Sunday, September 14, 2025

जगण्याचं ऋतुचक्र...!!!

 

होता पानगळीचा हंगाम माझा,
चैत्राची पालवी मागून गेलीस..!!
कळीच्या उमलण्याच्या मुहर्तास,
फुलांचा ध्यास घेऊन आलीस...!!
जेव्हा फुलं ही उमलली,
तेव्हा तुच त्यास अल्पायुषी म्हणून गेली...!!

जेव्हा कडाक्याच्या उन्हात,
पाऊस नसण्याची 
जाणीव मात्र दिलीस...
तेव्हा कुडकडणाऱ्या थंडीत मात्र
उन्ह नाही म्हणून 
कायमची सावली हिरावून गेलीस...!!

सखे,
तूज ठाऊक न सर्व...
प्रत्येक हंगामाचा 
काही काळ हा असतो ठरलेला...!!
आज उन्हांचा,
तर उद्या सावलीचा खेळ हा
मांडलेला...!!

तव 
न विसरावा खेळ हा नियतीचा
मांडलेल्या प्रत्येक डावाचा
शेवट हा ठरलेला...!!

कळीच्या उमलण्याचा
जो असतो साक्षीदार,
तोच सुगंधाचा प्रथम हक्कदार ...!!

म्हणूनच म्हणतो... गड्या 
असत्याकडे धावता धावता
अंतिम सत्यच न विसरावं...!!
जगणं हे ज्याचं त्याचं
त्याच्यावर ते सोडावं...!
उगाच हे न व्हावं
जगण्याच्या शर्यतीत
मरणच विसरावं...!!

#जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃


Tuesday, September 9, 2025

आयुष्य हे...!!

 


निवांत एखाद्या कातरवेळी

मन डोकावत असतं पाठीवरच्या गाठोड्यात,

कुपीतल्या बकुळीच्या सुगंधाने मढवलेल्या

मखमली कापडात बांधून ठेवलेल्या क्षणांना...!

दिवसेंदिवस सुगंधित होण्याच्या कलेचं

तेव्हा मात्र अप्रूप वाटतं...

आपलंच गाठोडं, आपलीच कुपी

आपलेच क्षण, आता मात्र कातरवेळेच्या क्षितिजासम भासतात .... सुंदर , शांत पण पुन्हा हाताशी कधीच न येणारे....!!

#आयुष्य_हे

#जिंदगी_का_फंडा🍃

Saturday, May 24, 2025

सर्द भिजलेला....!!!



ऑफिस सुटल्यानंतर धावत जाऊन त्याने बस पकडली. पावसाळा सुरू व्हायला अजुन तसा अवकाश होता पण त्यागोदरच्याच वळवाच्या पावसाने चांगलाच जोर धरला होता. घाई-घाईत सगळं साहित्य बॅगेत त्याने अक्षरशः  कोंबून भरलं होतं, त्यात आवर्जून घेतलेली छत्री मात्र ऑफिसातच विसरून राहिली होती... नेहमीप्रमाणे... ही व्यथा खुप पुढं निघून आल्यावर त्याच्या ध्यानी आली होती. पण आताश्या सुटलेल्या गोष्टींचं काही सोयर सुतक राहिलंच नव्हतं. कित्येक छोट्या मोठ्या क्षणांना आपलंस करण्यात, कितीतरी 'आपल्या' म्हणाव्या अश्या गोष्टी पुढ्यातून निसटल्या होत्या, काही सोडल्याही होत्या. त्यामुळे छत्रीच त्याला काही विशेष असं वाटलं नाही. प्रत्येकवेळी सुटलेल्या गोष्टींचा मतितार्थ मात्र काढून झाला होता 'कदाचित हे असंच असेल जीवन असं कायम वाटत होतं'...!!

कसं असतं ते जगणं...? कोणाला विचारणार ना...? ज्याच्या त्याच्या व्यथा अन् कथा अलगच असतात... 

माणसं वाढली, कनेक्टिव्हिटीही वाढली पण काहीतरी दुरावलं हे मात्र नक्की हे पुन्हा प्रकर्षाने जाणवलं ....!!

