Monday, December 23, 2019

अडगळीतलं सोनं...!!!!

      आज रात्रीचं जेवण झाल्यानंतर, मांजरी रोड वर शतपावली करावी म्हणून चालत होतो...!!
      तेव्हा एक दृश्य मनाला छेदून गेलं , त्याच्यांकडे लक्ष जायला कारणही तसंच होतं...!
       साधारणतः 70-75 वय वर्षे असणारे आजोबा हातगाडीवर मेथीच्या 20-25 जुड्या घेऊन विकण्यासाठी बसले होते , त्यांना साधं उभाही राहता येत नव्हतं, तरीही ते स्वतः ला संभाळत हातगाडी पुढे-पुढे ढकलत चालत होते....!!!
मग मनात असा प्रश्न पडला , कुठून येते यांच्याकडे एवढी ऊर्जा...!?
     आयुष्यभर कष्ट केलेलं असतं, कारण की आयुष्याच्या संध्याकाळी थोडे-थोडके सुखाचे दिवस येतील, दोन घास आनंदाने खाता येतील, नातवंडांबरोबर लहान होऊन जगता येईल, कोडकौतुक करता येईल...!!!
     या आजीं-आजोबांनीही हीच स्वप्ने पहिली असतील, यांनीही ऐशोआरामी जीवन जगण्याचे छान बेत केले असतील, आयुष्याची संध्याकाळ आपल्या प्रियजनांबरोबर घालवण्याची स्वप्न रंगवली असतील . पण मग या वयातही का असावी ही व्यथा ...!!
त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी तर इतर खूप साधनं होतीच की, वृद्धाश्रम होते, मंदिर -मज्जीद होती....!!
पण मग त्यांनी ही वाट का निवडावी...??
      तर याच्यासाठी माझ्या आकलनांनुसार एकच शब्द होता अन् तो म्हणजे "स्वाभिमान"...!
     "उतार वयातील व्यक्ती म्हणजे वय झालेलं उपजत बालकचं...!!"
      सगळं साथीनं करत असताना काबाड कष्ट करून त्यांच्या लेकरांची पोटाची खळगी भरवलेली असतात.
      आयुष्यभर केलेल्या तडजोडी, उपभोगलेले मान , पचवलेलं अपमान, झेललेली अवहेलना, अन् भोगलेली दुःखं....!!!
यामुळे त्यांची सहन करण्याची क्षमता संपलेली असते. आपल्याचं लोकांकडून आलेले बोल, त्यांना अनुकूचीदार बाणांसारखे हृदयात खोलवर रुतत जातात अन् ती जखम घेऊन चालणं आता अशक्य होतं...!
      ज्या लेकासाठी रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र केली,  त्याच्याकडुनच आज अवहेलना सहन करावी लागतेय...!
      मग जागा होतो तो स्वाभिमान, जो जपण्यासाठी आयुष्यभर धडपडत होते, आयुष्यभर त्या स्वाभिमानाचा चक्काचूर झाला , म्हणून मग आतातरी होऊ द्यायचा नाही...!! समाजातील असे आजोबा-आजी सत्तर पंचाहतरीनंतरही तरुण असलेले, आयुष्याच्या संध्याकाळचं चिरतरुण जीवन जगतात.......!!
       कोण हातगाडीवर भाजी घेऊन बसतं, कोण केळी घेऊन खणखणीत आवाजात केळी घेण्यासाठी आरोळी देतंय तर कोण आणखीही गावातल्या वाण्याकडे भाकरी वारी हमाली करतंय...!!
कोण मंदिराची साफ -सफाई करतंय, कोण मार्केटवर काही काम करून, पण स्वाभिमानाने ताठ मानेने तरण्याबांड पोरासारखं ऐटीत चालतंय...!
     पण काही जीवनात हार मानतात, आहे ते दिवस ढकलायचेत म्हणून चालतायतं, आधुनिक म्हणणाऱ्या गर्दीतल्या समाजाबरोबर....
      तर काही आजी-आजोबांच्या आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धाश्रमात गर्दी करताना दिसतेय हो ..!!
      पेपरात , दूरचित्रवाणी वर खूप कहाण्या वाचायला , बघायला मिळतात. नोकरीच्या ठिकाणी घेऊन जातो म्हणून आलेला लेक गावकडचं घरदार, शेत विकून, आई-बापाला स्टँड वर सोडुन गेलेल्या घटना जेव्हा घडतात तेव्हाही हाच प्रश्न पडतो , "हेच का लेका तुझे प्रेम...तुझ्या आई-बापावरचं ...!!"
हे दिवस बघण्यासाठीच का रे, त्यांनी तुझ्यासाठी पोटाला चिमटा घेऊन तुला तालुक्याच्या ठिकाणी महिन्याच्या पहिल्या तारखेला एसटी ड्रायव्हरकडे कापडात गुंडाळून पैसे पाठवले ...?
अरे लेका त्यांना तुझ्याकडून काहीच नकोय रे, फक्त दोनवेळची भाकरी अन् दोन आपुलकीचे शब्द..!!
        पण समाजात खूप विदारक चित्र आहे , नातवाकडे जे संस्कारांचं संक्रमण होतं, त्यासाठी आजी-आजोबांसारखं प्रभावी माध्यम दुसरं कोणतंच नाही.
       पण खेदजनक हे आहे की या आजी आजोबांची जागा मोबाईलने घेतलीय असं वाटतंय.....!!
     समाधानी आयुष्य जगण्यासाठी कशाचीच गरज लागत नाही...
जिद्दीला तरुण ठेवलं तर कायम समाधानी आयुष्य जगता येतं...!!
स्वाभिमानी माणसं अशीच असतात सदा सर्वदा तरुणाई फुललेली असते ....!!
    जी दिसतेय या जेष्ठांकडे, अनुभवाचं भांडार अन्  आयुष्यभर पुरून उरेल अशी संस्काराची शिदोरी असलेल्या आजी-आजोबांमध्ये....!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Wednesday, September 18, 2019

गाव अन् गावकडचं घर...!!

