Friday, May 21, 2021

मंतरलेले दिवस..!!!

पुन्हा एकदा,
विद्यापीठाची सैर करायचीय,
मंतरलेल्या दिवसांची अनुभूती घ्यायचीय.
हॉस्टेल मिळण्यासाठीची ती धावपळ पुन्हा करायचीय,
ज्यांना मिळालं नव्हतं त्यांना रेक्टरांची नजर चुकावून रूममध्ये घ्यायचंय,
नाहीतर कधी-कधी तर Tutorial Hall मध्येच झोपून जायचंय.
पुन्हा एकदा,
त्या रामण हॉलमध्ये लेक्चरला बसायचंय,
पाठक सरांचं Quantum Mechanics चं लेक्चर मात्र मन लावून ऐकायचंय, (डोक्यावरून जाणारं असलतरी....)
कधी लेक्चरला झोप आली तर हळूच एका चॉकलेटचे 2-3 भाग करून सर्वांमध्ये वाटून खायचेत...!
पुन्हा एकदा,
इंटर्नलच्या अगोदर त्या tutorial हॉल मध्ये बसून बेधुंद अभ्यास करायचाय.
न समजलेलं समजून घ्यायचंय, समजलेलं समजून सांगायचंय.
पुन्हा एकदा,
Experiment ची Viva देताना घाबरून जायचंय तर कधी-कधी सरांचीच viva घ्यायचीय,
सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6:15 पर्यंत तासन्तास बसून  फिझिक्स डोक्यात साठवायचंय.
कधीच न पाहिलेले tutorial चे  ते प्रॉब्लेम सोडवायचेत.
पुन्हा एकदा,
जयकरमध्ये 12-12 तास अभ्यास करायचाय,
अन् प्रॅक्टिकल परीक्षेची Viva घेणाऱ्या सरांचं नाव पाहूनच धरधरून घामेजून जायचंय.
पुन्हा एकदा,
प्रॅक्टिकल करताना,सेंट्रल हॉलमध्ये लेक्चर ऐकताना कोणाचीतरी खोड काढायचीय आणि कंटाळवाणं लेक्चर सुद्धा मजेत पार करायचंय.
मित्राचा- मैत्रिणीचा रिझल्ट खराब आला म्हणून त्याला-तिला विश्वास द्यायचाय,
पुढच्यावेळी तू century मारणार हे मनावर ठसवायचंय.
असंच पुन्हा एकदा छान फ्रेन्ड सर्कल बनवायचंय.
पुन्हा एकदा,
अनिकेतचा सहा रुपयांचा वडापाव खायचाय,
अण्णांनी बनवलेल्या मिसळचा आस्वाद घ्यायचाय,
रात्री 12-1 वाजता  चतुरशृंगी समोरचे पोहे खायचेत.
पुन्हा एकदा,
"स्पंदन" आणि "फ्रेशर्स"ला  हुंदडायचंय,
जगाचा विसर पडून दंगा करायचाय,
आणि दंगा करतच अख्या युनिव्हर्सिटीभर भटकायचंय.
पुन्हा एकदा,
Night outs अनुभवायच्यात,
एक्साम झाली की ट्रेकचे प्लॅन्स करायचेत,
गणपतीत ढोल- ताशाच्या तालावर बेधुंद नाचायचं.
पुन्हा एकदा,
पुन्हा एकदा,
मेसचा बेचव टिफिन बॅडमिंटन कोर्टवर गोल करून गप्पा मारत चविष्ट बनवायचाय,
कोण्या मित्राने घरून आणलेल्या टिफिनवर तुटून पडायचंय.
पुन्हा एकदा,
विद्यापीठातला पाऊस अनुभवायचाय, त्या पाऊसात बेधुंद नाचायचंय.
आणि फक्त डोळ्यातच स्वप्न रंगवायचेत गुलाबी छत्रीचे, छत्रीतल्या गुलाबाचे...!!
पावसामुळे खड्यात साचलेलं पाणी पायाने उडवायचंय,
फांदीवर साचलेल्या पाण्याने मात्र कोणालातरी भिजवायचंय.
अन् पुन्हा एकदा घरची आठवण आली म्हणून कोपऱ्यात बसून आसवं ढाळायचीत.
पुन्हा एकदा,
ज्यांचे हात सुटले त्यांचा हात घट्ट पकडायचाय,
नकळत घडलेल्या चूका सुधारायच्यात,
पुन्हा एकदा छोट्या कारणावरून अबोला धरलेल्याला घट्ट मिठी मारून भरभरून बोलायचंय.
ज्याच्याशी मैत्री करू शकलो नाही, ज्यांना मदत करू शकलो नाही, त्याच्याशी मैत्री करायचीय, मदत करायचीय.
पुन्हा एकदा वाढदिवसाला बेधुंद नाचायचं आहे.
पुन्हा एकदा,
चांदणी रात्र असताना, चंद्र पश्चिमेला सरकत असताना पहाटेपर्यंत गप्पा मारत बसायचंय.
पुन्हा एकदा महिन्याचे पैसे संपले म्हणून एकाच ताटात जेवायचंय..!
पुन्हा M Sc चा शेवटचा पेपर झाल्यावर मेन बिल्डिंगला जाऊन भावना शून्य नजरेनं बसायचंय ,नकळतच झालेल्या ओल्या पापण्या पुसायच्यात.
सतत भेटत रहायची कधीच पाळली न जाणारी वचनं द्यायचीत.
पुन्हा एकदा,
हॉस्टेल सोडताना, रूमला कुलूप लावताना, रेक्टरच्या हातात चावी देताना,आसवांना वाट मोकळी करून घ्यायचीय..!
कदाचित पुन्हा एकदा,
जड पावलांनी युनिव्हर्सिटीला, त्या पाऊलखुणांना, त्या आठवणींना, मागे सोडत चालत रहायचंय निसर्ग नियमाप्रमाणे दिगंतरापर्यंत, न थकता......!!
कारण या पावलांना अधिकार नाहीय थकण्याचा-थांबण्याचा...!!
कारण स्वप्नांचं क्षितिज अजून खूप लांब आहे, कधी-कधी वाट वाकडी केल्याने तर ते अजूनच लांब सरकलंय.
पण जरी पावलांना अधिकार नसला थांबण्याचा, तरी आठवणींचा हा अधिकार विधात्याने अबाधीत ठेवलाय म्हणून हा प्रपंच...!!
आयुष्याच्या प्रवासाच्या या वाटेवर काही क्षण सुटून जातात, काही माणसं त्यांच्या थांब्यावरून उतरून जातात. काही मागे उरतात. पण या सर्वांचे आठवणींचे व्रण मात्र राहतात...! मग कधीतरी ते क्षण अवचित भेटायला येतात, तेव्हा हेच क्षण प्रवासातल्या अंधाऱ्या रात्रीत चांदण्यांचं काम करतात...!! हे निसटून गेलेले क्षण जपून ठेवायचे असतात....!
कुपितल्या दुर्मिळ अत्तराप्रमाणे....!!बकुळीच्या फुलांच्या मंद, पण भुलवणाऱ्या सुगंधाप्रमाणे.....!!!

