वेळ संध्याकाळची,
पिटर कॅफेच्या नेहमीच्या टेबलावरती 'तो' बसलेला....!!
त्याची ती नेहमीची जागा , कॅफेत असलातरी समपारदर्शक काचेतून धावणार जग पाहत तासन्तास स्वतःच्या धुंदीत 'तो' न्याहाळत असायचा, ते गर्दीतलं पुणे..!
काहीकाळापूर्वी, तोही त्या धावणाऱ्यातलाच असावा कदाचित!!
गरमागरम कॉफीचा अधून-मधून घेतलेला 'सीप' एवढाच व्यत्यय त्याच्या एकांताला भंग करत होता...
त्यांतच दोन्ही हातांच्या बोटांची उगाचंच चुळबूळ करत, जणू कसलीतरी जुनी कोडी सोडवत होता.
स्वतःच्याच जाळ्यात अडकलेल्या कोळ्यांसारखी सुटका करून घेण्याचा असफल प्रयत्न करत असेल.
पण काही कोडी, काही क्षण आणि काही जाळी ही सुटण्यासाठी नसतातच, हे कधी-कधी विसरायला होत असावं.
त्याच्या बोटांची चाळण, खिडकीच्या पल्याडच धावणारं जग अन् मनाच्या खोल तळात आपल्याच जुन्या क्षणांचा ऊहापोह अन् त्यातच अधून-मधून घेतलेला कॉफीचा सीप... हे सगळं मात्र त्याच्याशी जोडलेलं होते.
त्याच्या पूर्वाश्रमीच्या क्षणांशी-आठवणींशी जोडलं जात होते.
पहिल्यांदा या शहरात पाय ठेवल्यापासून ते आजच्या त्याच्या प्रवासापर्यंत अनेक कहाण्यांचा फक्त तोच साक्षीदार होता.
प्रत्येक क्षणांचा साक्षीदार दुसरा कोणीच होऊ शकत नाही हे त्यास ठाव असावंअन् याच साक्षीदाराला भेटायचं झालं तर त्यासाठी असावा लागतो त्याच्या एकांतातली त्याच्याच आवडीची जागा...!
सगळं अगदी सगळं बदलून गेलं होत. त्यात तो सुद्धा आलाच, झालेल्या बदलाची जाणीव त्याला मात्र आज होत होती.
स्थायी फक्त होते 'तो', त्याचे स्वतःचे 'क्षण' आणि त्याच्या 'स्पंदनातून' आलेला त्याचा 'जिंदगी का फंडा'...!!
बोटांची चाळण कदाचित त्याचसाठी असेल.
हिशोब लावण्याचा प्रयत्न करत असेल. हिशोब लागणार नाही हे माहित असूनही शोधत असेल कदाचित काही उरलेल्या बाकीला...!
जी उरली याची जाणीवच सुखावणारी असेल.
खिडकीतून बाहेर पाहताना तो शोधत असेल गर्दीतल्या त्या कावऱ्या-बावऱ्या झालेल्या त्या जुन्या 'स्वतःला'. धावणाऱ्या गर्दीत स्वतःला सांभाळत उसवलेल्या धाग्यांना जोडणाऱ्या त्या अवलियाला..!!
अन् ही धावपळ तो आज पाहत असेल कॉफीच्या प्रत्येक सीप बरोबर तिन्हीसाजेला साक्षी ठेवून ... साठवत असेल प्रत्येक क्षण मनामध्ये उद्याच्या मावळणाऱ्या सूर्याबरोबर... असाच पुनश्च अनुभवण्यासाठी... जगण्यासाठी... जपण्यासाठी स्वतःच्या स्वतंत्र मालकी हक्काचे....क्षण..!!
#जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃










