Friday, May 31, 2019

आयुष्याच्या संध्याकाळी...!!!

    आज काल नवा ट्रेंड सुरू आहे,लिव्ह इन रिलशनशीपचा ( मी विरोधातही नाही आणि समर्थनातही नाही ) आणि त्याचं समर्थन केले जातं की लग्नाच्या अगोदर एकमेकांना समजून घेणं गरजेचं असतं, एकमेकांच्या आवडी-निवडी समजणं अन् आपल्या जोडीदाराला समजून घेतल्यावर लग्नानंतरचे problems होत नाहीत हे समर्थन दिलं जातं.
       पण मित्रांनो तुम्ही तुमच्या आज्जी आजोबांकडे पाहिलं आहे का हो ?
       आज जवळजवळ त्यांच्या लग्नाला सरासरी पन्नास साठ वर्षे नक्कीच उलटून गेले असतील.
तरीही त्यांचं एकमेकांवरचं प्रेम , एकमेकांची काळजी पुसटशीही कमी झालेली दिसत नाही,जाणवत नाही.
   अहो, समजून घ्यायचं सोडाच,पण त्यांनी लग्नाच्या अगोदर एकमेकांना पाहिलेलंही नसतं हो ..!!
सरळ बोहल्यावर चढल्यावर कळतं की हा माझा जीवनसाथी...!
     आणि लग्नाला पन्नास साठ वर्षे झाली तरीही अतूट नात्यातलं प्रेम अबाधित राहतं....!!!
पण आजकालचं प्रेम ...खूप अल्पायुषी झालंय हो, हीच शोकांतिका...!!
      प्रेम ही संकल्पनाच बदललीय की काय असं वाटायला लागलंय... आजकालची नाती  सरासरी एक नाहीतर दोन वर्षे टिकतात  मग नंतर तेच नातं बोअर वाटायला लागतं....!!
किती मज्जा आहे बघा ना , एक दोन वर्षांपूर्वी  एकमेकांच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आवडायच्या, ज्यावर तासन् तास  गप्पा व्हायच्या,एकमेकांच्या अडचणी दोघांनी सोडवल्या जायच्या, संवाद व्हायचा, त्याच गोष्टी एक दोन वर्षांनंतर नातं तुटायचं कारण बनतात. मग याला खरंच प्रेम म्हणायचं का हो ?
    म्हणजे तुम्हाला फक्त एकमेकांबरोबर वेळ घालवायचा आहे , प्रेम करायचं नाहीय....
 तुम्हाला आधार हवा आहे म्हणून partner पाहिजे असतो असं वाटत असेल तर थांबा..!
 एकमेकांना एकमेकांची गरज आहे म्हणुन एकत्र राहायचंय अन् याला जर तुम्ही प्रेम म्हणत असाल तर नक्कीच थोडं थांबा ...!!!
आणि दुसऱ्या बाजूला आजी आजोबांकडे पहा, नवल वाटेल...
    त्यांचं प्रेम आज पन्नास साठ वर्षांनंतरही तरुण असतं, त्या प्रेमातली काळजी कधीच कमी होत नाही. आयुष्यात असंख्य अडचणींना , दुःखांना दोघेही सामोरे जातात. आयुष्याच्या प्रवासात चढ-उतार आल्यावर एकमेकांना दिलेला हात, दिलेला आधार खूप समजावून जातो.
   खांद्याला खांदा लावून त्या अडचणींवर मात करतात, दुःखं पचवली जातात. प्रत्येक अडचणी वर उत्तरं शोधली जातात...
त्यांच्या आयुष्यातला चांगल्या वाईट वळणावरती मिळालेली एकमेकांची साथ वाखाणण्याजोगी असते.
     जर आजोबा गावात गेले असतील अन् दिवसातला तिसरा प्रहरही संपला असेल पण जर आजोबा गावातून आले नसतील तर आजी तोपर्यंत जेवणाच्या ताटाला शिवतही नाही. जेव्हा आजोबा येतील तेव्हाच जेवण करेल हा तिचा पण असतो ...!!
कुठून येतं हे प्रेम , कुठून येते एवढं प्रेम करण्याची शक्ती...?
     एकमेकांवर रागावतील, चिडतील, शिव्या घालतील पण  जेवणाच्या वेळेस एकमेकांना जेवायला विचारल्याशिवाय घास तोंडात सरकवणार नाहीत....
     यांना याचं प्रेम कधीच बोअर वाटत नाही, अन् यांनीच तर थेट लग्नात एकमेकांना पाहिलेलं असतं , मग कोणतं प्रेम खरं समजायचं ...?
     प्रेम निःस्वार्थपणात अन् निरागसतेत असतं, प्रेम हे ठरवून होत नसतं. जगात प्रेम गोष्टचं न्यारी आहे, त्यात निरागसता ही भरभरून असते ...!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Tuesday, May 21, 2019

"यारी"तली दुनिया...!!

