Thursday, April 21, 2022

पाऊस, जगणं अन् बरंच काही...!!

      पावसाळा सुरू होऊन जेमतेम पंधरा दिवस झाले होते,पण पावसाच्या पहिल्या सरींमुळे झाडांना पालवी फुटून निसर्गाने अगदी हिरवा शालू पांघराला होता.रानफुलांनी रंगबिरंगी चादर ओढली होती, त्या फुलांभोवती भ्रमरांची भ्रमंती चांगली वाढली होती. 

       अधून-मधून येणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्यांना वाहून आणणारा थंडगार वारा मोहित करून जात होता.पाठी हात बांधून, खिडकीत उभा राहून 'तो' हे सगळं पाहत होता.

         चालता-चालता थंड वाऱ्याची झुळूक शहारे उमटवत होती, तर कधी पानांवर साचलेले पावसाचे थेंब घरंगळत घेऊन अंगावर पडून एक अनामिक भावनेनं प्रफुल्लित करत होते.

        संततधार पडणारा तो पाऊस त्याला ना कसली घाई होती ना कसला आततायीपणा , तो अगदी शांतपणे बरसत होता...

         पण खिडकीत उभा राहून पाऊस पाहणारा 'तो'..... 'तो' मात्र कुठंतरी हरवला होता...त्याच्या मनात काहीतरी घडत होतं की , जे या शांततेच्या विरुद्ध दिशेने वाहत होतं...!भूतकाळाच्या सावल्यांनी अंगणात मात्र सावल्यांचा खेळ सुरू केला होता..

         पाठी हात बांधून खिडकीतून पाऊस पहायचं म्हंटलं तर अगदी दुग्धशर्करा योगच, पण त्यात कुठंतरी कधीतरी काही क्षण उचंबळून येतात, जे की भूतकाळात खेचत राहतात... 

        खिडकीतुन रातराणीच्या झाडाआडून दिसणाऱ्या कातरवेळीच्या सूर्याची जागा आज पावसाच्या थेंबांनी झुकून गेलेल्या रातराणीच्या झाडाने घेतली होती..जणू ते आज झुकून पाऊस राजाला मुजरा करत होतं असं भासत होतं. त्याच रातराणीच्या पानांवरून अलगद घरंगळत येणारे पावसाचे थेंब मोती बरसावेत तसे मातीत मिसळून जात होते. अगदी काही क्षणांचं त्यांचं अस्तित्व पण त्याचा त्याग करायला ते त्या क्षणाचाही विलंब न करता अगदी खुशीत मातीत एकरूप होत होते...  त्यांना कोण्या दुसऱ्या जीवाला संजीवनी देण्याची खुशी होती की...??  पानांवरून घरंगळत जाण्याच्या प्रवासाची कृतज्ञता...?? हे कोड मात्र सुटणारं नव्हतं...

         खिडकीत उभा राहून पाऊस पाहताना मात्र वयानुसार पाऊस सुद्धा बदलत गेला असं वाटून गेलं...लहानपणी आईची नजर चुकवून भावंडांबरोबर अंगणात मारलेल्या उड्या, "ये रे, ये रे पावसा, तुला देतो पैसा" म्हणत केलेला दंगा सर्वांग चिखलाने माखे पर्यंत केलेला नाच हे सर्व काही बदलत गेले....!

        मोठे होत गेलो आणि सगळं बदलत गेले, आज खिडकीत उभा राहून पाऊस  स्वतःमध्ये डोकावून पाहण्यास भाग पाडतो. भूतकाळाचा चित्रपट आपोआप डोकावू पाहतो आणि त्यात  कुठंतरी स्वतःला विसरून गेलोय असं प्रकर्षाने जाणवतं...

         आणि मग छत्री विसरून राहिल्यावर जी तारांबळ उडते अगदी तसंच काहीसं होतं  स्वतःकुठंतरी हरवल्यावर मन चिंब भिजून गेल्याशिवाय राहत नाही.

          कधी कोण्या सांजवेळी पडणारा पाऊस विलोभनीय भासतो तर कधी मनात काहूर माजवतो. पानांवरून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा कधी अभिमान वाटतो, तर कधी त्यांच्याकडे पाहून अनामिक उदासीनता येते.

