Sunday, May 1, 2022

जे माझं होतं, ते मजपाशीच राहिलं...!!!


                                     जे माझं होतं,

ते माझ्यापाशीच राहिलं,

जशी मातीत गाडण्याने

बियांची होते  वेली,

त्या वेलींपासून कळ्यांची फुलं झाली,

सुगंध देत-देत पुन्हा मातीत मिसळली...!!


जेव्हा वेली बहरून आली,

तेव्हा भ्रमरानीं चांगलीच गर्दी केली,

पण अंतसमयी मातीत मिसळताना

बहुतांनी पाठ फिरवली....!!


जे माझं होतं ते मज पाशीच राहिलं,

जे जगाचं उसनं होतं ते लोप पावलं,

हा येतील प्रकाशाच्या वाटेवर हात देणारे,

पण नसतील दूरवर कोण अंधाऱ्या वाटेवर साथ देणारे,

पण ही तर जगाची रीतच रे,

तेव्हा अंधाऱ्या वाटेवरच्या तू कवडश्यांचा शोध घे,

नाही भेटला काजवा जरी,

तरी तू कोणाचा काजवा होऊन घे,

पुसटश्या त्या चेहऱ्यावरचं समाधान मात्र बघून घे....!!


जे तुझं असेल ते तुझंजवळंच राहिल,

जे उसनं होतं ते मात्र निरोपच घेईल,

निरोप घेणाऱ्याला कधी आडवायचं नसतं,

येणाऱ्याचं मात्र खुल्या मनाने स्वागत करायचं असतं...!!


हा वाटतं,शपथानीं जरी बांधलं होतं,

'तू' अढळ ध्रुव तारा असं म्हणलं होतं,

पण वादळं येतात,

जशी झाडं कोलमडतात,

तसं मनीचं झाडं ही कोलमडतं,

किती दिस असं पकडुन राहणार,

एक ना एक दिस तेही दूर होणारच...!!


काही क्षण किती ही मुठीत बंद केले,

तरी कोणाच्या ना कोणाच्या नजरेस ते पडनारच,

मुखवट्यांमागचं जग सामोरे येतं राहिल,

यात फक्त माझं होतं तेच मजपाशीच राहिल,

वास्तवतेच्या कमानीतून तेच पार होईल...!!


हा हसणारे हसून जातील, पाहणारे पाहत राहतील,

तू चांगली फुलं वेचत रहा, एकमेकांत गुंफत रहा,

जरी जातील सुकून, होतील दूर,

तेव्हा पकडुन ठेवण्याचा अट्टहास नको करू,

मान्य दुरावणारी गोष्टच हवी असते,

तीच सगळ्यात प्रिय बनते,

पण जे दुरवणारं असतं ते कधीच थांबणारं नसतं....!!


पण अंततः जे माझं होतं ते मजपाशीच राहिलं,

अढळ वाटणारे तारे ही गळून पडले,

गुंफलेली फुले ही सुगंध देत मातीत मिसळले,

आता जे राहतील तीच प्राणप्रिय जपायची,

अजून आनंदाची झाडं लावायची,

त्यांची फुलं अट्टहासाविना वेचायची,

ठेच लागून पडलो तरी पुन्हा उठायचं,

फुलं वेचण्याचं कधी ना थांबवायचं,

जमलं तर गुंफून फुलांना एकमेकांत,

एक सूंदर माळ बनवायची...!!


माळताना त्यांना एकमेकांत,

त्या फुलांचा सुगंध श्वासात साठवायचा असा,

की अंतसमयी सुद्धा आठवावा जसा,

शांत.... सुंदर.... बकुळीच्या फुलांसवे....!!


#माझं_मजपाशी❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

No comments:

Post a Comment

शोध...!!

शीण दिसाचा तोलायला  सांज अप्रूप भासे, पुनवेच्या चांदण्याला  ओलावल्या पापण्या हलकेच दिसे... भार हा दिसाचा रात अलगद पेलते, उतरणीला जाताना  गूज...