास अभ्यास करायचाय,
अन् प्रॅक्टिकल परीक्षेची Viva घेणाऱ्या सरांचं नाव पाहूनच धरधरून घामेजून जायचंय.
पुन्हा एकदा,
प्रॅक्टिकल करताना,सेंट्रल हॉलमध्ये लेक्चर ऐकताना कोणाचीतरी खोड काढायचीय आणि कंटाळवाणं लेक्चर सुद्धा मजेत पार करायचंय.
मित्राचा- मैत्रिणीचा रिझल्ट खराब आला म्हणून त्याला-तिला विश्वास द्यायचाय,
पुढच्यावेळी तू century मारणार हे मनावर ठसवायचंय.
असंच पुन्हा एकदा छान फ्रेन्ड सर्कल बनवायचंय.
पुन्हा एकदा,
अनिकेतचा सहा रुपयांचा वडापाव खायचाय,
अण्णांनी बनवलेल्या मिसळचा आस्वाद घ्यायचाय,
रात्री 12-1 वाजता चतुरशृंगी समोरचे पोहे खायचेत.
पुन्हा एकदा,
"स्पंदन" आणि "फ्रेशर्स"ला हुंदडायचंय,
जगाचा विसर पडून दंगा करायचाय,
आणि दंगा करतच अख्या युनिव्हर्सिटीभर भटकायचंय.
पुन्हा एकदा,
Night outs अनुभवायच्यात,
एक्साम झाली की ट्रेकचे प्लॅन्स करायचेत,
गणपतीत ढोल- ताशाच्या तालावर बेधुंद नाचायचं.
पुन्हा एकदा,
पुन्हा एकदा,
मेसचा बेचव टिफिन बॅडमिंटन कोर्टवर गोल करून गप्पा मारत चविष्ट बनवायचाय,
कोण्या मित्राने घरून आणलेल्या टिफिनवर तुटून पडायचंय.
पुन्हा एकदा,
विद्यापीठातला पाऊस अनुभवायचाय, त्या पाऊसात बेधुंद नाचायचंय.
आणि फक्त डोळ्यातच स्वप्न रंगवायचेत गुलाबी छत्रीचे, छत्रीतल्या गुलाबाचे...!!
पावसामुळे खड्यात साचलेलं पाणी पायाने उडवायचंय,
फांदीवर साचलेल्या पाण्याने मात्र कोणालातरी भिजवायचंय.
अन् पुन्हा एकदा घरची आठवण आली म्हणून कोपऱ्यात बसून आसवं ढाळायचीत.
पुन्हा एकदा,
ज्यांचे हात सुटले त्यांचा हात घट्ट पकडायचाय,
नकळत घडलेल्या चूका सुधारायच्यात,
पुन्हा एकदा छोट्या कारणावरून अबोला धरलेल्याला घट्ट मिठी मारून भरभरून बोलायचंय.
ज्याच्याशी मैत्री करू शकलो नाही, ज्यांना मदत करू शकलो नाही, त्याच्याशी मैत्री करायचीय, मदत करायचीय.
पुन्हा एकदा वाढदिवसाला बेधुंद नाचायचं आहे.
पुन्हा एकदा,
चांदणी रात्र असताना, चंद्र पश्चिमेला सरकत असताना पहाटेपर्यंत गप्पा मारत बसायचंय.
पुन्हा एकदा महिन्याचे पैसे संपले म्हणून एकाच ताटात जेवायचंय..!
पुन्हा M Sc चा शेवटचा पेपर झाल्यावर मेन बिल्डिंगला जाऊन भावना शून्य नजरेनं बसायचंय ,नकळतच झालेल्या ओल्या पापण्या पुसायच्यात.
सतत भेटत रहायची कधीच पाळली न जाणारी वचनं द्यायचीत.
पुन्हा एकदा,
हॉस्टेल सोडताना, रूमला कुलूप लावताना, रेक्टरच्या हातात चावी देताना,आसवांना वाट मोकळी करून घ्यायचीय..!
कदाचित पुन्हा एकदा,
जड पावलांनी युनिव्हर्सिटीला, त्या पाऊलखुणांना, त्या आठवणींना, मागे सोडत चालत रहायचंय निसर्ग नियमाप्रमाणे दिगंतरापर्यंत, न थकता......!!
कारण या पावलांना अधिकार नाहीय थकण्याचा-थांबण्याचा...!!
कारण स्वप्नांचं क्षितिज अजून खूप लांब आहे, कधी-कधी वाट वाकडी केल्याने तर ते अजूनच लांब सरकलंय.
