Friday, October 30, 2020

चंद्र आहे साक्षीला..!!

चंद्र आहे साक्षीला,
तुझ्या माझ्या भेटीला,

लख्ख चांदणं अंगणी शिपलं होतं,
अंधाराला मनीच्या दूर पळवलं होतं,

तुझा हात हाती घेताना चांदणीही लाजली होती,
मिचकावीत डोळे गालातल्या गालात हसली होती,

ती थंड वाऱ्याची झुळूक होती,
तेव्हांच गवताची पाती शहारली होती,

पहाट होता होता दवबिंदूंनीं नाहली होती,
तेव्हांच सूर्यकिरणांनीं चमकली होती,

ती रात पुनवेची होती,
तिची त्याची मिठी घट्ट होती,

जशी कलेकलेने पुनव सरत गेली,
तशी तिची त्याची साथ सुटत गेली,

आजही येते भेटीला मनातल्या मनात,
पूनवेच्या रातीला कल्पनेच्या कुंचल्यात..!!!

#काल्पनिक
#कोजागिरी
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Monday, October 19, 2020

स्मशान....!!

 
    एखाद्या संध्याकाळी स्मशानातून एक फेरी मारून
तर पहा काय दिसेल....!! ऐशोआरामी अगदी श्रीमंतीत जन्मलेला आणि गरीबीत हालाकीत दिवस कठवलेला वेगळा भासत नाही.उच-नीच यांच्यात काही फरक जाणवत नाही, थोर-मोठा, जाती-धर्म ही असली लेबले स्मशानाच्या दारांतच गळून पडलेली दिसतील.

     कालपर्यंत एका वेगळ्याच आविर्भावात असणारे इथं येऊन शांत झाले, नाहीसे झाले, मातीचे झाले.

     काही लाखांच्या गाडीत बसणारा, luxurious life जगलेला आणि अनवाणी पायांनी दगड-धोंड्यांच्या वाटेवर कसाबसा चालत असलेलाही इथं येऊन एकत्र झाले, मिसळले.

     आता ही माती त्यांची वेगळी ओळख देत नाही. 'हि' अमुक-अमुक श्रीमंतांची, 'ही' अमुक-अमुक गरिबाची असं काही-काही सांगत नाही.

     'मी', 'माझं', 'मला' म्हणत खूप जगलं गेलं. पण आज-आजतर एका कोपऱ्यात असहाय बनून एक निरूपयोगी गोष्ट झालेली दिसेल.

     कालपर्यंत पुढे-मागे लुडबुड करणारे, माझे म्हणवणारे सगळे सोबतीला होते , क्षणभर ही उसंत देत नव्हते.आणी आज तीच माणसं...बॉडीला माती होण्याचीही वाट न पाहता पाठ दाखवून निघून गेले.

                      इथं कशाचाचं भेदभाव नाही.
                      ना जातीचा ना धर्माचा, 
                      सगळे सारखेच झाले.

     मग आजपर्यत जी धडपड झाली, मी काही वेगळा आहे हे दाखवण्यासाठी धावाधाव झाली,
या धावाधावीत काही सुटले गेले, काही सोडले गेले.
आपल्याच खांद्याला-खांदा लावून चालणाऱ्यांना खड्यात लोटलं, कधी आपण लोटले गेलो.
का...?? हे कश्यासाठी अंतिमतः तर सगळेच पाठ फिरवून निघून गेले. त्या गर्दीतही दिसले.-.

                   काही बळेच आसवं ढाळत होते,
                   काही नुसतंच नाटक करत होते,
                   काही मान खाली घालून गर्दीत चालत होते,
                   काही तर आजही निर्विकारच होते.

     आज सद्गुणांचा खुपचं उदो-उदो झाला, कोणाला दुर्गुण दिसलाच नाही..? सगळेच 'चांगला होता' हे बिरुद लावत होते.
थोड्यावेळ मलाच शंका यावी हे माझ्यासाठी आहे का..? पण जवळ तर दुसरी बॉडी दिसत नव्हती. हो-हो बॉडीचं थोड्यावेळा पूर्वीचा जिवंत जीव 'बॉडी' या प्रवर्गात मोडतोय.
जे घडत होतं ते जरा अनपेक्षितच वाटत होतं.

     स्मशानातून फेरी मारताना उच-नीच, जात-धर्म, कुळ यांचा जरी भेदभाव दिसत नसलातरी,
     या मातीत प्रकर्षाने जाणवते होते इथपर्यंतच्या प्रवासातील 
अपमानाचे शल्य, बोचणारे काटे, दिलेले-पचवलेले धोके
असंख्य विजय, तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त पराजय 
आपल्याच म्हणवणाऱ्यांचा मोह, मत्सर, क्रोध, प्रेम, हेवा यातलं आता काहीच उरलं नव्हतं.