        पण हे सगळे अगदी मनाचेच तर तरंग.. तेव्हांच अनुभूती येते की, पाऊस कधीच बदलत नाही बदलत जातो ते 'आपण'....!!

         परिस्थितीच्या गोंडस शब्दात आपण कुठंतरी 'स्वतःला' खूप दूर सोडून दिलेलं असतं, त्याच्या मनगटाला धरून त्या दूर सोडलेल्या 'स्वतःला' खेचून आणायची ताकद या पावसाच्या सरींमध्ये असते.....आणि तेव्हांच पालवी फुटून निसर्ग बहरून येतो, रंगीबेरंगी फुलांची आरास लागते..

      आणि वारा त्यांचा सुगंध भ्रमराच्या साथीने दूर देशी घेऊन जातो..... तो सुगंध अनुभवता आला पाहिजे, रोमारोमात साठवता आला पाहिजे.

      जीवनाच्या पश्चिम क्षितिजाकडे जाताना साठवलेली-जपलेली ही फुलं रखरखत्या उन्हात श्रावण सरींचं लेणं घेऊन येतात....!!!


#उन्हातला_पाऊस❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃




Sunday, April 3, 2022

मावळती...!!!


 मावळतीला जाताना,

जेव्हा आयुष्याचं पुस्तक वाचलं जाईल,

तेव्हा छोट्या छोट्या क्षणांची त्यात फुलं दिसावीत,

सुकली जरी असतील,

तरी सुगंधाने त्याच्या करत रहावं मोहित...!


मावळतीला जाताना,

खंत नसावी त्या पाकळ्यांना,

ज्यांनी रातराणीचा

सुगंध पेरला, 

म्हणून निरोप हा घेताना,

करावा महोत्सव कातरवेळीच्या सुर्यासम,

असावं स्मित हास्य नवजात बालकासम...!!


#जगणं❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃


Saturday, April 2, 2022

भ्रमरासी...!!

ती नुकतीच उमलणारी कळी रातराणीची,

तो भिरभिरत राहणारा भ्रमर असे,
ती नकळत अलगद उमलत राहते,
तो सुगंधापरी दरवळत राहतो,
हे उमलणं हे दरवळनं,
अजून कोणास ठाव नाही,
जेव्हा उमलून कळी,
होते फुलांची पाकळी,
तेंव्हाच भ्रमर स्थिरावतो अंगणी,
पहाटेचा वाराही शांत भासतो,
कळीचं फुल होणं, भ्रमराचं स्थिरावणं,
हे भासे दूरदेशीचा स्वप्नातला राजकुमार
कोण्या परीस भेटतो,
जसा फुलावर भ्रमर स्थिरावतो,
तसा त्याला तिचा
तिचा त्याला मिलनाचा भास होतो.....!!

#भ्रमरासी❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, March 20, 2022

कविता सुचते कशी...??


 कविता सुचतात,

शब्दांना शब्द भेटत जातात,

स्पदनं धडधडत राहतात...!!


लिहणाऱ्याच्या व्यथांना

कलाकृतीचा बहर फुलतो,

कविता सुचते कशी...??

हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो...!!


मनाला छेदून गेलेलं,

शब्दांनी व्यक्त होतो,

सुखाबरोबर-दुःखालाही,

'भारी' 'छान' चा साज चढतो...!!


कधी काही घडलेलं, घडावं वाटलेलं,

असं सगळंच त्यात येऊन जातं,

अशी कविता बहरत जाते,

हृदयाचा एक एक छेद 

उलगडत राहते...!!!


मनाला भावलेलं,

अव्यक्त राहिलेलं,

कवितेतून अलगद बाहेर येतं,

अन् हेच लिहिणाऱ्याचं जग बनतं...!!


कवितेत कोण्या चातकाला

पावसाचा विरह भासतो,

तर कोण्या परीला

दूर देशीचा प्रियकर दिसतो...!!


शब्द शब्दांना भेटत राहतो,

अव्यक्त भावनांना

शब्दसुमनांचा आधार मिळतो...!!


