Saturday, May 21, 2022

रे गड्या आता आवरायला घेऊ...!!


चल गड्या, आता पसारा आवरायला घेऊ,

माळ्यावरच्या गोष्टींची थोडी निवड करू,

थोडं तुझं, थोडं माझं समजून घेऊ,

अडगळीवरची धूळ थोडी साफ करू..!!


आपलं, आपलं म्हणून जपून ठेवलं होतं,

जगापासून दूर कुठंतरी दुःखं लपवलं होतं,

पण आता त्या अडगळीलाही ओझं झालंय,

धूळ साचून त्यावरती जरा जडच झालंय..!!


सारताना धुळ ती डोळ्यांत जाईल,

त्यामुळे कदाचित पापणी ओलीही होईल,

पण नाही, आता ती सुद्धा म्हणतेय,

बस्स झालं गडया आता पसारा आवरायला घेऊ...!!


वाण सामानांची निवड मात्र करू,

अजून मोह सुटणार नाही,

टाकून देणं जमणार नाही,

कधीतरी कुठंतरी वाटत राहील,

हे आपलं आहे आपलंच राहील,

पण गड्या हा मोह जरा वाईटच,

जसा तुझा तसा माझा ही...!!


याने लपवलेलं साचत राहील,

ते जपताना-लपवताना धडपड होईल,

याच धडपडीत कदाचित तूच तुला विसरून जाशील,

म्हणून म्हणतो, गड्या आता थोडं आवरायला घेऊ,

मनाला थोडं सावरायला घेऊ...!!


रे गड्या, जगणं हा व्यवहार आहे,

हे पचायला थोडं जड आहे,

पण बेरीज-वजाबाकीच्या गुंत्यात आपण पडायचं नसतं,

जी बाकी उरेल तीला डावलायचं नसते,

म्हणून कधीतरी अडगळीवरच्या गर्दीला वाट करून द्यायची असते....!!


म्हणून म्हणतो, बस्स झालं गड्या आता आवरायला घेऊ,

माझं असं मुळीच काही  नसतं,

जे याक्षणी आपलं असतं, तेचं फक्त आपलं असतं,

पुढच्या क्षणाचं आपल्याला काही माहीत नसतं..!!


जपून ठेवलेलं आजपर्यंत आता बाहेर डोकावू पाहतंय,

पोटमाळ्यावरची धूळ आता डोळ्यांत जाऊ पाहतेय,

तीसुद्धा आता थकलीय,

पांघरून घालून,

तिलाही कळून चुकलंय,

आता पापणी ओली होणार म्हणून...!!


झालीच पापणी ओली तर होउदे,

आलंच डोळ्यात पाणी तर येऊ दे,

पोटमाळ्यावरच्या ओझ्याला मात्र अंगणात येऊ दे,

जे चांगलं ते आपोआप त्याची जागा घेईल,

म्हणून म्हणतो, गड्या आता बस्स

पोटमाळ्यावरच्या गर्दीला आता आवरायला घे,

 मनाला सावरायला घे...!!


पसारा आवरताना,

अडगळीत पडलेल्या आपल्या मनाला सावरताना...

प्रत्येकाला आपलं कोणतरी हवं असतं.. 

मनाच्या विचारांच्या गर्तेत गुंतलेलं असताना,

लांब कुठंतरी मन मोकळं होईस्तोवर हिंडवून आणणारं.

म्हणून चंद्राशी दोस्ती करायची असते ,

दूर त्याच्याशी गप्पा मारायला शिकायचं असतं..

काळाच्या उदरात परतीच्या वाटेवर 

आठवणींचा साकव जोडत जोडत 

सुखाच्या मुक्कामी नेणारा तोच आपला चंद्र जपायचा असतो.!❤️



#पसारा❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

12 comments:

  1. Fabulous lines .. keep it up sirji ...🤟

    ReplyDelete
  2. पसारा आवरला की नव्याने येणाऱ्या कवडशाची वाट मोकळी होऊन जाते..!
    Great Going.. Keep Writing!!🍂

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर शब्द रचना सोमनाथ

    ReplyDelete
  4. मस्त शब्दरचना😊
    तरीसुद्धा मी खोली झाडणार नाही😎

    ReplyDelete
    Replies
    1. 😀 हा हा हा .....its ok मित्रा ❤️

      Delete
  5. Somnath Navnath LadhaneJune 11, 2023 at 8:25 PM

    👌

    ReplyDelete
  6. अप्रतिम...

    ReplyDelete

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...