Friday, June 10, 2022

फक्त 'तू'...!!


सह्याद्रीच्या वाटेवरती,

आनंदाची झाडं लावताना,

त्यांची फुलं वेचताना,

आपलं म्हणून माझं बनून 

'तू' हवीस...


सह्याद्रीच्या त्या उंच क्षितिजावर जाताना,

धांदरटपणाच्या लयी उठताना,

ठेच लागली,  जखम झाली,

तोल सांभाळताना

 'तू' हवीस....


नदीकाठी गाणी म्हणताना,

खळखळत्या झऱ्याचा आवाज ऐकताना,

दूर कुठंतरी कोकिळेचा सूर घुमताना,

'तू' हवीस.....


 त्याच तळ्याच्या काठावरती हरीण पाणी पिताना,

राजहंस जल क्रीडा करताना,

दूरवरून येणारा गार वारा शहारे उमटवताना,

त्या शाहऱ्यांचा अतिउच्च बिंदू बनून,

'तू' हवीस...


सूर्य पश्चिमक्षितिजाकडे जाताना,

त्याचं जाणं हुरहूर लावताना,

थरथरणारा हात आवेगाने पकडताना,

'तू' हवीस....


सूर्य गेला म्हणून पौर्णिमेचा चंद्र उगवताना,

सह्याद्री, त्या चांद प्रकाशात अगदी नाहून निघताना,

विचारांच्या गर्तेत श्वास गुदमरताना,

मनसोक्तपणे आपल्या विश्वातून हिंडवुन आणणारी 

'तू' हवीस...


त्या डोक्यावरच्या चंद्र प्रकाशात,

गवताच्या पात्यांवरचे दवबिंदू मोतीसम भासताना,

'तू' हवीस...


तीच गवताची पाती अनामिक वाऱ्याच्या स्पर्शाने शहरताना,

तसा काहीसा तुझा स्पर्श भासताना,

रोमारोमात सर्वांग शहारताना,

 फक्त 'तू' हवीस....!


आयुष्याच्या वाटेवर दगड धोंडे खाचखळग्यांबरोबरच

 आयुष्याच्या उंच उंच शिखरांवर जाऊन आसमंत कवेत घेताना,

तिथूनच कातरवेळीच्या सूर्याचा महोत्सव पाहताना,

निसर्ग नियमाप्रमाणे आयुष्याची संध्याकाळ होताना,

त्या क्षितिजावरचं उंच शिखर गाठून,

 सुरकुत्या पडलेला हात हाती घेताना,

अगदी पहिल्या भेटीच्या स्पर्शाची ऊब,

मायेचा ओलावा भासवणारी,

 'तू' हवीस....!!


तू , तू या बेलाग कणखर सह्याद्रीची ट्रेकर,

तू आयुष्यभराच्या जीवनाच्या चढ उतारांची पार्टनर

तू जगासाठी कल्पनेची सोबती,

पण माझ्यासाठी माझ्या पावलांबरोबर पाऊल टाकणारी साथी.....!!


#ती❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

जपलेला कृष्ण...!!

प्रत्येकाच्या मनाच्या तळघरात,

स्वतःचा असा एक कृष्ण जपला जातो,

कधी सखा बनवून, कधी सोबती होऊन,

तर कधी कधी मनामनात नकळत राहतो,

प्राणप्रिय बनून...!!


जेव्हा कधी एकांतात असताना

मनाची कवाडं उघडून,

मनसोक्त संवादाचा नाद घुमतो,

कुठंच कधीच काही व्यक्त न होणारं

तेव्हा सगळं सगळं व्यक्त होतो....!

यात प्रत्येकवेळी कृष्ण खूप विश्वासार्ह वाटतो...!!