पण जरी पावलांना अधिकार नसला थांबण्याचा, तरी आठवणींचा हा अधिकार विधात्याने अबाधीत ठेवलाय म्हणून हा प्रपंच...!!
आयुष्याच्या प्रवासाच्या या वाटेवर काही क्षण सुटून जातात, काही माणसं त्यांच्या थांब्यावरून उतरून जातात. काही मागे उरतात. पण या सर्वांचे आठवणींचे व्रण मात्र राहतात...! मग कधीतरी ते क्षण अवचित भेटायला येतात, तेव्हा हेच क्षण प्रवासातल्या अंधाऱ्या रात्रीत चांदण्यांचं काम करतात...!! हे निसटून गेलेले क्षण जपून ठेवायचे असतात....!
कुपितल्या दुर्मिळ अत्तराप्रमाणे....!!बकुळीच्या फुलांच्या मंद, पण भुलवणाऱ्या सुगंधाप्रमाणे.....!!!
#मंतरलेले_दिवस❤️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
【 आयुष्याच्या या प्रवासात भेटलेली प्रत्येक व्यक्ती मला घडवत गेली त्या सर्वांचा मी ऋणी आहे विद्यापीठातले दिवस, जगलेले क्षण म्हणजे जीवनाच्या वाटेवरच्या बागेतील फुलं,तीच फुलं मी गुंफण्याचा असफल प्रयत्न केला आहे प्रत्येक वाक्य कोणत्यातरी घटनेचा संदर्भ देणारं आहे वाचकाने शोधावं😀 #lots_of_love❣️】
Wednesday, May 12, 2021
तू तुझाच साथी...!!
निर्णय चुकतील, चुका होतील, तू सुधारत रहा,
ठेच लागेल, रक्त येईल, जखम होईल, तू सावरत रहा,
माणसं येतील, माणसं जातील, तू स्वीकारत रहा,
प्रतिकूल परिस्थितीत तू लढत रहा,
अनुभवातून शिकत रहा,
फुलपाखरं येतात फुलं बहरल्यावर,
तसेच निघून जातात कोमेजल्यावर,
पकड स्वतःच स्वतःचा घट्ट हात,
नाही होत धोका फितुरीचा ऐन युद्धात...!!
#संध्याकाळ #पाऊस
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Sunday, May 2, 2021
अवकाळी...!!
अवकाळी पाऊस होतो,
तसा अवेळी बकुळ सुध्दा बहरतो,
परिमळ त्या रातराणीचा दूरवर पसरतो,
खिडकीतून येणारा थंड वारा,
उगाच आठवणींच्या गावा नेतो,
रात्रीच्या या भयाण शांततेत,
पाऊस मात्र बेधुंद कोसळतो,
जसा अंगणात,तसाच मनात....!!
#अवकाळी_पाऊस❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Saturday, April 17, 2021
प्रवासी..!!!
ना तमा मज ऊन-वाऱ्याची,
पाऊसकाळाची,
आस फक्त पैलतीरावर जाण्याची,
लडखडलेच पाय कधी,
लागून ठेच झालीच जखम कधी,
तरी थांबणं हे रक्तात नाही,
वाटेवरून त्याच चालताना,
उमटतील अनेक पाऊलखुणा,
त्याच सांगतील कहाण्या,
प्रत्येक पावलांच्या, प्रत्येक जखमांच्या,
म्हणून नको मज सहानुभूती,
नको मज आता ही अनुभूती,
फक्त इतकंच साकडं ईश्वरास,
छोटेखानी हा प्रवास,
दाखवावी वाट वाटाड्यास,
भागवावी भूक भुकेल्याची,
द्यावं ओंजळीत पाणी तहानलेल्याच्या,
कधी काळ्याकुट्ट अंधारात ,
दाखवावा किरण प्रकाशाचा,
द्यावा चाचपडणाऱ्यास हात मदतीचा,
जे जे चांगलं तेच उरावं,
जे वाईट ते जळून खाक व्हावं,
अनंतात विलीन होताना,
खंत नसावी निरोप घेताना,
असावं स्मित हास्य नवजात बालकासम
करावा महोत्सव कातरवेळीच्या सुर्यासम.....!!!
#प्रवास❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Sunday, March 21, 2021
कवितेची गोष्ट...!!
तू वारू भावनांचा,
लगाम त्यास शब्दसुमनांचा,
तू असते अबोल शब्दांची कहाणी
आणते कधी डोळ्यात पाणी,
तू भावनांच्या गर्दीतली पाऊल वाट
देते मज एकांतातही साथ....!!
#कविता
#world_poetry_day❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Thursday, March 11, 2021
रोपटं मैत्रीचं...!!
