Wednesday, June 5, 2024

पाऊस, जगणं अन् बरंच काही....!!

आताश्या कामात दंग असणारं मन पाऊसात भिजून एकरूप होत नाही. खूपच वाटलं तर पाठीशी एका हातावर दुसऱ्या हाताची घट्ट मूठ बांधून किंवा खिडकीत उभं राहून, दुरूनच पाऊस पहिला जातो... अनुभवला जातो. हाताची पाठीशी बांधलेली घट्ट मूठच, सगळं नकळत सांगून जातेय.. यात मनाची घालमेल, मिळवलं-गमवल्याचा हिशोब, दुरावलेल्या गोष्टी, हुलकावणी देऊन गेलेले असंख्य क्षण, चुकलेल्या निर्णयापासून दुखावलेलं मन तर बरोबर निर्णयांमुळे खुश होणारं मन , सलणारे काटे, झालेल्या असंख्य जखमा, कधीच कोणालाच सांगू न शकणारं, आपल्याबरोबरचं, या जगाचा कायमचा निरोप घेणारं जगण्याच्या प्रवासातलं एखादं (एखादं ...??असंख्य) रहस्य असं कित्येक गोष्टी त्या मुठीत घट्ट पकडुन ठेवलेल्या असतात.... कोणासही दिसू नये ती घट्ट पकड म्हणून पाठीशी बांधून ठेवत असू कदाचित....

पण खिडकीतून कोसळणारा हा पाऊस ही पकड सैल करू पाहतो.... कोसळणाऱ्या त्या सरींबरोबर आपल्यालाही वाहत जाण्यास उद्विक्त करू पाहतो... 

वाऱ्यास सोबती घेऊन खिडकीतल्या पारिजातकाच्या झाडाबरोबर लपंडावाचा खेळ मांडून, त्याच्या इवलुश्या नाजूक फुलांचा अंगणात सडा टाकून, मनाला सुगंधाची भुरळ पाडू पाहतो.... 

कोसळणाऱ्या या सरी अन् हा अल्लड, अवखळपणे बिनदिक्कत मुक्त संचार करणारा वारा दूर कुठेतरी आठवणींच्या गावा घेऊन जातो....

कधीकाळी रेखाटलेली, आपलीच कल्पनेतील पावसाळी दिवसांची चित्रफीत डोळ्यांसमोर उभी करतो... कोसळणाऱ्या प्रत्येक सरींचा नवा अध्याय लिहितो.... झाडाच्या पानावरून घरंगळत येणारा हा पावसाचा थेंब काही वेगळाच भासतो....हा-हा म्हणता मातीत एकरूप होतो...

कसं जमवतो हा....??? याच कोड्यात आपलं मन गुंतून जातं.

पडणाऱ्या पावसाच्या सरी आता खोल मनाच्या बंद खोलीत डोकावून पाहतो... कित्येक दिवसांच्या जळमटांनी आच्छादलेेली, सुंदर क्षणांची चकचकीत भरजरी कापडात गुंडाळलेली कुपी लखलखीत करतो.

फुलं तोडण्याच्या झटापटीत झालेल्या जखमांवर हलकेच फुंकर घालून, सलणाऱ्या- रुतणाऱ्या काट्यांना दूर करत पाठीशी बांधलेली मूठ सैल करतो...

तेंव्हाच मनी रंगवलेली,हरवलेल्या क्षणांची, दुरावलेल्या किंवा दूर लोटलेल्या गोष्टींची, पावसाळी दिवसातली, गुलाबी रंगाची  कोपऱ्यात धूळ खात पडलेली कूपी पाहून हलकेच पापणी ओली होते ... 

दूर अनोख्या प्रदेशात घेऊन जाते.... 

कित्येक क्षणांचा हिशोब न ठेवता मनाला, आभाळात पाऊस पडुन गेल्यावर मुक्त संचार करणाऱ्या पक्ष्यासम जमिनीचा विसर पडुन वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते....