आज काही कामानिमित्त बस स्टँड वर जाणं झालं.
जसं-जसं स्टँड मध्ये जात होतो; तसं-तसं कॉलेजच्या दिवसांचा एक चित्रपट समोर दिसू लागला..!!
नुकतंच दहावीच्या वर्गातून, दहावीच्या बंधनातून, म्हणजे शाळेतून कॉलेजात पाऊल ठेवलेलं....!!
कॉलेज जीवनाबाबत खूप ऐकलेलं , पाहिलेलं, अन् वाचलेलं होतं
अन् ते दिवस आत्ता अनुभवन्यास मिळणार होते.
त्यामुळे कॉलेज जीवनाबाबत खुप कुतूहल होतं.
   दहावीची शाळा गावात होती अन् आत्ता कॉलेजसाठी तालुक्याच्या ठिकाणी जायचं होतं ती उत्सुकता वेगळीच...!
    1-2 किलोमीटर चालत जाऊन लाल डब्बा पकडायचा, तो नेहमीप्रमाणे कधीच वेळेवर यायचा नाही आणि त्या डब्ब्यात गर्दी खूप असली तरी ही त्यात मज्जा यायची..!!
एखाद्या दिवशी बस रिकामी असली की उदास वाटायचं.
गर्दीतल्या धक्यांची सवय झालेली....!!
कॉलेजमध्ये मग वर्गात बसायचं, काही चाळे केले तर वर्गाच्या बाहेर ही जावं लागायचं!!
    नवीन मित्र भेटले, भांडण झाली, प्रॅक्टिकला सरांचा मारही खाल्ला...!!
तास बुडवून स्टँडवर कोणाची तरी वाट पाहत बसणं...भारीच!!
    मित्राच्या "ति"च्या साठी तासनतास कॉलेजच्या कोपऱ्यावर थांबून ती आली की इशारत करणं..!!
कॉलेजच्या पहिल्याच दिवशी बस मध्ये चमकलेली "ती" अन्
"ती" येणार म्हणून स्टँड वर तिच्या अगोदर एक तास जाऊन बसणं....!
बस मध्ये 'ती" असल्यावर तेव्हा उगाच समाजसेवेचा आव आणत एखाद्या आजी-आजोबांचा शोध घेत त्यांना आपल्या सीट वर जागा देऊन, बस मध्ये खुप मोठं काम केल्यासारखं कॉलर टाईट करणं...!!
असं करत कॉलेज कधी संपलं कळलंच नाही, यात रिझल्टची पूर्ण वाट लागली होती....!
   पण या कॉलेज जीवनाने खूप शिकवलं, आयुष्याविषयी खूप धडे दिले, कसं जगावं, कसं असायला पाहिजे,आपण कसे आहोत याची ओळख झाली, चमकलेली "ती" ही इथंच दिसली, अन् as usual कायम "ती" ही पराई च राहिली.... ठेवली..!!
खूप भारी दोस्त मिळाले...! जीवाला जीव देणारे यार मिळाले.
कॉलेजमध्ये पहिल्यांदा भेटले तेव्हा कोणीच नव्हते ते..!!
पण नंतर जीवनामध्ये वादळासारखे घुसले..
 पुन्हा आयुष्य कधी जुन्या वळणावर आलं नाही..!!
चहाच्या टपरीवरच्या गप्पा....!!! आज ती टपरी आहे, पण कमीने दोस्त नाहीत...!!
 कॉलेज ते स्टॅन्ड पर्यंत केलेला दंगा, घालवलेला वेळ, केलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी....!!
     जगाचा विसर पडून केलेले कांड....! आजही आठवलं तर एक छोटंसं हसू आणतात....!!
किती वेडे होतो आपण यात अभिमान वाटतो...!!! एकमेकांसाठी सोडलेल्या बस...!!
आज सर्व आठवत गेलं.
यात graduation, postgraduation अन् नंतरच्या एका वर्षातील कमीने यारही आठवत गेले.
   या दोस्तांनी खूप छळलं, चिडवलं, खुप पिडलं,पकवलं, गडवलं त्यांच्याकडे पाहिलं, तर वाटायचं यार मला दुष्मनांची गरजच नाही.
त्यांना एक सल्ला विचारला तर पन्नास सल्ले द्यायचे..!
 ज्या प्रश्नांवर स्वतः गंडलेले असतात, confused असतात, त्याचं उत्तरं आपल्याला मात्र confidently द्यायचे,
म्हणायचे, 'कर तू बिंधास्त, तू करू शकतो हे', स्वतः पेक्षा आपल्यावर जास्त भरोसा करणारे...!!
त्यांच्यावर भरोसा ठेवून आपणही मग बिनधास्त करायचो, ते म्हणतील तसं! उगाच हरभऱ्याच्या झाडावर बसवलं जायचं पण त्यामुळे तर डेअरिंग केली, नाहीतर आपण कधीच केलं नसतं...!!!
त्यांचा असणारा विश्वास आपल्याला आत्मविश्वास देऊन जायचा...!!स्वत:च्या खिसा रिकामा असताना,
ते उधारी करून आपली गरज भागवायचे...!!
     कॉलेजच्या शेवटच्या दिवशी हे सगळे कमीने उदास होते, पण हळवं कोणी झालं नाही. सगळ्यांनी भेटत रहायचं हे एकमेकांना शिव्या देऊन सांगितलं...!!
पण जो तो आपापल्या आयुष्यामध्ये busy झाले...! काहींबाबत गैरसमज होऊन दुरावले गेले , काही गोष्टी न पटल्यामुळे स्वतः दूर झालो,पण त्यामुळे कधी त्यांच्याबाबत तिरस्कार वाटला नाही. आज त्यांनाही तेवढाच आदर आहे, राहील...!
   काहींची विकेट पडली, काही कामानिमित्त बाहेर पडले,
काही जॉब मधून बॉस सुट्टी देत नाही म्हणत बॉसला शिव्या देतात तेव्हा आपणच समजुन घ्यावं..!
आपण तरी कुठं वेळ काढुन भेटतो ?
   आत्ता महिन्यातून एखादा कॉल होतो , 4-5 महिन्याने भेट होते, यातच समाधान मानणं अगत्याचं..!
हे सगळं-सगळं वारुळातुन बाहेर पडणाऱ्या मूग्यांप्रमाणे हळूहळू सर्व आठवत गेलं..!!!
पण आत्ता वेळ ही खूप झाला होता,त्यामुळे आत्ता हे सगळं तिथंच सोडून निघणं गरजेचं होतं.
जस पाऊलं स्टँड च्या बाहेर च्या दिशेने जात होते तसे आठवणीतून बाहेर पडत होतो .....!!
पण एक नक्की "ओ दिन कभी नहीं भुलेंगे ...!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Wednesday, May 15, 2019