       कितीही दूर असलंतरीही गाव अन् गावकडचं घर यांचं आकर्षण कमी होत नाही ......!!
       गावातला दगडी बांधकाम असलेला वाडा, त्याच्याच पाठीमागे असलेली परसबाग अन् त्यात आजी-आजोबानीं; लेकरांप्रमाणे वाढवलेल्या वेगवेगळ्या फुलांची झाडं, काही सुगंधाने मोहून टाकणारी, तर काही सौंदर्याने खेचून नेणारी...!!!
आंब्या-फणसाबरोबरच नारळाची अन् औषधी गुणधर्म असलेल्या असंख्य वनस्पती ...!!
        किती छान असतं गावाकडचं जीवन, रात्रीच्या जेवणाला कोणताही डायनिंग हॉल फिका पडेल, अश्या सर्व भावंडे मिळून चंद्राच्या मंद प्रकाशात जेवणावळी बसायच्या; सुसंवाद अन् हास्यांची ललकारी उडून चंद्राला निरोप द्यायला निघून जायची ....!!!
      पण आत्ता काही राहिलं नाही,आत्ता राहिले फक्त आठवणींचे रिकामे सांगाडे......!! पण तीच आठवणींची पुंजी कामी येते; आत्ता कधी-कधी आनंदित करण्यासाठी ....!!
परसबागेतील बकुळीची फुलं जगण्याचं मूल्य सांगून जातं शेवटच्या क्षणांपर्यंत सौम्य सुगंधाची उधळत करत राहणं ...!!
हीच फुलं जीवनाचं तत्वज्ञान सांगून जातात आपण
ज्याला त्याला , ज्याच्या त्याच्या नजरेनं पाहिलं तर सर्व सुंदर दिसतं.
      सुट्टीचे दिवस संपुन गावातुन शहरात परतलं की आपण नक्की कुठले गावातले का शहरातले ? हा छळणारा प्रश्न ??
गाव बदलत नाही , गाव धुळीतल्या रस्त्यांची साथ सोडत नाही, गाव पुढं सरकत नाही ,
       पण त्या गावाने पाहिलेलं असतं तुम्ही मोठे होत असताना, त्या गावाने पाहिलेलं असतं तुमच्यातलं लहान मूल, त्याच गावाने पाहिलेलं असतं तुमच्या अंगातील असंख्य खोडी, तुमच्यातील सुप्त गुण आणि दोष ...!!!!
       ते गावचं शिकवते तुम्हाला तुमचे संस्कार ...
पण , पण त्या गावातही असतात अशी घरं, माणसं सोडून गेलेली मोडकळीस आलेली घरं ....ज्या घराने भोगली असतात तुमच्या बरोबर सुखं आणि अश्रुंचे क्षणही ...त्या घरातील अंगणाने दिला  असतो तुम्हास अनेक खेळांमधून आनंद ...!!! आणि त्याच अंगणाने दिलं असतं तुम्हास खेळताना झालेली जखम ...!!!
पण हीच मोडकळीस आलेली घरं आणि तेच अंगण वाट पाहत असतं कोणाची तरी हे नक्की ...!!
      पण त्याच अंगणातील प्राजक्त आत्ता पूर्वी सारखा बहरत नाही.
       गाव वाढत चाललंय, गावातील घरांच्या  मातीचा वास आत्ता सिमेंटच्या वासाने हरवून जातोय...!!
आत्ता जुनं घर इथं शोधूनही सापडणार नाही  ...!!!
आत्ता फक्तआठवणींचे सांगाडे आहेत ,असतील....!!!
पोपडे आलेल्या घराला पोतेरे मारणाऱ्या आई आणि आजीचं थकलेलं शरीर , तसचं संध्याकाळी शेतातून घरी येणाऱ्या बापाचा थकलेला आराम शोधणारा देह , आजोबांच्या हरिपाठाची आणि तुकोबांच्या अभंगाच्या सुखवणाऱ्या लयी ...!!!
        दारातलं मोठं गुलमोहराच झाड, त्याच्या शेंगा, त्याला उन्हाळयात येणारी लालबुंद फुलं किंवा क्वचित नाजूक हिरवी पानं ...!! ही अशी वाढत जाणारी रांग थांबनार नाही तरीही थांबावच लागणार...!!
      पण गावातील घरासमोरील अंगणातील पारिजातकाच्या फुलं तुला नेहमीच भुलवत राहतील, खेळवत राहतील त्यांच्या सुगंधाचा जोरावर .....अन् वाट पाहतच कोमेजून जातील पण तेही सुगधं देऊनच ......!!!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, August 4, 2019

प्रवासातलं जगणं...!!

     आयुष्यातला प्रवास सपंतच नाही हो ...!!
     जन्मापासून सुरू झालेला हा प्रवास , जिंदगी ला फुलस्टॉप भेटल्यावरच काय तो संपतो ....!!
     बालपणातलं स्वतःशीच खेळणं सर्वांना आवडतं, पण जेव्हा मोठे होतो, जबाबदारी येते, तेव्हा स्वतःशी खेळणं अन् पचवणं जिकिरीचं असतं,  कठीण जातं...!!
     नंतर थोडे मोठे झालो तर कुतूहलाने रांगत रांगत जाऊन आई अण्णांच्या (बाबांच्या) पायाला धरून उठण्याचा प्रयत्न करणं, आपल्यासाठी अन् आपलं कौतुक करणाऱ्या हितचिंतकांसाठी आनंदाचा क्षण असतो. पण आत्ता प्रवासात चालताना कुठं धडपडल्यासारखं झालं तरी आई बाबांना खुशालीत आहे हे पटवून देण्यात आंनद वाटतो ...!!
    आणखी वर्ष-सहा महिन्यांचं झाल्यावर आधार घेऊन उठून, छुण-छुण घातलेल्या पायांनी पहिलं पाऊल टाकताना,आण्णा-आईने वाजवलेल्या टाळ्या अन् चेहऱ्यावर ओथंमबुन वाहणारा आनंद आज ही हर्षभरीत करून जातो. पण आत्ता प्रवासात आधार घ्यावा वाटत नाही आधार व्हावा वाटतो , त्यांतच आनंद वाटतो...!!
     या प्रवासात वाट चालत असताना अडखळत , बोबडयाने टाकलेला पहिला शब्द ऐकताना घर अगदी आनंदाने नाहून निघालं असेल ....!! पण आज अडखळत बोललं तर आई बाबांना कळेल "कुछ तो हुवा है".....त्यामुळे मजेत बोललं जातं..
बालपणी चे दिवसचं भारी होते ते ....!!
     पण जीवनातला प्रवास संपत नाही हे तितकंच खरं...!!
शिक्षणासाठी आई बाबांच्या कुशीतली ऊब सोडावी लागली , घर, घरासमोरील अंगण सोडावं लागलं, गावातली गल्ली अन् गाव सोडावं लागलं, मित्र मंडळी,जाता येता आजी-आजोबांच्या तब्बेतीची चौकशी केल्याने निर्माण झालेलं, एक जिव्हाळ्याचं नातं , हे सगळं-सगळं विसरून जड पावलाने अन् तितक्याच जड अंतःकरणाने,भरल्या डोळ्याने, एका नव्या प्रवासाला सुरवात झालेली आजही डोळ्यासमोर तरळते, आत्ता प्रत्येकवेळी घरी जाताना आई-अण्णांबरोबरच , अंगण अन् गावातली गल्ली आतुरतेने वाट पाहते ...!!
     शिक्षण झाल्यावर कामानिमित्त हॉस्टेल ही सुटलं जातं
याच हॉस्टेलने खूप गोष्टी शिकवल्या , खूप आठवणी दिल्या.
आयुष्याच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा या हॉस्टेलचा आहे
घरापासून दूर असल्यावर हेच हॉस्टेल आपलं घर मानायचं
अन् सुरवातीचे काही दिवस बळेच घालवायचे...!!
अन् तेच हॉस्टेल सोडताना, जेवढं घर सोडताना वाईट वाटलं  तेवढंच हॉस्टेल ची रूम सोडताना अन् शेवटच कुलूप लॉक करताना वाईट अन् डोळ्यात थेंब तरळून गेले..!!
पण त्या हॉस्टेल ने खूप आठवणी दिल्या....!!
     शिक्षणाच्या काळात युनिव्हर्सिटी मध्ये खूप चांगले मित्र मैत्रिणी  झाल्या. जीवनात कधी वाटलं ही नव्हतं एवढे जीवाला जीव देणारे मित्र होतील ....आज काही कारणास्तव त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कमी झाला असलातरी ते विसमूर्तित जाणं शक्य नाही...!
प्रवास काटत असताना काही गोष्टी सुटल्या जातात, सोडव्या लागतात...पण त्या कधी विसमूर्तित जात नसतात ...!!
    अश्या या प्रवासाचा हव्यास पांथस्त्याला सुटत नाही.
अनंत अडचणीतून मार्ग काढत, करावा प्रवास आनंदात
...! स्वतःबरोबर इतरांनाही करावी वाटप आनंदाची अन् याच प्रवासाचा महोत्सव करता यावा, महोत्सव व्हावा .....!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Wednesday, July 24, 2019

आभासी जगातला "प्रवास"