तेंव्हाच वाऱ्याबरोबर खिडकीतून येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे जाग येते....ऑफिसातल्या कारकुनाने खोली बंद करण्यासाठी कुलुप हाती घेतल्याचा नाद होतो .... कल्पनेतल्या मनाला वास्तविक मन हाक देतं....

जणू खिडकीतून येणारा हा गार वारा सांगून जातो, कितीही सुंदर असले क्षण तरी कधीतरी सोडून द्यावेच लागतात ...

कल्पनेतलं जग विलोभनीय असतंच पण जगण्याच्या भागदौडी मध्ये ते मागं सुटलं जातं.... कितीही सुंदर असलं तरीही पावसाच्या सरींसम कधीतरी मातीत झोकून द्यावं लागतं विसरून स्वतःला एकरूप व्हावं लागतं..... जसं

दाटून आलेल्या आभाळानं आता कोसळनं पसंद केलं,

तसं मोलाच्या क्षणानांही मातीत मिसळनं 

आता नित्याचाच होऊन गेलं.....


#पाऊस❣️ #जगणं

#जिंदगी_का_फंडा🍃
 

Monday, June 3, 2024

दुनियादारी....

 

स्वार्थाची लक्तरे घेऊन जन्माला आलेली नाती कितीही ठिगळं लावली तरी फटकीच असतात...स्वार्थापोटी लावलेली हीच ठिगळं कधीनाकधी खऱ्या चेहऱ्यानिशी उघडी पडतात...!!


#दुनियादारी❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

Tuesday, May 21, 2024

तिन्हीसांजा.....!!!

 

तिन्हीसांजा होऊन आता
पाखरं परतीचं गीत गाती,
कातर क्षणांची बंधमुक्ताई 
ही कातरवेळ करती...!!

त्या पल्याडच्या वाऱ्यानं
आता 
निरोप कानात सांगितला,
प्रत्येक सुरवातीचा
'शेवट' हा ठरलेला....!!!

उमगेल जेव्हा 
आपून मेहमान इथला हे
तेव्हा निर्ढावलेल्या मनाची
सुंदर परिभाषा होईल....!!

मग गड्या नाही केला
उगवत्यास नमस्कार जरी,
तरी जाणाऱ्याचा 
मी मात्र ऋणी असेल....!!

जमवत फुलांना 
ओंजळीत हळूवार 
सुगंध मात्र जपत राहील...
आलाच वाटता मज
तर दान मात्र देत राहील..!
बदल्यात मिळवा सुगंध
ही अपेक्षा मज नाही
मिळूच नये काटे 
असंही काही 
आस नाही...!!

फुलं वेचताना
रुततातच की काटे 
पण याच फुलांच्या 
काहण्यांमध्ये 
अग्रस्थानी 
असतातच की ते ओरखडे..!

वाटत-वाटत सुगंध गड्या
मोकळा मी जरी होईल
तरी 
कातरवेळी तुझ्या संगतीत
एकांत मात्र फक्त माझा अन् माझाच राहील..!
तेव्हा ही तू असाच भासशील
जाणाऱ्या तुझ्याबरोबर
असंख्य आठवणींच गाठोड रीतं
करशील,
हिशोबाच्या नोंदवहीत मात्र
बाकी शून्यच राहील..!
नाही जरी जाहला प्रवास तुजसम 
तरी निरोप मात्र व्हावा तुजसमच
शांत, सौम्य, तेजोमय.....

#कातरवेळ #जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃

Sunday, May 12, 2024

माझी आई....!!

 जे जे चांगुले या देहात

ती देन तूझीच आई...!!

कष्टाळलेल्या घामाची

होणार नाही कधीच उतराई...!!

जशी शिवबांची जिजाई,

तशीच असते लेकरांची आई....!!

घराच्या घरपणाची,

शोभा असते तू....

अंगणातल्या तुळशीतला

दिवा असते तू....

कोपऱ्यावरच्या 

पारिजातकाचा सुगंध तू....

प्रसंगी नाराळसम 

आतून मधुर पण 

बाहेरून कणखर असते तू.....