संकटांची वादळं घोंघावत असताना,

आयुष्याची नौका त्यावर हेलकावे घेताना,

त्याच वादळांच्या छेडून तारा,

हेलकाव्यांचं तो गीत गाणारा,

त्याच गीताचे होऊन गाणे तो कालिया मर्दन करणारा,

असा तो आपला कृष्ण कायम ह्रदयी वसणारा...!


नश्वर जीवनाच्या बासरीत

फुंकर घालून,

लयबद्ध सूर उमटवतो...!!

सुख दुःखाच्या लपंडावाचा

खेळ चांगलाच रंगवतो...!

असा प्रत्येक मनीचा कृष्ण

आनंदाच्या क्षणी लोप पावतो,

पण दुःखाच्या रात्री 

नकळत पाठीवर हात ठेवतो...!!

म्हणूनच नकळत मोह मायांचा लगाम आवरत,

जीवनाच्या रथाचं सारथ्य त्याच्याकडे सोपवायचं असतं,

आपला स्वतःचा तो कृष्ण ओळखायचा असतो,

अन् जपायचा असतो 

स्पंदनातल्या प्रत्येक श्वासागणिक ....!!


#माझा_कृष्ण❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Wednesday, June 8, 2022

पहिला पाऊस...!!


कातरवेळी 'तो' बरसतो,
आठवणींच्या प्रदेशात,
ओलंचिंब करतो...!!

रोमारोमात सर्वांगात,
मातीचा सुगंध पसरतो,
अंगणाच्या कोपऱ्यावर
रातराणीचा बहर येतो...!!

सांजवेळी
सूर्य जाताना,
खिडकीतून पाऊस
पाहताना,
कैक आठवणींचा
पट डोळ्यासमोर येतो..!!
अन् पुन्हा नव्याने
'तो' जपला जातो
कुपितल्या संपत आलेल्या अत्तरासम.....!!

#पहिला_पाऊस❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Saturday, May 21, 2022

रे गड्या आता आवरायला घेऊ...!!


चल गड्या, आता पसारा आवरायला घेऊ,

माळ्यावरच्या गोष्टींची थोडी निवड करू,

थोडं तुझं, थोडं माझं समजून घेऊ,

अडगळीवरची धूळ थोडी साफ करू..!!


आपलं, आपलं म्हणून जपून ठेवलं होतं,

जगापासून दूर कुठंतरी दुःखं लपवलं होतं,

पण आता त्या अडगळीलाही ओझं झालंय,

धूळ साचून त्यावरती जरा जडच झालंय..!!


सारताना धुळ ती डोळ्यांत जाईल,

त्यामुळे कदाचित पापणी ओलीही होईल,

पण नाही, आता ती सुद्धा म्हणतेय,

बस्स झालं गडया आता पसारा आवरायला घेऊ...!!


वाण सामानांची निवड मात्र करू,

अजून मोह सुटणार नाही,

टाकून देणं जमणार नाही,

कधीतरी कुठंतरी वाटत राहील,

हे आपलं आहे आपलंच राहील,

पण गड्या हा मोह जरा वाईटच,

जसा तुझा तसा माझा ही...!!


याने लपवलेलं साचत राहील,

ते जपताना-लपवताना धडपड होईल,

याच धडपडीत कदाचित तूच तुला विसरून जाशील,

म्हणून म्हणतो, गड्या आता थोडं आवरायला घेऊ,

मनाला थोडं सावरायला घेऊ...!!


रे गड्या, जगणं हा व्यवहार आहे,

हे पचायला थोडं जड आहे,

पण बेरीज-वजाबाकीच्या गुंत्यात आपण पडायचं नसतं,

जी बाकी उरेल तीला डावलायचं नसते,

म्हणून कधीतरी अडगळीवरच्या गर्दीला वाट करून द्यायची असते....!!


म्हणून म्हणतो, बस्स झालं गड्या आता आवरायला घेऊ,

माझं असं मुळीच काही  नसतं,

जे याक्षणी आपलं असतं, तेचं फक्त आपलं असतं,

पुढच्या क्षणाचं आपल्याला काही माहीत नसतं..!!


