Saturday, April 17, 2021

प्रवासी..!!!


प्रवासी, या प्रवासाचा,

ना तमा मज ऊन-वाऱ्याची,

पाऊसकाळाची,

आस फक्त पैलतीरावर जाण्याची,


लडखडलेच पाय कधी,

लागून ठेच झालीच जखम कधी,

तरी थांबणं हे रक्तात नाही,


वाटेवरून त्याच चालताना,

उमटतील अनेक पाऊलखुणा,


त्याच सांगतील कहाण्या,

प्रत्येक पावलांच्या, प्रत्येक जखमांच्या,


म्हणून नको मज सहानुभूती,

नको मज आता ही अनुभूती,


फक्त इतकंच साकडं ईश्वरास,

 छोटेखानी हा प्रवास,

 दाखवावी वाट वाटाड्यास,


भागवावी भूक भुकेल्याची,

द्यावं ओंजळीत पाणी तहानलेल्याच्या,


कधी काळ्याकुट्ट अंधारात ,

दाखवावा किरण प्रकाशाचा,

द्यावा चाचपडणाऱ्यास हात मदतीचा,


जे जे चांगलं तेच उरावं,

जे वाईट ते जळून खाक व्हावं,


अनंतात विलीन होताना,

खंत नसावी निरोप घेताना,


असावं स्मित हास्य नवजात बालकासम

करावा महोत्सव कातरवेळीच्या सुर्यासम.....!!!


#प्रवास❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, March 21, 2021

कवितेची गोष्ट...!!

तू वारू भावनांचा,

लगाम त्यास शब्दसुमनांचा,


तू असते अबोल शब्दांची कहाणी

आणते कधी डोळ्यात पाणी,


तू भावनांच्या गर्दीतली पाऊल वाट

देते मज एकांतातही साथ....!!


#कविता

#world_poetry_day❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Thursday, March 11, 2021

रोपटं मैत्रीचं...!!


 मैत्रीच्या वळणावरती,

बहरला असेल गुलमोहर;


सुगंध त्या बकुळाचा,

गेला असेल दुरवर;


कोकिळा ही गात असेल गाणी,

पश्चिम क्षितिजावर सूर्यही थबकला असेल क्षणभर;


इवलसं रोपटं ते मैत्रीचं,

असते सावली उन्हातली,

बनते छत्री पावसातली ...!!


#मैत्री❣

#जिंदगी_का_फ़ंडा🍃




Sunday, February 28, 2021

आईसाहेब:- एक योद्धा...!!!

     आम्ही तीन भावंडं पहिली ताईसाहेब, सीमा आणि मी शेंडेफळ ....आम्हां तिघांमध्ये जे काही चांगलं असेल तर ते  फक्त आमच्या आईसाहेबांमुळेच....!!

     उंच शरीरयष्टी, सावळा चेहरा, त्यावरती अगदी ठळक दिसणारं  आई भवानीसारखं गोलाकार लालबुंद कुंकू झुबकेदार केसांचा बरोबर मधोमध पाडलेला भांग., गळ्यात विठ्ठलाची-तुळशीची माळ अशी लोभस दिसणारी माझी आई.....!!

     आई तशी तापट स्वभावाची , कोणाचं तिळभरही वावगं खपवून न घेणारी, उत्तरास प्रतिउत्तर देणारी, चुकीचं वाटलं तर तोंडावर फटदिशी बोलणारी असं हे व्यक्तिमत्व ...!!

     पण आई जेव्हा तिचा भूतकाळ सांगते तर अंगावर शहारे येतात, काहीतरी काल्पनिक ऐकतोय,असं वाटायचं. पण सगळं सत्य होतं, जरी ते कटू असलंतरी सत्यच होतं जे स्वीकारावं लागणारं...!!

     1972 च्या दुष्काळात सगळेच होरपळून निघाले होते आणि त्यांनतरच्या काळात आमच्या आई-अण्णांचा लग्न झालं...!! तेव्हा सासुरवास हा लेकीच्या पाचवीला पुजलेला होता , असंच म्हणावं लागेल... तश्यातही आईने आम्हां तीनही भावंडांवर संस्काराची जी बीजे रोवली त्यामुळेच आयुष्यात  आम्ही काहीतरी ओळख मिळवू शकलो..!अन् हे सर्व शक्य झालं ते फक्त माझ्या आईमुळेच...!!

