Sunday, July 21, 2024

आयुष्य हे...!!

 

शब्दही मुके जाहले,

जरी भावनांना पेव फुटले...


चालणाऱ्या पायांनीही 

प्रश्न करणं आता सोडलं,

उगवणाऱ्या दिसाबरोबर 

चालणंच हे जीवन मानलं...


मावळणाऱ्याचं तर आता 

भेटच नको जाहली,

असंख्य हिशोबांची डायरी

आता कोनाड्यात पडली... 


उगवला-मावळला की

आयुष्याची गणती होते,

धावणाऱ्यास मात्र 

याची कल्पना न होते...


धाव-धाव धावत

दमछाक कधी होते,

पण घाम पुसून 

पुन्हा धावण्यात 

स्पर्धा अपुरी पडते...


कधीतरी केव्हातरी

पेला हा भरतोच 

ओसंडून वाहण्यास

काहीच अवकाश होतो...


तेव्हा किती धावलो

याचा हिशोब काही 

लागत नाही,

कितीही धावलो तरी

जगण्याची

कस्तुरी काही सापडत नाही...


मग अशीच

एक संध्याकाळ होते,

तिरप्या किरणांनी 

सुरकुतल्या पायास स्पर्शून जाते..


तेव्हा मात्र ओलावणाऱ्या 

पापण्या किरणांना अंधुक करतात,

हा , हा म्हणता-म्हणता,

सर्वांग त्या सांजेच्या किरणांनी

व्यापून टाकतात..

 अनंत काळासाठी ....

काही वाईट, काही चांगल्या

 पाऊलखुणा मात्र मागं सोडतात ....!!!


#आयुष्य_हे❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

Wednesday, July 17, 2024

तत्व अन् बरंच काही....!!

 


तत्वनिष्ठता ही भाजीपाल्यासम कुठंही मिळणारी संजीवनी नाही. यासाठी कित्येक त्याग, अनुभव अन् आपण ज्यांना आदर्श मानतो यांच्या वाचनातून, त्या वाचलेल्या आदर्शवत कृतींच्या अनुभूतीतून अन् तपश्चर्येतून येते. पण त्याची व्याप्ती मातीच्या कणापेक्षाही लहान आपणाला उमजली जाते ...या काही अक्षरांची ताकद कळायला अन् अजमवायला कित्येक अनुभूतीतून तरल राहून स्वतःच्या परे जाऊन चुकीला स्वीकारून बरोबर गोष्टींची सक्षम बाजू मांडून्याचं  धारिष्ट खूप कमींकडे असतं... अर्थात, तत्त्वनिष्ठता ही एक ज्वाला आहे, जपली तर अनंतकाळासाठी कालातीत राहणारी अवघा आपला आसमंत रंगवून टाकणारी नाहीतर काही भौतिक अन् नश्वर लालसेपोटी वेशीवर टांगून, त्याचं ज्वालेची भस्मात जळून गेलेली तत्त्व अन् निष्ठा पाहूनही खेद नसणारी मंडळी भाळी ल्यायतात अन् आविर्भावातच जगणं रेटतात. यात उरली सुरली माणसं मात्र जिकिरीने प्रकाशाचा धर्म सांभाळतात, हे इतरांना हेकट, त्रासदायक अन् न पटणारी बनु शकतात यावर कितीही विश्वास न बसण्यासारखे असलं तरी तथ्य आहेच.... एव्हाना कधी कधी आपल्याच तत्वनिष्ठपणाचा, बाणेदारपणाचा कस लागतो. हे सगळं सोडून देऊन वाहत्या गंगेबरोबर, असंख्य माणसांच्या गर्दी बरोबर जाऊन त्या गर्दीचं व्हावं की काय असं होतं, बंडखोर वृत्ती उफाळून येते... पण तेव्हाच वेगळंपण जपण्याचा वसा घेऊन सद्सद्विवेक बुद्धी अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करायचं काम करत असते अन् कोलमडणारा रथ पूर्वरत होतो...

यात स्वतःला सांभाळणे अन् त्या काही अक्षरांसाठी जगणं हे ही एक तत्वचं... अश्या स्वभावाच्या माणसांना दुनियादारीत एकरूप होणं महाकाठिण्य असतं...