बकुळीची फुलं ....!!!

"देखो मगर प्यार से" ट्रक च्या पाठिमागे लिहिलेलं हे तीन शब्द जीवनाविषयीच तत्वज्ञान सांगून जातात...!!
     फुलांनी बहरलेल्या बागेतलं गर्द हिरवी पानं असलेलं झाड सुध्दा लक्ष वेधून घेतं, सुंदर दिसतं.
 दुसऱ्या फुलझाडांपेक्षा उठून दिसतं फक्त गर्द हिरवी पानं असतानाही ...!!   
पण, ते सूंदर दिसण्यासाठी एका स्वतंत्र दृष्टीने पाहायला हवं. 
ज्याला त्याला , ज्याच्या त्याच्या नजरेनं पाहिलं तर सर्व सुंदर दिसतं. 
फुलांकडे पहा; काही फुलं दिसण्याने आकर्षित करतात, तर काही फुलांचा सुगंध आकर्षित करतो..!
पण मग आपण ही अपेक्षा कशी करू शकतो? 
सूंदर दिसणाऱ्या फुलाने सुगंधही द्यावा किंवा सुगधं देणाऱ्या फुलाने सूंदर सुद्धा दिसावं.
आपण त्याला त्याच्या angle ने पहावं लागेल, तर ते खूप सूंदर वाटेल, मन प्रसन्न करेल. 
 आभाळाला भिडायला गेलेला एखादा गर्द झाडांचा डोंगर किंवा वेगळ्या आकाराचा उजाड डोंगर सुद्धा त्याच्या नजरेनं पाहिलं तर सूंदर दिसतो..!!
क्षितिजाला टेकलेलं आभाळ, ते आभाळ वेगवेगळ्या आकाराच्या कलाकृती धारण करत असल्याचा भास होणं अन् त्या कलाकृती, मनात निर्माण झालेल्या कुतूहलाने शांतपणे तासन् तास निहाळत राहणं, मनात नवचेतना निर्माण करतं.
ते क्षितिजापल्याडचं आभाळ सकाळी अन् संध्याकाळी सोनेरी रंग धारण करतं तेव्हा तो सोनेरी क्षण कधीही सरू नये असंच वाटतं...!!
हे पाहिल्यावर- अनुभवल्यावर चेहऱ्यावर नाजूक हसू फुटते अन् हा क्षण कोणत्याही आनंदाच्या क्षणांपेक्षा अतिउच्च असतो..!!
निसर्गातली प्रत्येक गोष्ट ही आपल्या जगण्याशी-आयुष्याशी साधर्म्य दाखवते. एक जगण्याचं तत्वज्ञान सांगते.
फुलं देण्यामागचं प्रयोजन काय असू शकतं? त्यात एक सुप्त संदेश असतो की, या फुलांप्रमाणे बहरत रहा, 
            फुलत रहा, परोपकारी असा, 
समोरच्याला आनंदाच्या खाऊची वाटप करा.    
              सदाबहार असा...!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Tuesday, May 7, 2019

"निसर्गातलं बेधुंद जगणं"....!!!



