Wednesday, June 2, 2021

उत्तररात्रीचा पाऊस...!!


      दिवसभराच्या धावपळीने थकलेलं शरीर बेड वर पडताच झोपी गेलं होतं. पावसाळा सुरू होऊन दहा-एक दिवस उलटून गेले होते, पण अजूनतरी म्हणावा असा पाऊस सुरू झाला नव्हता. पण आज काही वेगळं भासत होतं. सांजवेळीचा सूर्य अगदी झाकोळून गेला होता. काळेकुट्ट ढग वाऱ्याबरोबर रुंदन घालत होते. यथावकाश धो-धो पाऊस कोसळेल असंच झालं होतं. पण तसं पाहायला गेलं तर त्याच्या कोसळण्याला अजून अवधी होता.
     या वातावरणाने लाईट गेलेली होती आणि दिवसभराच्या कारस्थानाने कधी झोप लागली हे कळलंही नव्हतं.

     पण तश्यातच खिडकीतून आलेल्या वाऱ्याच्या थंडगार झोताने जाग आली. उठून, खिडकीत येऊन उतुंग आभाळाकडे पाहिलंतर कातरवेळेच्या काळ्याकुट्ट ढगांची जागा आता टिपूर चांदण्यांनीं घेतली होती. आताच पाऊस पडून गेल्यामुळे आभाळ अगदी रीतं झालं होतं.

     हवेतला गारवा वाढला होता, रात्र जशी चढत गेली तसा गारवा पण वाढत जातोय असा भास होत होता. खिडकीतल्या रातराणीच्या झाडाच्या पानांवरचे पावसाचे इवलूसे थेंब वाऱ्याच्या झोताबरोबर चेहऱ्यावर पडले आणि त्याचक्षणी मी लोटला गेलो आठवणींच्या अखंड-अथांग सागरात. 

     जेवढ्या चांदण्या खुल्या आभाळात दिसत होत्या, त्यांच्या प्रत्येक लुकलूकण्यात आठवणींचे क्षण जमा झाल्याचा भास होत होता... या ओल्या रात्रीच्या एकांतात अगदी हरवून गेलो. आजूबाजूच्या परिस्थितीचा विसर पडला. थकवा-झोप दूर पळून गेली. लुकलूकणारी प्रत्येक चांदणी कधी बुडवत तर कधी तरंगवत आनंदाचे सप्तरंग उठवत होती. 

     मग सुरू झाला तो भूतकाळाची डायरी चाळण्याचा लपंडावाचा खेळ. प्रत्येक क्षणांची गोळाबेरीज-वजाबाकी म्हणजेच हिशोबाचा मेळ बसवणं सुरू झालं.बेरीज वजाबाकीतच रात्र सरत चालली होती. पण हिशोब काही लागत नव्हता.कधी पापण्या ओल्या झाल्याचा भास तर कधी स्मित हास्याची लहर सर्वांगातून जात होती.

     ते पुण्यातले पावसाळी दिवस, कधी छत्री विसरली तर कधी मुद्दामच विसरवलेली छत्री, तर कधी आपल्याच धुंदीत विचारमग्न होऊन पावसाचा विसर पडून एकट्याने कोणाच्या आधाराविना केलेला प्रवास.तर कधी कोणी धावत येऊन खांद्यावर हात ठेवून छत्रीत घेतल्याच्या आठवणी. अश्या अनेक आठवणी होत्या या पावसाच्या...!!या सर्व आज जश्याच्या तश्या आठवत होत्या.

     आज कसलेच भान राहीलं नव्हतं. आठवणींच्या गर्तेत बुडालो असतानाच, दूरच्या झाडावरच्या नेहमीच्या कोकिळेने शीळ वाजवली.  त्यामुळे अचानक भानावर आलो, रातराणीचा दरवळ ही बहरला होता, तो दरवळ हृदयात साठवत गेलो, ती टपटप पडणारी फुलं सुद्धा आठवणी बनून राहणार होती चिरकाल...!!

रात्र आता रातराणीच्या शेंड्यावरून उतरणीला लागली होती. पूर्व क्षितिजावर काहीवेळाने तांबडं फुटणार होतं, पहाट होण्याची ती चाहूल होती.

घड्याळाच्या काट्याने तीनचा टोल देऊन, वेगाने पुढं सरकत होता. त्याला थांबवणं कोणाच्याच हातात नव्हतं, नसतं.

आजचे हे क्षणही उद्याची आठवण बनणार आहेत, हे माहीत असूनही यांना ही खुशी-खुशीने सोडण्यातच धन्यता असते.

पुनश्च एकदा आता रित्या आभाळात काळेकुट्ट ढग दाटून यायला लागलेत. पुन्हा एकदा अशीच रात्र कोसळणार आहे आभाळ रीतं करण्यासाठी....!!

 जसं होतं मन रीतं ओल्या पापन्यांनी...!! तसं आभाळ होतं रीतं अश्या रात्रींनी....कोणाला कानोकान खबर न देता...!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

6 comments:

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...