Thursday, September 17, 2020

बैलपोळा-एक उत्सव...!!!

दिवस सुगीचे सुरू जाहले,

ओला चारा बैल माजले,

लेझीम चाले जोरात.

     या ग.ल. ठोकळ यांच्या कवितेची हमखास आठवण होते ती बैलपोळयाच्या दिवशी.
     बैलपोळ्याचा दिवस उगवला की, माझं सारं मन गोळा होऊन गाववेशीतून फिरून येतं. बसल्या बसल्या गावच्या आठवणी काढतं. लहानपणाच्या, शाळकरी असतानाच्या आठवणी मनात रुंजी घालतात.
     वर्षभर शेतकऱ्याबरोबर शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाच्या बैलजोडीचा विश्रांतीचा दिवस म्हणजे बैलपोळा.
बैलपोळा श्रावण अमावस्या किंवा काहि ठिकाणी भाद्रपद अमावसेला साजरा केला जातो.एव्हाना शेतीतील सर्व कामे झालेली असायची, सुगीचे दिवस सरून, धान्य शेतकऱ्याच्या घरात विसावा घेत असायचं.
     बैलपोळ्याच्या आदल्यादिवशी बळीराजा त्याच्या सर्जा -राजाची शिंग घासून-पुसून स्वच्छ केली जायची.संध्याकाळी खांदा मळणीचा कार्यक्रम म्हणजे खांद्यावर तुप आणि हळद लावून सर्जा-राजाचा खांदा मळला जायचा, म्हणजे थोडक्यात हळदी समारंभ....!! त्यावेळी पावसाच्या नक्षत्राची नावं घेतली जायची आणि बैलाच्या हलचालीवरून बळीराजाला धान्याच्या बरकतीवर किंवा पावसावर संकेत मिळायचे अशी धारणा असायची.
     दुसऱ्या दिवशी म्हणजे बैलपोळ्याच्या दिवशी भल्यापहाटे उठून गावाच्या जवळच जनावरांसाठी चरण्यासाठी म्हणून राखीव जंगल असायचं त्याला गायरान म्हणलं जायचं.
गावातील सगळी बैलजोडी पहाटेच त्या गायरानात चरण्यासाठी असायची.खाऊन सुस्त झाल्यावर सर्जा-राजा मस्त उधळाचे, टोकदार शिंगांनी उचवट्याची माती उकरायचे.नंतर नदी-नाल्यामध्ये बैलांना अंघोळ घालून चकचकीत केलं जायचं.त्यादिवशी बैलाच्या मालकाचा म्हणजे धन्याचा उपवास असायचा.

     घरी आणून हिंगुळ लावून त्यावर बेगड लावली जायची त्यावर छबीगोंडा लावून, मस्तकावर बाशिंग, गळ्यात चंगळ, घुंगुरु,गाठी आणि पितळेची साखळी बांधली जायची.
पायात पैंजण किंवा तोडा असायचा पाठीवर झुल असायची
आणि उघड्या अंगावर रंगानी रंगवला जायचा.बैलजोडी घुंगराच्या आवाजाच्या तालावर उंच उड्या मारायचे उधळायचे.
मग अगदी नवऱ्या मुलागत सजवून गावात मिरवणुकीसाठी घेऊन जायचं.पाटलाच्या बैलजोडीच्या मानानंतर मिरवणूक काढली जायची. महादेवाच्या मंदिराला फेरी मारून "हर हर महादेव" च्या गजरात गावातून मिरवणूक निघायची..!
मिरवणूक वेशीत आली की घाईघाईने पण अचूक नेम धरून एका ठोक्यात वेशीतल्या दगडावर नारळ फुटले जायचे.ते नारळ गोळा करण्यासाठी एकच झुंबड उडायची.
     घरी आल्यावर घर मालककिणीने बैलांच्या लग्नाची तयारी करून ठेवलेली असायची. सगळं व्यवस्थित आणि वेळेत व्हयचं. अंगणातल्या बाजेवर गव्हाची आरास घातली जायची, त्याच्या मध्यभागी एका मडक्यात दिवा ठेवलेला असायचा तो दिवा पोळीने झाकलेला असायचा.
     बैलजोडी आणि मालक गावातून आलेले दिसल्यावर लगबगीने येऊन बैलांची मनोभावे पूजा केली जायची हळद-कुंकू लावून मालकीण पाया पडायची नंतर पोळीचा नैवेद्य खाऊ घालून,बैलांचं लग्न लावलं जायचं.
हातात पितळी ताट घेऊन त्याच्यावर लाटण्याने पिटवणारा आणि त्याच्या मागे "चाढं" घरून चालणारा...!!
यासाठी घरातल्या बच्चे कंपनीची चढा-ओढ असायची..!
ताट वाजवत फेरी मारणारा गजर करायचा.

"चावढ चावढ चांगभलं, पाऊस आला चांगभलं"

अश्या प्रसन्न वातावरणात लग्न पार पडायचं.
मग धनी उपवास सोडायचा.
     सर्जा-राजाच्या घुंगराचा आवाज जसा कमी होत जाई तशी धन्याला समाधानाने झोप लागून जायची.बच्चेकंपनी भलतीच खुश असायची, दिवसभरातल्या गमती जमतीं सांगत, चांदण्या मोजत निद्रेच्या अधीन व्हायची.असा स्वतःच्या लेकराच्या लग्नाप्रमाणे उत्साह असायचा.
'जनावरांची पूजा करा', 'त्यांना जीव लावा' ही सुप्त भूतदया शिकवली जायची.
     पण तद्नंतर विभक्त कुटुंब पद्धत उदयास आली,जमीनीच्या वाटण्या वाढल्या बळीराजाला बैलजोडी सांभाळणं, जिकिरीचं व्हायला लागलं.सर्जा राजांची जागा निर्जीव ट्रॅक्टरनी घेतली.
     आता हा आनंद आजच्या पिढीला कधीच अनुभवता येणार नाही.खूप सुंदर होते ते दिवस...!!
     आता गावात क्वचित बैल दिसतात कुतूहलाने डोळेभरून पाहून बालपणीच्या दिवसांचे आभार मानून चालत राहातो.
आता गाववेशीतून बैलपोळ्याच्या दिवशी कुणाला मिरवायचं? खापराचे मांडे, पुरणपोळी कोणी बनवायची? बैलं तरी किती आहेत गावात मिरवायला? आनंदाने बैलांचा सांभाळ करणारे किती शेतकरी उरले आहेत?

 बैलपोळा वेशीत उभा आहे गतकाळाच्या आठवणी उगळीत! आठवणींना घुंगराच्या तालावर खेळवत , मान डोलवत आठवणींच्या प्रदेशात खेचत.....!!

"धन्य तो धनी आणि धन्य ती सर्जा-राजाची बैलजोडी"

#बैलपोळा🎉
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

No comments:

Post a Comment

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...