      जीवनातल्या प्रवासात कधी कोणाचा थांबा येईल सांगता येत नाही.त्या थांब्यापर्यंतच्या प्रवासात खूप सारे त्याच वाटेने जाणारे वाटसरू एकमेकांना भेटतात..!!
      काहींचा प्रवास आनंदात होतो, कधी कोणाचं थांब्याच ठिकाण आकस्मित येतं. त्यांचा प्रवास संपतो, पण त्या प्रवासात त्याच्या बरोबर मागे राहिलेला प्रवासी हतबल होतो ,त्या थोड्या प्रवासात खिडकीतून बाहेर डोकावून खूप गोष्टी पाहिलेल्या असतात, काही अनुभवलेल्या अन् काहींविषयी स्वप्न पाहिलेली असतात.
पण अर्ध्याअधिक वाटेवर आपल्या सहप्रवाश्याने नाईलाजास्तव त्याच्या थांब्यावर उतरून घेतलेलं असतं. त्याचं उतरणं त्यालाही सोप्प नसतं, पण नियतीपुढे कोणालाच विजय मिळवता येत नाही, येणार नाही. या प्रवासात माणसं एकमेकांना भेटतात , पण त्या प्रवासाचा आनंद लुटण्याचं सौभाग्य सर्वांच्याच भाळी लिहिलेलं असतंच असं नाही .
      काहींच्या प्रवासातील रस्ता कापत असतांनाच स्वप्नांचे दोर ही तुटले जातात. तो थांबा कधी येणार हे पांथस्थ्याला ही माहीत नसतं त्यामुळे त्याचा कोणता शब्द, कोणतं वाक्य हे शेवटचं असेल हे सांगता येत नाही. जीवनाच्या या प्रवासात फिरून तो वाटसरू मिळेलच असं अजिबात नाही. म्हणून उगवलेला प्रत्येक दिवस हा प्रवासातील शेवटचा दिवस आहे असचं जगता आलं तर त्याने आयुष्यात सारं कमवल्यासारखं होतं.
     आपण स्वाभिमानाच्या गोंडस नावाखाली अहंकारच विष कधी जपून ठेवतो हे आपल्यालाही कळत नाही. कारण नसताना एकमेकांविषयी आकस ठेवतो. आपण या पृथ्वीवरील पाहुणे आहोत हेच विसरले जातो.अन् मग इथूनच चालू होते तीअहंकारी वृत्ती.
      स्वतःला या भल्यामोठ्या विश्वाच्या पसाऱ्यातील छोट्याश्या ग्रहावरील एक छोटा क्षुद्र प्राणी आहोत हे मान्य केलं तर प्रवास नेटका जरी असला तरी आनंदाचा होईल.
      कोणता कॉल, कोणता sms , कोणता शब्द शेवटचा असेल हे माहीत नसतं कदाचित तो कॉल कधीच न येण्यासाठी असू शकतो किंवा परत तो कॉल रेसिव्ह ही होऊ शकत नाही. तुमच्या मोबाईल मध्ये नंबर सेव्ह असेल पण तो कधीच लागणार नाही.
     त्यामूळे मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगता यावा.
          भेटावं तेही शेवटची भेट असल्यासारखं
          बोलावं भरभरून शेवटच्या शब्दासारखं
      परत वेळ निघून गेल्यावर हळहळ व्यक्त करण्यापेक्षा अन् गोडवे गाण्यापेक्षा, आहेत तोपर्यंत ego, स्वाभिमान, अहंकार बाजूला ठेऊन बोलाच सर्वांशी अगदी भरभरून मन मोकळे पणानं...!!
      अहंकाराला बाजूला ठेऊन एकदा मारा हाक तुमच्याच जिवाभावाच्या माणसांना, वेळ निघून जाण्या अगोदर, दूर निघून जाण्याअगोदर.....!!!
      अन् हा जीवनाचा प्रवास आनंदात करण्यासाठी प्रयत्नवत असावं.....!! जीवनाच्या प्रवासात आनंद देत चालत राहावं दिगंतरापर्यंत...!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Wednesday, June 12, 2019

पावसाच्या पहिल्या सरी ...!!!

         मागील वर्षी पाऊस नसल्यामुळे, यावर्षी धरतीवरचे सर्वच जीव-जंतू , झाडे-वेली, पावसाची खूप आतुरतेने वाट पाहत होते...!! अन् काही ओळी सुचल्या..!!
धरणी आसुसलेली तुझ्या मिलनासाठी
बरस रे नभा ....!!!
माझा बळीराजा चातकापेक्षा ही जास्त आस लावून बसलाय, वाट पाहतोय तुझी डोळ्यात तेल घालून..!!
कर ओलं चिंब अंग अन् अंगण , दरवळु दे सुगंध मातीचा...!!
बरस भरभरून, धरणीला दे घट्ट प्रेमभराने मिठी अन् कर तृप्त....!!
कर आनंदी बळीराजाला...!!
फुटूदे पालवी , होउदे हिरवाई चोहोबाजूंनी ....!!
बरस, बरस रे नभा
तुझ्याबरोबर बरसू दे मन ही होउदे प्रफुल्लीत ...!!

         अन् हीच प्रतीक्षा आज संपली अन् यावर्षीच्या पाऊसकाळातील पहिल्या पावसाच्या पहिल्या सरी आवेगाने त्याच्या प्रेयसीला धरणीला घट्ट मिठी मारून प्रेम भराने कोसळायला सुरवात झाली...!!
त्यामुळे आपसूकच काही शब्द फुटले...

पावसाच्या पहिल्या सरी,बेधुंद करणाऱ्या,
अंगावर शहारे आणणाऱ्या...!!
पावसाच्या पहिल्या सरी,मरगळलेल्या मनाला प्रफुल्लीत करणाऱ्या,
सगळं संपलेल्याला,सुकलेल्याला नवचेतना देणाऱ्या...
पावसाच्या पहिल्या सरी,मातीत मिसळलेल्याला नवनिर्मितीचा कोंब फोडणाऱ्या,
बीजाच रूपांतर इवल्याश्या रोपट्यात करणाऱ्या...!!
पावसाच्या पहिल्या सरी, अंगावर शिरशिरी आणणाऱ्या,
सर्वांगाबरोबरच मनालाही ओलाचिंब करून जाणाऱ्या..!!!
पावसाच्या पहिल्या सरी,धरणीला हिरवा शालू घालणाऱ्या...!!
अन् त्याच पावसाच्या पहिल्या सरी,
जुन्या-नव्यांच्या आठवणीत चिंब करणाऱ्या...!!!

       अन् तो कोसळणारा पाऊस खिडकीतून बघताना, मनातही आठवणींनीचा पाऊस धो-धो कोसळू लागला..
पडणाऱ्या सरींबरोबर आठवले चिंब करणारे कॉलेजातले ते दिवस..!!
सर्व गोष्टी बदलल्या कॉलेजचे दिवसही बदलले, कॉलेज ही पूर्ण बदलले, काळाबरोबर  "तो" ही बदलला.
पण "ती"...?
"ती" आणखी तशीच टवटवीत, अगदी तेव्हा जशी तरुण होती तशीच आज ही तरुण, आभूषणांनी नटलेली ...!!
"त्याने" खूप पावसाळे पाहिले, पण प्रत्येकवेळी "ती" ही तशीच चिरतरुण उभी राहायची, प्रत्येक पहिल्या पावसात अगदी तरुण...!!
तिला काळाचे बंधनच नाही त्यामुळे वयाचं ही बंधन नाही...!!तिला विसरण्याची, बद्दलवण्याची मिसाज कोणातच नाही.
ती म्हणजे "आठवण"....

      पाऊस अंगणात कोसळत होता, पण आता भिजायला जाण्यापेक्षा लांब उभा राहून खिडकीतून पाऊस पाहण्यातच आंनद वाटत होता..!!
      त्या पहिल्या सरी पाहताना सर्व आठवणींचा चित्रपट त्या सरींबरोबर डोळ्यासमोर कोसळत होता, चिंब-चिंब करत होता.
      त्या पहिल्या पावसाच्या पहिल्या सरींनी आठवणींना उजाळा दिला होता...!!
      भिजायला जरी अंगणात गेलो नाही, तरी खिडकीत उभा राहून मन मात्र ओल चिंब झालं होतं....!!
       त्यावेळी आईचं रागावणं पत्करून धावत जाऊन भिजायला जायची मज्जा, आज मात्र पाऊस खिडकीतून बघण्यात समाधान मानत होतो. आज आई रागवणारही नव्हती पण तरीही पहिल्या सारखं पहिल्या पावसात भिजण्याची इच्छा राहिली नव्हती..!
       खिडकीत उभा राहून ती संध्याकाळ जुन्या आठवणीत चिंब भिजवून जात होती पावसात न जाताही....!!!
असा होता यावर्षीचा पहिला पाऊस....मनात दाटलेल्या ढगांतुन बरसणाऱ्या सरींनी ओलं चिंब करणारा ...!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃


Monday, June 10, 2019

गावाकडची सांजवेळ...!!!