     आईने जुन्या काळातील सगळा सासुरवास भोगून, फक्त लेकरांच्या तोंडाकडे बघून सगळं सहन केलं, प्रसंगी यातना भोगल्या, पण हार मानली नाही.... आम्हाला मोठं केलं, संस्कार केले आणि संवेदनशील "माणूस" बनवलं....!!आजही आम्ही जेव्हा-जेव्हा घरातून बाहेर पडत असू तेव्हा-तेव्हा आई हेच सांगते,

" कोणाला काही म्हणू नको";  "कोणाकडे वाईट नजरेनं पाहू नको" ;  "ईश्वरावर भरोसा ठेव,विठ्ठल सगळं नीट करेन"  पण वाईट मार्ग पकडू नको....!!

हे तिचे नेहमीचे  वाक्ये....!! पण त्यात खुप मोठं जीवनाचं सार आहे, हे आता कळतं. जेव्हा कधी समाजात या संस्कारांचं कौतुक होतं ,तेव्हा कृत्य-कृत्य वाटतं आणि आपसूकच मान लवते ती आईच्या पायाशी....

     सव्वीस जणांच्या कुटूंबात फक्त ताईसाहेब आणि सीमा या दोघीच मुली, बाकी सगळी आम्ही मुलं....

 एकत्र असताना बऱ्याच गोष्टींची वानवा असायची आणि मग आईच्या मनाची तगमग व्हायची... जरी graduate नव्हती माझी माय तरी तिने नाही केला कधी मुलगी आणि मुलगा यात भेदभाव...!! घरातूनच समानतेचे धडे दिले....!!काळ लोटत गेला, दिवस सरले आणि जे हवं ते मिळू लागलं हे सर्व आमच्या आईच्या योगदानाने...!! हे सर्व शक्य झालं ते फक्त आईमुळे आणि तिच्या संस्कारातून एक छान कुटूंब बनलं...!!

     आता घर अगदी आनंदाने गजबजून गेले, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं आणि तिने यावर विरजण पाडलं...!! तरीही माझी माय खचली नाही नव्याने आवरायला घेतलं ।... आणि पुन्हा नव्याने उभी राहिली,आम्हां सर्वांना धीर दिला, काहीतरी मार्ग निघेल असं आश्वस्त केलं...!! स्वतःच दुःख दूर लोटलं आणि पुन्हा उभारी दिली...!अशी माझी आई, खूप संकट पार करून आज आम्हाला या वळणावरती आणलं...!!

     आजही घर सोडताना तिच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही, खूप बडबड करेन, नको-नको ते बोलेल,पण त्यातूनही तिचं प्रेम आणि काळजी दिसते...!! कामाच्या ताणामुळे  चिडचिड करते पण तरीही ती मायेचा सागर आहे...!!

    आई असतेच मायेचा सागर पण त्याच सागराच्या पोटात असंख्य भूकंप,धरणीकंप चालू असले तरी पृष्ठभागावर त्याचा लवलेशही दिसत नाही याचं मृत्तिमंत व्यक्तिमत्त्व म्हणजे आईसाहेब.....!!

एक छोटं कुटूंब  सूंदर विश्व बनवण्यात सिहांचा वाटा आईसाहेबांचा आहे....त्या आईविषयी माझ्यासारख्या पामराने काय लिहावं 

स्पंदनातून इतकंच मागेन ईश्वरास...

"इतकंच आयुष्य दे बा विठुराया,जे आईच्या आधी संपू नये आणि आई नंतर उरु नये....!!!"


#आई❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, February 14, 2021

साथ...!!


                   नको मज तुझा एक दिवस हात हाती,

पण असावा आयुष्याच्या संध्याकाळी,


समुद्र किनारी बसुनी,

पाहावी कातरवेळ तुझ्या नयनांनी,


थरथरणारा हात तो,

होई शांत तुझ्या स्पर्शानी,


ती कातरवेळ,

ती संध्यावेळ आयुष्याची,

अन् तेव्हा असावी साथ तुझी...!!


#कल्पनेतील_ती

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Thursday, January 28, 2021

वळून पाहणं...!!!