जपून ठेवलेलं आजपर्यंत आता बाहेर डोकावू पाहतंय,

पोटमाळ्यावरची धूळ आता डोळ्यांत जाऊ पाहतेय,

तीसुद्धा आता थकलीय,

पांघरून घालून,

तिलाही कळून चुकलंय,

आता पापणी ओली होणार म्हणून...!!


झालीच पापणी ओली तर होउदे,

आलंच डोळ्यात पाणी तर येऊ दे,

पोटमाळ्यावरच्या ओझ्याला मात्र अंगणात येऊ दे,

जे चांगलं ते आपोआप त्याची जागा घेईल,

म्हणून म्हणतो, गड्या आता बस्स

पोटमाळ्यावरच्या गर्दीला आता आवरायला घे,

 मनाला सावरायला घे...!!


पसारा आवरताना,

अडगळीत पडलेल्या आपल्या मनाला सावरताना...

प्रत्येकाला आपलं कोणतरी हवं असतं.. 

मनाच्या विचारांच्या गर्तेत गुंतलेलं असताना,

लांब कुठंतरी मन मोकळं होईस्तोवर हिंडवून आणणारं.

म्हणून चंद्राशी दोस्ती करायची असते ,

दूर त्याच्याशी गप्पा मारायला शिकायचं असतं..

काळाच्या उदरात परतीच्या वाटेवर 

आठवणींचा साकव जोडत जोडत 

सुखाच्या मुक्कामी नेणारा तोच आपला चंद्र जपायचा असतो.!❤️



#पसारा❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, May 1, 2022

जे माझं होतं, ते मजपाशीच राहिलं...!!!


                                     जे माझं होतं,

ते माझ्यापाशीच राहिलं,

जशी मातीत गाडण्याने

बियांची होते  वेली,

त्या वेलींपासून कळ्यांची फुलं झाली,

सुगंध देत-देत पुन्हा मातीत मिसळली...!!


जेव्हा वेली बहरून आली,

तेव्हा भ्रमरानीं चांगलीच गर्दी केली,

पण अंतसमयी मातीत मिसळताना

बहुतांनी पाठ फिरवली....!!


जे माझं होतं ते मज पाशीच राहिलं,

जे जगाचं उसनं होतं ते लोप पावलं,

हा येतील प्रकाशाच्या वाटेवर हात देणारे,

पण नसतील दूरवर कोण अंधाऱ्या वाटेवर साथ देणारे,

पण ही तर जगाची रीतच रे,

तेव्हा अंधाऱ्या वाटेवरच्या तू कवडश्यांचा शोध घे,

नाही भेटला काजवा जरी,

तरी तू कोणाचा काजवा होऊन घे,

पुसटश्या त्या चेहऱ्यावरचं समाधान मात्र बघून घे....!!


जे तुझं असेल ते तुझंजवळंच राहिल,

जे उसनं होतं ते मात्र निरोपच घेईल,

निरोप घेणाऱ्याला कधी आडवायचं नसतं,

येणाऱ्याचं मात्र खुल्या मनाने स्वागत करायचं असतं...!!


हा वाटतं,शपथानीं जरी बांधलं होतं,

'तू' अढळ ध्रुव तारा असं म्हणलं होतं,

पण वादळं येतात,

जशी झाडं कोलमडतात,

तसं मनीचं झाडं ही कोलमडतं,

किती दिस असं पकडुन राहणार,

एक ना एक दिस तेही दूर होणारच...!!


काही क्षण किती ही मुठीत बंद केले,

तरी कोणाच्या ना कोणाच्या नजरेस ते पडनारच,

मुखवट्यांमागचं जग सामोरे येतं राहिल,

यात फक्त माझं होतं तेच मजपाशीच राहिल,

वास्तवतेच्या कमानीतून तेच पार होईल...!!


