Saturday, December 25, 2021

सखे....!!


पहाटेच्या रातराणीचा तू दरवळ सखे,
भासे मज मी पिंगा घालणाऱ्या भ्रमरासवे..!!

ही शांत रात मज तुजसवे भासे,
न बोलता काही खूप बोलत असे..!!

सखे, चांदणी ती लुकलूकणारी,
भासे जणू नजर तुझी भिडणारी,
होताच मिलाफ क्षणात झुकणारी..!!

जरी झुकलेली नजर भासे,
तरी वाटे चोरपावलांनी मज निरखत असे..!!

सखे, तू जरी स्वर बासरीतले,
तर त्यांना जोडणारा मी मिलाफ असे..!!

सखे , तू जरी सरळ रेषेत चालणारी एक वाट,
तर मी वेडीवाकडी वळणं घेणारा अवघड घाट..!!

सखे, तू जरी सरितेचा शांत प्रवाह,
तर मी बेदरकारपणे कोसळणाऱ्या पाण्याचा दाह..!!

सखे,तू जरी सरळ वाटेवर धावणारी,
समाजाने आखून दिलेली एक रेषा,
तर मी वाट रोखून उभा जणू कडा सह्याद्रीचा ..!!

सखे, तू जरी शांतपणे कोसळणाऱ्या श्रावणसरी,
तर मी धो धो कोसळणारा वळवाचा पाऊस असे..!!

सखे, तू जरी उन्हातल्या वाटेवरचं विसाव्याचं ठाण ,
तर काही क्षणात बाहूत विसावणारा मी प्रवासी असे..!!

सखे, तू जरी दूर नभिचा चंद्र असे,
तर मी वाट पाहणारा चातक असे..!!

मज नाही वाटत तू यावं उतरून भेटीसमाझ्या,
पण जेव्हा व्हायला जमेल चंद्र पौर्णिमेचा,
तेव्हा तेव्हा नको हिरावू अधिकार चातकाचा...!!

#काल्पनिक❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃


Sunday, November 28, 2021

पाऊलवाटा...!!!


प्रवासी या वाटेवरचा,
अनेक चुकांच्या साक्षीला,
'तू' कायम सोबतीला,
मी मात्र साक्षीदार माफीचा..!!

अल्लडपणात धूळ उडवली,
अगदी अस्पष्ट मूर्ती दिसली,
तीच तेव्हा फुलं वाटली,
पण त्या धुळीने अंग माखले,
घडणारं घडून गेले,
तेव्हाही 'तू' कायम सोबतीला,
अन् मी मात्र साक्षीदार माफीचा..!!

हां दुतर्फा फुलं भेटली,
हिरवीगार रानं दिसली,
काही काळ हरकून गेलो,
वेळ काळाचं भान विसरलो,
तेव्हांच सूर्यास्ताची वेळ झाली,
दिसणारी वाट दिसेनाशी झाली,
पुन्हा चाचपडलो,
मोहाच्या आहारी गेलो,
तेव्हाही अंधुक 'तू' झाली,
पण साथ मात्र नाही सुटली,
अन् पुन्हा मी साक्षीदार माफीचा..!!

पुन्हा काजव्यांनी वाट दाखवली,
चढ-उतारांची जाणीव दिली,
दगड-धोंड्यानीं जखम दिली,
तेव्हाही 'तू' सोबतीला,
अन् पुन्हा मी मात्र साक्षीदार माफीचा...!!

सूर्योदयाची चाहूल लागली,
अंधारलेली 'तू' उजळून निघाली,
अनेक वाटा येऊन मिळाल्या,
चाचपडताना कुत्सित हसणाऱ्यांनी,
हात देण्याचा आव आणला,
तरी हात झिडकारनं जमणारं नव्हतं,
कृतज्ञता करत व्यक्त,
दोन पावलं चालत राहिलो फक्त,
अन् तेव्हाही 'तू' सोबतीला,
मी पुन्हा साक्षीदार माफीचा..!!

