Monday, June 22, 2020

तो, ती अन् कातरवेळ...!!!

      सांजवेळ,सर्व जण परतीच्या वाटेवर आहेत, पाखरांचा थवाही निघालाय घरट्याच्या दिशेने...!! त्यांची दोन दिवसांपूर्वीच उपजलेली पिल्लं घरट्याच्या दाराशी येऊन चिवचिव करतायत, वाट पाहत आहेत काही खाऊ घेऊन येणाऱ्या आई बाबांची...!!! ते ही लगबगीने घरट्याकडे थव्याने गुंजण करत चाललेत.
     सूर्याच्या क्षितिजाकडे रुतल्याने पूर्ण आभाळ तांबूस रंगात अगदी नाहून निघालं आहे त्यात हे थव्याचं विहंगम दृश्य खेचुन घेतंय... आकर्षित करतंय,रोखायचा प्रयत्न ही करू देत नाही...!!
दुरून गाणकोकिळा कुहुकुहू करतेय,
आत्ताच पाऊस थांबल्याने निसर्गाने अगदी नव्या नवरीसारखा साज चढवला आहे.रानातून थकून आलेला आई बाबांचा देह घराच्या अंगणात स्थिरावला आहे...!
     रानात गेलेली जनावरे आता गोठ्यात येऊन थबकली आहेत. त्यांच्या गळ्यातील घंटेच्या लयबद्ध सौम्य घंटानादात  त्यांच्या पाडसाना जवळ घेत प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
     एवढा शांत-स्तब्ध निसर्ग भासत असताना,
     'तो' मात्र त्या क्षितिजाकडे इंचा-इंचाने रुतत जाणाऱ्या सूर्याकडे टक लावून शांत बसलाय, कश्याततरी अगदी हरखून गेलाय.. यात विशेष असं काही नव्हतं,तो त्याच्या नेहमीच्या जागेवर जाऊन दररोज त्या सूर्याचं कातरवेळेचं सौंदर्य टक लावून पाहणं त्याचा छंदच आहे, होता.....!!
     त्याला त्या परतीचा प्रवास करणाऱ्या सूर्याचा हेवा वाटत असावा... कदाचित...!! अस्तित्वाला राम-राम ठोकत असतानाही त्याच्या रंगांच्या उधळणीवर-महोत्सवावर जळत असावा, कदाचित....!! त्याच्या औदार्याचा हेवा करत बसत असेल, त्याचही असंच काही स्वप्न असेल आयुष्याच्या संध्याकाळचं, परतीच्या प्रवासाचं महोत्सव करत रंगाची उधळण करत जिंदगीला राम राम ठोकण्याचं...!!
     पण त्याचं अन् तिचं-कातरवेळेचंं काहीतरी असं अतूट ऋणानुबंध असावेत, कोणतंतरी अनामिक नातं त्याला दररोज त्याचवेळी- सूर्य डुबण्याच्या वेळी, अनामिक ओढीने खेचून नेतं.
     'तो'ही हातातील सर्व कामे टाकून धावत जातो,अगदी खूप दिवसातून भेटणाऱ्या प्रेयसीला भेटताना जी डोळ्यात चमक असते, जी ओढ असते ना अगदी तीच ओढ, तिच चमक तोच उत्साह....!!!
पण आज काहीतरी वेगळा भासत होता 'तो'...!! क्षितिजाकडे रुतणाऱ्या सूर्याकडं पाहत तर होता,पण मनात काहीतरी वेगळंच चाललं होतं त्याच्या...!! चेहऱ्यावर कोणाच्यातरी आठवणीत व्याकुळ झालेले भाव स्पष्ट दिसत होते ...!!!कोण असावं बरं...?? असो पण या कातरवेळी कोणाबरोबरतरी घालवल्या असल्याच्या शंकेला डोळ्यातील चमक दुजोरा देत होती...!!
     ते जगलेले क्षण आज आठवणी बनुवन डोळ्यात चमकत होत्या....!! कातरवेळेच्या सूर्याचं क्षितीजात रुतण्याचा अन् सूर्याने जातेवेळी केलेला महोत्सव कदाचित त्यांच्या अनामिक नात्याचा साक्षीदार असावा....!!! तो एकमेव साक्षीदार असेल त्यांच्या अनामिक नात्याचा, ज्याने जवळून पाहिलं असेल त्यांना एकमेकांसाठी, भेटण्यासाठी बोलावं लागणारं खोटं...!! मित्र-मैत्रिणींची आप्तेष्टांची नजर चुकवून कधी-कधी खोटं बोलून भेटण्यासाठी,सूर्याचा महोत्सव पाहण्यासाठी केलेली धडपड...!!त्याच्या खांद्यावर डोकं ठेऊन  काही न बोलताही सर्व काही बोलल्यासारखं हलकं वाटण्यासाठी...!!!
धावत जाऊन दररोज भेटलं तरी खूप वर्षांनी भेटल्यासारखं उत्साहाने गळाभेट घेण्यासाठी धावत-पळत याचं सांजवेळी भेटले असतील ते तिघे....!!
'तो', 'ती' अन् 'ती'-कातरवेळ
     हे सर्व-सर्व एखाद्या पुस्तकातील ओळी वाचाव्यात तश्या त्याच्या चेहऱ्यावर आज स्पष्ट वाचता येत होत्या...!! बरेच दिवस झाले होते त्यांना विभक्त होऊन..!!
     पण 'त्या'ने ती कातरवेळ दुसऱ्या कोणाबरोबर न घालवता आता एकट्याने घालवत होता...!! कदाचीत 'ती' ही घालवत असेल बसत असेल क्षितिजाकडे डोळे लावून...!!
'तो' ही आज जाब विचारत असेल त्या कातरवेळेला, त्या अनामिक नात्याच्या साक्षीदाराला...!!एवढं सुदरतेने- महोत्सवाने नटलेल्या क्षितीजाला........!!!
या महोत्सवासारखा असावा आपला ही परतीचा प्रवास
निरोपाच्या क्षणींही हसत-खेळत महोत्सव करत, रंगांची उधळण करत व्हावा प्रवास दिगंतरापर्यंतचा......!!!

#जिंदगी _का_फ़ंडा🍃

No comments:

Post a Comment

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...