Monday, June 22, 2020

तो, ती अन् कातरवेळ...!!!

      सांजवेळ,सर्व जण परतीच्या वाटेवर आहेत, पाखरांचा थवाही निघालाय घरट्याच्या दिशेने...!! त्यांची दोन दिवसांपूर्वीच उपजलेली पिल्लं घरट्याच्या दाराशी येऊन चिवचिव करतायत, वाट पाहत आहेत काही खाऊ घेऊन येणाऱ्या आई बाबांची...!!! ते ही लगबगीने घरट्याकडे थव्याने गुंजण करत चाललेत.
     सूर्याच्या क्षितिजाकडे रुतल्याने पूर्ण आभाळ तांबूस रंगात अगदी नाहून निघालं आहे त्यात हे थव्याचं विहंगम दृश्य खेचुन घेतंय... आकर्षित करतंय,रोखायचा प्रयत्न ही करू देत नाही...!!
दुरून गाणकोकिळा कुहुकुहू करतेय,
आत्ताच पाऊस थांबल्याने निसर्गाने अगदी नव्या नवरीसारखा साज चढवला आहे.रानातून थकून आलेला आई बाबांचा देह घराच्या अंगणात स्थिरावला आहे...!
     रानात गेलेली जनावरे आता गोठ्यात येऊन थबकली आहेत. त्यांच्या गळ्यातील घंटेच्या लयबद्ध सौम्य घंटानादात  त्यांच्या पाडसाना जवळ घेत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
     एवढा शांत-स्तब्ध निसर्ग भासत असताना,
     'तो' मात्र त्या क्षितिजाकडे इंचा-इंचाने रुतत जाणाऱ्या सूर्याकडे टक लावून शांत बसलाय, कश्याततरी अगदी हरखून गेलाय.. यात विशेष असं काही नव्हतं,तो त्याच्या नेहमीच्या जागेवर जाऊन दररोज त्या सूर्याचं कातरवेळेचं सौंदर्य टक लावून पाहणं त्याचा छंदच आहे, होता.....!!
     त्याला त्या परतीचा प्रवास करणाऱ्या सूर्याचा हेवा वाटत असावा... कदाचित...!! अस्तित्वाला राम-राम ठोकत असतानाही त्याच्या रंगांच्या उधळणीवर-महोत्सवावर जळत असावा, कदाचित....!! त्याच्या औदार्याचा हेवा करत बसत असेल, त्याचही असंच काही स्वप्न असेल आयुष्याच्या संध्याकाळचं, परतीच्या प्रवासाचं महोत्सव करत रंगाची उधळण करत जिंदगीला राम राम ठोकण्याचं...!!
     पण त्याचं अन् तिचं-कातरवेळेचंं काहीतरी असं अतूट ऋणानुबंध असावेत, कोणतंतरी अनामिक नातं त्याला दररोज त्याचवेळी- सूर्य डुबण्याच्या वेळी, अनामिक ओढीने खेचून नेतं.
     'तो'ही हातातील सर्व कामे टाकून धावत जातो,अगदी खूप दिवसातून भेटणाऱ्या प्रेयसीला भेटताना जी डोळ्यात चमक असते, जी ओढ असते ना अगदी तीच ओढ, तिच चमक तोच उत्साह....!!!
पण आज काहीतरी वेगळा भासत होता 'तो'...!! क्षितिजाकडे रुतणाऱ्या सूर्याकडं पाहत तर होता,पण मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं त्याच्या...!! चेहऱ्यावर कोणाच्यातरी आठवणीत व्याकुळ झालेले भाव स्पष्ट दिसत होते ...!!!कोण असावं बरं...?? असो पण या कातरवेळी कोणाबरोबरतरी घालवल्या असल्याच्या शंकेला डोळ्यातील चमक दुजोरा देत होती...!!
     ते जगलेले क्षण आज आठवणी बनुवन डोळ्यात चमकत होत्या....!! कातरवेळेच्या सूर्याचं क्षितीजात रुतण्याचा अन् सूर्याने जातेवेळी केलेला महोत्सव कदाचित त्यांच्या अनामिक नात्याचा साक्षीदार असावा....!!! तो एकमेव साक्षीदार असेल त्यांच्या अनामिक नात्याचा, ज्याने जवळून पाहिलं असेल त्यांना एकमेकांसाठी, भेटण्यासाठी बोलावं लागणारं खोटं...!! मित्र-मैत्रिणींची आप्तेष्टांची नजर चुकवून कधी-कधी खोटं बोलून भेटण्यासाठी,सूर्याचा महोत्सव पाहण्यासाठी केलेली धडपड...!!त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन  काही न बोलताही सर्व काही बोलल्यासारखं हलकं वाटण्यासाठी...!!!
धावत जाऊन दररोज भेटलं तरी खूप वर्षांनी भेटल्यासारखं उत्साहाने गळाभेट घेण्यासाठी धावत-पळत याचं सांजवेळी भेटले असतील ते तिघे....!!
'तो', 'ती' अन् 'ती'-कातरवेळ
     हे सर्व-सर्व एखाद्या पुस्तकातील ओळी वाचाव्यात तश्या त्याच्या चेहऱ्यावर आज स्पष्ट वाचता येत होत्या...!! बरेच दिवस झाले होते त्यांना विभक्त होऊन..!!
     पण 'त्या'ने ती कातरवेळ दुसऱ्या कोणाबरोबर न घालवता आता एकट्याने घालवत होता...!! कदाचीत 'ती' ही घालवत असेल बसत असेल क्षितिजाकडे डोळे लावून...!!
'तो' ही आज जाब विचारत असेल त्या कातरवेळेला, त्या अनामिक नात्याच्या साक्षीदाराला...!!एवढं सुदरतेने- महोत्सवाने नटलेल्या क्षितीजाला........!!!
या महोत्सवासारखा असावा आपला ही परतीचा प्रवास
निरोपाच्या क्षणींही हसत-खेळत महोत्सव करत, रंगांची उधळण करत व्हावा प्रवास दिगंतरापर्यंतचा......!!!