धक्के खात, रस्त्याच्या अवस्थेमुळे शेजाऱ्यांचे

कोपरखिळे खात ... त्याच्या घराचा (सॉरी फ्लॅटचा) स्टॉप येऊन जातो. बॅग सावरत, मोबाईल सावरत त्याने उतरून घेतलं. आत्तापर्यंत थांबलेल्या पावसाने पुन्हा एकदा त्यांच स्वागत केलं. सुटलेल्या छत्रीचा मनस्ताप देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. पण त्याला काही फरक पडलाच नाही. सर्द भिजलेल्या कपड्यानिशी तो सोसायटीच्या दारात आला. 

जखमेवर मीठ म्हणा... नाहीतर काळजी म्हणा... वॉचमनने हात करत "साहेब आजही छत्री विसरलेच होय....!" असं म्हणत गालात हसला...!!

छत्रीचं कौतुक त्याला काही नव्हतंचमुळी...कित्येक जगाला न दिसणाऱ्या गोष्टी सुटल्या होत्या.. त्याला ही आठवत नसतील इतकं काही 'आपलं' स्वतःचं म्हणावं असं सुटलं होतं... त्यामुळे तोही आपल्याच भिजलेल्या सर्द झालेल्या स्वतःकडे पाहत कुत्सित हसला...!

तसाच जीना चढत तो खोलीत आला.

बॅग ठेवून, चेंज करून, वाफाळता चहा बनवला अन् गॅलरीत आला.

गॅलरीत बसल्यावर, त्याला आत्तापर्यंत धावतच होतो याची जाणीव होऊन गेली. धावण्यात, धावतो आहोत हेही कळू नये याचं मात्र नवल वाटलं.

गॅलरीतून जाणवणारा बेधुंद पाऊस, त्याबरोबरच थंड वारा आणि खाली रस्त्यावर गर्दीतून वाट काढत पटपट घर जवळ करणारी , जगण्यासाठी धावणारी सगळी माणसं तो पाहत होता.

काहीवेळापूर्वी याच गर्दीचा एक भाग असणारा तो आता मात्र शांत एकांत अनुभवत होता, आपल्या गॅलरीतल्या आवडत्या जागी बसून....!!

ऐन तारुण्यातल्या रंगीबेरंगी रंगवलेल्या आयुष्याचा इतका ब्लॅक अँड व्हाईट कॅनव्हास असेल असं कधी कल्पनेत ही न वाटलेला तो.... गॅलरीतल्या वाफाळत्या चहाचा तो निवांतपणा कृतार्थ होऊन अनुभवत होता... 

गावाकडच्या आठवणी, कॉलेजातल्या आठवणी, ती दंगा मस्ती, तो अल्लडपणा... वाट्टेल तेव्हा सायकल काढून, नंतर थोडे मोठे झाल्यावर बाईक काढून मारलेली सैर ही किती अनोखं होतं ना...!!

 असं स्वतःशीच बडबडत होता...

जीवन जगायचंय म्हणता-म्हणता खूपच दूरवर आलो की काय असंही वाटून गेलं. हाही कित्येक दिवसांनी मिळालेला क्षण उद्यासाठी अप्रूपच वाटेल काय की ...?? याचीही शंका वाटून गेली. 

हातातला चहा संपत आला होता, पण कॉलेजच्या कोपऱ्यावरच्या टपरीवरचा चहा मात्र अजूनही ताजातवाना वाफाळताच होता, आठवणींच्या रूपात...!!!

चहा प्यायला म्हणून गेलेली जमात तासंतास रमलेली असायची, कोण चहामध्ये, कोण सिगारच्या धुरामध्ये, तर कोण कोणाच्या धुंदीमध्ये...तर कोण गप्पांच्या लहरीमध्ये... किती अनोखं होतं ना हे सगळं, अगदी सुंदर स्टोरीच्या चित्रपटांसमचं...

आताही दिसते की ती टपरी दुरून, तोच चहावाला, तीच गरम चहाची किटली, तोच चहाचा सुगंध...

पण फक्त चहापिणारे बदलले, त्यांच्या कहाण्यांमधील पात्र बदलले, कहाण्या या सर्वांच्या सारख्याच हो , काही अर्धवट, मळकट कळकट झालेल्या... 

.... दुरूनच टपरीकडे बघत 'तो' शोधत होता... 

हरवलेल्या 'त्याला,, सुटलेल्या 'ति'ला अन् स्वतःमधल्या अल्लड बालकाला...!! आजही धावता धावता.... पावलं अडखळतातच...पापण्या ओलवतातच, वळवाच्या पावसासम अवकाळपणे....!! 