        गावाकडची सांजवेळ ही बेभान करणारी असते..!!
परदेशी जाणारा सुर्य रंगांची उधळण करत जातो,
ती उधळण त्याच्यासाठी महोत्सव असतो.

      पण त्या  रंगांच्या छटांची उधळण मनात एक अनामिक कालवाकालव करत असते..!!
कितीही समजवलं स्वतःला तरी तो महोत्सव एक हुरहूर लावून जातो...!
      यावेळी उगाच कोणाची तरी आठवण येणं,माहीतही नसतं कोणाची आठवण येतेय.पण उगाच एखादी जुनीपुराणी गोष्ट, चित्रपट उभा राहावा तशी इथंभूत डोळ्यासमोर उभी राहते...!
विनाकारण डोळ्यांच्या कडा ओलावतात, अनामिक कसल्यातरी ओढी ने कासावीस होतं..!
      ही अनामिक हुरहूर कमी होते ती सांजवेळ संपल्यावरच..!
गंमत म्हणजे एखाद्या विशिष्ट जागेवर जाऊन बसून तो उत्सव निर्विकार होऊन पाहत बसलं तर आपोआप ती हुरहूर कमी होऊन, शांत वाटतं..!!
     पण ही सांजवेळ अनुभवयास मिळते ती गावाकडेच...!
शहराच्या सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्याला हा महोत्सव, ही निसर्गाची अगाधलीला पाहवयास, अनुभवयास अन् त्याचा आनंद लुटावयास नाही मिळतं. पण हा दैवी सोहळा बघण्याची मज्जा काही औरच...!!
      गावांकडे दिसणारा सांजवेळीचा सूर्याचा लाल गोळा जसा जसा क्षितिजाआड जायला लागतो तसा तसा मनात कल्लोळ उठतो..!
      त्याचं क्षणा-क्षणाला क्षितिजापल्याड जाणं मनांत दुखरी नस रुततेय असं क्षणभर वाटतं...!!
     सगळं आभाळ तांबड्या रंगांनी भरून गेलंय आणि छोटी प्रकाशाची लाल छटाही आवरून निघायच्या तयारीला लागली आहे.
     ती छटा नजरे आड होते न होते तोच वाऱ्याची एक मंजुळ थंडगार झुळूक मनाला खिलवून अन् अंगावर शहारे आणते..!!
ती बोचरी हवहवीशी झुळूक काहीतरी संदेश घेऊन आलीय असा भास होतो.... कदाचित, "सूर्य गेला......" हाच संदेश असावा तो...!!
    महोत्सवातुन जागं करण्यासाठीच आली असावी ती झुळूक ,झुळूक नाहीच ती, ती तर कुजबूज,केलेलं हितगुज...!!
      या सांजवेळी सारेजण परतीच्या प्रवासाला लागतात. मुक्कामाच्या प्रवासाला....!!
     सूर्यास्ताचा अटळ महोत्सव मनात उलथापालथ करतो. खळबळून काढतो. तरीही हवासा वाटतो....
      आयुष्यात अशी सांजवेळ, कातरवेळ अनुभवावी एकदातरी..!!
पहावा महोत्सव नयनभरल्या डोळ्यांनी , प्रसन्न मनाने...!!

#जिंगदी_का_फ़ंडा🍃

Friday, May 31, 2019

आयुष्याच्या संध्याकाळी...!!!

    आज काल नवा ट्रेंड सुरू आहे,लिव्ह इन रिलशनशीपचा ( मी विरोधातही नाही आणि समर्थनातही नाही ) आणि त्याचं समर्थन केले जातं की लग्नाच्या अगोदर एकमेकांना समजून घेणं गरजेचं असतं, एकमेकांच्या आवडी-निवडी समजणं अन् आपल्या जोडीदाराला समजून घेतल्यावर लग्नानंतरचे problems होत नाहीत हे समर्थन दिलं जातं.
       पण मित्रांनो तुम्ही तुमच्या आज्जी आजोबांकडे पाहिलं आहे का हो ?
       आज जवळजवळ त्यांच्या लग्नाला सरासरी पन्नास साठ वर्षे नक्कीच उलटून गेले असतील.
तरीही त्यांचं एकमेकांवरचं प्रेम , एकमेकांची काळजी पुसटशीही कमी झालेली दिसत नाही,जाणवत नाही.
   अहो, समजून घ्यायचं सोडाच,पण त्यांनी लग्नाच्या अगोदर एकमेकांना पाहिलेलंही नसतं हो ..!!
सरळ बोहल्यावर चढल्यावर कळतं की हा माझा जीवनसाथी...!
     आणि लग्नाला पन्नास साठ वर्षे झाली तरीही अतूट नात्यातलं प्रेम अबाधित राहतं....!!!
पण आजकालचं प्रेम ...खूप अल्पायुषी झालंय हो, हीच शोकांतिका...!!
      प्रेम ही संकल्पनाच बदललीय की काय असं वाटायला लागलंय... आजकालची नाती  सरासरी एक नाहीतर दोन वर्षे टिकतात  मग नंतर तेच नातं बोअर वाटायला लागतं....!!
किती मज्जा आहे बघा ना , एक दोन वर्षांपूर्वी  एकमेकांच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आवडायच्या, ज्यावर तासन् तास  गप्पा व्हायच्या,एकमेकांच्या अडचणी दोघांनी सोडवल्या जायच्या, संवाद व्हायचा, त्याच गोष्टी एक दोन वर्षांनंतर नातं तुटायचं कारण बनतात. मग याला खरंच प्रेम म्हणायचं का हो ?
    म्हणजे तुम्हाला फक्त एकमेकांबरोबर वेळ घालवायचा आहे , प्रेम करायचं नाहीय....
 तुम्हाला आधार हवा आहे म्हणून partner पाहिजे असतो असं वाटत असेल तर थांबा..!
 एकमेकांना एकमेकांची गरज आहे म्हणुन एकत्र राहायचंय अन् याला जर तुम्ही प्रेम म्हणत असाल तर नक्कीच थोडं थांबा ...!!!
आणि दुसऱ्या बाजूला आजी आजोबांकडे पहा, नवल वाटेल...
    त्यांचं प्रेम आज पन्नास साठ वर्षांनंतरही तरुण असतं, त्या प्रेमातली काळजी कधीच कमी होत नाही. आयुष्यात असंख्य अडचणींना , दुःखांना दोघेही सामोरे जातात. आयुष्याच्या प्रवासात चढ-उतार आल्यावर एकमेकांना दिलेला हात, दिलेला आधार खूप समजावून जातो.
   खांद्याला खांदा लावून त्या अडचणींवर मात करतात, दुःखं पचवली जातात. प्रत्येक अडचणी वर उत्तरं शोधली जातात...
त्यांच्या आयुष्यातला चांगल्या वाईट वळणावरती मिळालेली एकमेकांची साथ वाखाणण्याजोगी असते.
     जर आजोबा गावात गेले असतील अन् दिवसातला तिसरा प्रहरही संपला असेल पण जर आजोबा गावातून आले नसतील तर आजी तोपर्यंत जेवणाच्या ताटाला शिवतही नाही. जेव्हा आजोबा येतील तेव्हाच जेवण करेल हा तिचा पण असतो ...!!
कुठून येतं हे प्रेम , कुठून येते एवढं प्रेम करण्याची शक्ती...?
     एकमेकांवर रागावतील, चिडतील, शिव्या घालतील पण  जेवणाच्या वेळेस एकमेकांना जेवायला विचारल्याशिवाय घास तोंडात सरकवणार नाहीत....
     यांना याचं प्रेम कधीच बोअर वाटत नाही, अन् यांनीच तर थेट लग्नात एकमेकांना पाहिलेलं असतं , मग कोणतं प्रेम खरं समजायचं ...?
     प्रेम निःस्वार्थपणात अन् निरागसतेत असतं, प्रेम हे ठरवून होत नसतं. जगात प्रेम गोष्टचं न्यारी आहे, त्यात निरागसता ही भरभरून असते ...!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Tuesday, May 21, 2019

"यारी"तली दुनिया...!!