हा हसणारे हसून जातील, पाहणारे पाहत राहतील,

तू चांगली फुलं वेचत रहा, एकमेकांत गुंफत रहा,

जरी जातील सुकून, होतील दूर,

तेव्हा पकडुन ठेवण्याचा अट्टहास नको करू,

मान्य दुरावणारी गोष्टच हवी असते,

तीच सगळ्यात प्रिय बनते,

पण जे दुरवणारं असतं ते कधीच थांबणारं नसतं....!!


पण अंततः जे माझं होतं ते मजपाशीच राहिलं,

अढळ वाटणारे तारे ही गळून पडले,

गुंफलेली फुले ही सुगंध देत मातीत मिसळले,

आता जे राहतील तीच प्राणप्रिय जपायची,

अजून आनंदाची झाडं लावायची,

त्यांची फुलं अट्टहासाविना वेचायची,

ठेच लागून पडलो तरी पुन्हा उठायचं,

फुलं वेचण्याचं कधी ना थांबवायचं,

जमलं तर गुंफून फुलांना एकमेकांत,

एक सूंदर माळ बनवायची...!!


माळताना त्यांना एकमेकांत,

त्या फुलांचा सुगंध श्वासात साठवायचा असा,

की अंतसमयी सुद्धा आठवावा जसा,

शांत.... सुंदर.... बकुळीच्या फुलांसवे....!!


#माझं_मजपाशी❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Thursday, April 21, 2022

पाऊस, जगणं अन् बरंच काही...!!

      पावसाळा सुरू होऊन जेमतेम पंधरा दिवस झाले होते,पण पावसाच्या पहिल्या सरींमुळे झाडांना पालवी फुटून निसर्गाने अगदी हिरवा शालू पांघराला होता.रानफुलांनी रंगबिरंगी चादर ओढली होती, त्या फुलांभोवती भ्रमरांची भ्रमंती चांगली वाढली होती. 

       अधून-मधून येणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्यांना वाहून आणणारा थंडगार वारा मोहित करून जात होता.पाठी हात बांधून, खिडकीत उभा राहून 'तो' हे सगळं पाहत होता.

         चालता-चालता थंड वाऱ्याची झुळूक शहारे उमटवत होती, तर कधी पानांवर साचलेले पावसाचे थेंब घरंगळत घेऊन अंगावर पडून एक अनामिक भावनेनं प्रफुल्लित करत होते.

        संततधार पडणारा तो पाऊस त्याला ना कसली घाई होती ना कसला आततायीपणा , तो अगदी शांतपणे बरसत होता...

         पण खिडकीत उभा राहून पाऊस पाहणारा 'तो'..... 'तो' मात्र कुठंतरी हरवला होता...त्याच्या मनात काहीतरी घडत होतं की , जे या शांततेच्या विरुद्ध दिशेने वाहत होतं...!भूतकाळाच्या सावल्यांनी अंगणात मात्र सावल्यांचा खेळ सुरू केला होता..

         पाठी हात बांधून खिडकीतून पाऊस पहायचं म्हंटलं तर अगदी दुग्धशर्करा योगच, पण त्यात कुठंतरी कधीतरी काही क्षण उचंबळून येतात, जे की भूतकाळात खेचत राहतात... 

        खिडकीतुन रातराणीच्या झाडाआडून दिसणाऱ्या कातरवेळीच्या सूर्याची जागा आज पावसाच्या थेंबांनी झुकून गेलेल्या रातराणीच्या झाडाने घेतली होती..जणू ते आज झुकून पाऊस राजाला मुजरा करत होतं असं भासत होतं. त्याच रातराणीच्या पानांवरून अलगद घरंगळत येणारे पावसाचे थेंब मोती बरसावेत तसे मातीत मिसळून जात होते. अगदी काही क्षणांचं त्यांचं अस्तित्व पण त्याचा त्याग करायला ते त्या क्षणाचाही विलंब न करता अगदी खुशीत मातीत एकरूप होत होते...  त्यांना कोण्या दुसऱ्या जीवाला संजीवनी देण्याची खुशी होती की...??  पानांवरून घरंगळत जाण्याच्या प्रवासाची कृतज्ञता...?? हे कोड मात्र सुटणारं नव्हतं...