सूर्योदयानंतर, सूर्यास्त होणार असतो,
आलेल्या वाटा परत,
परतीचा प्रवास करणार असतात,
पण, पण
त्या काळोख भरल्या रात्रीही 'तू' सोबतीला,
मग मीच पाहिले मज मागे वळूनी,
खूप अंतर गाठलं होतं तुझ्या साथीनी..!!

आठवणींच्या पटलावरती,
बाजी मारता आली नव्हती खरी,
पण डावात रंगत मात्र भरली होती..!!

तुझ्याकडे  पाहताना,
डोळे टपकत राहिले,
त्यातंच 'तू' विरून धूसर होत गेली,
अनोळखी मज 'तू' होती,
पण तरीही चालताना,
तुझी साथ मात्र कायम होती,
दरम्यान दिलेल्या साथीची,
अन् हातांची,
मी करतो वंदना दोघांचीही,
अन् कारण मी साक्षीदार माफीचा...!!

सूर्य माथ्यावर असताना,
सोबतीला कोणीच नसताना,
तूच पाहिले मज मलाच भेटताना,
'तू' असतेस अनोळखी जरी,
तरी एकही कारण नाही देत फिरण्यास माघारी,
म्हणूनच खडकाळ या वाटेवरी,
गप्पा मारायला तुझ्याशी जमलं पाहिजे,
सह्याद्रीच्या दगड-धोंडयांत तुला शोधलं पाहिजे,
तुझ्याविना कोणीचं नसतं कायम सोबतीला,
दिगंतरास जातानाही तूच असते साथीला,
त्यामुळंच जमलं पाहिजे तुझ्याशी मैत्री करायला,
जमलं पाहिजे तुझ्यासम बनायला
स्वार्थाविना साथ द्यायला,
चुकलेल्यांची वाट व्हायला...!!

#पाऊलवाटा❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃


Tuesday, October 19, 2021

चंद्र:-वेगळंपण जपणारा..!!

आयुष्याच्या वळणावर एक चंद्र असावा,

एकवेळ आंनदाच्या क्षणी आमावस्या बनून लुप्त होणारा,

पण दुःखाच्या रात्री पौर्णिमेचा चंद्र बनून लख्ख सोबत करणारा,

कितीही दूर असलातरी आपला भासणारा,

मध्यान्ह रात्री खिडकीतून दिसणारा,

आठवणींनीच्या आसवांना सोबत करणारा,

प्रत्येकाच्या आयुष्यात एक चंद्र असावा..!!


दिवसभर कडाक्याच्या उन्हात थिजल्यावर,

रात्री मंद प्रकाशात बाहूत विसावून घेणारा,

कातरवेळी सूर्य क्षितिजापल्याड जाताना,

हातातून रेती निसटावी तसं प्राणप्रिय क्षण निसटताना,

दुसरा हात घट्ट पकडून "मी आहे ना" म्हणणारा,

प्रत्येकाच्या आयुष्यात एक चंद्र असावा...!!


नेहमीच नाही पण कधीतरी आसवं ढाळायला,

हक्काने बोल लावायला एक चंद्र असावा,

काहीच न बोलता खूप सारं हितगुज करणारा,

चांदण्यांच्या गर्दीत आपलासा वाटणारा,

प्रत्येकाच्या आयुष्यात एक चंद्र असावा...!!


ज्याला ना मिळवण्याचा हव्यास,

ना गमावण्याची भीती,

पण पौर्णिमेला प्रेमाची भरती आणणारा,

अन् अमावास्येला विरह भासवणारा,

असा प्रत्येकाच्या आयुष्यात एक चंद्र असावा..!!


चांदण्यांच्या गर्दीत, मनाला भावनारा,

कोजागिरीचा चंद्र वेगळंपण जपणारा...!!

ज्याच्या सौंदर्यात सारं अंगण नटून जावं

दारातल्या पारिजातकाने अवेळीच दरवळावं,

पाहताना त्याच्याकडे तिने हळूच लाजावं...!!