आज काही कामानिमित्त बस स्टँड वर जाणं झालं.
जसं-जसं स्टँड मध्ये जात होतो; तसं-तसं कॉलेजच्या दिवसांचा एक चित्रपट समोर दिसू लागला..!!
नुकतंच दहावीच्या वर्गातून, दहावीच्या बंधनातून, म्हणजे शाळेतून कॉलेजात पाऊल ठेवलेलं....!!
कॉलेज जीवनाबाबत खूप ऐकलेलं , पाहिलेलं, अन् वाचलेलं होतं
अन् ते दिवस आत्ता अनुभवन्यास मिळणार होते.
त्यामुळे कॉलेज जीवनाबाबत खुप कुतूहल होतं.
   दहावीची शाळा गावात होती अन् आत्ता कॉलेजसाठी तालुक्याच्या ठिकाणी जायचं होतं ती उत्सुकता वेगळीच...!
    1-2 किलोमीटर चालत जाऊन लाल डब्बा पकडायचा, तो नेहमीप्रमाणे कधीच वेळेवर यायचा नाही आणि त्या डब्ब्यात गर्दी खूप असली तरी ही त्यात मज्जा यायची..!!
एखाद्या दिवशी बस रिकामी असली की उदास वाटायचं.
गर्दीतल्या धक्यांची सवय झालेली....!!
कॉलेजमध्ये मग वर्गात बसायचं, काही चाळे केले तर वर्गाच्या बाहेर ही जावं लागायचं!!
    नवीन मित्र भेटले, भांडण झाली, प्रॅक्टिकला सरांचा मारही खाल्ला...!!
तास बुडवून स्टँडवर कोणाची तरी वाट पाहत बसणं...भारीच!!
    मित्राच्या "ति"च्या साठी तासनतास कॉलेजच्या कोपऱ्यावर थांबून ती आली की इशारत करणं..!!
कॉलेजच्या पहिल्याच दिवशी बस मध्ये चमकलेली "ती" अन्
"ती" येणार म्हणून स्टँड वर तिच्या अगोदर एक तास जाऊन बसणं....!
बस मध्ये 'ती" असल्यावर तेव्हा उगाच समाजसेवेचा आव आणत एखाद्या आजी-आजोबांचा शोध घेत त्यांना आपल्या सीट वर जागा देऊन, बस मध्ये खुप मोठं काम केल्यासारखं कॉलर टाईट करणं...!!
असं करत कॉलेज कधी संपलं कळलंच नाही, यात रिझल्टची पूर्ण वाट लागली होती....!
   पण या कॉलेज जीवनाने खूप शिकवलं, आयुष्याविषयी खूप धडे दिले, कसं जगावं, कसं असायला पाहिजे,आपण कसे आहोत याची ओळख झाली, चमकलेली "ती" ही इथंच दिसली, अन् as usual कायम "ती" ही पराई च राहिली.... ठेवली..!!
खूप भारी दोस्त मिळाले...! जीवाला जीव देणारे यार मिळाले.
कॉलेजमध्ये पहिल्यांदा भेटले तेव्हा कोणीच नव्हते ते..!!
पण नंतर जीवनामध्ये वादळासारखे घुसले..
 पुन्हा आयुष्य कधी जुन्या वळणावर आलं नाही..!!
चहाच्या टपरीवरच्या गप्पा....!!! आज ती टपरी आहे, पण कमीने दोस्त नाहीत...!!
 कॉलेज ते स्टॅन्ड पर्यंत केलेला दंगा, घालवलेला वेळ, केलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी....!!
     जगाचा विसर पडून केलेले कांड....! आजही आठवलं तर एक छोटंसं हसू आणतात....!!
किती वेडे होतो आपण यात अभिमान वाटतो...!!! एकमेकांसाठी सोडलेल्या बस...!!
आज सर्व आठवत गेलं.
यात graduation, postgraduation अन् नंतरच्या एका वर्षातील कमीने यारही आठवत गेले.
   या दोस्तांनी खूप छळलं, चिडवलं, खुप पिडलं,पकवलं, गडवलं त्यांच्याकडे पाहिलं, तर वाटायचं यार मला दुष्मनांची गरजच नाही.
त्यांना एक सल्ला विचारला तर पन्नास सल्ले द्यायचे..!
 ज्या प्रश्नांवर स्वतः गंडलेले असतात, confused असतात, त्याचं उत्तरं आपल्याला मात्र confidently द्यायचे,
म्हणायचे, 'कर तू बिंधास्त, तू करू शकतो हे', स्वतः पेक्षा आपल्यावर जास्त भरोसा करणारे...!!
त्यांच्यावर भरोसा ठेवून आपणही मग बिनधास्त करायचो, ते म्हणतील तसं! उगाच हरभऱ्याच्या झाडावर बसवलं जायचं पण त्यामुळे तर डेअरिंग केली, नाहीतर आपण कधीच केलं नसतं...!!!
त्यांचा असणारा विश्वास आपल्याला आत्मविश्वास देऊन जायचा...!!स्वत:च्या खिसा रिकामा असताना,
ते उधारी करून आपली गरज भागवायचे...!!
     कॉलेजच्या शेवटच्या दिवशी हे सगळे कमीने उदास होते, पण हळवं कोणी झालं नाही. सगळ्यांनी भेटत रहायचं हे एकमेकांना शिव्या देऊन सांगितलं...!!
पण जो तो आपापल्या आयुष्यामध्ये busy झाले...! काहींबाबत गैरसमज होऊन दुरावले गेले , काही गोष्टी न पटल्यामुळे स्वतः दूर झालो,पण त्यामुळे कधी त्यांच्याबाबत तिरस्कार वाटला नाही. आज त्यांनाही तेवढाच आदर आहे, राहील...!
   काहींची विकेट पडली, काही कामानिमित्त बाहेर पडले,
काही जॉब मधून बॉस सुट्टी देत नाही म्हणत बॉसला शिव्या देतात तेव्हा आपणच समजुन घ्यावं..!
आपण तरी कुठं वेळ काढुन भेटतो ?
   आत्ता महिन्यातून एखादा कॉल होतो , 4-5 महिन्याने भेट होते, यातच समाधान मानणं अगत्याचं..!
हे सगळं-सगळं वारुळातुन बाहेर पडणाऱ्या मूग्यांप्रमाणे हळूहळू सर्व आठवत गेलं..!!!
पण आत्ता वेळ ही खूप झाला होता,त्यामुळे आत्ता हे सगळं तिथंच सोडून निघणं गरजेचं होतं.
जस पाऊलं स्टँड च्या बाहेर च्या दिशेने जात होते तसे आठवणीतून बाहेर पडत होतो .....!!
पण एक नक्की "ओ दिन कभी नहीं भुलेंगे ...!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Wednesday, May 15, 2019

बकुळीची फुलं ....!!!

