कृष्ण होता यावं...!!!
प्राणप्रिय,
बासरी सोडता यावी,
गोकुळ सुटलं जावं,
दही दूध लुटायचं
राहून जावं,
जगण्यात कृष्ण होता यावं....!!!
आपलं घर सोडून
दुसऱ्याचं घर आपलं करता यावं,
जगण्याच्या बेड्या सोडून
मुक्त जगता यावं,
जगता-जगता आख्ख गोकुळच
आपलंसं करता यावं....!!!
जगण्यात बासरीचे सूर
अन् जिरेटोपातल्या
मोरपिसाचे रंग भरता यावे,
यमुनेतल्या कालियावर बसून
संकटाची चिरफाड करता यावी....!!!
कृष्ण होता यावं,
प्राणांतिक सखी
राधेपासून दूर होता यावं,
सगळं सुटताना,
सगळं दूर जाताना,
चेहऱ्यावर हास्य मात्र ठेवता यावं....!!!
जगण्यात कृष्ण हे पान जोडता यावं,
जगण्यात कृष्ण होता यावं,
जे सुटलं, ते सुटलं,
पुन्हा मागं वळायचं नाही...!!!
बासरी सुटली,
गोकुळ सुटलं,
सवंगड्याचं पान हरवलं,
राधेच नाव गोकुळातच राहिलं,
बासरीचे सूर हरवले,
मोरपिसाचे रंग विरले,
तरी कृष्ण कृष्णच राहिला....!!!
तोची सत्याचा सारथी बनला,
द्रौपदीचा सखा जाहला,
हा, हा तोच सर्वस्व
तोच विधाता,
चराचरात राहिला...!!
महाभारताचा मुखपृष्ठ जाहला,
धर्मवसविण्याकारण
कोणाकडून शापित झाला...!!!
आपल्याच डोळ्यादेखत
आपल्याच वंशाचा नाश त्याने पाहिला,
अन्
सगळं जग सुदर्शनात मावणारा,
हा तोच कृष्ण,
जगाचा निरोप
नियतीच्या हातात ठेवून रिकामा जाहला....!!!!
देवच तो तरी नियतीच्या नियमांच
वकूब त्याने राखला,
पारध्याने धरलेला निशाणा
चरणकमलातून आरपार गेला...!!!
जगाचा पालनकर्ता
स्मितहास्य करत इहलोकीचा जाहला
अन् कृष्णाचा 'श्रीकृष्ण' जाहला...!!!
अन्
म्हणूनच कृष्ण हे पान जोडता यावं....!!
यातनांचा डोंगर उचलून हसता यावं...!!
#जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃

No comments:
Post a Comment