Sunday, June 14, 2026

जग अन् जगणं...!!!

 

नैऋत्य मोसमी वारे चालू होऊन बरेच दिवस झाले होते पण अजून मान्सून म्हणावा तसा चालू झाला नव्हता.

हा, पण या वाऱ्यांमुळे हवेतला उकाडा कमी होऊन थंडावा जाणवत होता. याने उन्हाळ्याची तीव्रता थोडीतरी कमी झाली होती.

आजचा सुट्टीचा वार जरा हळू-हळूच पुढे सरकत होता. कित्येक दिवसांनी आवश्यक असणाऱ्या हळुवारपणाची जाणीव देत होता...

तिन्हीसांज झाली होती अन् हळुवारपणेच प्रकाशाचं साम्राज्य जाऊन आता अंधार अधिराज्य गाजवत होता.

'तो' मात्र अंधुकश्या खोलीत, खिकडीपाशी बसून पश्चिम क्षितीजावर टक लावून शून्यात पाहत होता. जणु कित्येक वर्षांच्या तपानंतर त्याला हा निवांतपणा, ही एकांताची खिडकीजवळची जागा आणि पश्चिमेला उगवलेला शुक्र असा दुग्धशर्करा योग जुळून आला होता.

नैऋत्येकडून थंडावा आणणारा वारा अन् ही शांतता त्याला पुनश्च एकदा स्वतःशीच जोडत होती.

जगाच्या धावपळीत आपणही कधी ओढलो गेलो, नुसते ओढलोच नाही तर बांधलो गेलो हेच त्याला कळत नव्हतं. धावणारं जग, पळणारी माणसं, श्वास घेतोय म्हणून जीवंत आहोत याची जाणीव अन् उणीव याचा काहीच ताळमेळ लागत नव्हता.

यात आपणच आपल्याला दूरकुठंतरी हरवून बसलो आहोत अन् वास्तवातल्या झगमगाटात धूसर होत गेलो, असं त्यांस राहून-राहून वाटत होतं. जगण्याच्या संवेदना या गर्दीत हरवणार नाहीत यासाठी खूप कसरत करावी लागणार होती. खोलीतला हा अंधार मात्र त्याच्या जगात शांततेचा प्रकाश भरत होता. कधी-कधी जग धावतेय म्हणून धावतोय की आपल्यालाच धावायचंय याचं कोडं आज तोच उलगडत होता.

अश्यातच खिडकीजवळचा मोगरा मात्र खोलीत दरवळत होता. तो आज पुन्हा-पुन्हा खुणावत होता जगण्यासाठी अंधुकशी खोलीही सुगंधाने मोहरुन जाते. फक्त त्यासाठी हवी असते,

आपल्या हक्काची, आपल्या ओसरीची, आपली जागा,

हातात आधाराची स्वतःची काठी, मायेची उब देणारी आपल्याच ठिगळं पडलेल्या कापडांपासून बनवलेली आपली गोधडी अन् पाठीवर जगण्याच्या वाटेवर कमावलेलं सुंदर आठवणींच गाठोडं, जे घेऊन चालता यावं तिन्हीसांजेला सूर्य अस्तचलाकडे जाताना, समुद्राच्या लाटा किनाऱ्याला जोरजोरात धडका मारताना, पक्षी पुन्हा घरट्याकडे परतताना, चालता यावं आपल्या मुक्कामाच्या ठिकाणाकडे.... जगण्याच्या अतिउच्च आनंदीपणाने....!!!

#जगणं ❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

Monday, March 30, 2026

कृष्ण होता यावं...!!!


 कृष्ण होता यावं...!!!

प्राणप्रिय,

बासरी सोडता यावी,

गोकुळ सुटलं जावं,

दही दूध लुटायचं

राहून जावं,

जगण्यात कृष्ण होता यावं....!!!

आपलं घर सोडून

दुसऱ्याचं घर आपलं करता यावं,

जगण्याच्या बेड्या सोडून

मुक्त जगता यावं,

जगता-जगता आख्ख गोकुळच

आपलंसं करता यावं....!!!

जगण्यात बासरीचे सूर

अन् जिरेटोपातल्या

मोरपिसाचे रंग भरता यावे,

यमुनेतल्या कालियावर बसून

संकटाची चिरफाड करता यावी....!!!

कृष्ण होता यावं,

प्राणांतिक सखी

राधेपासून दूर होता यावं,

सगळं सुटताना,

सगळं दूर जाताना,

चेहऱ्यावर हास्य मात्र ठेवता यावं....!!!

जगण्यात कृष्ण हे पान जोडता यावं,

जगण्यात कृष्ण होता यावं,

जे सुटलं, ते सुटलं,

पुन्हा मागं वळायचं नाही...!!!

