Friday, May 28, 2021

रात्र...!!

.                              शांत वाटणारी तू ही,
                               शांत कधी सरत नाही,

न बोलता तू काही,

खूप सारे हितगुज करी,

तू सरताना येती आठवणींचे  दाटून नभ

अन् करती न गर्जताही सर्वांग चिंब,

शहारे  आणणारा दूरदेशीचा तो वारा,

वाटे मज  सम कोणी मोरपीस फिरवला,

खिडकीतून येणारी चंद्राची  ती छाया,

वाटे मज कोण आले अवेळी भेटाया,

दारातल्या बागेत बकुळ दरवळला,

वाटे कोण्या परीचा दूरदेशीचा अत्तर पसरला,

अश्यातच रात्र सरत गेली,

नव्याने पहाट पावलं टाकीत आली,

कोकिळेने नेहमीची इशारत केली,

ही शांत वाटणारी रात्र सरली,

आठवणींचे नभ रिकामे करत,

भूतकाळात विलीन झाली,

पुन्हा तू येशील,

पुन्हा नभ दाटतील,

पुन्हा भास होतील,

नव्याने....!!


#रात्र

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, May 23, 2021

श्रीकृष्णा...!!

 


तू नव्हता फक्त श्याम राधेचा,

तू दाखवला अर्थ प्रेमाचा,

तू नाही वाजवली फक्त बासरी,

तू बनवले विश्व आमुचे सप्तसुरी,

तू होता गोकुळातला गोपाळ,

अन् अधर्माचा कर्दनकाळ,

तू नाही हाकल्या फक्त गोकुळातल्या गाया,

तू दिली आम्हा भूतदया,

तू अर्जुनाच्या रथाचा होता सारथी,

पण जीवनाचा लगाम तर तुझ्याच हाती,

तू होता महानायक महाभारतातला,

तू  श्रेष्ठ यादवकुळातला,

तू दिले  वचन आम्हांस गीतेत,

'यदा यदा हि धर्मस्य' म्हणत , 

वाट पाहतो हा सुदामा,

कधी येईल त्याचा तो कान्हा,

कान्हा,

कसा नाही दिसत तुज अजून द्रौपदीचा छळ?

कसं नाही भेटत तुज येण्यास कारण प्रबळ?

का नाही दिसत तूज अजून ग्लानी धर्माची?

का नाही वाटत अजूनही तुज गरज येण्याची?

कान्हा,

आयुष्याच्या बासरीतील मधुर स्वर ऐकवायला ये,

गोमातेचा-गोपालांचा गोपाळ बनून ये,

कंसाचा(विकृतींचा) काळ बनून ये,

सुदामाचा यार बनून ये,

आजच्या अर्जुनाचा सारथी बनून ये,

द्रौपदीचा संकटमोचक सखा बनून ये,

अन् हो राधेचा कान्हा बनून अवश्य ये,

कृष्णा, पुन्हा एकदा बासरीत सूर भरायला ये!....


#जिंदगी_का_फ़ंडा🍃

【 Sketch by Reshma】

Friday, May 21, 2021

मंतरलेले दिवस..!!!