         खिडकीत उभा राहून पाऊस पाहताना मात्र वयानुसार पाऊस सुद्धा बदलत गेला असं वाटून गेलं...लहानपणी आईची नजर चुकवून भावंडांबरोबर अंगणात मारलेल्या उड्या, "ये रे, ये रे पावसा, तुला देतो पैसा" म्हणत केलेला दंगा सर्वांग चिखलाने माखे पर्यंत केलेला नाच हे सर्व काही बदलत गेले....!

        मोठे होत गेलो आणि सगळं बदलत गेले, आज खिडकीत उभा राहून पाऊस  स्वतःमध्ये डोकावून पाहण्यास भाग पाडतो. भूतकाळाचा चित्रपट आपोआप डोकावू पाहतो आणि त्यात  कुठंतरी स्वतःला विसरून गेलोय असं प्रकर्षाने जाणवतं...

         आणि मग छत्री विसरून राहिल्यावर जी तारांबळ उडते अगदी तसंच काहीसं होतं  स्वतःकुठंतरी हरवल्यावर मन चिंब भिजून गेल्याशिवाय राहत नाही.

          कधी कोण्या सांजवेळी पडणारा पाऊस विलोभनीय भासतो तर कधी मनात काहूर माजवतो. पानांवरून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा कधी अभिमान वाटतो, तर कधी त्यांच्याकडे पाहून अनामिक उदासीनता येते.

        पण हे सगळे अगदी मनाचेच तर तरंग.. तेव्हांच अनुभूती येते की, पाऊस कधीच बदलत नाही बदलत जातो ते 'आपण'....!!

         परिस्थितीच्या गोंडस शब्दात आपण कुठंतरी 'स्वतःला' खूप दूर सोडून दिलेलं असतं, त्याच्या मनगटाला धरून त्या दूर सोडलेल्या 'स्वतःला' खेचून आणायची ताकद या पावसाच्या सरींमध्ये असते.....आणि तेव्हांच पालवी फुटून निसर्ग बहरून येतो, रंगीबेरंगी फुलांची आरास लागते..

      आणि वारा त्यांचा सुगंध भ्रमराच्या साथीने दूर देशी घेऊन जातो..... तो सुगंध अनुभवता आला पाहिजे, रोमारोमात साठवता आला पाहिजे.

      जीवनाच्या पश्चिम क्षितिजाकडे जाताना साठवलेली-जपलेली ही फुलं रखरखत्या उन्हात श्रावण सरींचं लेणं घेऊन येतात....!!!


#उन्हातला_पाऊस❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃




Sunday, April 3, 2022

मावळती...!!!


 मावळतीला जाताना,

जेव्हा आयुष्याचं पुस्तक वाचलं जाईल,

तेव्हा छोट्या छोट्या क्षणांची त्यात फुलं दिसावीत,

सुकली जरी असतील,

तरी सुगंधाने त्याच्या करत रहावं मोहित...!


मावळतीला जाताना,

खंत नसावी त्या पाकळ्यांना,

ज्यांनी रातराणीचा

सुगंध पेरला, 

म्हणून निरोप हा घेताना,

करावा महोत्सव कातरवेळीच्या सुर्यासम,

असावं स्मित हास्य नवजात बालकासम...!!


#जगणं❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃


Saturday, April 2, 2022

भ्रमरासी...!!