वाचक वाचता वाचता

बेधुंद होतो,

ज्याला जसा तो तसा अर्थ लावत राहतो,

पण तरीही

लिहणाऱ्याच्या व्यथा मात्र

तश्याच राहतात,

 शब्द पोहचतात,

पण अव्यक्त भावना व्यक्त होऊनही चिरतरुण राहतात...!!


कविता सुचते कशी...??

हा प्रश्न कायम अनुत्तरित ठेवून

पुन्हा शब्दांना शब्द भेटत रहातात,

व्यथांच्या कथा बनतात....!!!


#व्यथा❣️

#जागतिककवितादिवस

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Monday, March 14, 2022

मावळणाऱ्या दिनकरा...!!


 मावळणाऱ्या दिनकरा,

जाता जाता एक कर,

दिवसभराच्या जखमांवर,

हळुवार दे फुंकर...!!

धावणाऱ्या या गर्दीत,

मज आतला माणूस जपू दे,

काटा जरी कुणाला रुते,

आसवं माझी ओलावू दे...!!

मावळणाऱ्या दिनकरा,

जाता जाता एक कर,

दिवसभराच्या अनुभवांचं,

गाठोडं मज संगती कायम असुदे..!!

उन्हा- सावलीत पावलं,

कायम मातीशी घट्ट वसुदे...!!


मावळणाऱ्या दिनकरा,

जाता जाता एक कर,

निरोपाच्या क्षणांच्या महोत्सवाचं

गमक दे,

मिथ्या जगाचा निरोप मी घेताना

हास्य कायम चेहऱ्यावर वसुदे

मावळणाऱ्या दिनकरा....!!❤️


#कातरवेळ❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃



Monday, March 7, 2022

तो पाऊस ती अवनी...!!

 

ठरलेल्या वेळी 'तो' येतो,

तरीही अधीर होऊन वाट 'ती' पाहते,

काही क्षणांचाच घडतो सहवास,

तरी 'ती' खूप काळ बहरत राहते,

ना थांबण्याचा मोह,

ना थांबवण्याची ईर्षा,

तरीही त्या क्षणभर क्षणांचीच असते प्रतीक्षा...

त्याचं येणं,

बेधुंद बरसनं,

ह्यात तिनं,

अगदी नाहून जाणं,

हेच मनाला भुलवत राहतं,

बकुळीच्या सुगंधासवे....पौर्णिमेच्या चांदण्यासवे...सौम्य... सुंदर...!!


#तो_पाऊस_ती_अवनी❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, January 23, 2022

आम्ही प्रवासी...!!

 

अंधाऱ्या रात्री आम्ही प्रकाश शोधत राहिलो,
कवडश्यांच्या अस्तित्वाला कमी लेखत राहिलो,
काजव्यांनी नव्हता दिसणार मार्ग जरी,
पण तेच तर  प्रकाशाची ज्योत तेवत ठेवणारी,

म्हणून घडणाऱ्या घटनेला कमी लेखायचं नसतं,
जे होणारं असतं ते काहीतरी देणारं असतं,
विजयाला पुढची वाट देईल,
पराजयाला प्रवासाची ओळख होईल,

विजय पराजय हा आपल्या मनीचा खेळ असतो,
जो मनावर एक चाल सरस करतो,
तो विजयाची पताका फडकावतो,

एका विजयाने एका पराजयाने स्वतःला तोलायचं नसतं,
संघर्षाचं, झालेल्या जखमांचं मोल जाणायचं असतं,

प्रवास आहे , उशीर होणं, गाडी लवकर जाणं हे सहाजिकचं,
म्हणून नशिबाला बोल लावून, डोकं आपटनं हे मात्र चुकीचंच,

एक थांबा गेला म्हणून हार होते असं नाही,
अनवाणी पायांच्या प्रवासाला कधी विसरायचं नाही,
मिळालेल्या छोट्या मोठ्या क्षणांनी आयुष्य फुलवायचं असतं,
चालता चालता अविस्मरणीय क्षणांची फुलं वेचायची असतात,
त्यांच फुलांना एकमेकात गुंफूण ती जपायची असतात, आयुष्याच्या संध्याकाळच्या एकांताच्या सोबतीसाठी....!!

#प्रवास❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Thursday, January 13, 2022

निरोप....!!


