Monday, April 8, 2024

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं, 
अनुभवलेलं लिहिणं,
त्यातून भावलेलं 
आत्मसात करणं,
आत्मसात केलेलं
टिकवून ठेवणं,
टिकवलेलंच जगणं होणं,
त्याच जगण्याचा
हेवा वाटणं,
आपणच आपल्याकडे
कुतूहलाने पाहणं..
प्रत्येक गोष्टीत
चांगलंच दिसणं..
यातच एकंदर
जगणंच सुदंर भासणं..
यात कधी मोडलाच
काटा, लागलीच ठेच, 
आलीच आसवं...
तरी जगणं सुंदर 
आहे हे सांगणं..
 चांगुलपणावर
दृढ विश्वास ठेवणं..
अन् पुढं जाऊन 
आपलाच प्रवास आपण 
मागे वळून पाहणं,
हे परतीला निघालेल्या
सूर्याच्या महोत्सवासारखं
सुखावणारं असतं.....!!

#जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃

Sunday, April 7, 2024

प्रीत...शब्दांची...शब्दांशी...!!


चोरट्या नजरेने

मागोवा तुझा घेतला होता,

कळूनही सर्वकाही

काहीच न कळण्याचा आव

मात्र त्याने आणला होता....


पापण्यांच्या  कोपऱ्यातून

न्याहळताना,

चित्र तुझेच रेखाटत होता...

पाठमोऱ्या तुजकडं पाहताना 

कल्पनांचा बांध मात्र सुटला होता...


माळलेल्या मोगऱ्याचा 

सखे सुगंध अजूनही भिनवतो..

पहाटेच्या स्तब्ध शांततेत

तो गीत मात्र तुझेच गातो...


गीत गात-गात

स्वप्नांच्या गावा जात,

कवेत तुझा भास होतो...

चुंबनांच्या अनेक ललकाऱ्यांनी

अंगावरी शहारे उमटवतो...


तेव्हांच उत्तररात्र मात्र

उतरणीला लागते,

स्वप्नांचा पसारा आवरून

वास्तवतेची आरव देते....


कल्पनांच्या सखे तुज 

 निरोप देऊन

तो मात्र अर्धवट कहाणीतलं 

आणखी एक पान जोडतो...

न कधी वाचलं जाणारं...

न कधी सांगितलं जाणारं ....

अव्यक्त....निःशब्द भावनांना

शब्दात जखडू पाहतो....!!


#लिहिणं #काल्पनिक❣️

#जिंदगी_का_फंडा🍃





Thursday, March 21, 2024

तू सांजवेळची कविता...!!

 

दिवस संपून जातो,

तरी बाकी काहीतरी उरतेच,

उगवत्या बरोबर केलेली

खूणगाठ कुठंतरी सुटतेच....!!

कुठं सुटली म्हणून 

मन मात्र लढत राहतं,

एक मन दुसऱ्या मनाशी

वाद घालत राहतं...!!


अश्यातच दाराशी सांजवेळ 

टेकते,

तिरप्या किरणांनी 

अभिषेक घालते....!!


सांजवेळ झाली की 

त्याला 'तुझी' आठवण येते,

मग 'तु' त्यास सामावून घेते...

अन् बंद कुपितल्या मनाला

हलकेच फुंकर घालते...!!

सांजवेळी तुझी 

उणीव कधी ना भासावी

सांजवेळी कायम सोबती 'तू' असावी...!!


#तू_सांजवेळची_कविता❣️

#जागतिक_कविता_दिवस #world_poetry_day 😍

#जिंदगी_का_फंडा🍃

Sunday, March 17, 2024

जगण्यातलं वाचन.....!!!

 

तुझ्या या साथीत नश्वर हा प्रवास व्हावा,
तुझी साथ न सुटता देह अनंतात सुटावा...

तुझ्या असण्याने जगणं समृध्द व्हावं,
खडकाळ या पाषाणावर
सर्जनशीलतेसहित बीज "माणसाचं" उमलावं....

स्पर्श होताच मातीस, त्या मातीचही सोनं व्हावं
त्यातून उगवणाऱ्या 
प्रत्येक बीजाचा-चांगुल्यांचा मेळा होईल...
नश्वर या जगण्याचा 
अखंडपणाचा प्रवास होईल....!!

#वाचन #निसर्ग #जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃


Tuesday, March 5, 2024

आयुष्यातलं जगणं...!!

 

आयुष्य.....

उडत-उडत घेत गिरक्या,

स्वतःच भोवताली घेतं फिरक्या....


कधी पोहचतं पश्चिम क्षितिजाला,

त्यांचं त्यास भान नसतं...

यात जगणं मात्र उनाड

पक्ष्यासावे वाऱ्यावरती उधळतं....


अन् गिरक्या घेता घेता

एकवार वळून मागं बघतं...

आपल्याच सुंदर क्षणासंग

खुदकन गालात हसतं. ..

हसता-हसता, निरोप घेता घेता

सांगून जातं. ...

कित्येक क्षणांचा साज ल्यालेलं 

तरीही आयुष्य हे कस्पटासम असतं...

बघता बघता 

अंतिमतः मातीत मिसळतं 

जी माती सांगत राहते अनंतकाळ 

आयुष्य हे जरी कस्पटासम

पण त्यातलं जगणं मात्र असावं 

आकाशातल्या अढळ ध्रुवताऱ्यासम

कायम आसमंतात सुगंध पेरणाऱ्या बकुळीच्या फुलासम....


