Tuesday, May 7, 2019

"निसर्गातलं बेधुंद जगणं"....!!!



       निसर्गाची आपल्या आयुष्याशी सांगड घातली की
मग निसर्गासारखंच आपलं आयुष्य ही नयनरम्य होतं.
    आकाशाला गवसणी घालण्यासाठी आसुसलेली उत्तुंग झाडं..!
    त्याच झाडांच्या पानांचा होणारा सळसळ आवाज, पक्षांचं मधुर गुंजण, दूरवरून येणारी कोकिळेची कुहूकुहू ,
   निसर्गाचं विराट रूप दर्शवणारा, उंचावरून बेदरकारपणे कोसळणारा धवलरूपी धबधबा.....!!
      अन् दूरवरून संदेश घेऊन येणारा, अंगावर शहारे आणणारा थंडगार वारा..!!
       त्यात भरीस भर म्हणजे सूर्याची किरणं सुद्धा जमिनीवर पडू न देणारं गर्द हिरव्या झाडांचं घनदाट जंगल ....!
     अन् शांतपणे कोसळणारी पावसाची संततधार , जी झाडाच्या पानांवर पडून घरंगळत आपल्या अंगावरून जमिनीवर पडते आणि तो क्षण मोहवून टाकते ...!!
    आणखी थोडसं पुढे गेलं कि, डोंगराच्या दुसऱ्या टप्प्यात  तेथील झाडे वेगळ्या प्रकारची, पक्षी सुद्धा वेगळ्या प्रकारचे..!!         
           आश्चर्य म्हणजे वेगवेगळ्या आकाराची डोंगरांची रांग
म्हणजे की पूर्ण वेगळ्या प्रदेशात आल्याचं feel व्हावं....
निसर्गाचं हे रूप पाहिल्यावर मनात जो प्रसन्न भाव निर्माण होतो
तो शब्दबद्ध नाही करता येणार!
     तिथेच कुठेतरी झरा, अन् त्याचं थंडगार पाणी...!!
मनसोक्त भटकायचं असेल तर  एकट्याने फिरण्याचा पर्याय एकदमच भारी ...!!!
     भुरभुरणाऱ्या पावसात अशी 'स्व'सोबत अभावाने म्हणा पण खेचून आणावी लागते , तरीही ही लज्जत न्यारीच ...!!
अश्यात सायकल किंवा बाईक पेक्षा चालत फिरणं म्हणजे खरी मज्जाच!!
थोडक्यात एकला चालो रे...!!!
     धुंद पावसाळी दिवसात 'स्व'सोबतीने केलेली ही निसर्गमय सफर यादगार होऊन राहील..!!
     वातावरण मस्त ढगाळलेलं तरी असतं किंवा रात्रभर कोसळत असल्याने उघडत अालेलं तरी असतं , आणि अशातच पूर्वेकडून वरती येणारा सोनेरी गोळा काही क्षण पूर्ण पृथ्वीला सोनेरी करून जातो, क्षणभर वाटतं की हा तर आहे 'परीस'...!!                    
        अशी सूंदर दिवसाची सुरुवात होत असते..!
                 हे दृश्य पाहणं म्हणजे मेजवानीच ...!
      थोडं पुढे गेल्यावर छोट्याशा शड्डू मध्ये वाफळता कटिंग घ्यायचा..!त्याचा आस्वाद घेत पुढच्या प्रवासाला सुरुवात करायची. स्वत:शी संवाद साधायचा.तेव्हा आपसूकच एक शांत शीळ बाहेर पडते , कळतही नाही ही शीळ कधी चालु झाली ते ...!!
       आपल्याला स्वतःला खूप दिवसांपासून काहीतरी विचारायचं असतं. स्वत:शी चर्चा-हितगुज करायला ही योग्य वेळ असते.
       वैशिष्ट्य म्हणजे जळमटलेल्या गोष्टींना आपण या वातावरणात अगदी सहज माफ करू शकतो. मग खूप हलकं-हलकं आणि उंच झाल्यासारखं वाटायला लागतं.
आता स्वत:सोबत खूप गप्पा झालेल्या असतात. रपेटही झालेली असते आणि नेहमीच्याच पण कधीच न जाणवलेल्या अनेक गोष्टी उमगलेल्या असतात.  अन् शेवटी एखाद्या जागेवर बसून डोळे मिटून कधीच लक्षात न आलेले पक्षांचे, झाडांचे, वाऱ्याचे, निसर्गातल्या इतर गमती जमतीचे आवाज टिपायचे अन्
मन भरलं की प्रसन्न मनाने परतीच्या प्रवासाला निघायचं...!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

No comments:

Post a Comment

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...