 

तुझं जाताना ते वळून पाहणं,
खूप काही सांगून गेलं,

अमावस्येचं चांदणं,
धरतीवर अवतरलं,

शेवटचेचं तुझे ते शब्द,
संपूच नये वाटत गेले,

ही वेळ इथंच थांबावी,
घड्याळ्याचे काटे सरुच नये वाटत गेले,

हातातून हात सुटताना ,
खूप झाल्या वेदना,
सर्व वैभवच घेऊन गेली जाताना,
देऊन शब्द कवितांना,

तू गेली पण आता,
दारातला गुलमोहर नाही बहरत पहिल्यासारखा,
दरवळ त्या बकुळाचा,
नाही भुलवत पहिल्यासारखा,

जिथं झाल्या असंख्य गप्पा,
तो बेंच आता वाकुल्या दाखवतो,
एवढं फुललं असताना,
ओसाड माळरानच तिथं भासतो,

सहज जावं फेरीला,
तर अजूनच वावटळ उठत गेला,
प्रत्येक कणात,
प्रत्येक क्षण आठवणीत कोरत गेला,

वाटलं दूर जावं कुठंतरी,
पण कसं  दूर जाऊ,
मी माझ्याच पासुनी,

म्हणून मी भटकत राहिलो,
कल्पनेच्या रंगात नाहून निघालो,

#काल्पनिक_ती❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Monday, January 18, 2021

वाट एकट्याचीच...!!!



 ही वाट एकट्याची,

ना आस कोणाच्या साथीची,

जरी असतील काटे अन् अडथळेही,
तरी आहेत काट्यांबरोबर फुलंही,

भ्रमरासी गुंतून राहिलो,
धडपडल्यानंतर जागा झालो,

किती आले किती गेले,
याचा हिशोब न लागे,

दरम्यान जसं उन्हाने सोबत केली,
तशीच सावलीही कुठेतरी मिळाली,

जरी अभिषेक घातला रक्तबंबाळ पावलांनी ,
तरी दिसेल वाट त्याच पाऊल खुणांनी,

घडलं जे , ते काही अनपेक्षित नव्हतं,
घाव खाल्ल्याशिवाय देवपण येणार नव्हतं,

म्हणूनच ही वाट एकट्याची,
असली जरी खाचखळग्यांची....!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃


 

Tuesday, December 1, 2020

चुकांचे पोवाडे...!!

गायिले चुकांचे पोवाडे,
भरवला भावनांचा बाजार,
तेव्हांच दिसल्या त्या बाजारातल्या झुंडी,
त्या झुंडीतली मुखवट्या पल्याडची माणसं,

क्षणभर थबकलो,क्षणात सावरलो,
हसून मनातल्या मनात खरे चेहरे पाहत बसलो,

खरे चेहरे दिसत होते धक्क्याने मन पिळवटत होते,
तरीही चढवून मुखवटा, हसून मन बाजारात फिरत होते,

गायिले मी अगणित ठेचांची गीतं,
दाखवली भळभळणारी जखम,
काही धावून आले, काही पाहून गेले,
काहींनी हात फिरवले, काही बघत राहिले,
तेव्हाही दिसली मुखवट्या पल्याडची माणसं,

काहींनी जिवंत कहाण्या विकत घेतल्या,
काहींनी त्या कथा चवीने चाखल्या,

मीच माझ्या चुकांचे गीत गायले,
 ते आले, त्यांनी ऐकले, त्यांनी गायले,

यात चूक ना कुणाची झाली,
सर्व कहाणी मुखवट्यात विरली,
मीच माझ्या अपयशाची गीतं गायली,
कल्पना नसताना झुंबड उडाली,

नव्हती माहीत एवढी माणसं धावून येतील,
भावनांचा बाजार भरवतील,
त्या भावना चवीने चाखून विकायला बसतील,
आणि मी तो खेळ स्वतःच्या डोळ्यांनी पाहील,

नाही मांडला सगळ्यांनीच बाजार जरी,
पण ती माणसं खुप कमीच होती,
बघ्यांची आणि विकणाऱ्यांचीच संख्या जास्त होती,

