Monday, September 27, 2021

कधी कधी...!!

 

कधी कधी 

तुमच्या दोन चांगल्या शब्दांनी काही चांगलं होणार असेल,

तर ते बोलायचे असतात,

कधी कधी,

वाईट बोलल्याने काही चांगलं होणार असेल,

तर वाईट बोलायचं असतं,

कधी कधी

मनात खूप काही असताना,

काहीच नसल्याचा आव आणायचा असतो,

कधी कधी 

काही चांगलं होणार असेल तर,

भळभळणारी आपली जखम लपवायची असते,

कधी कधी

तुमच्या "नाही" ने काही चांगलं होणार असेल,

तर 'हो' असताना ही 'नाही' म्हणायचं असतं,

कधी कधी 

काही चांगलंच होणार असेल 

तर जसे आपण नसतो, तसेच आहोत अस भासवायचं असतं,

कधी कधी 

काही चांगलं होण्यासाठी,

स्वतःला वाईट म्हणूवून घ्यायचं असतं,

आज नाही पण उद्याच्या उज्वलतेसाठी आज स्वतःला जाळायच असतं,

कधी कधी 

काही चांगलं घडणार असेल तर 'स्व' बाजूला ठेवायचा असतो,

कधी कधी 

एकरूप पाण्याच्या प्रवाहाचा आपण दुभाजक बनत असेल,

 तर नकळत स्वतः बाजूला व्हायचं असतं,

कधी कधी 

लडखडणाऱ्या पायांना हात द्यायचा नसतो,

त्यांना त्यांच्याच पायावर उभं राहू द्यायचं असतं,

कधी कधी 

काही चांगलं होणार असेल,

तर प्रवाहाच्या उलट दिशेने चालायचं असतं,

जखमा होणार असल्या तरीही....!!


#जगणं❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃



Thursday, September 23, 2021

एक दुःख हवंच..!!

 


एक दुःखं हवंच,

मखमली पाऊलवाटेवरून चालताना,

रक्ताळलेल्या ठेचांची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

उंच शिखरावर गेल्यावर,

मागे वळून पाहण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

जेव्हा कधी ठेच लागली,

आर्त हाक दिली,

त्या हाकेला साद दिलेल्यांच्या आठवणीसाठी..!!


एक तरी दुःखं हवंच,

जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

आकाशात उंच भरारी घेतल्यावर,

जमिनीवर येण्याची जाणीव देण्यासाठी..!


एक तरी दुःखं  हवंच,

समोरच्याच्या मनाचा ठाव घेण्यासाठी,

दुःखी माणसाच्या दुःखाची खोली कळण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

मखमली गादीवर झोपल्यावर,

जमिनीवरच्या अंथरुणाची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं तर हवंच,

वातानुकूलित गाडीत बसल्यावर,

भर उन्हात चालताना अनवाणी पायांना बसलेल्या चटक्यांची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

पंचतारांकित हॉटेलात जेवताना,

आईने घाईघाईने बांधून दिलेल्या भाकरीची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

सिग्नलला गाडी थांबल्यावर,

पोटासाठी भीक मागणाऱ्यांच्या वेदना कळण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

अलिशान बंगल्यात राहताना,

गावाकडच्या झोपडीत आईच्या कुशीतल्या उबेची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

आपलं छत सुरक्षित असताना,

ज्यांची घरं उध्वस्त झाली ना त्यांच्या हृदयाचा ठाव घेण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

मॉलमध्ये किंमती ड्रेस घेताना,

बापाने शेतात केलेल्या कष्टाची आठवण देण्यासाठी..!!


एक तरी दुःखं हवंच,

यशाची शिखरं चढताना,

प्रवासात अंधारून गेलेल्या पाऊलवाटेवर दिलेल्या साथीची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

कवितेच्या शब्दांसाठी,

त्या शब्दांना धार येण्यासाठी..!!


एक तरी दुःखं हवंच,

एकांतात सोबत करण्यासाठी,

कुरवाळत आसवं ढाळण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

आपल्यापासून आपणच खूप दूर गेल्यावर,

पुन्हा एकदा मागे वळून स्वतः ला शोधण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

सुखाची किंमत कळण्यासाठी,

समाधानी जगण्याचा अर्थ कळण्यासाठी..!!


#जिंदगी_का_फ़ंडा🍃

भरून आलेल्या...!!