बासरी सुटली,

गोकुळ सुटलं,

सवंगड्याचं पान हरवलं,

राधेच नाव गोकुळातच राहिलं,

बासरीचे सूर हरवले,

मोरपिसाचे रंग विरले,

तरी कृष्ण कृष्णच राहिला....!!!

तोची सत्याचा सारथी बनला,

द्रौपदीचा सखा जाहला,

हा, हा तोच सर्वस्व

तोच विधाता,

चराचरात राहिला...!!

महाभारताचा मुखपृष्ठ जाहला,

धर्मवसविण्याकारण

कोणाकडून शापित झाला...!!!

आपल्याच डोळ्यादेखत

आपल्याच वंशाचा नाश त्याने पाहिला,

अन्

सगळं जग सुदर्शनात मावणारा,

हा तोच कृष्ण,

जगाचा निरोप

नियतीच्या हातात ठेवून रिकामा जाहला....!!!!

देवच तो तरी नियतीच्या नियमांच

वकूब त्याने राखला,

पारध्याने धरलेला निशाणा

चरणकमलातून आरपार गेला...!!!

जगाचा पालनकर्ता

स्मितहास्य करत इहलोकीचा जाहला

अन् कृष्णाचा 'श्रीकृष्ण' जाहला...!!!

अन्

म्हणूनच कृष्ण हे पान जोडता यावं....!!

यातनांचा डोंगर उचलून हसता यावं...!!

#जगणं❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

Wednesday, March 18, 2026

गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला...!!!


होळी सरून आता उन्हानीं चांगलाच ताव धरला होता, त्यातच निसर्गाने पानगळीचा हंगाम चालू केलेला.

सह्याद्रीच्या कुशीत विसावलेली काही काळाची हिरवळ आता सोनेरी रंग ल्यावून आता पूर्ण रूपडचं पालटून टाकत होती.

काही दिवसांतच चैत्र पालवी फुलायला लागलेली अन् त्यामुळे त्या सोनेरी रंगात निसर्गानं निरनिराळे रंग भरायला चालू केलंय ...

दूर कुठंतरी काटेसावर बहरून आलांय जणू एखाद्या स्त्रीने भाळी लालबुंद कुंकूच ल्यायलय असं काही भास होत होता... त्याने एवढ्या पानगळीतही ऊर्जा भरत होती...

 बहाव्याने पिवळ्या रंगाचा दागिनाच बनवला होता जणू... जसं की त्याने तो कोणास  उसंत काढून अर्पणच केलाय...


निवडुंग, पळस, चाफा अन् गुलमोहर यांनीही त्यांच्या कामात थोडी ही कसूर ठेवली नव्हती.

कोणी नेमून दिलेल्या कामांनुसार इमानेइतबार नखशिखांत खरे उतरत होते.

निसर्गाचं हे रूपडं डोळ्यात साठवणं, जपून ठेवणं हे भाग्य काही थोडं नसे....

उन्हाच्या तळपत्या दिवसातही निसर्ग मात्र बहरतच होता ... याच चैत्र पालवीच्या मुहूर्तावर गुढीपाडवा मात्र दार ठोठावत होता...

याच फुलेल्या निर्सगाच्या देण्याचं, लेणं बनवून दाराशी तोरण बांधून नववर्षाची तयारी होतेय...  

उन्हाळकामे संपवून नव्या चैतन्याचं स्वागत होत होतं.

निसर्ग कदाचित हाच तर निरोप घेऊन आलेला असतो,  

पानगळीच्या रूपात सगळं सुटून मातीत मिसळावं अन् चैत्र पालवीच्या संकेतातून पुन्हा नव्याने बहरून जावं...

पानगळीच्या काळात बदल स्वीकारून आपल्याकडे उरलेल्या तुटपुंज्या विवेकावर काटेसावर, पळस , अन् बहवा फुलवावा...!!!

निसर्गाच्याच नियमांनी चालणं

जमवलं की पावलं खूप अडखळत नाहीत,

ठेचा लागतीलही 

पण त्याने पाय मोडल्याचं दुःख होणार नाही,

झालेल्या जखमांनी,

आता सगळं संपलंच असं,

अवकाळी काळे ढग मानगुटीवर बसण्याची शक्यता दुर्मीळच...!!!

'स्व'त्व अन् 'मि'त्व याचं कोडं पडणार नाही....

निसर्गाचंच देणं हे

त्याचंच हिरावून घेणं,

आपलं-आपलं म्हणता-म्हणता 

आपणच परकं होणं...


#जगणं ❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

जग अन् जगणं...!!!

  नैऋत्य मोसमी वारे चालू होऊन बरेच दिवस झाले होते पण अजून मान्सून म्हणावा तसा चालू झाला नव्हता. हा, पण या वाऱ्यांमुळे हवेतला उकाडा कमी होऊन ...