Tuesday, May 30, 2023

जगणं .... स्वप्नांचं...!!


 ढग आले दाटून आता,

वाटेवरती काळोख हा पसरला,

आणून मनगटात बळ आता,

फुलव स्वप्नांचा रम्य पिसारा...


वाऱ्या बरोबर पाऊसही येईल अवकाळी,

तरी न चुकणार लिहिलेलं ते भाळी...


साचून पानी डबक्यात आता बेडकं ही भेदरवतील,

आणले त्रान पायात या तर उंचावर नक्कीच जाशील, 


सप्नांच्या त्या रम्य पहाटेसाठी,

आता कोकिळेचं गाणं गा..


आनंदाश्रू टिपण्यासाठी आता,

मयुरासम फुलून पिसारा,

वसंताची  वाट  पहा....!!!


एकदिवस असा येईल,

घामाचेही मोती होतील;

अन् अभिमानाने शिरपेचात असतील,

कित्येक वर्षे कष्टाची कहाणी सांगतील

स्वप्नांची आग मनामधील

दाहीदिशा आता  

काजव्यासम उजळून टाकतील;

पावसामागुन पाऊस येतील

तेव्हा आणून मनगटात बळ आता 

स्वप्नांचा रम्य पिसारा फुलवतील....!!


#पाऊस #जगणं❣️

#जिंदगी_का_फंडा

Tuesday, May 23, 2023

जगण्याच्या वाटेवर....!!

 


तिन्हीसांजा जाहल्या जश्या

तसा साज हा चढला मावळतीला..


गीत गात पानांसंगती

साद देती  दूरदेशीच्या वाऱ्याला...


यात नजरेसही ना पडला बकुळ जरी

भुलवत राहतो त्या ललनापरी...


तेव्हाच एकांताच्या वाटेवरती

साद कोकिळेने द्यावी,

थबकल्या पावलांनी

वाट मात्र एकांताचीच धरावी...


बहरलेल्या गुलमोहराने

कित्येक अमावस्यानंतर 

लाटा किनाऱ्याला भिडल्याची

जाणीव द्यावी,

जाता जाता विरहानंतरच्या

भेटीची आस लावावी....

तिरप्या किरणांमध्ये

हीच निसर्ग निर्मिती उजळून निघावी

अन् मनामनात साठवावी,

जगण्याच्या वाटेवरच्या उमळणाऱ्या लाटांबरोबर

संथ सागराची अनुभुती घ्यावी....!!!


#जगणं❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

Tuesday, February 28, 2023

मी असा...!!


 
जगण्याच्या वाटेवर,

अस्तित्वाच्या लढाईतला,

मी असा ऊन वाऱ्यातला...!!

  

ओसाड माळरानावर,

दगड गोट्यांच्या साथीततला,

मी असा चटके देऊन,

जगवणाऱ्या मातीतला...!!


वाऱ्यासंग सुगंध पेरणारा,

प्रहरीचा सूर्य माथ्यावर पेलणारा,

मी असा पावसासंग गीत गाणारा...!!


एकांतातला एकटेपणा

अन् एकटेपणातला एकांत,

यात वळून मागे पाहणारा,

मी असा

जन्म मातीतला, शेवट मातीतला 

पाहुणा या जगण्यातला...!!


#जगणं❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃



Saturday, December 31, 2022

शेवटाकडे जाताना...!!

 

वर्षाच्या शेवटाकडे जाताना,
आठवणींचं गाठोडं पाठी टाकून चालत रहायचं..!

स्वप्नांचं क्षितिज तेवढं गाठायचं,
मान्य काही स्वप्न लांबणीवर पडले,
केलेले काही संकल्प धुळीस मिळाले,
पण पुन्हा नव्याने शिकवण घेऊन
चालत रहायचं,
कर्तृत्वाचं क्षितिजपार करायचं..!!

जी मिळाली अनुभवांची शिदोरी,
बांधून ती जपून वापरायची,
यावर्षीची नवी डायरी मात्र,
यशाने-कर्तृत्वाने फुलवायची....!!

#स्वागत_नववर्षाचे❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃


निरोप घेताना...!!!

 

निरोप देत सर्वांना,
पोहचला 'तो' पश्चिम क्षितिजाला...!!

तिचा हात हातात घेऊन ,
समजावत क्षणभर 'तो' थबकला...!!

तेव्हाच वाऱ्याने,
पानांबरोबर सूर धरला..!!