प्रत्येकासाठी आई असते तू,

पण तुझ्यासाठी बाई असते तू....

पूर्व क्षितिजावरचं तेजोवलय तू,

वळवाच्या पहिल्या पावसाचं चैतन्य तू,

अंधारलेल्या वाटेवर काजव्याचा प्रकाश तू,

तिन्हीसांजेची कोकिळेचा साद तू,

तू ना शब्दात बांधली जाणारी,

तू ना कवितेत सांधली जाणारी...!!

भव्यदिव्य व्यक्तिमत्वाची

देवाची प्रतिकृती तू...

अगाध, अनंत, अखंड

मातृत्वाचा झरा तू....!!


#आई❣️

#मदर्स_डे_वगैरे🍃❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

Friday, May 10, 2024

पाऊस अन् जगणं....!!

त्याच्या येण्याने 

चिंब भिजली ',

नकळत कवटाळलेल्या 

क्षणांना मुक्त करत

सृजन जाहली 'ती'...

पाहून भिजलेल्या तिज 

'तो' मात्र सुखावला,

कित्येक दिवसांच्या 

वाट पाहण्याला

खरा अर्थ लाभला...

भिजणं, 

भिजून त्यात एकरूप होणं,

किंवा खिडकीतून फक्त

त्याचं कोसळणे पाहणं,

हा क्षण ज्याचा त्याचा

पण प्रत्येक क्षणांचा

पाऊस मात्र नेहमीचाच...

कोणास आठवण,

पहिल्या भेटीची....

कोणास 

भेट मित्रांची,

त्या चहाच्या टपरीवरची....

कोणास 

गूज त्या पावसाबरोबर,

कोणास

अल्लड,अवखळ 

आपलीच जुनी साठवण...

कोणास,

जुने दिवस पावसाळी....

तर कोणास,

हलकेच आसवे 

पापनिवरची.....

कोणास,

पर्वणी कविमनची,

दिसे गर्द झाडीतून 

कोसळणाऱ्या धारा...

त्यास वाटे,

कोण्या परीच्या

गालावरून क्षण

प्रितीचा ओघळणारा.....!!


#पाऊस_जगणं_आठवण❣️

#जिंदगी_का_फंडा🍃



Monday, April 8, 2024

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं, 
अनुभवलेलं लिहिणं,
त्यातून भावलेलं 
आत्मसात करणं,
आत्मसात केलेलं
टिकवून ठेवणं,
टिकवलेलंच जगणं होणं,
त्याच जगण्याचा
हेवा वाटणं,
आपणच आपल्याकडे
कुतूहलाने पाहणं..
प्रत्येक गोष्टीत
चांगलंच दिसणं..
यातच एकंदर
जगणंच सुदंर भासणं..
यात कधी मोडलाच
काटा, लागलीच ठेच, 
आलीच आसवं...
तरी जगणं सुंदर 
आहे हे सांगणं..
 चांगुलपणावर
दृढ विश्वास ठेवणं..
अन् पुढं जाऊन 
आपलाच प्रवास आपण 
मागे वळून पाहणं,
हे परतीला निघालेल्या
सूर्याच्या महोत्सवासारखं
सुखावणारं असतं.....!!

#जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃

Sunday, April 7, 2024

प्रीत...शब्दांची...शब्दांशी...!!


चोरट्या नजरेने

मागोवा तुझा घेतला होता,

कळूनही सर्वकाही

काहीच न कळण्याचा आव

मात्र त्याने आणला होता....


पापण्यांच्या  कोपऱ्यातून

न्याहळताना,

चित्र तुझेच रेखाटत होता...

पाठमोऱ्या तुजकडं पाहताना 

कल्पनांचा बांध मात्र सुटला होता...


माळलेल्या मोगऱ्याचा 

सखे सुगंध अजूनही भिनवतो..

पहाटेच्या स्तब्ध शांततेत

तो गीत मात्र तुझेच गातो...


गीत गात-गात

स्वप्नांच्या गावा जात,

कवेत तुझा भास होतो...

