Thursday, September 23, 2021

एक दुःख हवंच..!!

 


एक दुःखं हवंच,

मखमली पाऊलवाटेवरून चालताना,

रक्ताळलेल्या ठेचांची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

उंच शिखरावर गेल्यावर,

मागे वळून पाहण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

जेव्हा कधी ठेच लागली,

आर्त हाक दिली,

त्या हाकेला साद दिलेल्यांच्या आठवणीसाठी..!!


एक तरी दुःखं हवंच,

जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

आकाशात उंच भरारी घेतल्यावर,

जमिनीवर येण्याची जाणीव देण्यासाठी..!


एक तरी दुःखं  हवंच,

समोरच्याच्या मनाचा ठाव घेण्यासाठी,

दुःखी माणसाच्या दुःखाची खोली कळण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

मखमली गादीवर झोपल्यावर,

जमिनीवरच्या अंथरुणाची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं तर हवंच,

वातानुकूलित गाडीत बसल्यावर,

भर उन्हात चालताना अनवाणी पायांना बसलेल्या चटक्यांची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

पंचतारांकित हॉटेलात जेवताना,

आईने घाईघाईने बांधून दिलेल्या भाकरीची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

सिग्नलला गाडी थांबल्यावर,

पोटासाठी भीक मागणाऱ्यांच्या वेदना कळण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

अलिशान बंगल्यात राहताना,

गावाकडच्या झोपडीत आईच्या कुशीतल्या उबेची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

आपलं छत सुरक्षित असताना,

ज्यांची घरं उध्वस्त झाली ना त्यांच्या हृदयाचा ठाव घेण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

मॉलमध्ये किंमती ड्रेस घेताना,

बापाने शेतात केलेल्या कष्टाची आठवण देण्यासाठी..!!


एक तरी दुःखं हवंच,

यशाची शिखरं चढताना,

प्रवासात अंधारून गेलेल्या पाऊलवाटेवर दिलेल्या साथीची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

कवितेच्या शब्दांसाठी,

त्या शब्दांना धार येण्यासाठी..!!


एक तरी दुःखं हवंच,

एकांतात सोबत करण्यासाठी,

कुरवाळत आसवं ढाळण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

आपल्यापासून आपणच खूप दूर गेल्यावर,

पुन्हा एकदा मागे वळून स्वतः ला शोधण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

सुखाची किंमत कळण्यासाठी,

समाधानी जगण्याचा अर्थ कळण्यासाठी..!!


#जिंदगी_का_फ़ंडा🍃

4 comments:

  1. खरय��
    एक तरि दुःख हवच,स्वतः च्या सुखाच्या क्षणांना सगळ्यांंत वाटण्यासाठी, सहानुभुतीचा आव कमी अन् त्या निर्मळ मनासाठी..

    ReplyDelete

शोध...!!

शीण दिसाचा तोलायला  सांज अप्रूप भासे, पुनवेच्या चांदण्याला  ओलावल्या पापण्या हलकेच दिसे... भार हा दिसाचा रात अलगद पेलते, उतरणीला जाताना  गूज...