Tuesday, September 29, 2020

वादळं...!!!

असंख्य वादळं येतील,
रचलेला डाव क्षणात विखुरला जाईल,
जे योजिले त्याच्या विपरीत होईल,
सगळं संपलं ही भावना जोर धरेल...!!
पण तेव्हा 'तू' खचू नकोस.
नव्याने पुन्हा आवरायला घे, 
झालेल्या चुका सुधारायला घे,
अनुभवातून धडा घे.
जिथं संपलं वाटलं तिथूनचं खरी सुरवात आहे,
फक्त तसं पहायला जमव,
आयुष्य खूप सुंदर आहे, 
त्याची सुंदरता पहायला जमव...!!

#सहजचं
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

पाऊस...!!!

१)
पाऊस पडलेलं स्वप्न,
पाऊस नवचैतन्य...!!
पाऊस चातकाची तहान,
पाऊस जीवजंतूंचा प्राण...!! 
पाऊस नवनिर्मितीची कास,
पाऊस बळीराजाची आस...!
पाऊस सुगधं,
पाऊस आपलेपणाचा बंध...!!
पाऊस प्रेरणा वचनपूर्तीची,
पाऊस निष्ठा प्रेमाची...!!
पाऊस वसुंधरेवरचं निस्वार्थ-निरागस प्रेम..!!
पाऊस न मिळालेल्या पहिल्या प्रेमाची आठवण,
पाऊस प्रियकराच्या प्रेमाची डोळ्यात साठवण...!!

#पाऊस
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

२)

पाऊस भेटतो प्रत्येकवेळी नाविण्याने नटलेला,
पाऊस नवनिर्मितीचा कोंब फुलवणारा,
धरणीला हिरवा शालू पांघरणारा...!!
पाऊस बळीराजाच्या आशांना प्रफुल्लित करणारा,
प्रियजनांना पहिल्या भेटीची आठवण देणारा...!!
पाऊस जुन्या नव्यांच्या आठवणीत चिंब भिजवणारा, अंगणात कोसळणारा, बेधुंद करणारा...!!!
पाऊस काहींच्या डोळ्यातुन ओघळणारा,
पाऊस 'अवलीयास' बेदरकारपणे कोसळणाऱ्या सरींमध्ये बेधुंद करणारा.....!!
डोळ्याच्या ओलसर कडांनी........

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

कातरवेळ- एक सहेली...!!

तुझी झलक पाहण्यासाठी गेलो भटकत,
तुझी अदा कैद करण्यासाठी हिरवीरानं तुडवत ...!!
तू माझी एक सहेली,
स्वीकारी मज जसा मी...!!
देई धडे अनुभूतींचे,
हसऱ्या दुखऱ्या निखळ प्रवाहाचे...!!
शमवी वादळे मनाचे,
चौखूर उधळलेल्या वारुचे..!! 
क्षितीजावर थांबून क्षणभर,
करी दिवसाचे मळभ दूर..!!
तू, तू  नेहमीचीचं,
तरी तुझी ओढ कायमचीचं..!!
उराशी मज एकचं स्वप्न,
व्हावा तुझ्यासम निरोप,
हसत बागडत, उधळीत रंगांचा लेप..!!

#कातरवेळ
#जिंदगी_का_फ़ंडा🍃


सांजवेळचा 'तो'...!!

सांजवेळी येणारा 'तो' काही वेगळाच भासतो,
संथ येणारा 'तो' शांतपणेच निरोप घेतो.
ना कसला आततायीपणा, ना कसली घाई.
रणरणत्या उन्हात वाट 'ती' पाहते,
पण अश्रू मात्र 'तो' ढाळतो.
याचं क्षणात मोर अंगणी नाचतो,
वारा हिरव्या पानांसंग गीत गातो,
नभी लपंडावाचा खेळ रंगतो,
अन् मग इंद्रधनू फुलू लागतो.
तेव्हाचं निरोपाचा क्षण येतो,
जसा आला 'तो' तसाच शांत-संथ निरोप घेतो.
ना कोणती वचनं, ना कोणत्या आणाभाका.
तरीही अचूक वेळा 'तो' पाळतो,
तरीही रणरणत्या उन्हात वाट 'ती' पाहते.
बदलत मात्र कोणीच नाही,
ना तिला आहे उंच होण्याची आशा,
ना त्याला आहे त्या उंचीचा अभिमान. 
ना 'ती' बदलली ना 'तो'.
ना कसली बंधनं, ना कसली वचनं,
म्हणूनच जमतं त्यांना फुलत राहणं,बहरत राहणं...!!