कारण जे पोटात तेच ओठावर आणण्याचं धारिष्ट ठेवणारी मंडळी हेकट म्हणून नाकारली जातात नाहीतर काही लेबलं लावून दूर फेकली जातात....

समाजात अशी माणसं एकाकी पडतातही पण याच वृत्तीमुळे जो जगण्यातला बाणेदार पणा आयुष्याच्या सोबतीला सावली प्रमाणे जपतात अन् निरोप घेऊन जातानाही काही चांगल्या पाऊल खुणा ठळक अनंत काळासाठी सोडून जातात....

भौतिक लालसेपोटी सांभाळलेल्या तत्वांना तिलांजली काही क्षणात दिली जाऊ शकते पण तीच तत्व अन् निष्ठा स्वीकारायला अन् अंगिकारायला हत्तीच बळ यावं लागतं क्षणोक्षणी आपल्या आदर्शांच स्मरण असावं लागतं

सभोवतालचं वातावरण आपल्याला त्याच्यानुसार बनायला भाग पाडतंही.... अश्यावेळी आपलं स्वतःचं वयल जपताना दमछाक होते, पण तीच दमछाक सकाात्मकतेचा सुंदर डाग देऊन जाते 

गर्दीचं व्हायचं नाही. हे पुन्हा-पुन्हा सांगत राहते.....

जगाला हेकट वाटणारी, बहुतांश वेळा न पटणारी ही वृत्ती त्याग मागत असते बलिदान मागत असते ..... जी माणसं बलिदान देतात ती अनंत काळात जिवंत राहतात.....!!!


#तत्त्व_अन्_निष्ठा #जगणं❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

प्रवाह जगण्याचा....!!

 

जीवनात या उन्ह कडाक्याचं 
हमखास पडावं,
उन्हानंतरच्या सावलीने
मात्र ते स्मरावं...
उन्हानंतर सावली
ही अपेक्षा काही गैर नाही,
पण सावली दिसताही
उन्ह वाट्याला हे काही
पचत नाही....

मातीत गाडून घेणारं 
बिजही पावसाअभावी 
कुजतच की,
पण कधीतरी फुलावं 
हे त्यालाही वाटतंच की...

जीवनात या 
कुजनं-फुलणं नक्की यावं,
संघर्षाच्या हा पावित्र्यात मात्र
मनाने कुठेतरी शांत निजावं...
गर्द काळोखातल्या वाटेवरही
चमकतोच की काजवा एखादा,
तोच तर ठरवतो चालण्याच्या दिशेला...

'तो' काजवा 'ती' फुलं
हवीच असतात सोबतीला,
त्याशिवाय प्रत्येक पाऊल 
वाटेल विरान वाटेवरला...

एका मागून एक पाऊल
पडत राहतं,
जीवनाच्या प्रवाहात 
प्रत्येक पाऊल मात्र गणलं जातं...
दुखःच्या लहरीबरोबर
सुखाचा शिडकावाने
प्रत्येक पाऊल स्मरलं जातं..

कितीही नाही म्हणलं तरी
थंड शिडकावा हवा असतो,
ठेचकाळलेल्या पावलांना
प्रवास असा नाही 
याचा विश्वास तोच देतो...

थकलेल्या पावलांनाही
थकायचा अधिकार नसतो,
उसनं आवसान आणून
पुढचं पाऊल पाहत राहतो...
कदाचित हाच तो प्रवास असतो
अनीच्छित, अनाकलनीय 
आळवाच्या पानावरच्या 
पाण्याच्या थेंबासारखा
कितिकाळ अस्तित्व
याची काहीएक कल्पना नसलेला
तरीही
उद्याची चांगली स्वप्नं पाहणारा 
नश्वर जीव.....!!!

#जगणं❣️
#जिंदगी_का_फंडा🍃


जगणं हे...!!

  जगणं म्हणजे तरी काय...?? लागलेली ठेच, झालेलं दुःख,  व्हिवळणाऱ्या वेदना, बोचणारे शल्य, अपूर्ण स्वप्ने, तुटलेलं मन, पण तरीही, उद्यासाठी फाटल...