Tuesday, May 21, 2024

तिन्हीसांजा.....!!!

 

तिन्हीसांजा होऊन आता
पाखरं परतीचं गीत गाती,
कातर क्षणांची बंधमुक्ताई 
ही कातरवेळ करती...!!

त्या पल्याडच्या वाऱ्यानं
आता 
निरोप कानात सांगितला,
प्रत्येक सुरवातीचा
'शेवट' हा ठरलेला....!!!

उमगेल जेव्हा 
आपून मेहमान इथला हे
तेव्हा निर्ढावलेल्या मनाची
सुंदर परिभाषा होईल....!!

मग गड्या नाही केला
उगवत्यास नमस्कार जरी,
तरी जाणाऱ्याचा 
मी मात्र ऋणी असेल....!!

जमवत फुलांना 
ओंजळीत हळूवार 
सुगंध मात्र जपत राहील...
आलाच वाटता मज
तर दान मात्र देत राहील..!
बदल्यात मिळवा सुगंध
ही अपेक्षा मज नाही
मिळूच नये काटे 
असंही काही 
आस नाही...!!

फुलं वेचताना
रुततातच की काटे 
पण याच फुलांच्या 
काहण्यांमध्ये 
अग्रस्थानी 
असतातच की ते ओरखडे..!

वाटत-वाटत सुगंध गड्या
मोकळा मी जरी होईल
तरी 
कातरवेळी तुझ्या संगतीत
एकांत मात्र फक्त माझा अन् माझाच राहील..!
तेव्हा ही तू असाच भासशील
जाणाऱ्या तुझ्याबरोबर
असंख्य आठवणींच गाठोड रीतं
करशील,
हिशोबाच्या नोंदवहीत मात्र
बाकी शून्यच राहील..!
नाही जरी जाहला प्रवास तुजसम 
तरी निरोप मात्र व्हावा तुजसमच
शांत, सौम्य, तेजोमय.....

#कातरवेळ #जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃

No comments:

Post a Comment

सर्द भिजलेला....!!!

ऑफिस सुटल्यानंतर धावत जाऊन त्याने बस पकडली. पावसाळा सुरू व्हायला अजुन तसा अवकाश होता पण त्यागोदरच्याच वळवाच्या पावसाने चांगलाच जोर धरला होता...