#सांजवेळचा_पाऊस
#जिंदगी_का_फ़ंडा🍃



आता तुला थांबलं पाहिजे....!!

आता तुला थांबलं पाहिजे,
खूप संसार उध्वस्त झाले म्हणून थांबलं पाहिजे
कोणी कर्ता गमावला, कोणी पोटचा गमावला,
तर कोणी जन्मदातीला पारखा झाला,
खूप झाला तांडव आता घेऊ दे थोडा श्वास मोकळा.
खुप संसार मोडून पडले, बेचिराख झाले,
आदिलशाही-मोघलशाहित घरं पेटवली होती,
गाढवाचा नांगर फिरवला होता.
आता तू चालती बोलती माणसं पेटवतोय रे,
स्मशानात गर्दी झालीय रे...!!
म्हणून तुला थांबलं पाहिजे.
न्यायचंच असेल तर गोरगरिबांचा पैसा लाटणारे भ्रष्ट राजकारणी घेऊन जा.
न्यायचंच असेल तर गरिबांच्या योजना हडप करणाऱ्या अधिकाऱ्यांना घेऊन जा.
न्यायचंच असेल तर आया-बहिणीचीं इज्जतीला हात लावणाऱ्या विकृतींना घेऊन जा.
न्यायचंच असेल तर दुषप्रवृत्तींना घेऊन जा.

#कोरोना
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

डायरीची पानं चाळताना...!!!

डायरीची पानं चाळताना,
काही पानं शहारली, बोलू लागली,

बोलता बोलता ओली झाली 
काही अक्षरं पुसली गेली..!!

फाटलेल्या काही पानांचे व्रण दिसले
जुन्या जखमेवर नव्याने घाव घातले...!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃
#शब्दखेळ

त्यागमूर्ती..!!

सोप्प नसतं मुलगी होणं,
आई-बाबांच्या डोळ्याच्या धाकात राहणं,
छोट्या बहीण-भावाची पाठराखण करणं,

सोप्प नसतं मुलगी होणं,
समाजाच्या दृष्ट नजरा झेलणं,
विकृतींच्या टोळक्याजवळून मान खाली घालून चालणं..!

सोप्प नसतं मुलगी होणं,
सतत घुसमट सहन करत राहणं,
झालंच कधी बंडखोर तर मोठ्यांच बोलणं खाणं..

सोप्प नसतं मुलगी होणं,
सात फेऱ्यात जीवनसाथी मानणं,
परकं घर आपलं म्हणणं..!!

सोपं नसतंच मुलगी होणं,
त्यागमूर्ती असूनही कायम दुजाभाव घेणं
तिचं होते अर्धांगिनी,तीच होते जननी..!!
पण प्रचंड त्यागातून समर्पणातून 
सोप्प नसतंच मुळी मुलगी होणं....!

#त्यागमूर्ती
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

अबोल...!!!

बस्स झाले आता हे अबोल राहणं,
ना मी बदललो ना माझं मन,

चूक ना तुझी झाली,
चूक ना माझी झाली,
चूक 'त्या' वेळेची झाली.

अबोल झाली तुही, 
अबोल झालो मीही...!

बस्स झालं आता हे अबोल राहणं,
पुन्हा भेटूया त्याच वळणावर
जिथं सुटले हात तुझे अन् माझे.

त्या वळणावरती बहरली असतील फुलं,
मोगरा गुलाब अन् जाईजुई,

आपल्या पावलांनी शहारली ,
विस्कटली असेल रेतीही,

आजकाल एकांतच खूप छान वाटतो,
तेव्हा होते भेेेटतो मी  मलाच....!!


#जिंदगी_का_फ़ंडा🍃 

Tuesday, September 22, 2020

लॉकडाउन:-एक अकल्पनिय काळ...!!