 

भरून आलेल्या आभाळाकडून,

कोसळणं शिकावं..!


विरहाने तापलेल्या पृथ्वीकडून,

वाट पाहणं शिकावं..!


प्रेम भरल्या सरींकडून,

तहान भागवनं शिकावं..!


दूरवरून आलेल्या वाऱ्याकडून,

पानासंग गीत गाणं शिकावं..!


उगवणाऱ्या सूर्याकडून,

काळोखावर मात देणं शिकावं..!


मावळत्या सूर्याकडून,

निरोपाचा मोल जाणावं..!


मातीत गाडलेल्या बीजाकडून,

नवनिर्मितीचं गमक घ्यावं..!


इवलूश्या कळीकडून,

उमलण्याचं धैर्य शिकावं,

त्याकळीच्या फुलाकडून,

सुगंधाचं देणं शिकावं,

अन् फुलता फुलता एक दिवस,

कोमेजून सहजतेने मातीतही मिसळावं...!!

फक्त इतकं सहजतेने जमावं..!!


#निसर्ग_गुरू❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃


बरं झालं ईठ्ठला..!!


थकलेल्या आजोबाची कहाणी त्यांच्याच शब्दात गुंफण्याचा प्रयत्न.....

बरं झालं ईठ्ठला नजर अंधुक जाहली,

जे जे वाईट ते दिसायची ईपत टळली..!


बरं झालं ईठ्ठला नजर अंधुक जाहली,

डोळ्यादेखत अन्याय पहायची नौबत ना आली..!


बरं झालं ईठ्ठला बहिरा मी जाहलो,

अनिष्ठ ऐकण्यातून सुटका मज जाहली..!


बरं झालं ईठ्ठला बहिरा मी जाहलो,

काळजात घुसणारे शब्दबाण लांबूनच रोखू शकलो..!


बरं झालं ईठ्ठला गुडघे कुरबुरु लागले,

दूर जाऊन माणसांतही एकटा मी ना राहिलो..!


हे सर्व असते असह्य मज जाहले,

म्हणून म्हणतो,

बरं झालं ईठ्ठला गोष्टी इसरायला लागलो,

ओझ त्या जखमांचं उतरू चाललो..!


बरं झालं ईठ्ठला जे केलं ते खूप,

म्हणूनतर दुखःबरोबर चाखू शकलो सुख....!!


#कहाणी_जेष्ठत्वाची❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃


Thursday, September 9, 2021

माणूस एक बंद पुस्तक...!!