#जगणं ❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

Thursday, May 15, 2025

वळवातली तिन्हीसांज....!!!


 तिन्हीसांजेचं एकाकीपण डोईवर घेऊन आतमध्ये डोकावू पाहणारं मन हल्ली खूप कमीवेळा भेटावयास येतं. पण जेव्हा भेटतं तेव्हा कित्येक दिवसांची उतराई मात्र करत असतं.

अशीच एक तिन्हीसांज कित्येक दिवसांनी भेटत होती त्यात कसलीही घाई नव्हती. कुठं जायचं नव्हतं ना कुठं थांबायचं बंधन होतं.

तो, त्याची एक बंद खोली अन् खिडकीतून डोकावणारी तिरपी सोनेरी किरणं...

त्याच्याच तंद्रीत तो तिन्हीसांजेस पाठीमागे हात बांधून एकांत अनुभवत होता. पाठी बांधलेल्या हाताच्या बोटांची कसलीशी चुळबूळ मात्र चालू होती. कुठलीशी न सुटणारी आकडेमोड करत बोट चाळत होता कुठला हिशोब होता त्यालाच माहित. बाहेर पावसाळी वातावरण भरून येत होतं, पाहता पाहता तिन्हीसांज ढगांनी आच्छादून जात होती. पण त्याला याचं काही घेणं देणं नव्हतं. त्याला यापासून दूर कोणतरी  घेऊन जात होतं. आयुष्यातले कुठलेतरी,  बोटांनाही ठाऊक नसलेले कित्येक हिशोब तो चाळत होता. यात

काही पैशांचे, काही उधारीचे, काही मानाचे, काही अपमानाचे, काही प्रेमाचे, काही विरहाचे, काही हुकलेल्या संधीचे, काही हिरावलेल्या घासाचे, काही चुकलेल्या वाटांचे, काही चुकवलेल्या वाटांचे,

काही मिळालेल्या ठेचांचे, रक्ताळलेल्या पावलांचे,

काही आठवणीतल्या क्षणांचे, तर काही क्षण कधीच न सांगता येणाऱ्या आठवणींचे...

असे कित्येक बोटांवर हिशोब न मांडता येणारे, कधीच न उलगडता येणारे कोडी बोटांनी चाळत होता . यात तिन्हीसांज सरून गेल्याचं भान ही त्यास उरले नव्हते. तो मात्र आपल्याच दरवाजा बंद केलेल्या खोलीत येरझाऱ्या मारत होता. अगदी स्तब्ध होऊन....

खोलीत काही जिवंत होतं तर ती फक्त भिंतीवर लटकवलेल्या घड्याळाच्या काट्यांची टिक टिक......

त्याने दरवाजा जरी बंद केला असला तरी मात्र खिडकी  बाहेरच्या जगाची चाहूल देत होती... हीचतर कदाचित खासियत असते खिडकीची...

आपल्याला वाटेल तेव्हाच जगाची चाहूल घेण्याची खुबी जपून ठेवलीय तिने.... हेवा वाटला सजीव वाटणाऱ्या निर्जीव खिडकीचा....

घड्याळाच्या टिक  टिक शिवाय काहीच ऐकू न येणाऱ्या खोलीत...  आता मात्र त्यास खिडकीत आणून उभं केलं होतं....नियतीच ती....वाऱ्याने पानांबरोबर घातलेला संग, कोकिळेने गायलेलं विरहाचं गाणं हे अनुभवता येत होतं...

संगतीला तिन्हीसांजेची वेळ झाली होती नुकत्याच पावसाळी दिवसांची, नैऋत्य मोसमी वाऱ्यांची लगबग चालू होती. काळया ढगांसवे अगदी कोंदटून आलं होतं. पाऊसही कसल्या न सुटणाऱ्या कोड्यासारखा श्वास रोखून घालमेल करत होता. याचा हिशोब मनात दाटून आलेल्या भावनांचा होता तर खिडकीबाहेर त्याचा हिशोब वाऱ्याबरोबर मांडलेल्या ढगांच्या लपंडवांचा होता.

आजची ही सांजवेळ काही तरी खुणावत होती मनातली घालमेल खिडकीपाशी उभा होती...