#मंतरलेले_दिवस❤️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
【 आयुष्याच्या या प्रवासात भेटलेली प्रत्येक व्यक्ती मला घडवत गेली त्या सर्वांचा मी ऋणी आहे विद्यापीठातले दिवस, जगलेले क्षण म्हणजे जीवनाच्या वाटेवरच्या बागेतील फुलं,तीच फुलं मी गुंफण्याचा असफल प्रयत्न केला आहे प्रत्येक वाक्य कोणत्यातरी घटनेचा संदर्भ देणारं आहे वाचकाने शोधावं😀 #lots_of_love❣️】

5 comments:

  1. आठवणीना शाप असतो वार्धक्याचा

    ReplyDelete
    Replies
    1. मनातलं छान उतरावल आहेस

      Delete
  2. सोम्या लय भारी.... वाचताना ते 2 वर्ष पुन्हा जगल्याची अनुभूती झाली. डोळ्यातून टचकन पाणी कधी आले कळलं नाही.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद मिनुम्म्मममम्मा
      आयुष्यातले ते दिवस अगदी अविस्मरणीय होते
      तेव्हाची ती दंगा मस्ती, तो खोडसाळपणा तेव्हा हसवत होता , आता तेच क्षण आठवले तरी डोळ्यातून टपकतात...!!

      Delete

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...