Sunday, February 28, 2021

आईसाहेब:- एक योद्धा...!!!

     आम्ही तीन भावंडं पहिली ताईसाहेब, सीमा आणि मी शेंडेफळ ....आम्हां तिघांमध्ये जे काही चांगलं असेल तर ते  फक्त आमच्या आईसाहेबांमुळेच....!!

     उंच शरीरयष्टी, सावळा चेहरा, त्यावरती अगदी ठळक दिसणारं  आई भवानीसारखं गोलाकार लालबुंद कुंकू झुबकेदार केसांचा बरोबर मधोमध पाडलेला भांग., गळ्यात विठ्ठलाची-तुळशीची माळ अशी लोभस दिसणारी माझी आई.....!!

     आई तशी तापट स्वभावाची , कोणाचं तिळभरही वावगं खपवून न घेणारी, उत्तरास प्रतिउत्तर देणारी, चुकीचं वाटलं तर तोंडावर फटदिशी बोलणारी असं हे व्यक्तिमत्व ...!!

     पण आई जेव्हा तिचा भूतकाळ सांगते तर अंगावर शहारे येतात, काहीतरी काल्पनिक ऐकतोय,असं वाटायचं. पण सगळं सत्य होतं, जरी ते कटू असलंतरी सत्यच होतं जे स्वीकारावं लागणारं...!!

     1972 च्या दुष्काळात सगळेच होरपळून निघाले होते आणि त्यांनतरच्या काळात आमच्या आई-अण्णांचा लग्न झालं...!! तेव्हा सासुरवास हा लेकीच्या पाचवीला पुजलेला होता , असंच म्हणावं लागेल... तश्यातही आईने आम्हां तीनही भावंडांवर संस्काराची जी बीजे रोवली त्यामुळेच आयुष्यात  आम्ही काहीतरी ओळख मिळवू शकलो..!अन् हे सर्व शक्य झालं ते फक्त माझ्या आईमुळेच...!!

     आईने जुन्या काळातील सगळा सासुरवास भोगून, फक्त लेकरांच्या तोंडाकडे बघून सगळं सहन केलं, प्रसंगी यातना भोगल्या, पण हार मानली नाही.... आम्हाला मोठं केलं, संस्कार केले आणि संवेदनशील "माणूस" बनवलं....!!आजही आम्ही जेव्हा-जेव्हा घरातून बाहेर पडत असू तेव्हा-तेव्हा आई हेच सांगते,

" कोणाला काही म्हणू नको";  "कोणाकडे वाईट नजरेनं पाहू नको" ;  "ईश्वरावर भरोसा ठेव,विठ्ठल सगळं नीट करेन"  पण वाईट मार्ग पकडू नको....!!

हे तिचे नेहमीचे  वाक्ये....!! पण त्यात खुप मोठं जीवनाचं सार आहे, हे आता कळतं. जेव्हा कधी समाजात या संस्कारांचं कौतुक होतं ,तेव्हा कृत्य-कृत्य वाटतं आणि आपसूकच मान लवते ती आईच्या पायाशी....

     सव्वीस जणांच्या कुटूंबात फक्त ताईसाहेब आणि सीमा या दोघीच मुली, बाकी सगळी आम्ही मुलं....

 एकत्र असताना बऱ्याच गोष्टींची वानवा असायची आणि मग आईच्या मनाची तगमग व्हायची... जरी graduate नव्हती माझी माय तरी तिने नाही केला कधी मुलगी आणि मुलगा यात भेदभाव...!! घरातूनच समानतेचे धडे दिले....!!काळ लोटत गेला, दिवस सरले आणि जे हवं ते मिळू लागलं हे सर्व आमच्या आईच्या योगदानाने...!! हे सर्व शक्य झालं ते फक्त आईमुळे आणि तिच्या संस्कारातून एक छान कुटूंब बनलं...!!

     आता घर अगदी आनंदाने गजबजून गेले, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आणि तिने यावर विरजण पाडलं...!! तरीही माझी माय खचली नाही नव्याने आवरायला घेतलं ।... आणि पुन्हा नव्याने उभी राहिली,आम्हां सर्वांना धीर दिला, काहीतरी मार्ग निघेल असं आश्वस्त केलं...!! स्वतःच दुःख दूर लोटलं आणि पुन्हा उभारी दिली...!अशी माझी आई, खूप संकट पार करून आज आम्हाला या वळणावरती आणलं...!!

     आजही घर सोडताना तिच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, खूप बडबड करेन, नको-नको ते बोलेल,पण त्यातूनही तिचं प्रेम आणि काळजी दिसते...!! कामाच्या ताणामुळे  चिडचिड करते पण तरीही ती मायेचा सागर आहे...!!

    आई असतेच मायेचा सागर पण त्याच सागराच्या पोटात असंख्य भूकंप,धरणीकंप चालू असले तरी पृष्ठभागावर त्याचा लवलेशही दिसत नाही याचं मृत्तिमंत व्यक्तिमत्त्व म्हणजे आईसाहेब.....!!

एक छोटं कुटूंब  सूंदर विश्व बनवण्यात सिहांचा वाटा आईसाहेबांचा आहे....त्या आईविषयी माझ्यासारख्या पामराने काय लिहावं 

स्पंदनातून इतकंच मागेन ईश्वरास...

"इतकंच आयुष्य दे बा विठुराया,जे आईच्या आधी संपू नये आणि आई नंतर उरु नये....!!!"


#आई❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

2 comments:

  1. आई नक्कीच एक महान योध्दा आणि एक उत्तम मार्गदर्शक असते...
    भारी लिहिलंय...
    Keep it up..sirji..

    ReplyDelete

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...