दरवेळी एकट्याची वाटणारी लढाई आज मात्र कोणतरी सोबती आहे याची ग्वाही देत होती... कित्येक वर्षांनी तो हे सगळं अनुभवत होता... .. त्याचमुळे कदाचित बोटांची चाळण अन् घालमेल आता हळूहळू मंदावली होती...

घड्याळाच्या टिक टिक विना घेतलेला दीर्घ श्वास अन् थंडावा घेऊन येणारा मोसमी गार वारा यांची जाणीव आताश्या होऊ लागली होती.

कोंदटून आलेलं आभाळ आता काहीस शांत झालं कदाचित न सुटणाऱ्या कोड्याचं उत्तर  त्यास दूर क्षितिजावर गवसल होतं.

याच तंद्रीत तो अजूनही खिडकीतच उभा होता. तिन्हीसांजेच्या धूसर  प्रकाशात वाऱ्याची झुळूक आली येताना त्याने मात्र थंड पावसाची सर घेऊन आली.

हा हा, म्हणता-म्हणता पहिल्या पावसाच्या पहिल्या सरी पुढ्यात पडल्या. वाऱ्याच्या थंड शिडकाव्याने  आलेला क्षीणवटा नाहीसा केला.

कोंदटलेलं मन अन् आभाळ बरसू नकळत लागलं....दरवाजाच्या नकळत खिडकीस मात्र ते जाणवलं.

ओसरीच्या सरी कधी दारातून घरात येत नाहीत पण खिडकी मात्र त्यांना अडसर  ठरत नाही. मग खिडकीतून दिसणारा लालबुंद गुलमोहर नव्या क्षणाचा आनंद दिल्याशिवाय राहत नाही. त्याच्यावर पडणाऱ्या तिन्हीसांजेच्या सोनेरी किरणांना अजूनच साद देत राहतो. तेच तेजोवलय, टोचणारी जळमटं दूर करून पहिल्या पावसाच्या सरींबरोबर कित्येक आठवणीना उजाळा देऊन नव्या क्षितिजाला भेटावयास पुन्हा सज्ज करत असते.

प्रत्येक वर्षीचा पाऊस पुन्हा नव्याने वेगळा भासतो,

पुन्हा नव्या गुलमोहरासारखं जगणं फुलवत राहतो कितीही न सुटणारी कोडी आली तरी आयुष्याचा गुलमोहर सजवणे सोडायचं नसतं... जगणं हे असंच असतं

मिळालेलं गमावलेलं प्रत्येक सांज विचारत राहते अन् पावसासारखं सगळं वाहून नेते पुन्हा नितळ होण्यासाठी पुन्हा गुलमोहोर फुलवण्यासाठी..... म्हणून एकांतातली सांजवेळ अनुभवता यावी ...!!

#जगणं ❣️

#जिंदगी_का_फंडा 🍃


Wednesday, February 12, 2025

शोध...!!

शीण दिसाचा तोलायला 

सांज अप्रूप भासे,

पुनवेच्या चांदण्याला 

ओलावल्या पापण्या

हलकेच दिसे...


भार हा दिसाचा

रात अलगद पेलते,

उतरणीला जाताना 

गूज कानात सांगते,

पुन्हा उद्याच्या

दिसाला नवा चेहरा देते...


चेहरा  नवा  लेऊन,

पुन्हा कालचाच दिस सुरू

खोडलेल्या शब्दांत

संजीवनी पेरते

पुन्हा सांज सरून,

रात उगवते

स्वतःमधल्या स्वतःला शोधत राहते...!!


#जगणं❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

 

Sunday, October 27, 2024

जगण्याचा एकांत...!!


आहेच जरा एकटा-एकटा राहणारा,

स्वतःच्याच एकांतात दंग होणारा...


सूर्य डोंगराआड जाताना,

अनामिक हुरहुरीत पाहत

हलकेच विचारशून्य होणारा,

नव्या विचारांच्या उगमाचं 

गमक कुतूहलाने पाहणारा,

सूर्य गेल्याचा सांगावा घेवून येणाऱ्या

वाऱ्यासवे शहारे अनुभवणारा....


आहेच जरा,

चैत्राच्या पालवीने मोहरल्या

झाडाला पाहताना,

साथ सोडणाऱ्या पिकल्या

पानात जगण्याचं तत्व शोधणारा...

