Monday, October 19, 2020

स्मशान....!!

 
    एखाद्या संध्याकाळी स्मशानातून एक फेरी मारून
तर पहा काय दिसेल....!! ऐशोआरामी अगदी श्रीमंतीत जन्मलेला आणि गरीबीत हालाकीत दिवस कठवलेला वेगळा भासत नाही.उच-नीच यांच्यात काही फरक जाणवत नाही, थोर-मोठा, जाती-धर्म ही असली लेबले स्मशानाच्या दारांतच गळून पडलेली दिसतील.

     कालपर्यंत एका वेगळ्याच आविर्भावात असणारे इथं येऊन शांत झाले, नाहीसे झाले, मातीचे झाले.

     काही लाखांच्या गाडीत बसणारा, luxurious life जगलेला आणि अनवाणी पायांनी दगड-धोंड्यांच्या वाटेवर कसाबसा चालत असलेलाही इथं येऊन एकत्र झाले, मिसळले.

     आता ही माती त्यांची वेगळी ओळख देत नाही. 'हि' अमुक-अमुक श्रीमंतांची, 'ही' अमुक-अमुक गरिबाची असं काही-काही सांगत नाही.

     'मी', 'माझं', 'मला' म्हणत खूप जगलं गेलं. पण आज-आजतर एका कोपऱ्यात असहाय बनून एक निरूपयोगी गोष्ट झालेली दिसेल.

     कालपर्यंत पुढे-मागे लुडबुड करणारे, माझे म्हणवणारे सगळे सोबतीला होते , क्षणभर ही उसंत देत नव्हते.आणी आज तीच माणसं...बॉडीला माती होण्याचीही वाट न पाहता पाठ दाखवून निघून गेले.

                      इथं कशाचाचं भेदभाव नाही.
                      ना जातीचा ना धर्माचा, 
                      सगळे सारखेच झाले.

     मग आजपर्यत जी धडपड झाली, मी काही वेगळा आहे हे दाखवण्यासाठी धावाधाव झाली,
या धावाधावीत काही सुटले गेले, काही सोडले गेले.
आपल्याच खांद्याला-खांदा लावून चालणाऱ्यांना खड्यात लोटलं, कधी आपण लोटले गेलो.
का...?? हे कश्यासाठी अंतिमतः तर सगळेच पाठ फिरवून निघून गेले. त्या गर्दीतही दिसले.-.

                   काही बळेच आसवं ढाळत होते,
                   काही नुसतंच नाटक करत होते,
                   काही मान खाली घालून गर्दीत चालत होते,
                   काही तर आजही निर्विकारच होते.

     आज सद्गुणांचा खुपचं उदो-उदो झाला, कोणाला दुर्गुण दिसलाच नाही..? सगळेच 'चांगला होता' हे बिरुद लावत होते.
थोड्यावेळ मलाच शंका यावी हे माझ्यासाठी आहे का..? पण जवळ तर दुसरी बॉडी दिसत नव्हती. हो-हो बॉडीचं थोड्यावेळा पूर्वीचा जिवंत जीव 'बॉडी' या प्रवर्गात मोडतोय.
जे घडत होतं ते जरा अनपेक्षितच वाटत होतं.

     स्मशानातून फेरी मारताना उच-नीच, जात-धर्म, कुळ यांचा जरी भेदभाव दिसत नसलातरी,
     या मातीत प्रकर्षाने जाणवते होते इथपर्यंतच्या प्रवासातील 
अपमानाचे शल्य, बोचणारे काटे, दिलेले-पचवलेले धोके
असंख्य विजय, तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त पराजय 
आपल्याच म्हणवणाऱ्यांचा मोह, मत्सर, क्रोध, प्रेम, हेवा यातलं आता काहीच उरलं नव्हतं.

     मग प्रश्न पडावा एवढी मोठी धावपळ का..? अंतिमतः जर शून्य सुद्धा राहणार नसेल.

                       तर हा माझा तो परका,
                       हा मित्र तो शत्रू,
                       तो अपमान,
                       ते काटे,
                       ती फुलं ,
                       हे नक्की काय होतं....??

     पण आता या प्रश्नाच्या उत्तरात काही गम्य नाही.
आता खुप उशीर झाला होता. आता काही सेकंदात माती होणार होती. पण हे कळायला स्मशानात जावं लागतं.
गमतीशीर आहे ना...!!
     ज्याने आयुष्यातला मोठा पराजय पाहिलाय, त्यालाच विजयाचं महत्व कळतं.
ज्याने गरिबीचे चटके सहन केलेत, त्याला पैसा काय हे कळतं.
ज्याने असंख्य काटे अनुभवलेत, त्याला फुलाचं महत्व कळतं.
ज्याने रखरखत्या सूर्याला डोक्यावर घेतलंय, त्यालाच सावली म्हणजे काय कळतं.
ज्याने मरण जवळून पाहिलंय, त्याला जगण्याचं महत्व कळतं.
ज्याने विरहाचं दुःख उपभोगलंय, त्यालाचं प्रेमाचं गमक कळतं.

     आयुष्य खूप सुंदर आहे पण जर बाकी काही उरणार नसेल तर आयुष्य जगण्याचे आयाम नक्की बदलायला हवेत.
हे सूंदर आयुष्य आणखी सुंदर बनवूयात...!!
आंनदी असा जय हो...मंगल हो....!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

2 comments:

पाऊस, जगणं अन् बरंच काही....!!

आताश्या कामात दंग असणारं मन पाऊसात भिजून एकरूप होत नाही. खूपच वाटलं तर पाठीशी एका हातावर दुसऱ्या हाताची घट्ट मूठ बांधून किंवा खिडकीत उभं राह...