     आज लॉकडाऊनला सहा महिने पूर्ण झाले,दरम्यानच्या काळात खूप गोष्टी बदलल्या, सर्वांना खडबडून जागं केलं...!!
     डॉ.कलामसरांनी दाखवलेलं 2020 चं महासत्ता होण्याचं स्वप्न आणि प्रत्यक्षात 2020 चा भारत याची तुलना होणं महाकठीण..!!
     सर्वच बाबतीत आपण कुठे आहोत..? काय केलं पाहिजे.? काय अनावश्यक आहे ..? काय आवश्यक आहे..? याचं अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करणं खूप आवश्यक आहे.
     असणाऱ्या हॉस्पिटलची वाताहात, जिल्हास्तरावरसुद्धा सुसज्ज हॉस्पिटल नसणं, आपल्यातला शिस्तबद्धपणा अन् कुठे राजकारण करावं याची जाण.
     या कठीण काळात माणसं माणसांशी कसे वागले कसं वागायला हवं, लॉक करताना तळागाळातील सर्व समाजाचा किती विचार केला..?, काय उपाययोजना करायला हव्या होत्या..? आणि असे प्रसंग पुन्हा उद्भवू नये यासाठी काय करता येईल.?, उद्भवलेचं तर आपण किती सज्ज असायला हवं...?  यासाठी आजपासून सुरवात करणं गरजेचं आहे..!
या कठीण काळाने काय शिकवण दिली हे जरी शिकता आलं तरी खूप झालं..
     यात गोरगरीब तसेच मध्यमवर्गीय समाजाची झालेली वाताहात , मन हेलावून टाकणाऱ्या गोष्टी होत राहिल्या..!      
     शिक्षण व्यवस्थेतील करावे लागणारे बदल, पुतळे प्रेरणा देण्याचं काम करतात मान्य, पण त्याच महापुरुषांच्या नावाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल , ग्रंथालये उभी राहिली तर काही सकारात्मक होईल का...? याचा विचार करणं गरजेचं, आणि हा विचार स्वतः करणं आवश्यक आहे.
स्वतःपासून स्वतःच्या घरापासून विचार करणं आवश्यक आहे..!    
     भारतातील एक सुज्ञ नागरिक, सत्ताधारी-राजकारणी आरोग्य यंत्रणा,समाज माध्यम, प्रशासन या सर्वांसाठीच हा आत्मपरीक्षण करण्याचा काळ, एक wakeup कॉल होता, आहे...!!
सर्व लवकर पूर्वरत व्हावं, समृद्धी यावी, मंगल व्हावं सुंदरतेने जग पुन्हा बहरावं...!!💐

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Thursday, September 17, 2020

बैलपोळा-एक उत्सव...!!!

दिवस सुगीचे सुरू जाहले,

ओला चारा बैल माजले,

लेझीम चाले जोरात.

     या ग.ल. ठोकळ यांच्या कवितेची हमखास आठवण होते ती बैलपोळयाच्या दिवशी.
     बैलपोळ्याचा दिवस उगवला की, माझं सारं मन गोळा होऊन गाववेशीतून फिरून येतं. बसल्या बसल्या गावच्या आठवणी काढतं. लहानपणाच्या, शाळकरी असतानाच्या आठवणी मनात रुंजी घालतात.
     वर्षभर शेतकऱ्याबरोबर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाच्या बैलजोडीचा विश्रांतीचा दिवस म्हणजे बैलपोळा.
बैलपोळा श्रावण अमावस्या किंवा काहि ठिकाणी भाद्रपद अमावसेला साजरा केला जातो.एव्हाना शेतीतील सर्व कामे झालेली असायची, सुगीचे दिवस सरून, धान्य शेतकऱ्याच्या घरात विसावा घेत असायचं.
     बैलपोळ्याच्या आदल्यादिवशी बळीराजा त्याच्या सर्जा -राजाची शिंग घासून-पुसून स्वच्छ केली जायची.संध्याकाळी खांदा मळणीचा कार्यक्रम म्हणजे खांद्यावर तुप आणि हळद लावून सर्जा-राजाचा खांदा मळला जायचा, म्हणजे थोडक्यात हळदी समारंभ....!! त्यावेळी पावसाच्या नक्षत्राची नावं घेतली जायची आणि बैलाच्या हलचालीवरून बळीराजाला धान्याच्या बरकतीवर किंवा पावसावर संकेत मिळायचे अशी धारणा असायची.
     दुसऱ्या दिवशी म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशी भल्यापहाटे उठून गावाच्या जवळच जनावरांसाठी चरण्यासाठी म्हणून राखीव जंगल असायचं त्याला गायरान म्हणलं जायचं.
गावातील सगळी बैलजोडी पहाटेच त्या गायरानात चरण्यासाठी असायची.खाऊन सुस्त झाल्यावर सर्जा-राजा मस्त उधळाचे, टोकदार शिंगांनी उचवट्याची माती उकरायचे.नंतर नदी-नाल्यामध्ये बैलांना अंघोळ घालून चकचकीत केलं जायचं.त्यादिवशी बैलाच्या मालकाचा म्हणजे धन्याचा उपवास असायचा.

