Sunday, November 8, 2020

अण्णा आणि दादा..!!!

       'अण्णा' आणि 'दादा'(आजोबा): जडणघडणीत सर्वात मोठा वाटा असेल तर या दोन अवलीयांचा..!!  वय नवद्दी पार केलेले 'दादा' तर आयुष्याचं अर्ध शतक पूर्ण केलेले माझे 'अण्णा'..

     'दादा' गौरवर्णीय, गळ्यात मोठ्या मण्यांच्या तुळीशीच्या दोन माळा, त्याला टपोरे रुद्राक्ष..!! कपाळी शोभेल असा अष्टगंध, डोईवर पालखुर प्रकारातला लाल फेटा,अंगात तीन बटनांचा नेहरू आणि पायाच्या गोठ्यापर्यंत धोतर अन् पायात चामडी जोडे..! एकंदरीत तुकोबांसारखा पेहराव.पाठीचा कणा ताठच होता, पण आता वय झाल्याने शरीर थकलं होतं त्यामुळे आता थोडे झुकले होते.वयानुसार केस पांढरे झालेत, चेहऱ्यावर सुरकुत्या दिसतात.पण त्या चेहऱ्यावरचं तेज आजही झळकतं.
दादांचा स्वभाव खुप रागीट-कडक, सव्हीस जणांच्या कुटूंबात त्यांच्या शब्दाच्या बाहेर कोणी नसायचं. आवाजातील खणखणीतपणा, राकटपणा, हजरजबाबीपणा म्हणजे आजही तरुण तडफदारच... 


दादांच्या अगदी विरुद्ध स्वभाव माझ्या अण्णांचा...!!  दादांना काही थोडंस खटकलं की आकाश पाताळ एक करणारे तसे 'अण्णा' अगदी शांत स्वभावाचे.... 

     गांधी टोपी, अंगात पांढरा शर्ट आणि पायजमा...!! गळ्यात तुळशीची माळ भाळी चंदनाच्या लेपावर लावलेला अष्टगंध. उंचीच्या मानाने पिळदार शरीरयष्टी एकंदरीत अगदी विलोभनीय व्यक्तिमत्त्व....!!

     'दादा' आणि अण्णांच्या स्वभावातील तफावतीबरोबर जुळवून घ्यायचं म्हणजे मोठी कसरतच... एकाच प्रसंगावर दोन वेगवेगळे मत प्रवाह स्पष्ट दिसायचे-जाणवायचे आणि यामुळे त्या प्रसंगाचे आयाम कळण्यास कायम मदत होऊन, कोणतं योग्य आणि कोणतं अधिक योग्य याची जाण लवकर आली.

     दोघेही अध्यात्माशी जोडलेले एवढंच काही साम्य होतं. त्यामुळे अध्यात्म लवकर अंगवळणी पडलं...दादांचा भल्या पहाटेचा हरिपाठ आजही मंत्रमुग्ध करतो.सकाळची सुरवात प्रसन्न होते.


     मी लहान असताना 'दादा' वेगवेगळ्या गावांना भेटीगाठी घ्यायला जाताना मला कायम सोबती घेऊन जायचे.... त्यात त्यांच्या मित्रमंडळी जोडण्याची कसब, ओळखी वाढवणं.. बोलताना कसं बोलावं, दोन शब्द बोलावे पण अगदी मनाच्या तळघरातून, सांगावं तर चांगला विचार...!! गावातल्या पंचांबरोबर झालेल्या गप्पा त्याकाळी कळत नसायच्या. पण शांत बसून ऐकायचं आणि जमेल तितकं समजून घ्यायचं, जे कळलं नसेल ते प्रवासादरम्यान दादांना प्रश्न विचारून-विचारून भांडावून सोडायचं हा आठवड्यातून एकदाचा दिनक्रम आणि यामुळे चांगल्या माणसांची एक सुंदर साखळी निर्माण करायची, ओळखी वाढवून चांगलं-वाईटाची जाण लवकर आली . अनोळखी माणसांनाही आपुलकीने बोलावे, कधी कोणास वाईट बोलून मन दुःखी करू नये, तोडून बोलू नये या गोष्टी आपोआपच दादांमुळे अंगवळणी पडत गेल्या. नंतर कितीतरी दिवस दादांचा सोबती,  एक मित्र बनून मीच असायचो. काही काळानंतर काही कारणास्तव आमची सोबत सुटली, भेट दुर्मिळ झाली. पण जेव्हा कधी भेटलो तेव्हा पुन्हा त्याच मैत्रीपूर्ण नात्याने भेटायचो.कधी वाट चुकवून दादा परतायचे मग माझा त्रागा व्हयचा, घर डोक्यावर घ्यायचो...!!