निरभ्र आकाशात त्याने त्याचं  वेगळंपण जपावं,

चांदणं शिंपलेल्या अंगणात तुझ्या साथीला त्याने  असावं ...!!

असा चंद्र प्रत्येकाच्या आयुष्यात असावा,

अढळपणे अविरत साथ देणारा...!!❤️


#कोजागिरी❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃 

Monday, September 27, 2021

कधी कधी...!!

 

कधी कधी 

तुमच्या दोन चांगल्या शब्दांनी काही चांगलं होणार असेल,

तर ते बोलायचे असतात,

कधी कधी,

वाईट बोलल्याने काही चांगलं होणार असेल,

तर वाईट बोलायचं असतं,

कधी कधी

मनात खूप काही असताना,

काहीच नसल्याचा आव आणायचा असतो,

कधी कधी 

काही चांगलं होणार असेल तर,

भळभळणारी आपली जखम लपवायची असते,

कधी कधी

तुमच्या "नाही" ने काही चांगलं होणार असेल,

तर 'हो' असताना ही 'नाही' म्हणायचं असतं,

कधी कधी 

काही चांगलंच होणार असेल 

तर जसे आपण नसतो, तसेच आहोत अस भासवायचं असतं,

कधी कधी 

काही चांगलं होण्यासाठी,

स्वतःला वाईट म्हणूवून घ्यायचं असतं,

आज नाही पण उद्याच्या उज्वलतेसाठी आज स्वतःला जाळायच असतं,

कधी कधी 

काही चांगलं घडणार असेल तर 'स्व' बाजूला ठेवायचा असतो,

कधी कधी 

एकरूप पाण्याच्या प्रवाहाचा आपण दुभाजक बनत असेल,

 तर नकळत स्वतः बाजूला व्हायचं असतं,

कधी कधी 

लडखडणाऱ्या पायांना हात द्यायचा नसतो,

त्यांना त्यांच्याच पायावर उभं राहू द्यायचं असतं,

कधी कधी 

काही चांगलं होणार असेल,

तर प्रवाहाच्या उलट दिशेने चालायचं असतं,

जखमा होणार असल्या तरीही....!!


#जगणं❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃



Thursday, September 23, 2021

एक दुःख हवंच..!!

 


एक दुःखं हवंच,

मखमली पाऊलवाटेवरून चालताना,

रक्ताळलेल्या ठेचांची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

उंच शिखरावर गेल्यावर,

मागे वळून पाहण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

जेव्हा कधी ठेच लागली,

आर्त हाक दिली,

त्या हाकेला साद दिलेल्यांच्या आठवणीसाठी..!!


एक तरी दुःखं हवंच,

जगण्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

आकाशात उंच भरारी घेतल्यावर,

जमिनीवर येण्याची जाणीव देण्यासाठी..!


एक तरी दुःखं  हवंच,

समोरच्याच्या मनाचा ठाव घेण्यासाठी,

दुःखी माणसाच्या दुःखाची खोली कळण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

मखमली गादीवर झोपल्यावर,

जमिनीवरच्या अंथरुणाची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं तर हवंच,

वातानुकूलित गाडीत बसल्यावर,

भर उन्हात चालताना अनवाणी पायांना बसलेल्या चटक्यांची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

पंचतारांकित हॉटेलात जेवताना,

आईने घाईघाईने बांधून दिलेल्या भाकरीची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

सिग्नलला गाडी थांबल्यावर,

पोटासाठी भीक मागणाऱ्यांच्या वेदना कळण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

अलिशान बंगल्यात राहताना,

गावाकडच्या झोपडीत आईच्या कुशीतल्या उबेची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

आपलं छत सुरक्षित असताना,

ज्यांची घरं उध्वस्त झाली ना त्यांच्या हृदयाचा ठाव घेण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

मॉलमध्ये किंमती ड्रेस घेताना,

बापाने शेतात केलेल्या कष्टाची आठवण देण्यासाठी..!!