     घरी आणून हिंगुळ लावून त्यावर बेगड लावली जायची त्यावर छबीगोंडा लावून, मस्तकावर बाशिंग, गळ्यात चंगळ, घुंगुरु,गाठी आणि पितळेची साखळी बांधली जायची.
पायात पैंजण किंवा तोडा असायचा पाठीवर झुल असायची
आणि उघड्या अंगावर रंगानी रंगवला जायचा.बैलजोडी घुंगराच्या आवाजाच्या तालावर उंच उड्या मारायचे उधळायचे.
मग अगदी नवऱ्या मुलागत सजवून गावात मिरवणुकीसाठी घेऊन जायचं.पाटलाच्या बैलजोडीच्या मानानंतर मिरवणूक काढली जायची. महादेवाच्या मंदिराला फेरी मारून "हर हर महादेव" च्या गजरात गावातून मिरवणूक निघायची..!
मिरवणूक वेशीत आली की घाईघाईने पण अचूक नेम धरून एका ठोक्यात वेशीतल्या दगडावर नारळ फुटले जायचे.ते नारळ गोळा करण्यासाठी एकच झुंबड उडायची.
     घरी आल्यावर घर मालककिणीने बैलांच्या लग्नाची तयारी करून ठेवलेली असायची. सगळं व्यवस्थित आणि वेळेत व्हयचं. अंगणातल्या बाजेवर गव्हाची आरास घातली जायची, त्याच्या मध्यभागी एका मडक्यात दिवा ठेवलेला असायचा तो दिवा पोळीने झाकलेला असायचा.
     बैलजोडी आणि मालक गावातून आलेले दिसल्यावर लगबगीने येऊन बैलांची मनोभावे पूजा केली जायची हळद-कुंकू लावून मालकीण पाया पडायची नंतर पोळीचा नैवेद्य खाऊ घालून,बैलांचं लग्न लावलं जायचं.
हातात पितळी ताट घेऊन त्याच्यावर लाटण्याने पिटवणारा आणि त्याच्या मागे "चाढं" घरून चालणारा...!!
यासाठी घरातल्या बच्चे कंपनीची चढा-ओढ असायची..!
ताट वाजवत फेरी मारणारा गजर करायचा.

"चावढ चावढ चांगभलं, पाऊस आला चांगभलं"

अश्या प्रसन्न वातावरणात लग्न पार पडायचं.
मग धनी उपवास सोडायचा.
     सर्जा-राजाच्या घुंगराचा आवाज जसा कमी होत जाई तशी धन्याला समाधानाने झोप लागून जायची.बच्चेकंपनी भलतीच खुश असायची, दिवसभरातल्या गमती जमतीं सांगत, चांदण्या मोजत निद्रेच्या अधीन व्हायची.असा स्वतःच्या लेकराच्या लग्नाप्रमाणे उत्साह असायचा.
'जनावरांची पूजा करा', 'त्यांना जीव लावा' ही सुप्त भूतदया शिकवली जायची.
     पण तद्नंतर विभक्त कुटुंब पद्धत उदयास आली,जमीनीच्या वाटण्या वाढल्या बळीराजाला बैलजोडी सांभाळणं, जिकिरीचं व्हायला लागलं.सर्जा राजांची जागा निर्जीव ट्रॅक्टरनी घेतली.
     आता हा आनंद आजच्या पिढीला कधीच अनुभवता येणार नाही.खूप सुंदर होते ते दिवस...!!
     आता गावात क्वचित बैल दिसतात कुतूहलाने डोळेभरून पाहून बालपणीच्या दिवसांचे आभार मानून चालत राहातो.
आता गाववेशीतून बैलपोळ्याच्या दिवशी कुणाला मिरवायचं? खापराचे मांडे, पुरणपोळी कोणी बनवायची? बैलं तरी किती आहेत गावात मिरवायला? आनंदाने बैलांचा सांभाळ करणारे किती शेतकरी उरले आहेत?

 बैलपोळा वेशीत उभा आहे गतकाळाच्या आठवणी उगळीत! आठवणींना घुंगराच्या तालावर खेळवत , मान डोलवत आठवणींच्या प्रदेशात खेचत.....!!

"धन्य तो धनी आणि धन्य ती सर्जा-राजाची बैलजोडी"

#बैलपोळा🎉
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

तू सांजवेळची कविता...!!

  दिवस संपून जातो, तरी बाकी काहीतरी उरतेच, उगवत्या बरोबर केलेली खूणगाठ कुठंतरी सुटतेच....!! कुठं सुटली म्हणून  मन मात्र लढत राहतं, एक मन दुस...