#जिंदगी _का_फ़ंडा🍃

Wednesday, June 10, 2020

स्त्री तुझं नक्की गाव कोणतं....??


     लहानपणापासून वयाच्या 23-24 वर्षापर्यंत आई-बाबांबरोबर असणारी त्याच गावाला आपलं गाव म्हणलेलं असतं.ज्या गावात-गल्लीत, घरात, घरातच्या अंगणात असंख्य आठवणी असतात.

     भावंडांबरोबर सुख-दुःख पचवलेले असतात. चुकलं तर आई-बाबांनी दिलेल्या मारामध्ये, खाऊमध्ये अगदी समसमान वाटप झालेली असते नव्हे केलेली असते.

पण, पण वयाच्या 23-24 वर्षांनंतर असं काय होतं की तिला हे अंगण परक्या सारखं वाटतं...??
      कारण, आता वयाच्या 24 वर्षापर्यंत जे आपलं घर आपलं अंगण असं वाटत होतं ते आता माहेर होणार असतं...!! म्हणजे 23-24 वर्षाच्या आठवणी, गावाशी, घराशी, घराच्या अंगणाशी जुळलेलं भावनिक नातं हे परकं होणार होतं...!
किती हा मोठा त्याग....!!
     जे आजपर्यंत मनावर ठासून बिंबवलं असतं की हेच माझं घर आहे. भावंडांशी बरोबरच्या वाट्यासाठी भांडणं केली असतात.
आई शेजारी झोपण्यापासून ते बाजारातून आणलेल्या खाऊमध्ये भांडून मिळवलेला वाटा हे सगळं काय होतं?
आभासी होतं का...??