एक तरी दुःखं हवंच,

यशाची शिखरं चढताना,

प्रवासात अंधारून गेलेल्या पाऊलवाटेवर दिलेल्या साथीची आठवण देण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

कवितेच्या शब्दांसाठी,

त्या शब्दांना धार येण्यासाठी..!!


एक तरी दुःखं हवंच,

एकांतात सोबत करण्यासाठी,

कुरवाळत आसवं ढाळण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

आपल्यापासून आपणच खूप दूर गेल्यावर,

पुन्हा एकदा मागे वळून स्वतः ला शोधण्यासाठी..!


एक तरी दुःखं हवंच,

सुखाची किंमत कळण्यासाठी,

समाधानी जगण्याचा अर्थ कळण्यासाठी..!!


#जिंदगी_का_फ़ंडा🍃

भरून आलेल्या...!!


 

भरून आलेल्या आभाळाकडून,

कोसळणं शिकावं..!


विरहाने तापलेल्या पृथ्वीकडून,

वाट पाहणं शिकावं..!


प्रेम भरल्या सरींकडून,

तहान भागवनं शिकावं..!


दूरवरून आलेल्या वाऱ्याकडून,

पानासंग गीत गाणं शिकावं..!


उगवणाऱ्या सूर्याकडून,

काळोखावर मात देणं शिकावं..!


मावळत्या सूर्याकडून,

निरोपाचा मोल जाणावं..!


मातीत गाडलेल्या बीजाकडून,

नवनिर्मितीचं गमक घ्यावं..!


इवलूश्या कळीकडून,

उमलण्याचं धैर्य शिकावं,

त्याकळीच्या फुलाकडून,

सुगंधाचं देणं शिकावं,

अन् फुलता फुलता एक दिवस,

कोमेजून सहजतेने मातीतही मिसळावं...!!

फक्त इतकं सहजतेने जमावं..!!


#निसर्ग_गुरू❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃


बरं झालं ईठ्ठला..!!


थकलेल्या आजोबाची कहाणी त्यांच्याच शब्दात गुंफण्याचा प्रयत्न.....

बरं झालं ईठ्ठला नजर अंधुक जाहली,

जे जे वाईट ते दिसायची ईपत टळली..!


बरं झालं ईठ्ठला नजर अंधुक जाहली,

डोळ्यादेखत अन्याय पहायची नौबत ना आली..!


बरं झालं ईठ्ठला बहिरा मी जाहलो,

अनिष्ठ ऐकण्यातून सुटका मज जाहली..!


बरं झालं ईठ्ठला बहिरा मी जाहलो,

काळजात घुसणारे शब्दबाण लांबूनच रोखू शकलो..!


बरं झालं ईठ्ठला गुडघे कुरबुरु लागले,

दूर जाऊन माणसांतही एकटा मी ना राहिलो..!


हे सर्व असते असह्य मज जाहले,

म्हणून म्हणतो,

बरं झालं ईठ्ठला गोष्टी इसरायला लागलो,

ओझ त्या जखमांचं उतरू चाललो..!


बरं झालं ईठ्ठला जे केलं ते खूप,

म्हणूनतर दुखःबरोबर चाखू शकलो सुख....!!


#कहाणी_जेष्ठत्वाची❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃


Thursday, September 9, 2021

माणूस एक बंद पुस्तक...!!

