Thursday, September 9, 2021

माणूस एक बंद पुस्तक...!!

माणूस म्हणजे एक बंद पुस्तकंच. त्या पुस्तकाची सुरवात आणि शेवट जरी सारखाच असलातरी, आतमधील पानं मात्र खूप विभिन्न, काही फाटलेली, पण व्रण ठेऊन गेलेली. काही आयुष्याच्या भागदौड मध्ये गळून खूप दूर जाऊन पडलेली तर काही चुरगळुन गेलेली, अगदी जीर्ण झाली तरी प्राणप्रिय जपलेली....!!
काही पानांची कितीही पारायण झाली तरीकाही अनटोल्ड स्टोरी सम नव्यानेच भासनारी....
       प्रत्येक पान प्रत्येकाला समजेलच असं नाही आणि वाचकाने त्याचा अट्टहास ही धरू नये...!!
        काही कथा आणि व्यथा या ज्याच्या त्यालाच भोगायच्या असतात त्यामुळे शहाण्याने खोलात जायचं नसतं....
       कितीतरी जखमांचे हुंदके, उसासे आतल्या आत प्रत्येक पानात दडलेले असतात प्रत्येक शब्दांची एक नवी कहाणी बनून. जसे उसासे-हुंदके तसेच कधीच कोणाला सांगता न येणारे असे असंख्य क्षण...!!
असे काही क्षण ज्यांची पुन्हा कधीच आठवण ही होऊ नये,
तर असे काही क्षण जे कधीच विसमूर्तितही जाऊ नये.
अन् असेेही काही क्षण, क्षणभर डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर हसू आणणारे...!
असे प्रत्येक माणसाचे असंख्य क्षण हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यात जाऊन पडलेले असतात, बंद दाराआड...!
हे तेच क्षण असतात जे करतात आपल्याबरोबर सोबत प्रत्येक वाटेवर काळोखातल्या असो किंवा प्रकाशातल्या अन् आपल्याबरोबरच जगाचा निरोपसुध्दा घेतात.
        माणसाला जवळचं म्हणून असं कोणी नसतंच मुळी, ज्यांच्याशी तो सगळं-सगळं खरं सांगून टाकेल, काहीतरी कुठंतरी, कधीतरी असुरक्षिततेची पाल कायम पिच्छा पुरवत असते.
बोलताना-ऐकताना कुठंतरी,कधीतरी ही असुरक्षिततेची पाल लुकलूकतेच आणि मग सुरू होतो लपंडावाचा जीवघेणा खेळ.
        कोणाचंतरी काही गुपित आपल्याकडे ठेऊन, आपलं काही गुपित त्याच्याकडे ठेऊन अव्यक्त करार होतो, व्यवहार होतो आणि त्या करारावर नाती कायम हेलकावे घेत राहतात ... अन् मग नात्यांमध्ये फरफट कोणाची तरी होणारंच हे ठरलेले असतं, कधी याची तर कधी त्याची ... कितीही नाही म्हंटलं तरी प्रत्येक नातं स्वार्थापोटीच बनलं जातं अन् राखलं सुध्दा जातं... कदाचित खुपजण या मताशी असहमत असतीलही पण हे मत नाकारले जाईल असं होणार नाही....
         एकांतात मनाला नेहमी प्रश्न सतावत राहतो. हे जे बंद पुस्तक आहे, हे कधी उघडतं का..? ही बंद दारं खरंच कोण ठोठावतं का?
ठोठावलंच तर ही मनाच्या अडगळीची बंद दारं कधी उघडतील का..??
नाही म्हणजे उघडलीच तर ते कोणत्या स्वरूपात उघडतील...??
         हा हा हा इथंसुद्धा असुरक्षितता😬😀 म्हणजे स्वतःच्या विचारांवर सुद्धा हे भूत स्वार असतं. याचपायी माणूस कायम धावत राहतो कधी खऱ्यागोष्टींपासून तर कधी खोट्यापासून...!
अन् यांतच हे बंद पुस्तक अजून कुलूप बंद करण्यासाठी माणूस नवनवे तंत्र अवगत करतो यात कधी घसरतो तर कधी क्षितिज गाठतो...!! अन् पुन्हा त्या बंद पुस्तकाची पान लिहीत राहतो, दिगंतरापर्यंत...!!
         जे पुस्तक तो स्वतःसुद्धा वाचू शकत नाही पण मात्र त्या पुस्तकाची पानं वाढत जातात दिवसोंदिवस...!! पण कधीतरी काही क्षण का होईना पुस्तक उघडण्याचा मोह अनावर होतो आणि मग तेव्हा माणूस, माणूस राहत नाही तो एक विचार बनतो..
जो विचार कायम वाहत राहतो, पाषाणात सापडलेल्या जिंवत पाण्याच्या झऱ्यासारखा..तेव्हा त्याला नसते तमा कशाचीच, नसते पर्वा कडक दुष्काळाची, ना पाषाणाच्या दाहकतेची.
        हे बंद पुस्तकाचं ओझं वागवता वागवता आयुष्याची संध्याकाळ होते.अशी संध्यावेळ जेव्हा सूर्य आयुष्यभराची दाहकता पोटात साठवून अस्तचलास निघालेला असतो..!!
        आयुष्याच्या संध्याकाळी मंद,शांत कोमल किरणांचा आभास देऊन, कसलाही आततायीपणा न करता, कसलीही घाई न करता, जीवनाच्या मिथ्या असणाऱ्या मोह, लोभ, मत्सराच्या डोंगराला मागे सोडून सर्वांच्या दृष्टीआड होत, मंद पावलं टाकत माघारी फिरतो, क्षितिजापल्याड जातो.
         आयुष्याच्या सकाळ धामधुमीत उत्साहात सुरू होऊन, आसमंत प्रकाशमय करून, कर्तृत्वाच्या प्रकाशाने तळपत राहून आजची ही संध्याकाळ झालेली असते.यात एक पुस्तक मिटून जात असतं न उघडताच, ज्या पुस्तकाची पुनरावृत्ती कधीच न होण्यासाठी...!!
हे अमूल्य, अतुलनीय पुस्तक एकाही वाचकाविना अमर होतं, बंद होतं अगदी कायमचं....!!! 

#आयुष्याचं_पुस्तक❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

No comments:

Post a Comment

शोध...!!

शीण दिसाचा तोलायला  सांज अप्रूप भासे, पुनवेच्या चांदण्याला  ओलावल्या पापण्या हलकेच दिसे... भार हा दिसाचा रात अलगद पेलते, उतरणीला जाताना  गूज...