Wednesday, July 17, 2024

तत्व अन् बरंच काही....!!

 


तत्वनिष्ठता ही भाजीपाल्यासम कुठंही मिळणारी संजीवनी नाही. यासाठी कित्येक त्याग, अनुभव अन् आपण ज्यांना आदर्श मानतो यांच्या वाचनातून, त्या वाचलेल्या आदर्शवत कृतींच्या अनुभूतीतून अन् तपश्चर्येतून येते. पण त्याची व्याप्ती मातीच्या कणापेक्षाही लहान आपणाला उमजली जाते ...या काही अक्षरांची ताकद कळायला अन् अजमवायला कित्येक अनुभूतीतून तरल राहून स्वतःच्या परे जाऊन चुकीला स्वीकारून बरोबर गोष्टींची सक्षम बाजू मांडून्याचं  धारिष्ट खूप कमींकडे असतं... अर्थात, तत्त्वनिष्ठता ही एक ज्वाला आहे, जपली तर अनंतकाळासाठी कालातीत राहणारी अवघा आपला आसमंत रंगवून टाकणारी नाहीतर काही भौतिक अन् नश्वर लालसेपोटी वेशीवर टांगून, त्याचं ज्वालेची भस्मात जळून गेलेली तत्त्व अन् निष्ठा पाहूनही खेद नसणारी मंडळी भाळी ल्यायतात अन् आविर्भावातच जगणं रेटतात. यात उरली सुरली माणसं मात्र जिकिरीने प्रकाशाचा धर्म सांभाळतात, हे इतरांना हेकट, त्रासदायक अन् न पटणारी बनु शकतात यावर कितीही विश्वास न बसण्यासारखे असलं तरी तथ्य आहेच.... एव्हाना कधी कधी आपल्याच तत्वनिष्ठपणाचा, बाणेदारपणाचा कस लागतो. हे सगळं सोडून देऊन वाहत्या गंगेबरोबर, असंख्य माणसांच्या गर्दी बरोबर जाऊन त्या गर्दीचं व्हावं की काय असं होतं, बंडखोर वृत्ती उफाळून येते... पण तेव्हाच वेगळंपण जपण्याचा वसा घेऊन सद्सद्विवेक बुद्धी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करायचं काम करत असते अन् कोलमडणारा रथ पूर्वरत होतो...

यात स्वतःला सांभाळणे अन् त्या काही अक्षरांसाठी जगणं हे ही एक तत्वचं... अश्या स्वभावाच्या माणसांना दुनियादारीत एकरूप होणं महाकाठिण्य असतं...

कारण जे पोटात तेच ओठावर आणण्याचं धारिष्ट ठेवणारी मंडळी हेकट म्हणून नाकारली जातात नाहीतर काही लेबलं लावून दूर फेकली जातात....

समाजात अशी माणसं एकाकी पडतातही पण याच वृत्तीमुळे जो जगण्यातला बाणेदार पणा आयुष्याच्या सोबतीला सावली प्रमाणे जपतात अन् निरोप घेऊन जातानाही काही चांगल्या पाऊल खुणा ठळक अनंत काळासाठी सोडून जातात....

भौतिक लालसेपोटी सांभाळलेल्या तत्वांना तिलांजली काही क्षणात दिली जाऊ शकते पण तीच तत्व अन् निष्ठा स्वीकारायला अन् अंगिकारायला हत्तीच बळ यावं लागतं क्षणोक्षणी आपल्या आदर्शांच स्मरण असावं लागतं

सभोवतालचं वातावरण आपल्याला त्याच्यानुसार बनायला भाग पाडतंही.... अश्यावेळी आपलं स्वतःचं वयल जपताना दमछाक होते, पण तीच दमछाक सकाात्मकतेचा सुंदर डाग देऊन जाते 

गर्दीचं व्हायचं नाही. हे पुन्हा-पुन्हा सांगत राहते.....

जगाला हेकट वाटणारी, बहुतांश वेळा न पटणारी ही वृत्ती त्याग मागत असते बलिदान मागत असते ..... जी माणसं बलिदान देतात ती अनंत काळात जिवंत राहतात.....!!!


#तत्त्व_अन्_निष्ठा #जगणं❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

No comments:

Post a Comment

जगण्याचा एकांत...!!

आहेच जरा एकटा-एकटा राहणारा, स्वतःच्याच एकांतात दंग होणारा... सूर्य डोंगराआड जाताना, अनामिक हुरहुरीत पाहत हलकेच विचारशून्य होणारा, नव्या विचा...