समुद्राच्या लाटांनी,
किनाऱ्याला मात्र जाब विचारला...!!

पण त्याला निरोप घेणं अटळ होतं,
याचं गमक फक्त तिलाच उमगलं होतं...!!

म्हणून निरोप 'तो' घेताना,
'ती' लपवते चेहऱ्यावरची छटा काळी,
भरते केशरी रंग कपाळी...!!

यांतच 'तो' आता क्षितिजाआड
जातो आहे,
मांडीवर डोकं ठेवून तिच्या
निरोप तो घेतो आहे...!!

#तो_सूर्य_ती_कातरवेळ❣️
#निरोप2022
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, November 13, 2022

वळण...!!

चालता चालता आता वाटेनं
असं घेतलं वळण,
जसं उन्हातल्या पावलांना
पौर्णिमेचं स्मरण...!

म्हणूनच विसरून काट्यानां आता
जमलं फुलं जपणं,
सुकली जरी उन्हांत
तरी सुगंध श्वासात साठवणं....!!

गर्दीतल्या वाटेत सुद्धा 
जमलं आता एकांत जपणं,
ज्वालामुखी लपवून पोटातला
गर्द हिरवाईने नटणं..!!
अन् फुलांबरोबरंच काट्यांनाही
स्वीकारणं...!!

काहींच नाहीतर 
लेखणीला आपलं करणं...!!
एकटेपणा ऐवजी
एकांत जपणं...!!
मित्वापेक्षा स्वत्व ओळ्खणं...!!

#आयुष्य_हे❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃


 

Tuesday, August 30, 2022

निरोप...!!




निरोप असा घ्यावा की,
घेणाऱ्याच्या वर्मीचा घाव
कोणा ना दिसावा...!!

निरोप असा घ्यावा की,
कातरवेळीचा महोत्सव फिका भासावा,
अन् कोजागिरीचा चंद्र रिता वाटावा.....!!

निरोप असा घ्यावा की,
श्रावणात ,शिशिराचं आगमन वाटावं,
ऐन अमावसेच्या रातीचं चांदणं
अंगणात उतरावं,
तिथंच पारिजातकाच्या फुलांनं
हळूच मातीत मिसळावं,
शेजारच्या फुलाच्या नकळत
लोप व्हावं,
सुगंध देत देत,मातीचं व्हावं....
निरोप असा घ्यावा
कातरवेळीच्या सुर्यासम प्रखर, तेजोमय , शांत सौम्य...!!

#निरोप❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃


Friday, August 26, 2022

बाप माणूस...!!


बाप माणूस म्हणजे,

कडाक्याच्या थंडीतला
रखरखीत निखारा,
ऊब देत-देत
जळून राख होणारा...!!

बाप माणूस म्हणजे,
अथांग सागर,शांत तो भासणारा,
पोटात ज्वालामुखी तेवत ठेवत,
पृष्ठभाग संथ ठेवणारा...!!

बाप माणूस म्हणजे
काळ्या ढगांशी वारा
तो झुंजणारा,
शुष्क होताना
श्रावणसरी घेऊन येणारा...!!!

बाप माणूस म्हणजे
तुटकी वहाण रक्ताळलेल्या पायांची,
चालते वेदना घेऊन ती काट्यांची...!!

बाप माणूस म्हणजे
हसणाऱ्या चेहऱ्यावरची
दुखरी वेदना,
पश्चिम क्षितिजावर उठणारी
कातरवेळीची काळी संवेदना....!!!

#बाप_माणूस❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, August 21, 2022

एकांताच्या वाटेवरून...!!


 एकांताच्या वाटेवरती,

अनेक वाटा येऊन मिळतील,
पूर्वार्धाच्या काळामध्ये,
कौतुकाचे गोडवे गातील...!!

अर्थात,
क्षणभर आख्खा प्रवास लोभस वाटेल,
त्यातच,
सहवासातला आनंद अगदी हरकून टाकेल...!!

पण गड्या,
लोभाच्या या गर्दीत,
कुठंतरी तू हरवून जातो,
मग पुन्हा शोध स्वतःचा घेत घेत,
खूप दूरवर चालत राहतो...!!

हरवून जाणं,हरकून जाणं,
हा निसर्गाचा नियम जरी,
तरी न चुकावावं चालत राहणं,
एकांताच्या वाटेवरी....!!