       निसर्गाची आपल्या आयुष्याशी सांगड घातली की
मग निसर्गासारखंच आपलं आयुष्य ही नयनरम्य होतं.
    आकाशाला गवसणी घालण्यासाठी आसुसलेली उत्तुंग झाडं..!
    त्याच झाडांच्या पानांचा होणारा सळसळ आवाज, पक्षांचं मधुर गुंजण, दूरवरून येणारी कोकिळेची कुहूकुहू ,
   निसर्गाचं विराट रूप दर्शवणारा, उंचावरून बेदरकारपणे कोसळणारा धवलरूपी धबधबा.....!!
      अन् दूरवरून संदेश घेऊन येणारा, अंगावर शहारे आणणारा थंडगार वारा..!!
       त्यात भरीस भर म्हणजे सूर्याची किरणं सुद्धा जमिनीवर पडू न देणारं गर्द हिरव्या झाडांचं घनदाट जंगल ....!
     अन् शांतपणे कोसळणारी पावसाची संततधार , जी झाडाच्या पानांवर पडून घरंगळत आपल्या अंगावरून जमिनीवर पडते आणि तो क्षण मोहवून टाकते ...!!
    आणखी थोडसं पुढे गेलं कि, डोंगराच्या दुसऱ्या टप्प्यात  तेथील झाडे वेगळ्या प्रकारची, पक्षी सुद्धा वेगळ्या प्रकारचे..!!         
           आश्चर्य म्हणजे वेगवेगळ्या आकाराची डोंगरांची रांग
म्हणजे की पूर्ण वेगळ्या प्रदेशात आल्याचं feel व्हावं....
निसर्गाचं हे रूप पाहिल्यावर मनात जो प्रसन्न भाव निर्माण होतो
तो शब्दबद्ध नाही करता येणार!
     तिथेच कुठेतरी झरा, अन् त्याचं थंडगार पाणी...!!
मनसोक्त भटकायचं असेल तर  एकट्याने फिरण्याचा पर्याय एकदमच भारी ...!!!
     भुरभुरणाऱ्या पावसात अशी 'स्व'सोबत अभावाने म्हणा पण खेचून आणावी लागते , तरीही ही लज्जत न्यारीच ...!!
अश्यात सायकल किंवा बाईक पेक्षा चालत फिरणं म्हणजे खरी मज्जाच!!
थोडक्यात एकला चालो रे...!!!
     धुंद पावसाळी दिवसात 'स्व'सोबतीने केलेली ही निसर्गमय सफर यादगार होऊन राहील..!!
     वातावरण मस्त ढगाळलेलं तरी असतं किंवा रात्रभर कोसळत असल्याने उघडत अालेलं तरी असतं , आणि अशातच पूर्वेकडून वरती येणारा सोनेरी गोळा काही क्षण पूर्ण पृथ्वीला सोनेरी करून जातो, क्षणभर वाटतं की हा तर आहे 'परीस'...!!                    
        अशी सूंदर दिवसाची सुरुवात होत असते..!
                 हे दृश्य पाहणं म्हणजे मेजवानीच ...!
      थोडं पुढे गेल्यावर छोट्याशा शड्डू मध्ये वाफळता कटिंग घ्यायचा..!त्याचा आस्वाद घेत पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. स्वत:शी संवाद साधायचा.तेव्हा आपसूकच एक शांत शीळ बाहेर पडते , कळतही नाही ही शीळ कधी चालु झाली ते ...!!
       आपल्याला स्वतःला खूप दिवसांपासून काहीतरी विचारायचं असतं. स्वत:शी चर्चा-हितगुज करायला ही योग्य वेळ असते.
       वैशिष्ट्य म्हणजे जळमटलेल्या गोष्टींना आपण या वातावरणात अगदी सहज माफ करू शकतो. मग खूप हलकं-हलकं आणि उंच झाल्यासारखं वाटायला लागतं.
आता स्वत:सोबत खूप गप्पा झालेल्या असतात. रपेटही झालेली असते आणि नेहमीच्याच पण कधीच न जाणवलेल्या अनेक गोष्टी उमगलेल्या असतात.  अन् शेवटी एखाद्या जागेवर बसून डोळे मिटून कधीच लक्षात न आलेले पक्षांचे, झाडांचे, वाऱ्याचे, निसर्गातल्या इतर गमती जमतीचे आवाज टिपायचे अन्
मन भरलं की प्रसन्न मनाने परतीच्या प्रवासाला निघायचं...!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...