पुन्हा एकदा,
विद्यापीठाची सैर करायचीय,
मंतरलेल्या दिवसांची अनुभूती घ्यायचीय.
हॉस्टेल मिळण्यासाठीची ती धावपळ पुन्हा करायचीय,
ज्यांना मिळालं नव्हतं त्यांना रेक्टरांची नजर चुकावून रूममध्ये घ्यायचंय,
नाहीतर कधी-कधी तर Tutorial Hall मध्येच झोपून जायचंय.
पुन्हा एकदा,
त्या रामण हॉलमध्ये लेक्चरला बसायचंय,
पाठक सरांचं Quantum Mechanics चं लेक्चर मात्र मन लावून ऐकायचंय, (डोक्यावरून जाणारं असलतरी....)
कधी लेक्चरला झोप आली तर हळूच एका चॉकलेटचे 2-3 भाग करून सर्वांमध्ये वाटून खायचेत...!
पुन्हा एकदा,
इंटर्नलच्या अगोदर त्या tutorial हॉल मध्ये बसून बेधुंद अभ्यास करायचाय.
न समजलेलं समजून घ्यायचंय, समजलेलं समजून सांगायचंय.
पुन्हा एकदा,
Experiment ची Viva देताना घाबरून जायचंय तर कधी-कधी सरांचीच viva घ्यायचीय,
सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6:15 पर्यंत तासन्तास बसून  फिझिक्स डोक्यात साठवायचंय.
कधीच न पाहिलेले tutorial चे  ते प्रॉब्लेम सोडवायचेत.
पुन्हा एकदा,
जयकरमध्ये 12-12 तास अभ्यास करायचाय,
अन् प्रॅक्टिकल परीक्षेची Viva घेणाऱ्या सरांचं नाव पाहूनच धरधरून घामेजून जायचंय.
पुन्हा एकदा,
प्रॅक्टिकल करताना,सेंट्रल हॉलमध्ये लेक्चर ऐकताना कोणाचीतरी खोड काढायचीय आणि कंटाळवाणं लेक्चर सुद्धा मजेत पार करायचंय.
मित्राचा- मैत्रिणीचा रिझल्ट खराब आला म्हणून त्याला-तिला विश्वास द्यायचाय,
पुढच्यावेळी तू century मारणार हे मनावर ठसवायचंय.
असंच पुन्हा एकदा छान फ्रेन्ड सर्कल बनवायचंय.
पुन्हा एकदा,
अनिकेतचा सहा रुपयांचा वडापाव खायचाय,
अण्णांनी बनवलेल्या मिसळचा आस्वाद घ्यायचाय,
रात्री 12-1 वाजता  चतुरशृंगी समोरचे पोहे खायचेत.
पुन्हा एकदा,
"स्पंदन" आणि "फ्रेशर्स"ला  हुंदडायचंय,
जगाचा विसर पडून दंगा करायचाय,
आणि दंगा करतच अख्या युनिव्हर्सिटीभर भटकायचंय.
पुन्हा एकदा,
Night outs अनुभवायच्यात,
एक्साम झाली की ट्रेकचे प्लॅन्स करायचेत,
गणपतीत ढोल- ताशाच्या तालावर बेधुंद नाचायचं.
पुन्हा एकदा,
पुन्हा एकदा,
मेसचा बेचव टिफिन बॅडमिंटन कोर्टवर गोल करून गप्पा मारत चविष्ट बनवायचाय,
कोण्या मित्राने घरून आणलेल्या टिफिनवर तुटून पडायचंय.
पुन्हा एकदा,
विद्यापीठातला पाऊस अनुभवायचाय, त्या पाऊसात बेधुंद नाचायचंय.
आणि फक्त डोळ्यातच स्वप्न रंगवायचेत गुलाबी छत्रीचे, छत्रीतल्या गुलाबाचे...!!
पावसामुळे खड्यात साचलेलं पाणी पायाने उडवायचंय,
फांदीवर साचलेल्या पाण्याने मात्र कोणालातरी भिजवायचंय.
अन् पुन्हा एकदा घरची आठवण आली म्हणून कोपऱ्यात बसून आसवं ढाळायचीत.
पुन्हा एकदा,
ज्यांचे हात सुटले त्यांचा हात घट्ट पकडायचाय,
नकळत घडलेल्या चूका सुधारायच्यात,
पुन्हा एकदा छोट्या कारणावरून अबोला धरलेल्याला घट्ट मिठी मारून भरभरून बोलायचंय.
ज्याच्याशी मैत्री करू शकलो नाही, ज्यांना मदत करू शकलो नाही, त्याच्याशी मैत्री करायचीय, मदत करायचीय.
पुन्हा एकदा वाढदिवसाला बेधुंद नाचायचं आहे.
पुन्हा एकदा,
चांदणी रात्र असताना, चंद्र पश्चिमेला सरकत असताना पहाटेपर्यंत गप्पा मारत बसायचंय.
पुन्हा एकदा महिन्याचे पैसे संपले म्हणून एकाच ताटात जेवायचंय..!
पुन्हा M Sc चा शेवटचा पेपर झाल्यावर मेन बिल्डिंगला जाऊन भावना शून्य नजरेनं बसायचंय ,नकळतच झालेल्या ओल्या पापण्या पुसायच्यात.
सतत भेटत रहायची कधीच पाळली न जाणारी वचनं द्यायचीत.
पुन्हा एकदा,
हॉस्टेल सोडताना, रूमला कुलूप लावताना, रेक्टरच्या हातात चावी देताना,आसवांना वाट मोकळी करून घ्यायचीय..!
कदाचित पुन्हा एकदा,
जड पावलांनी युनिव्हर्सिटीला, त्या पाऊलखुणांना, त्या आठवणींना, मागे सोडत चालत रहायचंय निसर्ग नियमाप्रमाणे दिगंतरापर्यंत, न थकता......!!
कारण या पावलांना अधिकार नाहीय थकण्याचा-थांबण्याचा...!!
कारण स्वप्नांचं क्षितिज अजून खूप लांब आहे, कधी-कधी वाट वाकडी केल्याने तर ते अजूनच लांब सरकलंय.
पण जरी पावलांना अधिकार नसला थांबण्याचा, तरी आठवणींचा हा अधिकार विधात्याने अबाधीत ठेवलाय म्हणून हा प्रपंच...!!
आयुष्याच्या प्रवासाच्या या वाटेवर काही क्षण सुटून जातात, काही माणसं त्यांच्या थांब्यावरून उतरून जातात. काही मागे उरतात. पण या सर्वांचे आठवणींचे व्रण मात्र राहतात...! मग कधीतरी ते क्षण अवचित भेटायला येतात, तेव्हा हेच क्षण प्रवासातल्या अंधाऱ्या रात्रीत चांदण्यांचं काम करतात...!! हे निसटून गेलेले क्षण जपून ठेवायचे असतात....!
कुपितल्या दुर्मिळ अत्तराप्रमाणे....!!बकुळीच्या फुलांच्या मंद, पण भुलवणाऱ्या सुगंधाप्रमाणे.....!!!