"देखो मगर प्यार से" ट्रक च्या पाठिमागे लिहिलेलं हे तीन शब्द जीवनाविषयीच तत्वज्ञान सांगून जातात...!!
     फुलांनी बहरलेल्या बागेतलं गर्द हिरवी पानं असलेलं झाड सुध्दा लक्ष वेधून घेतं, सुंदर दिसतं.
 दुसऱ्या फुलझाडांपेक्षा उठून दिसतं फक्त गर्द हिरवी पानं असतानाही ...!!   
पण, ते सूंदर दिसण्यासाठी एका स्वतंत्र दृष्टीने पाहायला हवं. 
ज्याला त्याला , ज्याच्या त्याच्या नजरेनं पाहिलं तर सर्व सुंदर दिसतं. 
फुलांकडे पहा; काही फुलं दिसण्याने आकर्षित करतात, तर काही फुलांचा सुगंध आकर्षित करतो..!
पण मग आपण ही अपेक्षा कशी करू शकतो? 
सूंदर दिसणाऱ्या फुलाने सुगंधही द्यावा किंवा सुगधं देणाऱ्या फुलाने सूंदर सुद्धा दिसावं.
आपण त्याला त्याच्या angle ने पहावं लागेल, तर ते खूप सूंदर वाटेल, मन प्रसन्न करेल. 
 आभाळाला भिडायला गेलेला एखादा गर्द झाडांचा डोंगर किंवा वेगळ्या आकाराचा उजाड डोंगर सुद्धा त्याच्या नजरेनं पाहिलं तर सूंदर दिसतो..!!
क्षितिजाला टेकलेलं आभाळ, ते आभाळ वेगवेगळ्या आकाराच्या कलाकृती धारण करत असल्याचा भास होणं अन् त्या कलाकृती, मनात निर्माण झालेल्या कुतूहलाने शांतपणे तासन् तास निहाळत राहणं, मनात नवचेतना निर्माण करतं.
ते क्षितिजापल्याडचं आभाळ सकाळी अन् संध्याकाळी सोनेरी रंग धारण करतं तेव्हा तो सोनेरी क्षण कधीही सरू नये असंच वाटतं...!!
हे पाहिल्यावर- अनुभवल्यावर चेहऱ्यावर नाजूक हसू फुटते अन् हा क्षण कोणत्याही आनंदाच्या क्षणांपेक्षा अतिउच्च असतो..!!
निसर्गातली प्रत्येक गोष्ट ही आपल्या जगण्याशी-आयुष्याशी साधर्म्य दाखवते. एक जगण्याचं तत्वज्ञान सांगते.
फुलं देण्यामागचं प्रयोजन काय असू शकतं? त्यात एक सुप्त संदेश असतो की, या फुलांप्रमाणे बहरत रहा, 
            फुलत रहा, परोपकारी असा, 
समोरच्याला आनंदाच्या खाऊची वाटप करा.    
              सदाबहार असा...!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Tuesday, May 7, 2019

"निसर्गातलं बेधुंद जगणं"....!!!



       निसर्गाची आपल्या आयुष्याशी सांगड घातली की
मग निसर्गासारखंच आपलं आयुष्य ही नयनरम्य होतं.
    आकाशाला गवसणी घालण्यासाठी आसुसलेली उत्तुंग झाडं..!
    त्याच झाडांच्या पानांचा होणारा सळसळ आवाज, पक्षांचं मधुर गुंजण, दूरवरून येणारी कोकिळेची कुहूकुहू ,
   निसर्गाचं विराट रूप दर्शवणारा, उंचावरून बेदरकारपणे कोसळणारा धवलरूपी धबधबा.....!!
      अन् दूरवरून संदेश घेऊन येणारा, अंगावर शहारे आणणारा थंडगार वारा..!!
       त्यात भरीस भर म्हणजे सूर्याची किरणं सुद्धा जमिनीवर पडू न देणारं गर्द हिरव्या झाडांचं घनदाट जंगल ....!
     अन् शांतपणे कोसळणारी पावसाची संततधार , जी झाडाच्या पानांवर पडून घरंगळत आपल्या अंगावरून जमिनीवर पडते आणि तो क्षण मोहवून टाकते ...!!
    आणखी थोडसं पुढे गेलं कि, डोंगराच्या दुसऱ्या टप्प्यात  तेथील झाडे वेगळ्या प्रकारची, पक्षी सुद्धा वेगळ्या प्रकारचे..!!         
           आश्चर्य म्हणजे वेगवेगळ्या आकाराची डोंगरांची रांग
म्हणजे की पूर्ण वेगळ्या प्रदेशात आल्याचं feel व्हावं....
निसर्गाचं हे रूप पाहिल्यावर मनात जो प्रसन्न भाव निर्माण होतो
तो शब्दबद्ध नाही करता येणार!
     तिथेच कुठेतरी झरा, अन् त्याचं थंडगार पाणी...!!
मनसोक्त भटकायचं असेल तर  एकट्याने फिरण्याचा पर्याय एकदमच भारी ...!!!
     भुरभुरणाऱ्या पावसात अशी 'स्व'सोबत अभावाने म्हणा पण खेचून आणावी लागते , तरीही ही लज्जत न्यारीच ...!!
अश्यात सायकल किंवा बाईक पेक्षा चालत फिरणं म्हणजे खरी मज्जाच!!
थोडक्यात एकला चालो रे...!!!
     धुंद पावसाळी दिवसात 'स्व'सोबतीने केलेली ही निसर्गमय सफर यादगार होऊन राहील..!!
     वातावरण मस्त ढगाळलेलं तरी असतं किंवा रात्रभर कोसळत असल्याने उघडत अालेलं तरी असतं , आणि अशातच पूर्वेकडून वरती येणारा सोनेरी गोळा काही क्षण पूर्ण पृथ्वीला सोनेरी करून जातो, क्षणभर वाटतं की हा तर आहे 'परीस'...!!                    
        अशी सूंदर दिवसाची सुरुवात होत असते..!
                 हे दृश्य पाहणं म्हणजे मेजवानीच ...!
      थोडं पुढे गेल्यावर छोट्याशा शड्डू मध्ये वाफळता कटिंग घ्यायचा..!त्याचा आस्वाद घेत पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. स्वत:शी संवाद साधायचा.तेव्हा आपसूकच एक शांत शीळ बाहेर पडते , कळतही नाही ही शीळ कधी चालु झाली ते ...!!
       आपल्याला स्वतःला खूप दिवसांपासून काहीतरी विचारायचं असतं. स्वत:शी चर्चा-हितगुज करायला ही योग्य वेळ असते.
       वैशिष्ट्य म्हणजे जळमटलेल्या गोष्टींना आपण या वातावरणात अगदी सहज माफ करू शकतो. मग खूप हलकं-हलकं आणि उंच झाल्यासारखं वाटायला लागतं.
आता स्वत:सोबत खूप गप्पा झालेल्या असतात. रपेटही झालेली असते आणि नेहमीच्याच पण कधीच न जाणवलेल्या अनेक गोष्टी उमगलेल्या असतात.  अन् शेवटी एखाद्या जागेवर बसून डोळे मिटून कधीच लक्षात न आलेले पक्षांचे, झाडांचे, वाऱ्याचे, निसर्गातल्या इतर गमती जमतीचे आवाज टिपायचे अन्
मन भरलं की प्रसन्न मनाने परतीच्या प्रवासाला निघायचं...!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Friday, April 19, 2019

मनाच्या "स्व"त्वातून ....!!!




