Tuesday, May 21, 2019

"यारी"तली दुनिया...!!

आज काही कामानिमित्त बस स्टँड वर जाणं झालं.
जसं-जसं स्टँड मध्ये जात होतो; तसं-तसं कॉलेजच्या दिवसांचा एक चित्रपट समोर दिसू लागला..!!
नुकतंच दहावीच्या वर्गातून, दहावीच्या बंधनातून, म्हणजे शाळेतून कॉलेजात पाऊल ठेवलेलं....!!
कॉलेज जीवनाबाबत खूप ऐकलेलं , पाहिलेलं, अन् वाचलेलं होतं
अन् ते दिवस आत्ता अनुभवन्यास मिळणार होते.
त्यामुळे कॉलेज जीवनाबाबत खुप कुतूहल होतं.
   दहावीची शाळा गावात होती अन् आत्ता कॉलेजसाठी तालुक्याच्या ठिकाणी जायचं होतं ती उत्सुकता वेगळीच...!
    1-2 किलोमीटर चालत जाऊन लाल डब्बा पकडायचा, तो नेहमीप्रमाणे कधीच वेळेवर यायचा नाही आणि त्या डब्ब्यात गर्दी खूप असली तरी ही त्यात मज्जा यायची..!!
एखाद्या दिवशी बस रिकामी असली की उदास वाटायचं.
गर्दीतल्या धक्यांची सवय झालेली....!!
कॉलेजमध्ये मग वर्गात बसायचं, काही चाळे केले तर वर्गाच्या बाहेर ही जावं लागायचं!!
    नवीन मित्र भेटले, भांडण झाली, प्रॅक्टिकला सरांचा मारही खाल्ला...!!
तास बुडवून स्टँडवर कोणाची तरी वाट पाहत बसणं...भारीच!!
    मित्राच्या "ति"च्या साठी तासनतास कॉलेजच्या कोपऱ्यावर थांबून ती आली की इशारत करणं..!!
कॉलेजच्या पहिल्याच दिवशी बस मध्ये चमकलेली "ती" अन्
"ती" येणार म्हणून स्टँड वर तिच्या अगोदर एक तास जाऊन बसणं....!
बस मध्ये 'ती" असल्यावर तेव्हा उगाच समाजसेवेचा आव आणत एखाद्या आजी-आजोबांचा शोध घेत त्यांना आपल्या सीट वर जागा देऊन, बस मध्ये खुप मोठं काम केल्यासारखं कॉलर टाईट करणं...!!
असं करत कॉलेज कधी संपलं कळलंच नाही, यात रिझल्टची पूर्ण वाट लागली होती....!
   पण या कॉलेज जीवनाने खूप शिकवलं, आयुष्याविषयी खूप धडे दिले, कसं जगावं, कसं असायला पाहिजे,आपण कसे आहोत याची ओळख झाली, चमकलेली "ती" ही इथंच दिसली, अन् as usual कायम "ती" ही पराई च राहिली.... ठेवली..!!
खूप भारी दोस्त मिळाले...! जीवाला जीव देणारे यार मिळाले.
कॉलेजमध्ये पहिल्यांदा भेटले तेव्हा कोणीच नव्हते ते..!!
पण नंतर जीवनामध्ये वादळासारखे घुसले..
 पुन्हा आयुष्य कधी जुन्या वळणावर आलं नाही..!!
चहाच्या टपरीवरच्या गप्पा....!!! आज ती टपरी आहे, पण कमीने दोस्त नाहीत...!!
 कॉलेज ते स्टॅन्ड पर्यंत केलेला दंगा, घालवलेला वेळ, केलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी....!!
     जगाचा विसर पडून केलेले कांड....! आजही आठवलं तर एक छोटंसं हसू आणतात....!!
किती वेडे होतो आपण यात अभिमान वाटतो...!!! एकमेकांसाठी सोडलेल्या बस...!!
आज सर्व आठवत गेलं.
यात graduation, postgraduation अन् नंतरच्या एका वर्षातील कमीने यारही आठवत गेले.
   या दोस्तांनी खूप छळलं, चिडवलं, खुप पिडलं,पकवलं, गडवलं त्यांच्याकडे पाहिलं, तर वाटायचं यार मला दुष्मनांची गरजच नाही.
त्यांना एक सल्ला विचारला तर पन्नास सल्ले द्यायचे..!
 ज्या प्रश्नांवर स्वतः गंडलेले असतात, confused असतात, त्याचं उत्तरं आपल्याला मात्र confidently द्यायचे,
म्हणायचे, 'कर तू बिंधास्त, तू करू शकतो हे', स्वतः पेक्षा आपल्यावर जास्त भरोसा करणारे...!!
त्यांच्यावर भरोसा ठेवून आपणही मग बिनधास्त करायचो, ते म्हणतील तसं! उगाच हरभऱ्याच्या झाडावर बसवलं जायचं पण त्यामुळे तर डेअरिंग केली, नाहीतर आपण कधीच केलं नसतं...!!!
त्यांचा असणारा विश्वास आपल्याला आत्मविश्वास देऊन जायचा...!!स्वत:च्या खिसा रिकामा असताना,
ते उधारी करून आपली गरज भागवायचे...!!
     कॉलेजच्या शेवटच्या दिवशी हे सगळे कमीने उदास होते, पण हळवं कोणी झालं नाही. सगळ्यांनी भेटत रहायचं हे एकमेकांना शिव्या देऊन सांगितलं...!!
पण जो तो आपापल्या आयुष्यामध्ये busy झाले...! काहींबाबत गैरसमज होऊन दुरावले गेले , काही गोष्टी न पटल्यामुळे स्वतः दूर झालो,पण त्यामुळे कधी त्यांच्याबाबत तिरस्कार वाटला नाही. आज त्यांनाही तेवढाच आदर आहे, राहील...!
   काहींची विकेट पडली, काही कामानिमित्त बाहेर पडले,
काही जॉब मधून बॉस सुट्टी देत नाही म्हणत बॉसला शिव्या देतात तेव्हा आपणच समजुन घ्यावं..!
आपण तरी कुठं वेळ काढुन भेटतो ?
   आत्ता महिन्यातून एखादा कॉल होतो , 4-5 महिन्याने भेट होते, यातच समाधान मानणं अगत्याचं..!
हे सगळं-सगळं वारुळातुन बाहेर पडणाऱ्या मूग्यांप्रमाणे हळूहळू सर्व आठवत गेलं..!!!
पण आत्ता वेळ ही खूप झाला होता,त्यामुळे आत्ता हे सगळं तिथंच सोडून निघणं गरजेचं होतं.
जस पाऊलं स्टँड च्या बाहेर च्या दिशेने जात होते तसे आठवणीतून बाहेर पडत होतो .....!!
पण एक नक्की "ओ दिन कभी नहीं भुलेंगे ...!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

2 comments:

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...