Sunday, February 23, 2020

वसुंधरेकडून घेऊ काही ....!!!


      कसा असतो ना निसर्ग ....!! झाडाची पूर्ण पानं गळून गेले तरी नाउमेद न होता, नव्या जोमाने सुरवात करतो अन् तीच ऊर्जा तोच गोडवा घेऊन सर्वांना आनंदित करतो...!!
       झाडाचं गळून पडलेलं प्रत्येक पान जाता-जाता छान संदेश देऊन जातं, मी  जातो आहे, पण माझ्या जाण्याने नवनीनिर्मितीचा कोंब फुटणार आहे,नवीन पालवी फुटणार आहे अन् याच आनंदात मातीत मिसळून जातं मातीचं होतं.!!
     नवनिर्मितीची हे संक्रमण हे कोणाच्यातरी त्यागातून कोणाच्यातरी निस्वार्थी,समर्पणाच्या भावेतूनच चालू राहत असतं.
याच गोष्टी जर निसर्गाची निर्मिती असणाऱ्या मानव मध्ये आल्यातर निसर्ग जसा नवप्रेरीत करणारा , नाविन्याचा ध्यास असणारा सृजनशील आहे. तसाच मानव ही सृजनशील, नवप्रेरीत अन् नाविन्यपूर्ण असेल..!
पण आपल्याला स्वतःची तर सोडाच पण निसर्गाकडूनच मिळालेली गोष्ट देण्यास आपण कचरतो.
निसर्गाकडे पाहीलं तर खूप प्रेरणा मिळते, पण आपण चांगलं लवकर घेत नाहीत, स्वीकारत नाहीत.
जे स्वीकारायला पाहिजे, ते अंगवळणी पडत नाही अन् पडलंच तर ते समाजात रुचत नाही.
म्हणूनच माणूस हा प्राणी निसर्गाची निर्मिती असूनही निसर्गासारखं पारदर्शक, दानशूर, निस्वार्थी कधीच होत नाही, होता येणारही नाही...!
   आपणास विंदा करंदीकरांची कविता पूर्णत्वाने लागू होते.
        "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे"
        "घेता-घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे"
माणसाला आणखी एक  भा.रा. तांबेच्या कवितेचं बिरुद लावलं जातं की जे साजेसंच आहे...!!
        'जो तो वंदन करी उगवत्या,'
        'जो तो पाठ फिरवि मावळत्या,'
        'रीत जगाची ही रे सवित्या'
       "स्वार्थपरायणपरा |"
पण त्याच निसर्गाची निर्मित्ती असणारी पानं, फुलं, फळांच्या बाबतीत असं कधी होत नाही.
      त्यांचा परोपकारी, निस्वार्थी बाणा आपणास छान संदेश देऊन जातो. फक्त पाहणाऱ्याने त्या-त्या नजरेनं पाहावं....!!
      काही सुगंधी फुलांकडे सौंदर्य असेलचं असं नसतं अन्
काही दिसायला मोहक असतात पण ते सुगंधी असतातच असं नाही..!!
पण आपण इथंही अपेक्षा करतो की सुंदर दिसणाऱ्याने सुगंधितही करावं
कसं शक्य आहे....!!??
       ज्या झाडाने फळातील गोडवा द्यावा त्यानेच कसं वाटसरूस शीतल छाया द्यावी....!!
       भल्या पहाटे उठून निसर्गाच्या सानिध्यात एक फेरी मारली तर  निसर्गाचा नवीन आविष्कार अनुभवण्यास मिळतो.
तो पक्ष्यांचा किलबिलाट, दूरवरून ऐकू येणारी कोकिळेची कुहुकुहू , असाच दूरवरून संदेश घेऊन येणारा, पानांची शीळ वाजवणारा, मंद थंडगार वारा..! त्याची झुळूक जेव्हा सर्वांगाला स्पर्श करून जाते ना, तेव्हा कोण्या एका प्रियकराने किंवा प्रियसीने फुंकर मारल्या नंतर जी आवर्तने निर्माण होतात अन् पूर्ण अंग शहारले जातं तसा भास होतो...!!
        नंतर पूर्वेकडून क्षितिजाआडून आकाशाला त्याच्या रंगानी नाहून टाकणारा सुवर्णगोल पूर्ण आभाळ तांबूस रंगाने रंगवतो अन् आदल्या दिवसापेक्षा जास्त तेजोमय उत्तेजित दिसतो. तेव्हा तो क्षण पाहणं अवर्णनीय असतं ...!!!
तेव्हाच पक्षी आपल्या पिल्लांसाठी खाऊ आणण्यासाठी उंच आकाशी फरारी घेतात, तो क्षणही  तांबूस रंगात लोभनिय वाटतो...!!
      अन् हीच निसर्गाची देणगी दिवसभरासाठी पुरून उरते....
पण माणूस दिवसभराच्या कटकारस्थानाने थकतो
त्याला परत उत्तेजित करण्यासाठी असते ती कातरवेळ..!!
   दिवस आणि रात्र यांना जोडणारी वेळ म्हणजे कातरवेळ.
पश्चिम क्षितिजापासून हातभरावर सूर्यगोल दिसू लागला की सुरू होतो सूर्यास्ताचा अटळ उत्सव. लाल-तांबड्या रंगाच्या अक्षरशः अगणित छटांचा मनसोक्त उधळण होते . नारिंगी, केशरी, भगव्याची उधळण होते.
      सूर्यास्ताचा अटळ उत्सव असं मनाला उलथंपालथं करतो. खळबळून काढतो. तरीही हवासा वाटतो....... या कातरवेळी प्रत्येकाला हवा असतो एकांत ....एक स्वतःचा क्षण....त्यावेळेस त्याला भान हरपून शांत बसणं पसंद असतं....!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

तू सांजवेळची कविता...!!

  दिवस संपून जातो, तरी बाकी काहीतरी उरतेच, उगवत्या बरोबर केलेली खूणगाठ कुठंतरी सुटतेच....!! कुठं सुटली म्हणून  मन मात्र लढत राहतं, एक मन दुस...