    काही ठिकाणी गेल्यावर तुम्ही स्वतः हरवता त्या सुंदर विश्वात ....!!
तुम्ही स्वतःच स्वतःचे होऊन जाता;
    अन् माणूस जेव्हा स्वतःला वेळ देतो ना त्यावेळेस तो स्वतःमध्ये हरवून जातो, ते हरवलेपण त्याचा "स्व"शोध घेण्यासाठी कारणीभूत ठरतं, आयुष्यात कधी कधी  "स्व"शोध घेणं खूप गरजेचं असतं, स्वतःला स्वतःच्या नजरेनं पाहणं आवश्यक असतं...!! बऱ्याचवेळी आपण स्वतःला स्वतःच्या नजरेनं पाहतच नाहीत, पाहतो ते दुसऱ्याच्या चष्म्याने....!!!
त्यांनी लावलेली लेबलं आपल्याला खरी वाटू लागतात अन् आपण स्वतःला ही दुसऱ्यांच्या चष्म्याने बघतो...!! आपण साधा नवीन आपल्या आवडीचा ड्रेस जरी घातला तरी दुसऱ्याच्या comments ची अपेक्षा करतो...!!
    आठवा बरं ,तुम्ही तुम्हाला शेवटची शाबासकी कधी दिलीय...??
स्वतःला शाबासकी देता आली पाहिजे बस्स ....!! कधी कधी स्वतःची वाह वाह करावी स्वतःनेच....!!!
अशी ठिकाणं प्रत्येकाच्या आयुष्यात असावीत...!!
      जिथं एकटं गेल्यावर वाटावं, इथं आहे आपलं कोणतरी, जे घेतं आपल्याला आहे तसं सामावून, जे स्वीकारतं, आहोत आपण अगदी तसंच...!!
      ते कधी खटाटोप करत नाही बदलवण्याचा, ते ठिकाण प्रेम करतं तुम्ही आत्ता आहात त्याच्यावर , तुम्ही आहात तिथं तसंच स्वीकारणं पसंद करतं....!!!
         इतरांनी आपल्याला स्वीकारण्यापेक्षा आपण स्वत:ला         स्वीकारलेले कधीही चांगले...!
  प्रत्येकालाच जमेल असं नाही , पण असं एक ठिकाण असावंच सगळ्यांकडे...!!!,
          जिथं मनातलं सर्व-सर्व काही असेल ते उन्मळून बाहेर येतं, असं ठिकाण  जिथं आनंदही तेवढ्याच तीव्रतेने व्यक्त होतो अन् नाराजीही तेवढ्याच हक्काच्या तीव्रतेनं बाहेर पडते, अशी एक जागा तर असतेच ती माझी माय, माझी आई, जे असतं एका लेकराचं विश्व ...!!!
   पण समाजाची नजर ज्यावेळेस सांगते ना, की तुम्ही मोठे झालात तेव्हा त्या विश्वाला - त्या आईला पण सर्व सांगताना आड येतो; आपला समजूतदारपणा, मोठे झालो ही भावना ....!!!
       त्याचमुळे अशी ठिकाणं असावीत जिथं बघाल तुम्ही स्वतःला, कराल स्वतःच्या चांगल्या- वाईट गोष्टींवर उदंड प्रेम ...!!
जिथं असेल एक माज, आहे तसा स्वीकारण्यातला ...!!!!
      मग ते ठिकाण एका अजाण टेकडीवरील महाकाय दगड असेल, किंवा नदीकाठच्या वाळवंटात, रणरणत्या उन्हातल्या पांथस्थाला  सुखद सावली देणारं एखादं झुडूप ...!!!
 त्या झुडपाच्या हवहव्याशा वाटणाऱ्या त्या सावलीतून दिसतो, डोळ्याला गारवा देणारा सरितेचा अथांग, पण मंदावलेला प्रवाह ....!!!
   मग जाणवावं तो प्रवाह सुद्धा स्वत तळपतोच आहे सूर्याच्या तेजाने ....पण तोच प्रवाह देतोय त्या पांथस्थाला सुखद मायेचा ओलावा, गारवा .....!!!!
बनावं तसंच त्या प्रवाहासारखं...!!!
    जमेल ???

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, April 14, 2019

"श्वास" विकला जातोय.....!!!!!

एके दिवशी मेट्रो सिटी असणाऱ्या पुण्याच्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या जे एम रोडवरून फिरत असताना ,
एक 8-9 वर्षाचा मुलगा अंगावर मळलेले कपडे,फाटलेला, बटनं नसलेला शर्ट घालून तो अन्, त्याची आई, सिग्नल ला फुगे विकत होते...!!
ते 8-9 वर्षाचं बालपण असंच फुटपाथवर धरणी मातेचा पलंग अन् आभाळाच्या छायेखाली झोपून चाललेलं ....! हे पाहिल्यावर मनावर वज्राघात झाल्यासारखं जाणवलं.
    कोणीतरी अचानक धातुच्या घणाने डोक्यावर घाव घालावा अन् आपल्याला भोवळ यावी अन् मन सुन्न व्हावं, मनाची विचार करण्याची क्षमता संपली अन् पाय गळून गेल्यासारखं वाटायला लागलं...!!
अन् एक आम्ही लोकं एन्जॉय च्या नावाखाली बर्थडे करतो, पार्ट्या करतो...
    या पार्ट्या अन् बर्थडे चे किस्से चवीने सांगतो , अन् म्हणतो की आम्ही खूप मज्जा केली, एन्जॉय केला....
   तर त्याच वेळेस दुसऱ्या बाजूला एक बालवयातील बाळ त्याचा अन् त्याच्या आईचा उदरनिर्वाह करण्यासाठी आतड्याला पीळ पडला तरी विचार न करता त्या फुग्यांमध्ये आपल्या आतड्यातली हवा भरून सिग्नल ला विकून पोट भरतोय....!!
एका बाजूला टाटा, अंबानी, अदानी चे उंच उंच महाल , महागड्या गाड्या ऐशोआरामी जीवन so called luxurious life....!!!
तर दुसऱ्या बाजूला एका विकसनशील भारतातील 8-9 वर्षाचा बालक टीचभर पोट भरण्यासाठी कासावीस होताना दिसतो...
का एवढी दरी असावी श्रीमंती अन् गरिबी मध्ये ..????
अहो, ही माणसं फुकट काही मागत नाहीत आपल्याकडे
त्यांना कष्टाचीच भाकर आवडेल;आवडते
पण त्यांच्या हाताला काम तरी द्या ...!!!!
एवढ्या दरीने कधी ना कधी उद्रेक हा होईलच ...!!!
प्रश्न पोटाचा असला तरी, आयुष्य जगताना नाईलाजास्तव का होईना हसत हसत उत्तरं ही शोधावीच लागतात...! मग तो फुगे विकणारा असो किंवा सायकलवर कागदी फुलांचे गुच्छ विकणारा असो किंवा सिग्नल वर देवाच्या नावाने काळी बाहुली विकणारा असो ....!!!
कोणीतरी विचारलं , "हिंदू आहेस का मुसलमान? -अन् खूप अजीब उत्तर आलं ........उपाशी आहे साहेब  ...!!!"
ते रोडवरील दृश्य पाहिल्यावर मनातून आलं,
      कोई समझ ना सका उस की मजबुरी...
      जो सांसे बेच रहा था गुब्बारे में भर के...
आणि कोणीतरी लिहून ठेवलंय ...!!!
    "भुक फिरती है मेरे मुल्क में नंगे पाओ रिज़्क ज़ालिम कि तिजोरी में छुपा बैठा है...!'
      मित्रांनो , आयुष्यात तुम्ही कितीही मोठे व्हा...!! बक्कळ पैसा कमवा...!! तुमच्या शब्दाकोशात एन्जॉय चा जो अर्थ असेल त्यापद्धतीने एन्जॉय करा...
   पण त्याच बरोबर मालक-साहेब एक करा; या लोकांना दोनवेळचं जेवण मिळेल एवढं त्यांच्यासाठी नक्की करा..!
तुम्ही luxurious life जगा पण माझ्या मित्रांनो ,या रोड वर असणाऱ्या लोकांसाठी, त्याचं टीचभर पोट भरण्यासाठी जमेल ते करा...!! आयुष्यात आपल्या महत्वकांक्षा खूप असतील पण त्यांच्या फक्त दोनवेळचं पोट भरेल एवढं जेवण हवं आहे...!!
    तुमच्या कमाईतून त्यांच्या टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी एक छोटा वाटा काढून ठेवला तर ईश्वर तुम्हांस त्याच्या हजारपट देईल ....!!!
वामनराव पै नी कुठेतरी लिहून ठेवलंय,
"तुम्ही इतरांच्या बाबतीत जे जे कराल ते ते तुमच्याकडे हजारपटीने reflect होतं...
मग ते प्रेम असो, तिरस्कार असो, मत्सर असो ....!!"
हे लोकं वर आले तरच आपला हिंदुस्थान खरा विकसित देश बनेल ....!!!
साहेब, हे करत असताना
मदतीचे हात किती मोठे आहेत हे पाहण्यापेक्षा मदत करण्याची इच्छा किती मोठी आहे हे बघा .....!!!
कुठेच नसतं ठरवलेले मुक्कामाचं ठिकाण
स्वप्नांच्याच वाटेवर टीचभर पोटासाठी लोकांना मांडावं लागत दुकान...!!!!!!
#जिंदगी_का_फंडा 🌿🍃

Friday, March 22, 2019

पाणी पेटतं तेव्हा .....!!!