#आयुष्य❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

Sunday, February 18, 2024

आयुष्य क्षणांच...!!

 

क्षणा क्षणाने आयुष्य

सरत जाईल..

आजचा हा क्षण

उद्यासाठी भूतकाळात 

जमा होईल...


मिळालेल्या जखमांवर

बळच फुंकर घातली जाईल..

मिळालेल्या त्या पुंजीलाच

यश समजत राहील...

पण तेव्हाच  गमावलेलं

क्षण मात्र एकांतात 

प्रश्न विचारत राहतील..


होऊन गेलेल्या त्या प्रवासात

वेडं मन हरवू पाहिल..

एकेका क्षणात जखडू पाहिल..

अन् पुन्हा त्या अनवट वाटांवर

एकट्या मनाची वाट आढवील..

आठवणीत रमवत राहील

कळत नकळत नजरेनच

अर्ध्य देवू पाहिल...


म्हणूनच रे गड्या, जगावं असं

आजचा क्षण

उद्याच्या भूतकाळातला

सुंदर क्षण गणला जावा...


थरथरणारी क्षीण पावलं

परतीच्या दिशेने पडताना

त्या क्षणांनी गालिचा अंथरावा..

अन् सूर्य अस्तास जातानाही

त्या क्षणांचा महोत्सव व्हावा....!!


अगदी प्रवास संपतानासुद्धा......!!!


#प्रवास #जगणं♥️

#जिंदगी_का_फंडा🍃

Saturday, January 27, 2024

प्रिये...!!

 

माळलेल्या मोगऱ्याचा गंध अजूनही 
नसात भिनतो आहे...
गालावर रुळलेली, वेढण घातलेली,
 बट  आठवताच तो अजूनही भुलतो आहे...!!
भुलनं, भिणनं यास जग आकर्षण म्हणत 
लेबलं लावील..
'तो' मात्र आयुष्याच्या संध्याकाळीही
चिरतरुण यौनातली "तुज" आठवत राहील...!!

#जगणं #प्रेम #आदर #काल्पनिक❣️
#जिंदगी_का_फंडा🍃


Tuesday, December 26, 2023

सांजवेळ....!!

भाजलेल्या मनाला,

उमळणाऱ्या काट्यांना,

सांजवेळ फुंकर घालते,

अव्यक्त शब्दांना....!!


उन्हानंतर सावलीला,

अनामिक हुरहुरीला,

सांजवेळ कुशीत घेते,

ना दिसता कुणा ...!!


कधी आई बनून,

कधी बनून बहीण,

डोळ्यातून टपकणाऱ्या

मोत्यांना लपवते झेलून,

अन् सांजवेळच दाखवते,

बनून मैत्रीण...!!


दिसाबरोबर हसताना,

मुखवट्या मागच्या

दुखऱ्या क्षणांना,

सांजवेळ सांगते,

हळूच तिरप्या किरणांना....!!


अशी 'तू',

असा 'मी',

आजन्मीच ऋणी,

कायमच 'मी'....!!!


#सांजवेळ❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

Thursday, September 28, 2023

जगणं.... ज्याचं.. त्याचं

 


चहू बाजूंनी आभाळ भरून आल्यावर 

आज तो भरभरून कोसळला,

दाटून आलेल्या मनाला 

हलकेच चिंब करून गेला...!!


संथ कोसळताना त्याने 

एकांताची जाणीव दिली,

तूच तुझा साथी म्हणत 

पाठीवर आश्वासक थाप दिली,

अन् पडताच मातीत मिसळताना

त्याने जगाची रीत सांगितली...!!


वाऱ्यासंग गडगडाट करत,

लढल्याचा शंखात नाद भरत,

कदाचित सांगून गेला कानात,

घेऊन उसनं अवसान  लेका,

उतरायचं नसतं जगाच्या युद्धात...!!


आता आणून लेका बळ मनगटात,

असतो सुकाणू  तोलायचा,

करून जीवनाची मशागत आता

काळ हा रण गाजवायचा..!!


पहा त्या तिथल्या क्षितिजाले,

रान फुललेलं बघण्यास लेका

आई बाचे डोळे आतूरलेले...!!


असेल जरी सूर्य पश्चिमेकडे झुकलेला

पण तरीही कष्टाचा दाह मात्र दुसऱ्या प्रहराचा,

अट्टाहास तयांचा फक्त पूर्ण स्वप्न तुझी पाहण्याचा...

.!!


#जगणं❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

Friday, September 22, 2023

अन् पाऊस...!!


 तिन्हीसांजेच्या वेळी,

'तो' आज बेधुंद बरसला...!


कोणा चाहूल न देता,

तीच्यासवे एकरूप जाहला..!


गरंगळत पानांवरून असा 'तो' आला,

जसा कोणा परीच्या गालांवरून,

कोण्या प्रियकराने अचूक त्याला टिपला..!


जसा शातंतेत 'तो' आला,

तसा शांततेच जाईल...!

पुन्हा अनीच्छित काळासाठी,

विरहाने व्याकुळ होऊन वाट 'ती' पाहिल..!


काही क्षणांच्याच त्याच्या भेटीत,

कुशीत तिच्या फुलं उपजतील..!!

वाऱ्यासवे दुडदुडत राहून,

आसमंतात सुगंध पेरतील..!


याच साठी विरहाच्या काळातही ,

दोहांतला साकव मात्र अतूट राहील...!

अन् अखंडपणे सुगंध पेरीत राहील बकुळासवे

शांत... अन् सौम्य.....!!


#पाऊस❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...