Wednesday, July 17, 2024

प्रवाह जगण्याचा....!!

 

जीवनात या उन्ह कडाक्याचं 
हमखास पडावं,
उन्हानंतरच्या सावलीने
मात्र ते स्मरावं...
उन्हानंतर सावली
ही अपेक्षा काही गैर नाही,
पण सावली दिसताही
उन्ह वाट्याला हे काही
पचत नाही....

मातीत गाडून घेणारं 
बिजही पावसाअभावी 
कुजतच की,
पण कधीतरी फुलावं 
हे त्यालाही वाटतंच की...

जीवनात या 
कुजनं-फुलणं नक्की यावं,
संघर्षाच्या हा पावित्र्यात मात्र
मनाने कुठेतरी शांत निजावं...
गर्द काळोखातल्या वाटेवरही
चमकतोच की काजवा एखादा,
तोच तर ठरवतो चालण्याच्या दिशेला...

'तो' काजवा 'ती' फुलं
हवीच असतात सोबतीला,
त्याशिवाय प्रत्येक पाऊल 
वाटेल विरान वाटेवरला...

एका मागून एक पाऊल
पडत राहतं,
जीवनाच्या प्रवाहात 
प्रत्येक पाऊल मात्र गणलं जातं...
दुखःच्या लहरीबरोबर
सुखाचा शिडकावाने
प्रत्येक पाऊल स्मरलं जातं..

कितीही नाही म्हणलं तरी
थंड शिडकावा हवा असतो,
ठेचकाळलेल्या पावलांना
प्रवास असा नाही 
याचा विश्वास तोच देतो...

थकलेल्या पावलांनाही
थकायचा अधिकार नसतो,
उसनं आवसान आणून
पुढचं पाऊल पाहत राहतो...
कदाचित हाच तो प्रवास असतो
अनीच्छित, अनाकलनीय 
आळवाच्या पानावरच्या 
पाण्याच्या थेंबासारखा
कितिकाळ अस्तित्व
याची काहीएक कल्पना नसलेला
तरीही
उद्याची चांगली स्वप्नं पाहणारा 
नश्वर जीव.....!!!

#जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃


No comments:

Post a Comment

जगण्याचा एकांत...!!

आहेच जरा एकटा-एकटा राहणारा, स्वतःच्याच एकांतात दंग होणारा... सूर्य डोंगराआड जाताना, अनामिक हुरहुरीत पाहत हलकेच विचारशून्य होणारा, नव्या विचा...