 

      हेच आग विझवणारं पाणी,
दुष्काळात कधी पेट घेतं हे कळतंच नाही ....!!
'पाणी जपून वापरा' हे वाक्य आम्हांला नवीन नाही माय-बाप...!!
        तरी सुदधा आम्ही पाणी कधी जपून वापरतच नाही ओ ...
कारण आम्ही पाहिलेलं नसतं, माझी माय घागरभर पाण्यासाठी भर उन्हात मैलो न मैल दूर भटकते,तेव्हा कुठं तिला घागरभर पाणी मिळतं ....!!
        माथ्यावर आग ओकणारा सूर्य, अन् पाय पोळवणारी धरती यामध्ये माझी माय भोवळ येत असताना सुद्धा भटकते ओ मैलो न मैल दूर...!!!
       पाण्यासाठी तिची ओढाताण एवढ्याचसाठी असते की
तिची लेकरं अन् लेकरांप्रमाणेच प्रेम करणाऱ्या जनावरांची दुष्काळाच्या झळानीं पाण्याविना लाही-लाही होत असते ओ ...
पण आम्हांला त्याची थोडी पण झळ पोहचत नाही..
आम्ही आमच्या सुखासाठी उन्हाळ्यात शॉवरने दोन दोनदा आंघोळ करतो अन् एका बादली मध्ये होणाऱ्या अंघोळीसाठी 3-4 हंडे वाया घालतो..!
        तर त्याच 3-4 हंड्यासाठी-घागरींसाठी माझी माय भटकत असते ओ; भोवळ येत असतानाही ....!!!
          आम्हांला कल्पनासुद्धा नसते याची म्हणूनच आम्ही उडवतो मुबलक पाणी कॉर्पोरेशन चं समजून ...!! ज्या पाण्यासाठी माझी माय भटकते भर उन्हात..!!!
        हेच पाणी असतं की ज्याच्यामुळे माझ्या बळीराजाकडे एका दाण्याचे हजार दाणे बनवण्याची क्षमता असते...!!
हेच पाणी जे विझवतं आग...!!!
           पण दुष्काळात त्याच पाण्यासाठी , अन् पेंढीभर चाऱ्यासाठी माझा बळीराजा गुरांच्या छावणीत गुरांप्रमाणे राहतो ओ...!!!
         जोपर्यंत पाण्याचा टँकर येत नाही अन् जोपर्यंत त्यांच्या सर्जा-राजाला पाणी पाजत नाही, पेंढीभर खायला घालत नाही तोपर्यंत माझा बळीराजा घास पण मुखात घालत नाही ओ ...!
मग कधी कधी टँकर संध्याकाळी येतो तर कधी रात्री ...!
तर कधी कधी आमचे राजकारणी लोकं, तो चारा सुद्धा खातात ओ ...!! जे कुळ भगवान कृष्णाचं पवित्र यादव कूळ म्हणतो , जिथं महाभारत घडलं असं मानतो,  अशा या पवित्र जागेवर असं घडताना पाहिलयं ओ ...!!
          अन् हे सर्व जवळून बघतील ना, तेव्हा हा प्रश्न पडणार नाही, की माझा बळीराजा का करत असावा आत्महत्या???            'अचलपूर'च्या आमदारांसारखं आमच्या बळीराजाच्या बाजूने खंबीरपणे का कोण उभे राहत नाहीत ओ??
        आमच्या बळीराजाच्या बाजूने कायम विरोधीपक्षच असतो!...हीच शोकांतिका..!!
       निसर्गाने साथ दिली तर तुमच्या थट्टा उडवणाऱ्या पॅकेज ची गरजच नाही ओ ....
       आभाळ भरून आल्यावर खुश होणाऱ्या माझ्या बळीराजाला परीस्थितीचं ओझं कधीच वाटत नाही;कारण मेहनत करुन परिस्थितीवर मात करण्याचा ध्यास फक्त  बळीराजाच्याच रक्तात असतो..!!
       काळ्या आईचं ऊर फाडून शेती कसणाऱ्या माझ्या बळीराजाचा भेगा पडलेला हात,  नि:शब्द पण बोलकी प्रतिक्रिया देऊन जातो...!!
      दुष्काळी दौरा करण्यासाठी तुमचा ताफा येतो,
पण त्या ताफ्यामूळे उडणाऱ्या धुळीतच माझ्या बळीराजाचं दुःख झाकोळून जातं, तुमच्या पर्यंत पोहचतंच नाही ओ ...!!
#SaveWater
#लाखाचा_पोशिंदा_बळीराजा
#जिंदगी_का_फ़ंडा🌿

Sunday, March 3, 2019

स्पंदनातून..!!!


     सांजवेळी बसावं असंच गावातील उंच टेकडीवर,..
!!अश्या जागेवर की जिथुन दिसेल सगळं गाव , गावात येणारी धुळीची वाट , आपलं घर , आपलं अंगण, आणि अंगणातील गुलमोहराचं लालबुंद झाड....!!
     त्या सांजवेळी आणखी गोष्टी दिसतील, समजणाऱ्या अनामिक ओढीने  धुळीच्या वाटेने धावत येणारी गुरे, शेळ्या, मेंढ्या....! आपल्या पाडसाच्या अतीव ओढीने, त्याच्या खुरानीं धूळ उडवत ...!!
   कसलीही पर्वा न करता येतील धावत, हंबरडा फोडत, अन् ते वासरू, ते पाडस पण त्याचवेळी आपल्या आई ची वाट पाहत, दाव्याला न सुटणारे पिळे मारत, असफल प्रयत्न करतंय की, परसाच्या दारात जाऊन कधी एकदाचं भेटतोय त्याच्या आई ला? आणि ती आई, ती गोमाता पण त्याच ओढीने धावत येतेय की कधी पाडसाला जिव्हे ने कुरवाळत दूध रुपी अमृत देतेय ?....!!
       धरणी वरती हे पाहत असताना अचानक जावं त्या उतुंग आभाळाकडे लक्ष..!!अन आश्चर्य म्हणजे जे आत्ता धरणी वर पाहिलं तेच आभाळात पण दिसतंय..!पाखरं पण त्यांच्या घरट्याच्या दिशेने लगबघीने चाललीयत त्यांची पण तीच ओढ, तीच प्रेम भावना अन मग दिसतं माझ्या अंगणातील लालबुंद दिसणाऱ्या गुलमोहराच्या झाडावरील घरट्यातील तो छोटा जीव
     घरट्याच्या तोंडाशी येऊन,इवलुशी चोच काढून चिवचिवत आहे आईची वाट पाहत ..!!
मग खात्री पटावी की, या विश्वात सर्व प्रेमच प्रेम आहे ....पाहणाऱ्याच्या नजरेत ते साठवता आलं पाहिजे...!!
हे सर्व पाहताना मन अगदी प्रसन्न होतं. त्या विधात्याला शतशः प्रणाम करण्यासाठी हात आपोआप जोडले जावे अन डोळ्यात त्या प्रेमपूर्ण गोष्टीने पाणी यावं..!!
      माझी आई  पण माझी वाट पाहत थांबली असेल घराच्या दारात,  दिवे पाजळत असेल पण नजर मात्र सारखी कुंपणाच्या फाटकाकडे असेल कधी तिचं तिला पाडस येताना दिसेल,थोडा उशीर झाला तरी सैरभैर होईल ..!
     नंतर गावात येणाऱ्या धुळीच्या वाटेवरून बळीराजा आपल्या लेकरांप्रमाणे प्रेम करणाऱ्या सर्जा-राजा ची बैलगाडी घेऊन येताना दिसावा, त्या बैलगाडीच्या चाकांमुळे उडणारी धूळ त्या सूर्यास्ताच्या किरणांमुळे अगदी सोनेरी दिसावी,
     तीच सोनेरी धूळ जाऊन मिळतेय आभाळाला असं क्षणभर वाटावं ...!!
    अन तो सोनेरी क्षण पाहताना नाइलाजाने का होईना पण टेकडी वरून परतीच्या प्रवासाला सुरवात करावी ...!!प्रसन्न मनाने....!!!


#जिंदगी_का_फ़ंडा🌿

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...