#मंतरलेले_दिवस❤️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃
【 आयुष्याच्या या प्रवासात भेटलेली प्रत्येक व्यक्ती मला घडवत गेली त्या सर्वांचा मी ऋणी आहे विद्यापीठातले दिवस, जगलेले क्षण म्हणजे जीवनाच्या वाटेवरच्या बागेतील फुलं,तीच फुलं मी गुंफण्याचा असफल प्रयत्न केला आहे प्रत्येक वाक्य कोणत्यातरी घटनेचा संदर्भ देणारं आहे वाचकाने शोधावं😀 #lots_of_love❣️】

Wednesday, May 12, 2021

तू तुझाच साथी...!!



            निर्णय चुकतील, चुका होतील, तू सुधारत रहा,

ठेच लागेल, रक्त येईल, जखम होईल, तू सावरत रहा,

माणसं येतील, माणसं जातील, तू स्वीकारत रहा,

प्रतिकूल परिस्थितीत तू लढत रहा,

अनुभवातून शिकत रहा,

फुलपाखरं येतात फुलं बहरल्यावर,

तसेच निघून जातात कोमेजल्यावर,

पकड स्वतःच स्वतःचा घट्ट हात,

नाही होत धोका फितुरीचा ऐन युद्धात...!!


#संध्याकाळ #पाऊस

#जिंदगी_का_फ़ंडा🍃


Sunday, May 2, 2021

अवकाळी...!!


 अवकाळी पाऊस होतो,

तसा अवेळी बकुळ सुध्दा बहरतो,

परिमळ त्या रातराणीचा दूरवर पसरतो,


खिडकीतून येणारा थंड वारा,

उगाच आठवणींच्या गावा नेतो,


रात्रीच्या या भयाण शांततेत,

पाऊस मात्र बेधुंद कोसळतो,

जसा अंगणात,तसाच मनात....!!


#अवकाळी_पाऊस❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃




Saturday, April 17, 2021

प्रवासी..!!!