माणूस म्हणजे एक बंद पुस्तकंच. त्या पुस्तकाची सुरवात आणि शेवट जरी सारखाच असलातरी, आतमधील पानं मात्र खूप विभिन्न, काही फाटलेली, पण व्रण ठेऊन गेलेली. काही आयुष्याच्या भागदौड मध्ये गळून खूप दूर जाऊन पडलेली तर काही चुरगळुन गेलेली, अगदी जीर्ण झाली तरी प्राणप्रिय जपलेली....!!
काही पानांची कितीही पारायण झाली तरीकाही अनटोल्ड स्टोरी सम नव्यानेच भासनारी....
       प्रत्येक पान प्रत्येकाला समजेलच असं नाही आणि वाचकाने त्याचा अट्टहास ही धरू नये...!!
        काही कथा आणि व्यथा या ज्याच्या त्यालाच भोगायच्या असतात त्यामुळे शहाण्याने खोलात जायचं नसतं....
       कितीतरी जखमांचे हुंदके, उसासे आतल्या आत प्रत्येक पानात दडलेले असतात प्रत्येक शब्दांची एक नवी कहाणी बनून. जसे उसासे-हुंदके तसेच कधीच कोणाला सांगता न येणारे असे असंख्य क्षण...!!
असे काही क्षण ज्यांची पुन्हा कधीच आठवण ही होऊ नये,
तर असे काही क्षण जे कधीच विसमूर्तितही जाऊ नये.
अन् असेेही काही क्षण, क्षणभर डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर हसू आणणारे...!
असे प्रत्येक माणसाचे असंख्य क्षण हृदयाच्या एखाद्या कोपऱ्यात जाऊन पडलेले असतात, बंद दाराआड...!
हे तेच क्षण असतात जे करतात आपल्याबरोबर सोबत प्रत्येक वाटेवर काळोखातल्या असो किंवा प्रकाशातल्या अन् आपल्याबरोबरच जगाचा निरोपसुध्दा घेतात.
        माणसाला जवळचं म्हणून असं कोणी नसतंच मुळी, ज्यांच्याशी तो सगळं-सगळं खरं सांगून टाकेल, काहीतरी कुठंतरी, कधीतरी असुरक्षिततेची पाल कायम पिच्छा पुरवत असते.
बोलताना-ऐकताना कुठंतरी,कधीतरी ही असुरक्षिततेची पाल लुकलूकतेच आणि मग सुरू होतो लपंडावाचा जीवघेणा खेळ.
        कोणाचंतरी काही गुपित आपल्याकडे ठेऊन, आपलं काही गुपित त्याच्याकडे ठेऊन अव्यक्त करार होतो, व्यवहार होतो आणि त्या करारावर नाती कायम हेलकावे घेत राहतात ... अन् मग नात्यांमध्ये फरफट कोणाची तरी होणारंच हे ठरलेले असतं, कधी याची तर कधी त्याची ... कितीही नाही म्हंटलं तरी प्रत्येक नातं स्वार्थापोटीच बनलं जातं अन् राखलं सुध्दा जातं... कदाचित खुपजण या मताशी असहमत असतीलही पण हे मत नाकारले जाईल असं होणार नाही....
         एकांतात मनाला नेहमी प्रश्न सतावत राहतो. हे जे बंद पुस्तक आहे, हे कधी उघडतं का..? ही बंद दारं खरंच कोण ठोठावतं का?
ठोठावलंच तर ही मनाच्या अडगळीची बंद दारं कधी उघडतील का..??
नाही म्हणजे उघडलीच तर ते कोणत्या स्वरूपात उघडतील...??
         हा हा हा इथंसुद्धा असुरक्षितता😬😀 म्हणजे स्वतःच्या विचारांवर सुद्धा हे भूत स्वार असतं. याचपायी माणूस कायम धावत राहतो कधी खऱ्यागोष्टींपासून तर कधी खोट्यापासून...!
अन् यांतच हे बंद पुस्तक अजून कुलूप बंद करण्यासाठी माणूस नवनवे तंत्र अवगत करतो यात कधी घसरतो तर कधी क्षितिज गाठतो...!! अन् पुन्हा त्या बंद पुस्तकाची पान लिहीत राहतो, दिगंतरापर्यंत...!!
         जे पुस्तक तो स्वतःसुद्धा वाचू शकत नाही पण मात्र त्या पुस्तकाची पानं वाढत जातात दिवसोंदिवस...!! पण कधीतरी काही क्षण का होईना पुस्तक उघडण्याचा मोह अनावर होतो आणि मग तेव्हा माणूस, माणूस राहत नाही तो एक विचार बनतो..
जो विचार कायम वाहत राहतो, पाषाणात सापडलेल्या जिंवत पाण्याच्या झऱ्यासारखा..तेव्हा त्याला नसते तमा कशाचीच, नसते पर्वा कडक दुष्काळाची, ना पाषाणाच्या दाहकतेची.
        हे बंद पुस्तकाचं ओझं वागवता वागवता आयुष्याची संध्याकाळ होते.अशी संध्यावेळ जेव्हा सूर्य आयुष्यभराची दाहकता पोटात साठवून अस्तचलास निघालेला असतो..!!
        आयुष्याच्या संध्याकाळी मंद,शांत कोमल किरणांचा आभास देऊन, कसलाही आततायीपणा न करता, कसलीही घाई न करता, जीवनाच्या मिथ्या असणाऱ्या मोह, लोभ, मत्सराच्या डोंगराला मागे सोडून सर्वांच्या दृष्टीआड होत, मंद पावलं टाकत माघारी फिरतो, क्षितिजापल्याड जातो.
         आयुष्याच्या सकाळ धामधुमीत उत्साहात सुरू होऊन, आसमंत प्रकाशमय करून, कर्तृत्वाच्या प्रकाशाने तळपत राहून आजची ही संध्याकाळ झालेली असते.यात एक पुस्तक मिटून जात असतं न उघडताच, ज्या पुस्तकाची पुनरावृत्ती कधीच न होण्यासाठी...!!
हे अमूल्य, अतुलनीय पुस्तक एकाही वाचकाविना अमर होतं, बंद होतं अगदी कायमचं....!!! 

