Sunday, September 22, 2024

तिन्हीसांजेच मनपाखरू....!!

 

शोधाया आधाराची कुशी 
तिन्ही सांजेच मनपाखरू
झेप घेई आकाशी...

खेळ रंगवून क्षितिजाशी,
संधान बांधून वादळाशी...
तिन्हीसांजेचं मनपाखरू
स्पर्धा करी हेलकाव्यांशी....

भळभळणाऱ्या जखमांना,
न दिसणाऱ्या घावांना,
ठिगळं लावत आयुष्याला,
मांडतं पट उद्याचा,
हिशोब जुळवत आजचा....

भास्कर, मात्र
 डोंगराआड जाण्याआधी
शोधत राहतो
गर्दीतला तुला, 
तुझ्यातल्या एकांताला...!!

गोंधळातल्या गुंत्यात,
लेबलांच्या जळमटात,
तू शोधत राहतो
एकतंतातल्या तुलाच,....

एव्हाना 
पश्चिमेकडून सांगावा
येतो
मांडलेला पसारा 
आवरायला घेतो...

काय-काय मांडलं होतं,
काय-काय योजलं होतं,
यात काही उमजत नाही,
कालचा तू,आजचा तू
यात आत्ताचा तू हा हरवला
जातो....

या डोंगरापल्याड रुतत जाणाऱ्या 
सुर्यासम 
आपण स्वतःच मागे पडत जातो...
मनपाखरु हरवून जातं, हरखून जातं 
पुन्हा कधी सांजवेळी भेट होईल
 याच्या अपेक्षेत निरोप घेतं...
स्वतःच्या शोधात 
स्वतःभोवतीच घिरट्या घेतं....

#मनपाखरू❣️ #सांजवेळ
#जिंदगी_का_फंडा🍃


No comments:

Post a Comment

शोध...!!

शीण दिसाचा तोलायला  सांज अप्रूप भासे, पुनवेच्या चांदण्याला  ओलावल्या पापण्या हलकेच दिसे... भार हा दिसाचा रात अलगद पेलते, उतरणीला जाताना  गूज...