माणूस म्हणजे एक बंद पुस्तकंच. त्या पुस्तकाची सुरवात आणि शेवट जरी सारखाच असलातरी, आतमधील पानं मात्र खूप विभिन्न, काही फाटलेली, पण व्रण ठेऊन गेलेली. काही आयुष्याच्या भागदौड मध्ये गळून खूप दूर जाऊन पडलेली तर काही चुरगळुन गेलेली, अगदी जीर्ण झाली तरी प्राणप्रिय जपलेली....!!
काही पानांची कितीही पारायण झाली तरीकाही अनटोल्ड स्टोरी सम नव्यानेच भासनारी....
       प्रत्येक पान प्रत्येकाला समजेलच असं नाही आणि वाचकाने त्याचा अट्टहास ही धरू नये...!!
        काही कथा आणि व्यथा या ज्याच्या त्यालाच भोगायच्या असतात त्यामुळे शहाण्याने खोलात जायचं नसतं....
       कितीतरी जखमांचे हुंदके, उसासे आतल्या आत प्रत्येक पानात दडलेले असतात प्रत्येक शब्दांची एक नवी कहाणी बनून. जसे उसासे-हुंदके तसेच कधीच कोणाला सांगता न येणारे असे असंख्य क्षण...!!
असे काही क्षण ज्यांची पुन्हा कधीच आठवण ही होऊ नये,
तर असे काही क्षण जे कधीच विसमूर्तितही जाऊ नये.
अन् असेेही काही क्षण, क्षणभर डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर हसू आणणारे...!
असे प्रत्येक माणसाचे असंख्य क्षण हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यात जाऊन पडलेले असतात, बंद दाराआड...!
हे तेच क्षण असतात जे करतात आपल्याबरोबर सोबत प्रत्येक वाटेवर काळोखातल्या असो किंवा प्रकाशातल्या अन् आपल्याबरोबरच जगाचा निरोपसुध्दा घेतात.
        माणसाला जवळचं म्हणून असं कोणी नसतंच मुळी, ज्यांच्याशी तो सगळं-सगळं खरं सांगून टाकेल, काहीतरी कुठंतरी, कधीतरी असुरक्षिततेची पाल कायम पिच्छा पुरवत असते.
बोलताना-ऐकताना कुठंतरी,कधीतरी ही असुरक्षिततेची पाल लुकलूकतेच आणि मग सुरू होतो लपंडावाचा जीवघेणा खेळ.
        कोणाचंतरी काही गुपित आपल्याकडे ठेऊन, आपलं काही गुपित त्याच्याकडे ठेऊन अव्यक्त करार होतो, व्यवहार होतो आणि त्या करारावर नाती कायम हेलकावे घेत राहतात ... अन् मग नात्यांमध्ये फरफट कोणाची तरी होणारंच हे ठरलेले असतं, कधी याची तर कधी त्याची ... कितीही नाही म्हंटलं तरी प्रत्येक नातं स्वार्थापोटीच बनलं जातं अन् राखलं सुध्दा जातं... कदाचित खुपजण या मताशी असहमत असतीलही पण हे मत नाकारले जाईल असं होणार नाही....
         एकांतात मनाला नेहमी प्रश्न सतावत राहतो. हे जे बंद पुस्तक आहे, हे कधी उघडतं का..? ही बंद दारं खरंच कोण ठोठावतं का?
ठोठावलंच तर ही मनाच्या अडगळीची बंद दारं कधी उघडतील का..??
नाही म्हणजे उघडलीच तर ते कोणत्या स्वरूपात उघडतील...??
         हा हा हा इथंसुद्धा असुरक्षितता😬😀 म्हणजे स्वतःच्या विचारांवर सुद्धा हे भूत स्वार असतं. याचपायी माणूस कायम धावत राहतो कधी खऱ्यागोष्टींपासून तर कधी खोट्यापासून...!
अन् यांतच हे बंद पुस्तक अजून कुलूप बंद करण्यासाठी माणूस नवनवे तंत्र अवगत करतो यात कधी घसरतो तर कधी क्षितिज गाठतो...!! अन् पुन्हा त्या बंद पुस्तकाची पान लिहीत राहतो, दिगंतरापर्यंत...!!
         जे पुस्तक तो स्वतःसुद्धा वाचू शकत नाही पण मात्र त्या पुस्तकाची पानं वाढत जातात दिवसोंदिवस...!! पण कधीतरी काही क्षण का होईना पुस्तक उघडण्याचा मोह अनावर होतो आणि मग तेव्हा माणूस, माणूस राहत नाही तो एक विचार बनतो..
जो विचार कायम वाहत राहतो, पाषाणात सापडलेल्या जिंवत पाण्याच्या झऱ्यासारखा..तेव्हा त्याला नसते तमा कशाचीच, नसते पर्वा कडक दुष्काळाची, ना पाषाणाच्या दाहकतेची.
        हे बंद पुस्तकाचं ओझं वागवता वागवता आयुष्याची संध्याकाळ होते.अशी संध्यावेळ जेव्हा सूर्य आयुष्यभराची दाहकता पोटात साठवून अस्तचलास निघालेला असतो..!!
        आयुष्याच्या संध्याकाळी मंद,शांत कोमल किरणांचा आभास देऊन, कसलाही आततायीपणा न करता, कसलीही घाई न करता, जीवनाच्या मिथ्या असणाऱ्या मोह, लोभ, मत्सराच्या डोंगराला मागे सोडून सर्वांच्या दृष्टीआड होत, मंद पावलं टाकत माघारी फिरतो, क्षितिजापल्याड जातो.
         आयुष्याच्या सकाळ धामधुमीत उत्साहात सुरू होऊन, आसमंत प्रकाशमय करून, कर्तृत्वाच्या प्रकाशाने तळपत राहून आजची ही संध्याकाळ झालेली असते.यात एक पुस्तक मिटून जात असतं न उघडताच, ज्या पुस्तकाची पुनरावृत्ती कधीच न होण्यासाठी...!!
हे अमूल्य, अतुलनीय पुस्तक एकाही वाचकाविना अमर होतं, बंद होतं अगदी कायमचं....!!! 

#आयुष्याचं_पुस्तक❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...