#आयुष्याचं_पुस्तक❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, August 1, 2021

मैत्री..!!

मैत्री असते,
खवळलेल्या प्रवाहाला शांत करणारा नदीकाठ,
मैत्री असते,
उजाड माळरानावरचा गुलमोहराचा थाट,
मैत्री असते,
भावनांच्या गोंधळातून निघणारी एक पाऊलवाट,
मैत्री असते,
दगडधोंड्यांच्या वाटेवरचा आधाराचा हात,
मैत्री असते,
सोबत नसताना साथीला असल्याचा भास,
मैत्री असते,
प्रेमाच्या पल्याडच्या नदीतीरावरच गाव,
मैत्री असते,
रिमझिम पावसाच्या संततधार सरी
आपलेपणाचा ओलावा कायम ठेवणारी,
न भिजताही ओल-चिंब करणारी....!!!

#मैत्री❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃


Tuesday, July 20, 2021

बा विठुराया...!!

 



                       नजर रोखून त्या  दिवे घाटावर,

यंदाही वाट पाहत उभा विटेवर,


नाही दिसला त्यास एकही वारकरी,

राहिले हात तसेच त्याचे कमरेवरी,


नाही आली ऐकू काकडा आरती,

नाही जमले यंदा वारकरी,


अन् तो मात्र तसाच उभा विटेवर,

नजर रोखून दिवे घाटावर,


बस्स झालं रे बा विठुराया,

संपुदे ही काया,


धाव घेण्यास पंढरी,

अवघा महाराष्ट्र तळमळतो...!

दर्शन घेण्यास,

आजही वाट तुझीच पाहतो,


तू गेला होता नारे,

जनीच्या घरी,

तूच वाचवलं ना,

गोऱ्याच लेकरू,


मग साकडं तुज मजकडून,

संपुदे हे संकट,

भेटुदे तुज परत,

बा विठुराया 

माझा वारकरी,

राहिला यंदाही घरी,

तू तसाच विटेवरी,

हात तुझे कमरेवरी...!!


#वारकरी

#एकादशी

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

जग अन् जगणं...!!!

  नैऋत्य मोसमी वारे चालू होऊन बरेच दिवस झाले होते पण अजून मान्सून म्हणावा तसा चालू झाला नव्हता. हा, पण या वाऱ्यांमुळे हवेतला उकाडा कमी होऊन ...