आताश्या कामात दंग असणारं मन पाऊसात भिजून एकरूप होत नाही. खूपच वाटलं तर पाठीशी एका हातावर दुसऱ्या हाताची घट्ट मूठ बांधून किंवा खिडकीत उभं राहून, दुरूनच पाऊस पहिला जातो... अनुभवला जातो. हाताची पाठीशी बांधलेली घट्ट मूठच, सगळं नकळत सांगून जातेय.. यात मनाची घालमेल, मिळवलं-गमवल्याचा हिशोब, दुरावलेल्या गोष्टी, हुलकावणी देऊन गेलेले असंख्य क्षण, चुकलेल्या निर्णयापासून दुखावलेलं मन तर बरोबर निर्णयांमुळे खुश होणारं मन , सलणारे काटे, झालेल्या असंख्य जखमा, कधीच कोणालाच सांगू न शकणारं, आपल्याबरोबरचं, या जगाचा कायमचा निरोप घेणारं जगण्याच्या प्रवासातलं एखादं (एखादं ...??असंख्य) रहस्य असं कित्येक गोष्टी त्या मुठीत घट्ट पकडुन ठेवलेल्या असतात.... कोणासही दिसू नये ती घट्ट पकड म्हणून पाठीशी बांधून ठेवत असू कदाचित....
पण खिडकीतून कोसळणारा हा पाऊस ही पकड सैल करू पाहतो.... कोसळणाऱ्या त्या सरींबरोबर आपल्यालाही वाहत जाण्यास उद्विक्त करू पाहतो...
वाऱ्यास सोबती घेऊन खिडकीतल्या पारिजातकाच्या झाडाबरोबर लपंडावाचा खेळ मांडून, त्याच्या इवलुश्या नाजूक फुलांचा अंगणात सडा टाकून, मनाला सुगंधाची भुरळ पाडू पाहतो....
कोसळणाऱ्या या सरी अन् हा अल्लड, अवखळपणे बिनदिक्कत मुक्त संचार करणारा वारा दूर कुठेतरी आठवणींच्या गावा घेऊन जातो....
कधीकाळी रेखाटलेली, आपलीच कल्पनेतील पावसाळी दिवसांची चित्रफीत डोळ्यांसमोर उभी करतो... कोसळणाऱ्या प्रत्येक सरींचा नवा अध्याय लिहितो.... झाडाच्या पानावरून घरंगळत येणारा हा पावसाचा थेंब काही वेगळाच भासतो....हा-हा म्हणता मातीत एकरूप होतो...
कसं जमवतो हा....??? याच कोड्यात आपलं मन गुंतून जातं.
पडणाऱ्या पावसाच्या सरी आता खोल मनाच्या बंद खोलीत डोकावून पाहतो... कित्येक दिवसांच्या जळमटांनी आच्छादलेेली, सुंदर क्षणांची चकचकीत भरजरी कापडात गुंडाळलेली कुपी लखलखीत करतो.
फुलं तोडण्याच्या झटापटीत झालेल्या जखमांवर हलकेच फुंकर घालून, सलणाऱ्या- रुतणाऱ्या काट्यांना दूर करत पाठीशी बांधलेली मूठ सैल करतो...
तेंव्हाच मनी रंगवलेली,हरवलेल्या क्षणांची, दुरावलेल्या किंवा दूर लोटलेल्या गोष्टींची, पावसाळी दिवसातली, गुलाबी रंगाची कोपऱ्यात धूळ खात पडलेली कूपी पाहून हलकेच पापणी ओली होते ...
दूर अनोख्या प्रदेशात घेऊन जाते....
कित्येक क्षणांचा हिशोब न ठेवता मनाला, आभाळात पाऊस पडुन गेल्यावर मुक्त संचार करणाऱ्या पक्ष्यासम जमिनीचा विसर पडुन वेगळ्याच दुनियेत घेऊन जाते....
तेंव्हाच वाऱ्याबरोबर खिडकीतून येणाऱ्या पावसाच्या सरींमुळे जाग येते....ऑफिसातल्या कारकुनाने खोली बंद करण्यासाठी कुलुप हाती घेतल्याचा नाद होतो .... कल्पनेतल्या मनाला वास्तविक मन हाक देतं....
जणू खिडकीतून येणारा हा गार वारा सांगून जातो, कितीही सुंदर असले क्षण तरी कधीतरी सोडून द्यावेच लागतात ...
कल्पनेतलं जग विलोभनीय असतंच पण जगण्याच्या भागदौडी मध्ये ते मागं सुटलं जातं.... कितीही सुंदर असलं तरीही पावसाच्या सरींसम कधीतरी मातीत झोकून द्यावं लागतं विसरून स्वतःला एकरूप व्हावं लागतं..... जसं
दाटून आलेल्या आभाळानं आता कोसळनं पसंद केलं,
तसं मोलाच्या क्षणानांही मातीत मिसळनं
आता नित्याचाच होऊन गेलं.....
#पाऊस❣️ #जगणं
#जिंदगी_का_फंडा🍃
No comments:
Post a Comment