मातीत मिसळून मातीचं 

होताना एकवार कृतज्ञतेने 

पोशिंद्यास हसमुख निरोप देणारा....


आहेच जरा,

पावसात आपलंपण पाहणारा,

गर्द झाडांच्या पानांवर 

काळोखी सांज होताना,

पावसाच्या सरींनी उठलेल्या

सुरांत मंत्रमुग्ध होणारा...


पानांवरून घरंगळत येणाऱ्या

पावसाच्या थेंबाचं अस्तित्व 

जगण्याबरोबर बांधणारा...


बंद कळीचं फुल होताना,

बहरलेल्या फुलाचं कौतुक होताना,

तो पाहत, उभा कोपऱ्यात,

कोमेजलेल्या फुलांचं 

मातीत मिसळताना....

मिसळतानाही सुगंध पेरताना...

तो उभाच आत्म्यासवे,

उगवत्यापेक्षा मावळतीकडे 

पाहत राहणारा...

अखंड,अविरत, कालातीत...


#जगणं❣️

#जिंदगी_का_फंडा🍃


Sunday, October 6, 2024

सांकव जगण्याचा....!!



माणसं माणसांच्या
मनापर्यंत तर पोहचतात,
पण मनाच्या बंद खोलीची
कवाडं मात्र बंदच राहतात....

माणसं भासतातही जवळची,
काही असतातही जीवाची,
पण काही युध्दाची रणांगणेच 
मायावी असतात...
सर्वांना दिसत तर नाहीतच
पण भासतही नाहीत....

माणसं माणसांपर्यंत 
पोहचतच नाहीत,
असं माणसंच माणसांना 
म्हणत राहतात...
जगण्याच्या सरीतेवर 
गरजेचा सांकव जोडत राहतात...
या सांकवाचं आयुष्य 
ठरतं सरीतेच्या प्रवाहावर,
प्रवाहाच्या वेगावर,
लाटांच्या तीव्रतेवर,
अन् तीव्रतेच्या प्रतिकारावर.....

यात काही साकव प्रवाहाच्या 
शेवटापर्यंत टिकतात,
काही ओंडक्यासवे सागरास मिळतात...

दरम्यान माणसं ओळखीचे तर खूप दिसतात,
पल्याडच्या पैलतीरावरून बळेच हसतात,
आपण हसणं पाहायचं,
ओंडकी गोळा करत-करत 
पैलतीराकडे निघायचं....

दरम्यान सुर्य तिरप्या किरणांनी
डोकावूं पाहिल,
त्याला अर्ध्य वाहून घ्यायचं,
पुन्हा कधी भेटेल न भेटेल
हे त्यासच ठावूक म्हणून
आपण आपलं ओझं 
त्याच्यावर सोपवायचं....

सरितेच्या काठावरची 
फुलांची मायावी आरास पाहायची,
सोनेरी किरणांनी लकाकणारी
दवबिंदू डोळ्यात साठवायची,
अन् दवबिंदूसम असणारं 
हे मायावी आयुष्य
त्याच्याच चरणाशी विलीन करून
निरोपाचा अर्ध्य वाहून घ्यायचं,
सांकव पूर्ण होईल न होईल,
हे आता न पहायचं ....!!

#सांकव #जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃

Saturday, September 28, 2024

जगणं हे...!!

 

जगणं म्हणजे तरी काय...??

लागलेली ठेच,

झालेलं दुःख, 

व्हिवळणाऱ्या वेदना,

बोचणारे शल्य,

अपूर्ण स्वप्ने,

तुटलेलं मन,

पण तरीही,

उद्यासाठी

फाटलेल्या जुन्याच स्वप्नांना

नव्याने ठिगळं लावणं,

अन् तीच नवी मानणं.....


जगणं म्हणजे तरी काय...??

कालचीच वही,

कालचीच लेखणी,

काही अक्षरं खोडलेली,

काही नव्याने लिहीलेली,

यात लिहीलेली समाधानी जरी भासती,

पण खोडलेली मात्र लक्ष वेधती....


जगणं म्हणजे तरी काय....??

ओंजळीत जपलेली,

पारिजातकाची फुलंच..

काही सुकलेली, 

काही चुरगळलेली,

काही मात्र,

तिन्हीसांज होईस्तोवर 

रेती निसटावी तशी

ओंजळीतून निसटलेली....