 सांजवेळी,

निरोपाच्या क्षणी,

का यावं डोळ्यात पाणी..!!


जरी येणार उद्या तू,

तरी का गावी उदास गाणी..!!


रोजच्या निरोपाच्या क्षणी,

क्षितिजावर क्षणभर थबकतो,

चुकलेला दिवसाचा मेळ क्षणात बसवतो..!!


डोंगराआड जाणारा तू,

रोज काहीतरी शिकवण देतो,

सांगत राहतो, निरोपाच्या क्षणीसुद्धा,

महोत्सव हा करायचा असतो..!!


आज काळ्या ढगांनी आच्छादलं,

म्हणून तेज कधी कमी होत नसतं,

औदार्य अन् तेज हे रक्तातंच भिनलेलं असतं..!!


मित्वाच्या जंजाळातुन स्वत्वाचा शोध घ्यायचा असतो,

म्हणूनच सांजवेळी डायरीवर दिवस उतरवताना,

तिरप्या किरणांसह काही क्षणांना निरोप द्यायचा असतो,

जड पावलांनी... जड अंतकरणानी...!!


#कातरवेळ❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

शेवटाकडे जाताना...!!


 वर्षाच्या शेवटाकडे जाताना,

आठवणींचं गाठोडं पाठी टाकून चालत रहायचं..!


स्वप्नांचं क्षितिज तेवढं गाठायचं,

मान्य काही स्वप्न लांबणीवर पडले,

केलेले काही संकल्प धुळीस मिळाले,

पण पुन्हा नव्याने शिकवण घेऊन

चालत रहायचं,

कर्तृत्वाचं क्षितिजपार करायचं..!!


जी मिळाली अनुभवांची शिदोरी,

बांधून ती जपून वापरायची,

यावर्षीची नवी डायरी मात्र,

यशाने-कर्तृत्वाने फुलवायची....!!


#स्वागत_नववर्षाचे

#जिंदगी_का_फ़ंडा

Tuesday, January 4, 2022

जगणं...!!

 

जीवन म्हणजे एक युद्धच,

आव्हानांनी काठोकाठ भरलेला  पेला..!


यात विजयाचे शंख वाजतील,

तसे पराजयाचे पांढरे निशाणही दिसतील,

ऐनवेळी आपल्यांची साथ सुटेल,

 दिलेला हात ऐनवेळी दगा करेल...!!


दरम्यान जखमांचे वार होतील,

 काही वार अबोल होतील..!


कोण्या कर्णाला,

जीवनभर अनुत्तरित रहस्य, मरतेवेळी कळेल,

तर कोण्या परीक्षितिला गर्भातच अभय मिळेल..!


जीवन म्हंटलं की हे सर्व ओघाने आलंच,

कळीचं उमलणं, त्याचं फुल होणं,

तारुण्याच्या काळात बहरून जाणं, सुगधं पेरणं,

जसं वसंतात बहरलं जातं,

अगदी तसंच शिशिरात पानगळ ही व्हावीच लागते,

कठीण असलं तरी फुललेल्याला मातीत मिसळावंच लागतं,

यात ना विजयाचा आनंद असतो,

ना पराजयाचं दुःखं असतं,

फक्त यात मागे उरतात,


त्या या युद्धभूमीवरच्या पाऊलखुणा,

सापडलेल्या वाटेबरोबरच चुकलेल्या वाटेच्याही,

अगदी कोणताही भेदभाव न करता...!!


म्हणुन ना विजय महत्वाचा, असतो ना पराजय,

महत्वाचा असतो तो प्रवास दिगंतराचा....!!!

कारण ही युद्धभूमी हा पाटी पेन्सिलचा डाव नक्किच नसतो,

इथं गिरवलेला प्रत्येक शब्द पाटीवर कोरला जातो,

खोडला तरी डाग मात्र मागे उरतो....!!


#जगणं❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

जग अन् जगणं...!!!

  नैऋत्य मोसमी वारे चालू होऊन बरेच दिवस झाले होते पण अजून मान्सून म्हणावा तसा चालू झाला नव्हता. हा, पण या वाऱ्यांमुळे हवेतला उकाडा कमी होऊन ...