प्रवासी, या प्रवासाचा,

ना तमा मज ऊन-वाऱ्याची,

पाऊसकाळाची,

आस फक्त पैलतीरावर जाण्याची,


लडखडलेच पाय कधी,

लागून ठेच झालीच जखम कधी,

तरी थांबणं हे रक्तात नाही,


वाटेवरून त्याच चालताना,

उमटतील अनेक पाऊलखुणा,


त्याच सांगतील कहाण्या,

प्रत्येक पावलांच्या, प्रत्येक जखमांच्या,


म्हणून नको मज सहानुभूती,

नको मज आता ही अनुभूती,


फक्त इतकंच साकडं ईश्वरास,

 छोटेखानी हा प्रवास,

 दाखवावी वाट वाटाड्यास,


भागवावी भूक भुकेल्याची,

द्यावं ओंजळीत पाणी तहानलेल्याच्या,


कधी काळ्याकुट्ट अंधारात ,

दाखवावा किरण प्रकाशाचा,

द्यावा चाचपडणाऱ्यास हात मदतीचा,


जे जे चांगलं तेच उरावं,

जे वाईट ते जळून खाक व्हावं,


अनंतात विलीन होताना,

खंत नसावी निरोप घेताना,


असावं स्मित हास्य नवजात बालकासम

करावा महोत्सव कातरवेळीच्या सुर्यासम.....!!!


#प्रवास❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, March 21, 2021

कवितेची गोष्ट...!!

तू वारू भावनांचा,

लगाम त्यास शब्दसुमनांचा,


तू असते अबोल शब्दांची कहाणी

आणते कधी डोळ्यात पाणी,


तू भावनांच्या गर्दीतली पाऊल वाट

देते मज एकांतातही साथ....!!


#कविता

#world_poetry_day❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Thursday, March 11, 2021

रोपटं मैत्रीचं...!!


 मैत्रीच्या वळणावरती,

बहरला असेल गुलमोहर;


सुगंध त्या बकुळाचा,

गेला असेल दुरवर;


कोकिळा ही गात असेल गाणी,

पश्चिम क्षितिजावर सूर्यही थबकला असेल क्षणभर;


इवलसं रोपटं ते मैत्रीचं,

असते सावली उन्हातली,

बनते छत्री पावसातली ...!!


#मैत्री❣

#जिंदगी_का_फ़ंडा🍃




Sunday, February 28, 2021

आईसाहेब:- एक योद्धा...!!!

     आम्ही तीन भावंडं पहिली ताईसाहेब, सीमा आणि मी शेंडेफळ ....आम्हां तिघांमध्ये जे काही चांगलं असेल तर ते  फक्त आमच्या आईसाहेबांमुळेच....!!

     उंच शरीरयष्टी, सावळा चेहरा, त्यावरती अगदी ठळक दिसणारं  आई भवानीसारखं गोलाकार लालबुंद कुंकू झुबकेदार केसांचा बरोबर मधोमध पाडलेला भांग., गळ्यात विठ्ठलाची-तुळशीची माळ अशी लोभस दिसणारी माझी आई.....!!

     आई तशी तापट स्वभावाची , कोणाचं तिळभरही वावगं खपवून न घेणारी, उत्तरास प्रतिउत्तर देणारी, चुकीचं वाटलं तर तोंडावर फटदिशी बोलणारी असं हे व्यक्तिमत्व ...!!

     पण आई जेव्हा तिचा भूतकाळ सांगते तर अंगावर शहारे येतात, काहीतरी काल्पनिक ऐकतोय,असं वाटायचं. पण सगळं सत्य होतं, जरी ते कटू असलंतरी सत्यच होतं जे स्वीकारावं लागणारं...!!

     1972 च्या दुष्काळात सगळेच होरपळून निघाले होते आणि त्यांनतरच्या काळात आमच्या आई-अण्णांचा लग्न झालं...!! तेव्हा सासुरवास हा लेकीच्या पाचवीला पुजलेला होता , असंच म्हणावं लागेल... तश्यातही आईने आम्हां तीनही भावंडांवर संस्काराची जी बीजे रोवली त्यामुळेच आयुष्यात  आम्ही काहीतरी ओळख मिळवू शकलो..!अन् हे सर्व शक्य झालं ते फक्त माझ्या आईमुळेच...!!