तसे माझे 'अण्णा'
      तसे'अण्णा', माझे खूप जवळचे प्राणप्रिय मित्रच. लहान असताना अंगणात उभा राहून शेतात गेलेल्या बापाला हाक मारण्यासाठी या मुखातून पहिले शब्द बाहेर पडेल ते म्हणजे "अण्णा".
     माझी बालपणात अण्णांबरोबर सायकल सवारी असायची त्यांच्या सायकलच्या नळीवर टॉवेलने गुंडाळून माझ्यासाठी 'अण्णा' छान बैठक लावायचे आणि आमची सवारी दिवस-दिवस फिरत असायची. त्यांच्या बरोबरच्या या प्रवासाची सर आताच्या कोणत्याच सवारीला येणार नाही. माझ्यासाठी पतंग बनवणं, मातीचे बैल बनवणं , जोंधळ्याच्या काड्यांपासून बैलगाडी, लिंबाच्या काड्यांपासून बनवलेली अंगठी, अण्णांच्या खांद्यावर बसून आख्खी यात्रा पहिली, आख्खा बाजार खांद्यावर बसून पहिला आणि 'अण्णा' बाजाराची पिशव्या सांभाळत मला सगळ्यात उंच असल्याचा, आकाश ठेंगणे झाल्याचा भास द्यायचे आणि मी टाळ्या वाजवल्यावर त्या रणरणत्या उन्हातही अण्णांचा चेहरा आनंदाने फुलून जायचा.अशी कितीतरी मोठी यादी आहे.
     म्हणजे अण्णांविषयी काय सांगावं शब्दच सुचत नाहीत पण तोडक मोडक बोलणं इष्टच...
     आईच्या सांगण्यानुसार 'अण्णा' त्यांच्या धामधुमीच्या काळात खूप रागीट आणि कडक स्वभावाचे होते.
     पण आता खूप आमूलाग्र बदल झालाय.'अण्णा' म्हणजे शांत तितकाच संयम यांचा अप्रतिम मिलाफ.
     रागात पटकन कोणी काही बोलून गेलंतरी चेहऱ्यावरचा निरागस भाव पाहून रागावणाराच कुचंबून, झालेली चूक आपोआप लक्षात येऊन गप्प बसायचा. 'अण्णा' कधी समजावुन सांगण्यात ऊर्जा वाया लावत नाहीत कृतीतून योग्य ती गोष्ट सांगून देतात.
     कितीही राग आला, एखादी गोष्ट आवडली नसलीतरी पटकन कधी सांगत नाही, म्हणत नाहीत हे चुकीचं आहे, ते पटलं नाही. पण कृतीतून योग्य संदेश द्यायची कसब आकर्षकच...

     मध्यंतरीच्या काळात खूप वाईट प्रसंगांना तोंड द्यावं लागलं. एकाचवेळी खूप जीवघेणे प्रसंग आले.खूप आघाड्यांवर लढाई करावी लागली. आजपर्यंतच्या प्रवासात अण्णांना एवढं निराशावादी किंवा खचलेलं पाहिलं नव्हतं. पहिल्यांदाच चेहऱ्यावर चिंता दिसली होती.पण काळ सरत गेला, गढूळ झालेलं पाणी निवळत गेलं आणि पुन्हा माझे आण्णा पूर्वपदावर येतायत काळ जाईल तसं व्यवस्थित होईल या आशेवर...!!!

                   असे कसे 'अण्णा' तूम्ही,
                   कधीच थांबला नाहीत..!!
        आलाच थकवा तर कधी बोलला नाहीत,
       आमच्यासाठी तुमची स्वप्न स्वप्नंच ठेवलीत,
                 तीच स्वप्न लेकरात पाहिलीत,
                      पोटाला चिमटा काढून,
                    लेकरांची हौस भागवलीत..!!
                      असे कसे 'अण्णा' तूम्ही,
           कधीच थांबला नाहीत..!!  
                             तूम्ही तर अखं आयुष्य वेचलत,                                            
असे माझे 'अण्णा' माझ्यासाठी दिवसाची रात्र केली, दुःख पचवली, कृतीतून संस्कारच बीजं रोवलीत, समाजाचं काही देणं लागतो याच भान दिलं, जमेल तितकं चांगलं वागायचं हे रक्तात भिनवलत.

शतशः प्रणाम....!!तुमच्या अंशाएव्हढी सर येवो!!!

#'अण्णा'_'दादा'❤️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

9 comments:

  1. खूप आवडलं, अण्णा आणि दादांच्या चरणी नतमस्तक🙏

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद दादा
      आभारी आहे तुमचा..!!
      तुमच्या आई बाबांना आमुचा प्रणाम🙏🙏

      Delete
  2. Khupch chan🤗 💐👌👌🙏🙏

    ReplyDelete

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...