Wednesday, July 24, 2019

आभासी जगातला "प्रवास"

      जीवनातल्या प्रवासात कधी कोणाचा थांबा येईल सांगता येत नाही.त्या थांब्यापर्यंतच्या प्रवासात खूप सारे त्याच वाटेने जाणारे वाटसरू एकमेकांना भेटतात..!!
      काहींचा प्रवास आनंदात होतो, कधी कोणाचं थांब्याच ठिकाण आकस्मित येतं. त्यांचा प्रवास संपतो, पण त्या प्रवासात त्याच्या बरोबर मागे राहिलेला प्रवासी हतबल होतो ,त्या थोड्या प्रवासात खिडकीतून बाहेर डोकावून खूप गोष्टी पाहिलेल्या असतात, काही अनुभवलेल्या अन् काहींविषयी स्वप्न पाहिलेली असतात.
पण अर्ध्याअधिक वाटेवर आपल्या सहप्रवाश्याने नाईलाजास्तव त्याच्या थांब्यावर उतरून घेतलेलं असतं. त्याचं उतरणं त्यालाही सोप्प नसतं, पण नियतीपुढे कोणालाच विजय मिळवता येत नाही, येणार नाही. या प्रवासात माणसं एकमेकांना भेटतात , पण त्या प्रवासाचा आनंद लुटण्याचं सौभाग्य सर्वांच्याच भाळी लिहिलेलं असतंच असं नाही .
      काहींच्या प्रवासातील रस्ता कापत असतांनाच स्वप्नांचे दोर ही तुटले जातात. तो थांबा कधी येणार हे पांथस्थ्याला ही माहीत नसतं त्यामुळे त्याचा कोणता शब्द, कोणतं वाक्य हे शेवटचं असेल हे सांगता येत नाही. जीवनाच्या या प्रवासात फिरून तो वाटसरू मिळेलच असं अजिबात नाही. म्हणून उगवलेला प्रत्येक दिवस हा प्रवासातील शेवटचा दिवस आहे असचं जगता आलं तर त्याने आयुष्यात सारं कमवल्यासारखं होतं.
     आपण स्वाभिमानाच्या गोंडस नावाखाली अहंकारच विष कधी जपून ठेवतो हे आपल्यालाही कळत नाही. कारण नसताना एकमेकांविषयी आकस ठेवतो. आपण या पृथ्वीवरील पाहुणे आहोत हेच विसरले जातो.अन् मग इथूनच चालू होते तीअहंकारी वृत्ती.
      स्वतःला या भल्यामोठ्या विश्वाच्या पसाऱ्यातील छोट्याश्या ग्रहावरील एक छोटा क्षुद्र प्राणी आहोत हे मान्य केलं तर प्रवास नेटका जरी असला तरी आनंदाचा होईल.
      कोणता कॉल, कोणता sms , कोणता शब्द शेवटचा असेल हे माहीत नसतं कदाचित तो कॉल कधीच न येण्यासाठी असू शकतो किंवा परत तो कॉल रेसिव्ह ही होऊ शकत नाही. तुमच्या मोबाईल मध्ये नंबर सेव्ह असेल पण तो कधीच लागणार नाही.
     त्यामूळे मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगता यावा.
          भेटावं तेही शेवटची भेट असल्यासारखं
          बोलावं भरभरून शेवटच्या शब्दासारखं
      परत वेळ निघून गेल्यावर हळहळ व्यक्त करण्यापेक्षा अन् गोडवे गाण्यापेक्षा, आहेत तोपर्यंत ego, स्वाभिमान, अहंकार बाजूला ठेऊन बोलाच सर्वांशी अगदी भरभरून मन मोकळे पणानं...!!
      अहंकाराला बाजूला ठेऊन एकदा मारा हाक तुमच्याच जिवाभावाच्या माणसांना, वेळ निघून जाण्या अगोदर, दूर निघून जाण्याअगोदर.....!!!
      अन् हा जीवनाचा प्रवास आनंदात करण्यासाठी प्रयत्नवत असावं.....!! जीवनाच्या प्रवासात आनंद देत चालत राहावं दिगंतरापर्यंत...!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...