     मग प्रश्न पडावा एवढी मोठी धावपळ का..? अंतिमतः जर शून्य सुद्धा राहणार नसेल.

                       तर हा माझा तो परका,
                       हा मित्र तो शत्रू,
                       तो अपमान,
                       ते काटे,
                       ती फुलं ,
                       हे नक्की काय होतं....??

     पण आता या प्रश्नाच्या उत्तरात काही गम्य नाही.
आता खुप उशीर झाला होता. आता काही सेकंदात माती होणार होती. पण हे कळायला स्मशानात जावं लागतं.
गमतीशीर आहे ना...!!
     ज्याने आयुष्यातला मोठा पराजय पाहिलाय, त्यालाच विजयाचं महत्व कळतं.
ज्याने गरिबीचे चटके सहन केलेत, त्याला पैसा काय हे कळतं.
ज्याने असंख्य काटे अनुभवलेत, त्याला फुलाचं महत्व कळतं.
ज्याने रखरखत्या सूर्याला डोक्यावर घेतलंय, त्यालाच सावली म्हणजे काय कळतं.
ज्याने मरण जवळून पाहिलंय, त्याला जगण्याचं महत्व कळतं.
ज्याने विरहाचं दुःख उपभोगलंय, त्यालाचं प्रेमाचं गमक कळतं.

     आयुष्य खूप सुंदर आहे पण जर बाकी काही उरणार नसेल तर आयुष्य जगण्याचे आयाम नक्की बदलायला हवेत.
हे सूंदर आयुष्य आणखी सुंदर बनवूयात...!!
आंनदी असा जय हो...मंगल हो....!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Friday, October 16, 2020

व्यथा बळीराजाची...!!

कशी सांगू शेतकऱ्याची व्यथा,
पीक कधी ओल्याने तर कधी कोरड्या दुष्काळाने नेलं,
कधी  हमीभावाने तर कधी व्यापाऱ्याने भावात लुटलं,
हाता तोंडाला आलेला घास,
पावसाने हिरावून नेला...!!

दिवाळीला लेकराला नवी कापडं घ्यायची होती,
कारभारणीला लय दिसातून एक साडी घ्यायची होती,
त्याची चप्पल तर पार झिजली होती,
कपडे ठिगळं लावून लावून शिवली होती..

आवनदा पाऊस ठीक होता, पीक पण जोमात होतं,
कष्टाचं चीज होणार होतं,
पण आभाळ कोसळलं,
होत्याचं नव्हतं झालं,
ज्याने दिलं त्यानेच नेलं,
शेतकरयाचं स्वप्न डोळ्यातून टपकलं.
खचू नको रे शेतकऱ्याच्या पोरा 

एक दिस तुझाही येईल,
दुरून पाहणारी माणसं नतमस्तक होतील....!!

#शेतकरी_वाचवा
#अतिवृष्टी
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Monday, October 12, 2020

एक प्रवासी..!!

या वाटेचा मी प्रवासी,
साथ काट्यांची दगड धोंड्यांची..!

आस सह्यादीची, सह्याद्रीसम उंच होण्याची,
सवय मज कायम रखरखत्या उन्हाची,
अवचित भेटली ती घेउनी शीतलता चंद्राची..!

क्षणभर थबकली त्या तळ्यावरती,
प्रतिमा पाहिली.. तिची की चंद्राची..??

मी आपला याच प्रश्नात दंग,
भरतो कुंचल्याने कल्पनेचे रंग..!

असो, मी आपला वेडा प्रवासी,
साथ मज रखरखत्या उन्हाची,
आस मज सह्याद्रीची....!!

#कल्पनेतील_ट्रेकर😍
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Wednesday, October 7, 2020

एक सायंकाळ..!!

एक सायंकाळ अशीही व्हावी,
विचारांचं काहूर शांत व्हावं,
मनी उठलेली वादळं क्षणात नाहीसं व्हावीत,
सलणारे काटे निखळून पडावेत,
त्या जखमा भरून निघाव्यात..!!

एक सायंकाळ अशीही व्हावी,
आजूबाजूच्या गोंगाटाचं भान विसरावं,
स्वतःच्या स्वतःमध्येच शांत बसावं...!!
ना कसल्या महत्वकांक्षा असाव्यात
ना कसला हेवा असावा...!

ना विजयाच्या आंनदाची पताका दिसावी,
ना पराजयाचं पांढरं वस्त्र उंचावलेलं दिसावं...!!

एक सायंकाळ अशीही व्हावी,
एकच गोंगाट होऊन धावपळीची चाहूल लागावी,
टी-टी-टी वाजणारं मशीन झोपी जावं,
राहिलेला शेवटचा दीर्घ श्वास सुटावा,
शांत....शांत......अन्....शां.....त..!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃




जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...