बहरला असेल गुलमोहर;
सुगंध त्या बकुळाचा,
गेला असेल दुरवर;
कोकिळा ही गात असेल गाणी,
पश्चिम क्षितिजावर सूर्यही थबकला असेल क्षणभर;
इवलसं रोपटं ते मैत्रीचं,
असते सावली उन्हातली,
बनते छत्री पावसातली ...!!
#मैत्री❣
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Sunday, February 28, 2021
आईसाहेब:- एक योद्धा...!!!
आम्ही तीन भावंडं पहिली ताईसाहेब, सीमा आणि मी शेंडेफळ ....आम्हां तिघांमध्ये जे काही चांगलं असेल तर ते फक्त आमच्या आईसाहेबांमुळेच....!!
उंच शरीरयष्टी, सावळा चेहरा, त्यावरती अगदी ठळक दिसणारं आई भवानीसारखं गोलाकार लालबुंद कुंकू झुबकेदार केसांचा बरोबर मधोमध पाडलेला भांग., गळ्यात विठ्ठलाची-तुळशीची माळ अशी लोभस दिसणारी माझी आई.....!!
आई तशी तापट स्वभावाची , कोणाचं तिळभरही वावगं खपवून न घेणारी, उत्तरास प्रतिउत्तर देणारी, चुकीचं वाटलं तर तोंडावर फटदिशी बोलणारी असं हे व्यक्तिमत्व ...!!
पण आई जेव्हा तिचा भूतकाळ सांगते तर अंगावर शहारे येतात, काहीतरी काल्पनिक ऐकतोय,असं वाटायचं. पण सगळं सत्य होतं, जरी ते कटू असलंतरी सत्यच होतं जे स्वीकारावं लागणारं...!!
1972 च्या दुष्काळात सगळेच होरपळून निघाले होते आणि त्यांनतरच्या काळात आमच्या आई-अण्णांचा लग्न झालं...!! तेव्हा सासुरवास हा लेकीच्या पाचवीला पुजलेला होता , असंच म्हणावं लागेल... तश्यातही आईने आम्हां तीनही भावंडांवर संस्काराची जी बीजे रोवली त्यामुळेच आयुष्यात आम्ही काहीतरी ओळख मिळवू शकलो..!अन् हे सर्व शक्य झालं ते फक्त माझ्या आईमुळेच...!!
आईने जुन्या काळातील सगळा सासुरवास भोगून, फक्त लेकरांच्या तोंडाकडे बघून सगळं सहन केलं, प्रसंगी यातना भोगल्या, पण हार मानली नाही.... आम्हाला मोठं केलं, संस्कार केले आणि संवेदनशील "माणूस" बनवलं....!!आजही आम्ही जेव्हा-जेव्हा घरातून बाहेर पडत असू तेव्हा-तेव्हा आई हेच सांगते,
" कोणाला काही म्हणू नको"; "कोणाकडे वाईट नजरेनं पाहू नको" ; "ईश्वरावर भरोसा ठेव,विठ्ठल सगळं नीट करेन" पण वाईट मार्ग पकडू नको....!!
हे तिचे नेहमीचे वाक्ये....!! पण त्यात खुप मोठं जीवनाचं सार आहे, हे आता कळतं. जेव्हा कधी समाजात या संस्कारांचं कौतुक होतं ,तेव्हा कृत्य-कृत्य वाटतं आणि आपसूकच मान लवते ती आईच्या पायाशी....
सव्वीस जणांच्या कुटूंबात फक्त ताईसाहेब आणि सीमा या दोघीच मुली, बाकी सगळी आम्ही मुलं....
एकत्र असताना बऱ्याच गोष्टींची वानवा असायची आणि मग आईच्या मनाची तगमग व्हायची... जरी graduate नव्हती माझी माय तरी तिने नाही केला कधी मुलगी आणि मुलगा यात भेदभाव...!! घरातूनच समानतेचे धडे दिले....!!काळ लोटत गेला, दिवस सरले आणि जे हवं ते मिळू लागलं हे सर्व आमच्या आईच्या योगदानाने...!! हे सर्व शक्य झालं ते फक्त आईमुळे आणि तिच्या संस्कारातून एक छान कुटूंब बनलं...!!
आता घर अगदी आनंदाने गजबजून गेले, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आणि तिने यावर विरजण पाडलं...!! तरीही माझी माय खचली नाही नव्याने आवरायला घेतलं ।... आणि पुन्हा नव्याने उभी राहिली,आम्हां सर्वांना धीर दिला, काहीतरी मार्ग निघेल असं आश्वस्त केलं...!! स्वतःच दुःख दूर लोटलं आणि पुन्हा उभारी दिली...!अशी माझी आई, खूप संकट पार करून आज आम्हाला या वळणावरती आणलं...!!