रे गड्या,
एकटेपणात अन् एकांतात,
जमीन आसमानाची दरी,
ज्याला जमलं पार करण्यास
जगण्याची नौका त्याची
पोहचते पैलतीरी....!!

म्हणून सांगतो गड्या,
एकांतात फुलायला शिक,
लढता-लढता हसायला शिक,
जग सुंदरतेने बहरून उठेल,
वाईटातल्या गर्दीत सुद्धा
उंचावलेला चांगला हात दिसेल,
धूळ खात अडगळीत पडलेलं,
सुद्धा धूळ झटकून सुंदर भासेल...!!

म्हणून म्हणतो गड्या,
आयुष्याच्या वाटेवरती,
कधीतरी एकांताची वाट धर,
चालत-चालत दुरवरती,
स्वतःला हरवून बघ,
नदीकाठच्या पैलतीरावर,
सुंदरतेच्या रेतीवर,
आठवणींचे साकव
जोडत-जोडत,
त्या शंख-शिंपल्यात
एकांताचा प्रवास बघ
सुंदर....सौम्य... अन् प्रगल्भ...!!!


#एकांत❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Friday, June 10, 2022

फक्त 'तू'...!!


सह्याद्रीच्या वाटेवरती,

आनंदाची झाडं लावताना,

त्यांची फुलं वेचताना,

आपलं म्हणून माझं बनून 

'तू' हवीस...


सह्याद्रीच्या त्या उंच क्षितिजावर जाताना,

धांदरटपणाच्या लयी उठताना,

ठेच लागली,  जखम झाली,

तोल सांभाळताना

 'तू' हवीस....


नदीकाठी गाणी म्हणताना,

खळखळत्या झऱ्याचा आवाज ऐकताना,

दूर कुठंतरी कोकिळेचा सूर घुमताना,

'तू' हवीस.....


 त्याच तळ्याच्या काठावरती हरीण पाणी पिताना,

राजहंस जल क्रीडा करताना,

दूरवरून येणारा गार वारा शहारे उमटवताना,

त्या शाहऱ्यांचा अतिउच्च बिंदू बनून,

'तू' हवीस...


सूर्य पश्चिमक्षितिजाकडे जाताना,

त्याचं जाणं हुरहूर लावताना,

थरथरणारा हात आवेगाने पकडताना,

'तू' हवीस....


सूर्य गेला म्हणून पौर्णिमेचा चंद्र उगवताना,

सह्याद्री, त्या चांद प्रकाशात अगदी नाहून निघताना,

विचारांच्या गर्तेत श्वास गुदमरताना,

मनसोक्तपणे आपल्या विश्वातून हिंडवुन आणणारी 

'तू' हवीस...


त्या डोक्यावरच्या चंद्र प्रकाशात,

गवताच्या पात्यांवरचे दवबिंदू मोतीसम भासताना,

'तू' हवीस...


तीच गवताची पाती अनामिक वाऱ्याच्या स्पर्शाने शहरताना,

तसा काहीसा तुझा स्पर्श भासताना,

रोमारोमात सर्वांग शहारताना,

 फक्त 'तू' हवीस....!


आयुष्याच्या वाटेवर दगड धोंडे खाचखळग्यांबरोबरच

 आयुष्याच्या उंच उंच शिखरांवर जाऊन आसमंत कवेत घेताना,

तिथूनच कातरवेळीच्या सूर्याचा महोत्सव पाहताना,

निसर्ग नियमाप्रमाणे आयुष्याची संध्याकाळ होताना,

त्या क्षितिजावरचं उंच शिखर गाठून,

 सुरकुत्या पडलेला हात हाती घेताना,

अगदी पहिल्या भेटीच्या स्पर्शाची ऊब,

मायेचा ओलावा भासवणारी,

 'तू' हवीस....!!


तू , तू या बेलाग कणखर सह्याद्रीची ट्रेकर,

तू आयुष्यभराच्या जीवनाच्या चढ उतारांची पार्टनर

तू जगासाठी कल्पनेची सोबती,

पण माझ्यासाठी माझ्या पावलांबरोबर पाऊल टाकणारी साथी.....!!


#ती❣️

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

सर्द भिजलेला....!!!

ऑफिस सुटल्यानंतर धावत जाऊन त्याने बस पकडली. पावसाळा सुरू व्हायला अजुन तसा अवकाश होता पण त्यागोदरच्याच वळवाच्या पावसाने चांगलाच जोर धरला होता...