     आई-बाबांच्या ताटात केलेलं जेवण, कधी-कधी कौतुकाने म्हणा किंवा हट्टाने बाबांनी भरवलेला घास सर्व-सर्व परकं होणारं असतं.
आजपासून मागचं सर्व सोडून कोनाचतरी घर आपलं म्हणायचंय, त्यालाच आयुष्य म्हणायचंय. तिथली माणसंच आपली म्हणायची आहेत,ज्यांना जन्मापासून 24 वर्षापर्यंत साधं पाहिलेलंही नसतं.
त्यांनाच आज अचानक काही क्षणात आपलं म्हणायचंय.
त्यांच्या आवडी-निवडी बघायच्यात.
रुसवे-फुगवे काढायचे आहेत.
नवरा म्हणणाऱ्या प्राण्याला खुश ठेवायचंय.
कस, कस शक्य आहे...??
     आई-बाबांकडून आलेल्या सवयी इथं चालतीलच असं नाही.
म्हणजे आतापर्यंतच्या बऱ्याच गोष्टी-सवयी सोडायच्या असतात, भले चांगल्या असो वा वाईट...!!!
म्हणजे 'ती' म्हणून असं काही उरतच नाही.
       जे करायचं ते फक्त या 24 वर्षानंतर भेटलेल्या आपल्या माणसांसाठी....!!गजब है यार...!!
     त्या घराला, त्या अंगणाला, आपलं मानायचं नव्हे-नव्हे  म्हणायचंय...!!
इथली माणसंच,आपली म्हणायचं दिगंतरापर्यंत....!!
अन् एवढं सगळं त्यागून, चुकून काही झालं तर ही माणसं, तो त्याग, तिचं मन पाहत नाहीत...!!
     अन् जेव्हा कधी 'ती' कंटाळवून माहेरी येते.तेव्हा माहेर ही खूप बदलेल असतं.
'ति'चं असणारं अंगण, तिचं असणारं घर, तिचं गाव, तिला  तिचेच भावंडं, तिचेच आई-बाबा पाहुणी म्हणून पाहत असतील तेव्हा काय म्हणत असेल तिचं मन....समुद्राच्या पोटात असणाऱ्या त्सुनामी सारखं हेलकावे खात असेल तरीही पृष्ठभागावर साधे तरंगही न दाखवता शांत होत असेल.
किती वाईट वाटतं असेल ना...??
ज्या भावंडांशी समान वाट्यासाठी भांडणं केलेली असतात, त्यांच्यापुढे ती आज चार दिवसांची पाहुणी असते.
किती ती insecure होत असेल याचा विचार केलाय कधी...??
म्हणजे मग नक्की 'स्त्री'चं गाव कोणतं...??
कोणत्या गावची 'ती'...??
     माहेर तिला पाहुणी म्हणून पाहतेय,अन् सासर तर तिच्याकडे त्यागमूर्ती म्हणूनच पाहतंय.
आई-बाबांच्या ऐकण्यातली लेक
नवऱ्याची आज्ञाधारक बायको बनते,
सर्व ऐकणारी सून बनते,
नन्तर हट्ट पुरवणारी टिफिन पुरवणारी आई बनते,
अन् शेवटी घराचं ओझं बनणारी म्हतारी सासू
पण मग नक्की 'ती' काय हवंय काय व्हायचंय याचा कधी विचार होत नाही.

वपूनी लिहून ठेवलंय, पचायला जड आहे पण कटुसत्य आहे::--

(टीप:-सगळेच पुरुष-नवरे नाही पण हे लागू होतं बहुतांश वेळा....!! पुरुषांनाही भावना असतात मध्य साधायचा असतो)

"या नवऱ्यानां मोलकरीण, स्वयंपाकिण, शय्यासोबतीण, मैत्रीण, पत्नी आणि पोरांची जबाबदारी  उचलणारी एक परिचारिका हवी असते. त्याशिवाय ती मिळवती हवी पण तिला लौकिक नको. एका बायकोत स्त्रीत त्यांना इतकं हवं असतं...!!"

 किती शोकांतिका ही....!!

     आजपर्यंत तिच्या वाट्याला काय आलं....!!

रामायणात सीता होऊन वनवास,
कुंती होऊन त्याग....!!
महाभारतात द्रौपदी होऊन वीरांच्या भरसभेत वस्त्रहरण...!!
ज्यां स्त्रीने,
जिजाऊ होऊन...आदर्श छत्रपती शिवराय घडवले
मणिकर्णिका होऊन...झाशीसाठी लढली
सावित्री होऊन...स्त्री शिक्षणासाठी जीव वेचला
तरी आजही ती छळली जातेय 
ती परकीच वाटेत ती एवढी आदिमाया शक्ती त्यागमूर्ती असतानाही दुय्यम लेखली जाते.
मग त्या त्यागमूर्तीचं नक्की गाव कोणतं...?
तिच्यावर ऍसिड हल्ले होतात,
विकृतींकडून शिकार होते,
नक्की तिची चूक काय..??
एक स्त्री जन्म हीच चूक म्हणावी का..??
कारण तिचं असं कायमस्वरूपीचं मुक्कामाचं ठिकाण कोणतं...??
'ती' त्यागच करत येते, स्पंदनातल्या शेवटच्या श्वासापर्यंत....!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃


जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...