चुंबनांच्या अनेक ललकाऱ्यांनी

अंगावरी शहारे उमटवतो...


तेव्हांच उत्तररात्र मात्र

उतरणीला लागते,

स्वप्नांचा पसारा आवरून

वास्तवतेची आरव देते....


कल्पनांच्या सखे तुज 

 निरोप देऊन

तो मात्र अर्धवट कहाणीतलं 

आणखी एक पान जोडतो...

न कधी वाचलं जाणारं...

न कधी सांगितलं जाणारं ....

अव्यक्त....निःशब्द भावनांना

शब्दात जखडू पाहतो....!!


#लिहिणं #काल्पनिक❣️

#जिंदगी_का_फंडा🍃





Thursday, March 21, 2024

तू सांजवेळची कविता...!!

 

दिवस संपून जातो,

तरी बाकी काहीतरी उरतेच,

उगवत्या बरोबर केलेली

खूणगाठ कुठंतरी सुटतेच....!!

कुठं सुटली म्हणून 

मन मात्र लढत राहतं,

एक मन दुसऱ्या मनाशी

वाद घालत राहतं...!!


अश्यातच दाराशी सांजवेळ 

टेकते,

तिरप्या किरणांनी 

अभिषेक घालते....!!


सांजवेळ झाली की 

त्याला 'तुझी' आठवण येते,

मग 'तु' त्यास सामावून घेते...

अन् बंद कुपितल्या मनाला

हलकेच फुंकर घालते...!!

सांजवेळी तुझी 

उणीव कधी ना भासावी

सांजवेळी कायम सोबती 'तू' असावी...!!


#तू_सांजवेळची_कविता❣️

#जागतिक_कविता_दिवस #world_poetry_day 😍

#जिंदगी_का_फंडा🍃

Sunday, March 17, 2024

जगण्यातलं वाचन.....!!!

 

तुझ्या या साथीत नश्वर हा प्रवास व्हावा,
तुझी साथ न सुटता देह अनंतात सुटावा...

तुझ्या असण्याने जगणं समृध्द व्हावं,
खडकाळ या पाषाणावर
सर्जनशीलतेसहित बीज "माणसाचं" उमलावं....

स्पर्श होताच मातीस, त्या मातीचही सोनं व्हावं
त्यातून उगवणाऱ्या 
प्रत्येक बीजाचा-चांगुल्यांचा मेळा होईल...
नश्वर या जगण्याचा 
अखंडपणाचा प्रवास होईल....!!

#वाचन #निसर्ग #जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃


Tuesday, March 5, 2024

आयुष्यातलं जगणं...!!

 

आयुष्य.....

उडत-उडत घेत गिरक्या,

स्वतःच भोवताली घेतं फिरक्या....


कधी पोहचतं पश्चिम क्षितिजाला,

त्यांचं त्यास भान नसतं...

यात जगणं मात्र उनाड

पक्ष्यासावे वाऱ्यावरती उधळतं....


अन् गिरक्या घेता घेता

एकवार वळून मागं बघतं...

आपल्याच सुंदर क्षणासंग

खुदकन गालात हसतं. ..

हसता-हसता, निरोप घेता घेता

सांगून जातं. ...

कित्येक क्षणांचा साज ल्यालेलं 

तरीही आयुष्य हे कस्पटासम असतं...

बघता बघता 

अंतिमतः मातीत मिसळतं 

जी माती सांगत राहते अनंतकाळ 

आयुष्य हे जरी कस्पटासम

पण त्यातलं जगणं मात्र असावं 

आकाशातल्या अढळ ध्रुवताऱ्यासम

कायम आसमंतात सुगंध पेरणाऱ्या बकुळीच्या फुलासम....


#आयुष्य❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

जग अन् जगणं...!!!

  नैऋत्य मोसमी वारे चालू होऊन बरेच दिवस झाले होते पण अजून मान्सून म्हणावा तसा चालू झाला नव्हता. हा, पण या वाऱ्यांमुळे हवेतला उकाडा कमी होऊन ...