चांगली मात्र एक गोष्ट घडली,
मुखवट्या पल्याडची माणसं दिसली,

मुखवटे तर अगणित होते प्रत्येकाला काही लेबलं होती,
माझी माझी म्हणवणारी माणसं खूपच दूरची होती,
तर दूर दूरच्या देशीची माणसं आपली होती,

क्षणभर हृदयात चर्रर्रर्रर्र झालं,
पण फक्त क्षणात मीही मुखवट्यात गेलो,
पुन्हा चढवला मुखवटा आता न उतरवण्यासाठी,

मुखवटा हेच सत्य भासवं,
हेच आता सत्य समजावं,
सगळेच नव्हते मुखवटे पण बहुतांश त्यांनीच व्यापले होतं,
नाही चढवला मुखवटा तर पुन्हा बाजार हा भरेल तेजीत,

पुन्हा नाही पाहवणार हा बाजार, 
ही मुखवट्या पल्याडची माणसं,

मीच माझ्या अपयशाची गीत गायिली होती,
 तेव्हा आपल्या माणसांत,
आता गाईन मनातल्या मनात काळजाच्या प्रत्येक स्पंदनात ....!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Thursday, November 26, 2020

समुद्रीची 'कातरवेळ'...!!!

सांजवेळी नभी रंग उधळती,
पाखरं मनसोक्त हुल्लड घालती,

वारा समुद्रीचा, पानासंगी शीळ वाजवतो,
मनी विचारांचे तरंग उठवतो,

दूर देशीचा तो थंडगार वारा,
आजही आणतो अंगावरी शहारा,

पश्चिम क्षितिजावर सूर्य विसावतो,
अनामिक हुरहुरीचे वावटळ उठवतो,
लाटांना सोनेरी साज चढतो,

त्या किनाऱ्याला आलिंगन देती,
तेव्हाच हृदयाला कंपने भासती,

उडवून फवारे आठवनींचे,
नाही विसरत चिंब करायचे,

जरी पुसली लाटांनी नावं त्या रेतीवरची,
नाही विसरली आठवण त्या भेटीची,

कौतुक या समुद्राचंच वाटतं,
लाटांचं उन्मळून येणं,
किनाऱ्याचं झेलत राहणं,
आतल्या आत तुटत राहणं, 
नवं त्या समुद्राला नसतं,

असंख्य कहाण्या शांतपणे पोटात घेतो,
अनेक प्रेमाचा-विरहाचा साक्षी बनतो,

तेव्हांच निरोपाचा क्षण येतो,
टांगेवाला टाच मारितो,
टप-टप-टप करत आठवणींच्या गावा जातो,
'तो' किनारा 'ती' लाट मागे सोडीतो,
नव्या किनाऱ्याच्या नव्या लाटेच्या शोधात दौडतो....!!!


#जिंदगी_का_फ़ंडा🍃



'ति'च्या कल्पनेचा 'तो'...!!


जेव्हा कधी एकटी होती,
तेव्हा तेव्हा साथ मात्र त्याची होती,

आलीच आसवं कधी नयनी,
सावरून त्याने जपली तळहातांनी,

तिचा भाव मनीचा,
क्षणात तो जाणायचा,

हरवली नाही कधीच ती विचारांच्या गर्दीत,
नसला बरोबर, तरी तोच होता तिच्या आठवणीत,

एकटी असताना आभासातील भास होता,
तिच्या बडबडीचं हक्कांच व्यासपीठ होता,

रणरणत्या उन्हात सावली होता,
भर पावसात त्याचा हात हाती होता,

तो विश्वासाचं दुसरं नाव होता,
काळजी करण्याचा त्याचाचं प्रण होता,

कधी एकटं तिला वाटलंच नाही,
कारण त्याने कधी साथ सोडलीच नाही,

असाच होता तर,
तिच्या मनीचा राजकुमार,

जरी नसला प्रत्यक्षात,
पण तिच्या मात्र होता स्वप्नात,

#तिच्या_कल्पनेचा_तो
#जिंदगी_का_फ़ंडा🍃






जग अन् जगणं...!!!

  नैऋत्य मोसमी वारे चालू होऊन बरेच दिवस झाले होते पण अजून मान्सून म्हणावा तसा चालू झाला नव्हता. हा, पण या वाऱ्यांमुळे हवेतला उकाडा कमी होऊन ...