आजही घर सोडताना तिच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, खूप बडबड करेन, नको-नको ते बोलेल,पण त्यातूनही तिचं प्रेम आणि काळजी दिसते...!! कामाच्या ताणामुळे चिडचिड करते पण तरीही ती मायेचा सागर आहे...!!
आई असतेच मायेचा सागर पण त्याच सागराच्या पोटात असंख्य भूकंप,धरणीकंप चालू असले तरी पृष्ठभागावर त्याचा लवलेशही दिसत नाही याचं मृत्तिमंत व्यक्तिमत्त्व म्हणजे आईसाहेब.....!!
एक छोटं कुटूंब सूंदर विश्व बनवण्यात सिहांचा वाटा आईसाहेबांचा आहे....त्या आईविषयी माझ्यासारख्या पामराने काय लिहावं
स्पंदनातून इतकंच मागेन ईश्वरास...
"इतकंच आयुष्य दे बा विठुराया,जे आईच्या आधी संपू नये आणि आई नंतर उरु नये....!!!"
#आई❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Sunday, February 14, 2021
साथ...!!
नको मज तुझा एक दिवस हात हाती,
पण असावा आयुष्याच्या संध्याकाळी,
समुद्र किनारी बसुनी,
पाहावी कातरवेळ तुझ्या नयनांनी,
थरथरणारा हात तो,
होई शांत तुझ्या स्पर्शानी,
ती कातरवेळ,
ती संध्यावेळ आयुष्याची,
अन् तेव्हा असावी साथ तुझी...!!
#कल्पनेतील_ती
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
Thursday, January 28, 2021
वळून पाहणं...!!!
Monday, January 18, 2021
वाट एकट्याचीच...!!!
शोध...!!
शीण दिसाचा तोलायला सांज अप्रूप भासे, पुनवेच्या चांदण्याला ओलावल्या पापण्या हलकेच दिसे... भार हा दिसाचा रात अलगद पेलते, उतरणीला जाताना गूज...

-
"देखो मगर प्यार से" ट्रक च्या पाठिमागे लिहिलेलं हे तीन शब्द जीवनाविषयीच तत्वज्ञान सांगून जातात...!! फुलांनी बहरलेल्या ब...
-
चल गड्या, आता पसारा आवरायला घेऊ, माळ्यावरच्या गोष्टींची थोडी निवड करू, थोडं तुझं, थोडं माझं समजून घेऊ, अडगळीवरची धूळ थोडी साफ करू..!! आपलं, ...
-
हेच आग विझवणा रं पाणी, दुष्काळात कधी पेट घेतं हे कळतंच नाही ....!! 'पाणी जपून वापरा' हे वाक्य आम्हांला नवीन नाही माय...
-
सांजवेळी बसावं असंच गावातील उंच टेकडीवर,.. !!अश्या जागेवर की जिथुन दिसेल सगळं गाव , गावात येणारी धुळीची वाट , आपलं घर , आपलं अंगण...
-
मागील वर्षी पाऊस नसल्यामुळे, यावर्षी धरतीवरचे सर्वच जीव-जंतू , झाडे-वेली, पावसाची खूप आतुरतेने वाट पाहत होते...!! अन् काही ओळी स...
-
दिवसभराच्या धावपळीने थकलेलं शरीर बेड वर पडताच झोपी गेलं होतं. पावसाळा सुरू होऊन दहा-एक दिवस उलटून गेले होते, पण अजूनतरी म्हणावा असा पा...
-
काही ठिकाणी गेल्यावर तुम्ही स्वतः हरवता त्या सुंदर विश्वात ....!! तुम्ही स्वतःच स्वतःचे होऊन जाता; अन् माणूस जेव्हा स्वतःला...
-
प्रवासी या वाटेवरचा, अनेक चुकांच्या साक्षीला, 'तू' कायम सोबतीला, मी मात्र साक्षीदार माफीचा..!! अल्लडपणात धूळ उडवली, अगदी अस्पष्ट मू...
-
एके दिवशी मेट्रो सिटी असणाऱ्या पुण्याच्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जे एम रोडवरून फिरत असताना , एक 8-9 वर्षाचा मुलगा अंगावर मळलेले क...
-
एखाद्या संध्याकाळी स्मशानातून एक फेरी मारून तर पहा काय दिसेल....!! ऐशोआरामी अगदी श्रीमंतीत जन्मलेला आणि गरीबीत हालाकीत...