ती नुकतीच उमलणारी कळी रातराणीची,

तो भिरभिरत राहणारा भ्रमर असे,
ती नकळत अलगद उमलत राहते,
तो सुगंधापरी दरवळत राहतो,
हे उमलणं हे दरवळनं,
अजून कोणास ठाव नाही,
जेव्हा उमलून कळी,
होते फुलांची पाकळी,
तेंव्हाच भ्रमर स्थिरावतो अंगणी,
पहाटेचा वाराही शांत भासतो,
कळीचं फुल होणं, भ्रमराचं स्थिरावणं,
हे भासे दूरदेशीचा स्वप्नातला राजकुमार
कोण्या परीस भेटतो,
जसा फुलावर भ्रमर स्थिरावतो,
तसा त्याला तिचा
तिचा त्याला मिलनाचा भास होतो.....!!

#भ्रमरासी❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, March 20, 2022

कविता सुचते कशी...??


 कविता सुचतात,

शब्दांना शब्द भेटत जातात,

स्पदनं धडधडत राहतात...!!


लिहणाऱ्याच्या व्यथांना

कलाकृतीचा बहर फुलतो,

कविता सुचते कशी...??

हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो...!!


मनाला छेदून गेलेलं,

शब्दांनी व्यक्त होतो,

सुखाबरोबर-दुःखालाही,

'भारी' 'छान' चा साज चढतो...!!


कधी काही घडलेलं, घडावं वाटलेलं,

असं सगळंच त्यात येऊन जातं,

अशी कविता बहरत जाते,

हृदयाचा एक एक छेद 

उलगडत राहते...!!!


मनाला भावलेलं,

अव्यक्त राहिलेलं,

कवितेतून अलगद बाहेर येतं,

अन् हेच लिहिणाऱ्याचं जग बनतं...!!


कवितेत कोण्या चातकाला

पावसाचा विरह भासतो,

तर कोण्या परीला

दूर देशीचा प्रियकर दिसतो...!!


शब्द शब्दांना भेटत राहतो,

अव्यक्त भावनांना

शब्दसुमनांचा आधार मिळतो...!!


वाचक वाचता वाचता

बेधुंद होतो,

ज्याला जसा तो तसा अर्थ लावत राहतो,

पण तरीही

लिहणाऱ्याच्या व्यथा मात्र

तश्याच राहतात,

 शब्द पोहचतात,

पण अव्यक्त भावना व्यक्त होऊनही चिरतरुण राहतात...!!


कविता सुचते कशी...??

हा प्रश्न कायम अनुत्तरित ठेवून

पुन्हा शब्दांना शब्द भेटत रहातात,

व्यथांच्या कथा बनतात....!!!


#व्यथा❣️

#जागतिककवितादिवस

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Monday, March 14, 2022

मावळणाऱ्या दिनकरा...!!


 मावळणाऱ्या दिनकरा,

जाता जाता एक कर,

दिवसभराच्या जखमांवर,

हळुवार दे फुंकर...!!

धावणाऱ्या या गर्दीत,

मज आतला माणूस जपू दे,

काटा जरी कुणाला रुते,

आसवं माझी ओलावू दे...!!

मावळणाऱ्या दिनकरा,

जाता जाता एक कर,

दिवसभराच्या अनुभवांचं,

गाठोडं मज संगती कायम असुदे..!!

उन्हा- सावलीत पावलं,

कायम मातीशी घट्ट वसुदे...!!


मावळणाऱ्या दिनकरा,

जाता जाता एक कर,

निरोपाच्या क्षणांच्या महोत्सवाचं

गमक दे,

मिथ्या जगाचा निरोप मी घेताना

हास्य कायम चेहऱ्यावर वसुदे

मावळणाऱ्या दिनकरा....!!❤️


#कातरवेळ❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃



जग अन् जगणं...!!!

  नैऋत्य मोसमी वारे चालू होऊन बरेच दिवस झाले होते पण अजून मान्सून म्हणावा तसा चालू झाला नव्हता. हा, पण या वाऱ्यांमुळे हवेतला उकाडा कमी होऊन ...