     आईने जुन्या काळातील सगळा सासुरवास भोगून, फक्त लेकरांच्या तोंडाकडे बघून सगळं सहन केलं, प्रसंगी यातना भोगल्या, पण हार मानली नाही.... आम्हाला मोठं केलं, संस्कार केले आणि संवेदनशील "माणूस" बनवलं....!!आजही आम्ही जेव्हा-जेव्हा घरातून बाहेर पडत असू तेव्हा-तेव्हा आई हेच सांगते,

" कोणाला काही म्हणू नको";  "कोणाकडे वाईट नजरेनं पाहू नको" ;  "ईश्वरावर भरोसा ठेव,विठ्ठल सगळं नीट करेन"  पण वाईट मार्ग पकडू नको....!!

हे तिचे नेहमीचे  वाक्ये....!! पण त्यात खुप मोठं जीवनाचं सार आहे, हे आता कळतं. जेव्हा कधी समाजात या संस्कारांचं कौतुक होतं ,तेव्हा कृत्य-कृत्य वाटतं आणि आपसूकच मान लवते ती आईच्या पायाशी....

     सव्वीस जणांच्या कुटूंबात फक्त ताईसाहेब आणि सीमा या दोघीच मुली, बाकी सगळी आम्ही मुलं....

 एकत्र असताना बऱ्याच गोष्टींची वानवा असायची आणि मग आईच्या मनाची तगमग व्हायची... जरी graduate नव्हती माझी माय तरी तिने नाही केला कधी मुलगी आणि मुलगा यात भेदभाव...!! घरातूनच समानतेचे धडे दिले....!!काळ लोटत गेला, दिवस सरले आणि जे हवं ते मिळू लागलं हे सर्व आमच्या आईच्या योगदानाने...!! हे सर्व शक्य झालं ते फक्त आईमुळे आणि तिच्या संस्कारातून एक छान कुटूंब बनलं...!!

     आता घर अगदी आनंदाने गजबजून गेले, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आणि तिने यावर विरजण पाडलं...!! तरीही माझी माय खचली नाही नव्याने आवरायला घेतलं ।... आणि पुन्हा नव्याने उभी राहिली,आम्हां सर्वांना धीर दिला, काहीतरी मार्ग निघेल असं आश्वस्त केलं...!! स्वतःच दुःख दूर लोटलं आणि पुन्हा उभारी दिली...!अशी माझी आई, खूप संकट पार करून आज आम्हाला या वळणावरती आणलं...!!

     आजही घर सोडताना तिच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, खूप बडबड करेन, नको-नको ते बोलेल,पण त्यातूनही तिचं प्रेम आणि काळजी दिसते...!! कामाच्या ताणामुळे  चिडचिड करते पण तरीही ती मायेचा सागर आहे...!!

    आई असतेच मायेचा सागर पण त्याच सागराच्या पोटात असंख्य भूकंप,धरणीकंप चालू असले तरी पृष्ठभागावर त्याचा लवलेशही दिसत नाही याचं मृत्तिमंत व्यक्तिमत्त्व म्हणजे आईसाहेब.....!!

एक छोटं कुटूंब  सूंदर विश्व बनवण्यात सिहांचा वाटा आईसाहेबांचा आहे....त्या आईविषयी माझ्यासारख्या पामराने काय लिहावं 

स्पंदनातून इतकंच मागेन ईश्वरास...

"इतकंच आयुष्य दे बा विठुराया,जे आईच्या आधी संपू नये आणि आई नंतर उरु नये....!!!"


#आई❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, February 14, 2021

साथ...!!


                   नको मज तुझा एक दिवस हात हाती,

पण असावा आयुष्याच्या संध्याकाळी,


समुद्र किनारी बसुनी,

पाहावी कातरवेळ तुझ्या नयनांनी,


थरथरणारा हात तो,

होई शांत तुझ्या स्पर्शानी,


ती कातरवेळ,

ती संध्यावेळ आयुष्याची,

अन् तेव्हा असावी साथ तुझी...!!


#कल्पनेतील_ती

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

जग अन् जगणं...!!!

  नैऋत्य मोसमी वारे चालू होऊन बरेच दिवस झाले होते पण अजून मान्सून म्हणावा तसा चालू झाला नव्हता. हा, पण या वाऱ्यांमुळे हवेतला उकाडा कमी होऊन ...