जगण्याच्या याच हिशोबात 

बाकी मोजकीच उरते,

उरलेल्या फुलांपेक्षा 

निसटलेला फुलांत 

मन मात्र गुंतून राहते..


#जगणं #आयुष्य❣️

#जिंदगी_का_फंडा🍃


Sunday, September 22, 2024

जगणं शब्दाचं, शब्दांपर्यंतचं.....

वाटेत माझिया 

सह्याद्रीची

आडवाट नक्कीच यावी,

त्याचबरोबर कणखरता 

मात्र रक्तात भिनावी....


चालताना पायात माझिया

स्वार्थाची लक्तरे जरी गुंतली

तर तेव्हा निस्वार्थीपणाची 

फुलं मात्र पेरायास जमावी..!!


जेव्हा बोचऱ्या शब्दांची

लाखोळी वाहिली जाईल,

तेव्हा शब्दांनी माझिया

सुमने उधळण्याची न टाळावी...


थकलेल्या मनाला

क्षिनलेल्या डोळ्यांना,

शब्दांनी माझिया 

नवचैतन्याचं दान मिळावं...

नैराश्येच्या वाटेवर

आशेची फुलं दिसावी

तीच चांगुल्याची फुलं

वेचली जावी,

वेचलेल्या या सुगंधाची 

मांदियाळी नक्की व्हावी,


भरलेल्या सुगंधाच्या बाजारात

ही फुलं मात्र मुक्ततेने उधळावी ...

ही फुलं वेचताना 

जखमाही देतील,

त्याच जखमांच्या कहाण्या 

वाटेच्या शेवटाला

चवीने सांगितल्या जातील....


वाटेवरचा सुर्य आता

अस्ताचलास निघेल,

निरोपाची घटका 

समीप आणेल...


वाट आता अंधारून जाईल,

थरथरणाऱ्या हाताला,

चाचपडणाऱ्या हाताला,

आधाराची काठी व्हावी...


शब्दांनीच शब्दांची

जखम भरावी,

सांत्वनाच्या शब्दांनी 

आयुष्याची सांगता व्हावी...

शब्दांची सुमने उधळताना 

तिन्हीसांजेची

काळसर छटा मात्र न दिसावी...!!


#जगणं ❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

 

तिन्हीसांजेच मनपाखरू....!!

 

शोधाया आधाराची कुशी 
तिन्ही सांजेच मनपाखरू
झेप घेई आकाशी...

खेळ रंगवून क्षितिजाशी,
संधान बांधून वादळाशी...
तिन्हीसांजेचं मनपाखरू
स्पर्धा करी हेलकाव्यांशी....

भळभळणाऱ्या जखमांना,
न दिसणाऱ्या घावांना,
ठिगळं लावत आयुष्याला,
मांडतं पट उद्याचा,
हिशोब जुळवत आजचा....

भास्कर, मात्र
 डोंगराआड जाण्याआधी
शोधत राहतो
गर्दीतला तुला, 
तुझ्यातल्या एकांताला...!!

गोंधळातल्या गुंत्यात,
लेबलांच्या जळमटात,
तू शोधत राहतो
एकतंतातल्या तुलाच,....

एव्हाना 
पश्चिमेकडून सांगावा
येतो
मांडलेला पसारा 
आवरायला घेतो...

काय-काय मांडलं होतं,
काय-काय योजलं होतं,
यात काही उमजत नाही,
कालचा तू,आजचा तू
यात आत्ताचा तू हा हरवला
जातो....

या डोंगरापल्याड रुतत जाणाऱ्या 
सुर्यासम 
आपण स्वतःच मागे पडत जातो...
मनपाखरु हरवून जातं, हरखून जातं 
पुन्हा कधी सांजवेळी भेट होईल
 याच्या अपेक्षेत निरोप घेतं...
स्वतःच्या शोधात 
स्वतःभोवतीच घिरट्या घेतं....

#मनपाखरू❣️ #सांजवेळ
#जिंदगी_का_फंडा🍃


जगण्याचं ऋतुचक्र...!!!

  होता पानगळीचा हंगाम माझा, चैत्राची पालवी मागून गेलीस..!! कळीच्या उमलण्याच्या मुहर्तास, फुलांचा ध्यास घेऊन आलीस...!! जेव्हा फुलं ही उमलली, ...