Friday, May 31, 2019

आयुष्याच्या संध्याकाळी...!!!

    आज काल नवा ट्रेंड सुरू आहे,लिव्ह इन रिलशनशीपचा ( मी विरोधातही नाही आणि समर्थनातही नाही ) आणि त्याचं समर्थन केले जातं की लग्नाच्या अगोदर एकमेकांना समजून घेणं गरजेचं असतं, एकमेकांच्या आवडी-निवडी समजणं अन् आपल्या जोडीदाराला समजून घेतल्यावर लग्नानंतरचे problems होत नाहीत हे समर्थन दिलं जातं.
       पण मित्रांनो तुम्ही तुमच्या आज्जी आजोबांकडे पाहिलं आहे का हो ?
       आज जवळजवळ त्यांच्या लग्नाला सरासरी पन्नास साठ वर्षे नक्कीच उलटून गेले असतील.
तरीही त्यांचं एकमेकांवरचं प्रेम , एकमेकांची काळजी पुसटशीही कमी झालेली दिसत नाही,जाणवत नाही.
   अहो, समजून घ्यायचं सोडाच,पण त्यांनी लग्नाच्या अगोदर एकमेकांना पाहिलेलंही नसतं हो ..!!
सरळ बोहल्यावर चढल्यावर कळतं की हा माझा जीवनसाथी...!
     आणि लग्नाला पन्नास साठ वर्षे झाली तरीही अतूट नात्यातलं प्रेम अबाधित राहतं....!!!
पण आजकालचं प्रेम ...खूप अल्पायुषी झालंय हो, हीच शोकांतिका...!!
      प्रेम ही संकल्पनाच बदललीय की काय असं वाटायला लागलंय... आजकालची नाती  सरासरी एक नाहीतर दोन वर्षे टिकतात  मग नंतर तेच नातं बोअर वाटायला लागतं....!!
किती मज्जा आहे बघा ना , एक दोन वर्षांपूर्वी  एकमेकांच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आवडायच्या, ज्यावर तासन् तास  गप्पा व्हायच्या,एकमेकांच्या अडचणी दोघांनी सोडवल्या जायच्या, संवाद व्हायचा, त्याच गोष्टी एक दोन वर्षांनंतर नातं तुटायचं कारण बनतात. मग याला खरंच प्रेम म्हणायचं का हो ?
    म्हणजे तुम्हाला फक्त एकमेकांबरोबर वेळ घालवायचा आहे , प्रेम करायचं नाहीय....
 तुम्हाला आधार हवा आहे म्हणून partner पाहिजे असतो असं वाटत असेल तर थांबा..!
 एकमेकांना एकमेकांची गरज आहे म्हणुन एकत्र राहायचंय अन् याला जर तुम्ही प्रेम म्हणत असाल तर नक्कीच थोडं थांबा ...!!!
आणि दुसऱ्या बाजूला आजी आजोबांकडे पहा, नवल वाटेल...
    त्यांचं प्रेम आज पन्नास साठ वर्षांनंतरही तरुण असतं, त्या प्रेमातली काळजी कधीच कमी होत नाही. आयुष्यात असंख्य अडचणींना , दुःखांना दोघेही सामोरे जातात. आयुष्याच्या प्रवासात चढ-उतार आल्यावर एकमेकांना दिलेला हात, दिलेला आधार खूप समजावून जातो.
   खांद्याला खांदा लावून त्या अडचणींवर मात करतात, दुःखं पचवली जातात. प्रत्येक अडचणी वर उत्तरं शोधली जातात...
त्यांच्या आयुष्यातला चांगल्या वाईट वळणावरती मिळालेली एकमेकांची साथ वाखाणण्याजोगी असते.
     जर आजोबा गावात गेले असतील अन् दिवसातला तिसरा प्रहरही संपला असेल पण जर आजोबा गावातून आले नसतील तर आजी तोपर्यंत जेवणाच्या ताटाला शिवतही नाही. जेव्हा आजोबा येतील तेव्हाच जेवण करेल हा तिचा पण असतो ...!!
कुठून येतं हे प्रेम , कुठून येते एवढं प्रेम करण्याची शक्ती...?
     एकमेकांवर रागावतील, चिडतील, शिव्या घालतील पण  जेवणाच्या वेळेस एकमेकांना जेवायला विचारल्याशिवाय घास तोंडात सरकवणार नाहीत....
     यांना याचं प्रेम कधीच बोअर वाटत नाही, अन् यांनीच तर थेट लग्नात एकमेकांना पाहिलेलं असतं , मग कोणतं प्रेम खरं समजायचं ...?
     प्रेम निःस्वार्थपणात अन् निरागसतेत असतं, प्रेम हे ठरवून होत नसतं. जगात प्रेम गोष्टचं न्यारी आहे, त्यात निरागसता ही भरभरून असते ...!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

6 comments:

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...