Saturday, May 23, 2020

आम्ही गावाकडचे की शहराचे...??


     भौतिकशास्रामध्ये पदवी पूर्ण केली, पदव्युत्तर शिक्षणासाठी युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळाला , त्यात उत्सुकतेची बाब म्हणजे नावाजलेल्या भौतिकशास्र विभागात पदव्युत्तर शिक्षण घेता येणार यामुळे प्रचंड खुश...!!
     त्याचबरोबर उदासीनतेनेही पाठ सोडली नाही, पहिल्यांदाच घर सोडावं लागणार , आई-आण्णांपासून दूर जावं लागणार...!!
नवीन मित्र-मैत्रिणी , हॉस्टेलला जमेल का...?? वैगरे, वैगरे असंख्य प्रश्नांनी डोक्यात विचारांचं काहूर माजवलं होतं.
     पण उत्साह होताच काहीतरी नवीन शिकायला मिळणार, जयकरसारखं लाखोंचं पुस्तक भांडार वापरायला मिळणार......!!
आजपर्यंत रिझल्टवरच दिसलेली युनिव्हर्सिटीची मेन बिल्डिंग अनुभवास मिळणार वैगरे वैगरे....!!
      तालुक्याचं गाव सोडून दुसऱ्या मोठ्या शहरात जाण्याचा/राहण्याचा कधी सबंध आला नव्हता, नव्हे नव्हे योगच नव्हता..!!
     आता पहिल्यांदाच पुण्यात जावं लागणार होतं, मनाच्या एका कोपऱ्यात कुतुहुल ही होतं तर दुसऱ्या कोपऱ्यात असुरक्षितता....!!
     कुतुहुल का...?? तर विद्येचं माहेर घर म्हणलं जाणाऱ्या शहरात M.Sc करायला मिळणार होती अन् त्यात भरीसभर युनिव्हर्सिटीमध्ये..., आणि  असणारं पुण्याचं आकर्षण वेगळंच...!!!
     तर हे शहर आपल्याला स्वीकारेल का..?? याबाबत असुरक्षितता, आपण काहीतरी विभिन्न आहोत काय की ...?? हा न्यूनगंड....
     अशी एकंदरीत अवस्था असतानाही आई-आण्णांपासून कधीही दूर न जाणारा मी , जेव्हा पुण्याला निघालो तेव्हा आईच्या डोळ्यात अश्रू होते अन् तीच गत माझीही होती...!! 
     अश्रू नयनांनी लाल डब्याने धावपळीचा प्रवास सुरु झाला , ओळखीची माणसं, ओळखीची धुळीची वाट, गावातली ती गल्ली अन् वळणावरील गप्पांचा कट्टा हा सर्व ओळखीचा प्रदेश झटपट मागे टाकत एसटी भरभर शहर जवळ करत होती...!!
     मायानगरी भल्यापहाटे चालू होणारी अन् रात्री 12-1 पर्यंत जागी असणारी पुण्य नगरी....अन् यामध्ये आत्ता सुरू होणार होता, स्पर्धेच्या जगातील  जीवघेण्या गर्दीतला कायमच धावपळीचा प्रवास......! जसं एसटीची चाकं फिरत होती, तसं डोक्यात विचारांचं काहूरही गरगर फिरत होतं.
     आता गाव , गावातील गल्ली, घर अन् अंगण हे सगळं सुटणार होतं, सुट्टी भेटली म्हणून कधी गावी आलोच तर तो ही कायमचा पाहुणा म्हणूनच येणार होतो, स्वतःच अंगण आता परका म्हणून पाहणार होतं, ज्या अंगणाने पाहिलंय माझं पहिलं पाऊल टाकताना लटपटणारे पाय, ऐकलंय माझ बोबड बोलणं अन् हासलही असेल मनोमन, हे तेच अंगण ज्याने पाहिलंय सुखद क्षण अन् दुःखद आठवणीही, यानेच दिल्या होत्या काही सुखद तर काही दुःखद जखमा आता त्याच अंगणात मी पाहुणा म्हणून परका तर होणार नाही ना....?? या विचारांनी डोकं सुन्न होत होतं अन् डोळ्यांच्या कडा ओलसर...!!
     गावातील उनाडक्या केलेले दिवस, अंगणातली बाग , पारावर बसणारी जेष्ठ मंडळींची बैठक अन् त्यांच्या गप्पा...!! सर्व -सर्व डोळ्यासमोर तरळत होतं, जसं-जसं एसटी शहर जवळ करत होती तसं तसं या माझ्या गावाच्या गोष्टीपासून दूर जात होतो...!!
जेव्हा कधी शहरातल्या गर्दीत एकटा हरवून जातो ना तेव्हा- तेव्हा प्रत्येकवेळी हाच प्रश्न आजही पडतो.
                    आपण गावाकडचे की शहराकडचे...?
     गावाकडचे म्हणावं तर आपण इथे फक्त सुट्टी मिळाली तर काही काळासाठीच येतो म्हणजे पाहुणे बनुनच...!!
अन् शहराचे म्हणावं तर शहर कधी आपलंसं वाटलंच नाही, इथं दिसते ती फक्त जीवघेणी स्पर्धा, जीव गुदमरून टाकणारी, इथली माणसांमध्ये कधी मायेचा ओलावा, आपलेसे पण कधी जांवलंच नाही...!!
     मात्र ना गाव सुटलं गेलं, ना शहराने स्वीकारलं....!!
     गावाकडचं निरागस प्रेम इकडं कधी दिसलं नाही अन् शहर बदलत गेली पण माझ्या गावाने धुळीची वाट सोडली नाही. आई-आजीने सारवलेली भिंतीतून येणारा पहिला पावसाचा सुगधं आजही विसरत नाही...
     आजोबांनी गायलेले भल्या पहाटेचे ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग अन् दिवे लागणीच्या वेळेचा हरिपाठ कानात आजही गुणगुणत राहतो, एक मृत्तिमंत भास देतो...!!बापाचा काम करून थकणारा देह आजही अंगणात आला की उत्साहित होतो...!!
कातरवेळीची शांतता अन् प्रसन्नता जाणवत नाही.
हे सर्व-सर्व आता चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर तरळत होतं
तसं शहरात यातलं काहीच अनुभवता येणार नव्हतं, इथं फक्त गर्दीतलं जीवमुठीत धरून जगणं अन् गाड्यांचे कर्कश आवाज, शांत झोप ही न येऊ देणारे... हे सगळं वास्तव होतं ते स्वीकारावच लागणार आहे....
अन् परत शहराकडे पावलं टाकावीचं लागणार आहेत .
न थकता ......!!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Thursday, May 14, 2020

मनाच्या कप्प्यातून....!!

     मन काय असतं....??
     मन हे नुकतंच पाऊल टाकायला लागलेल्या बाळाचं अंगणातलं पहिलं पाऊल असतं, नाविण्याने नटलेलं...कुतूहलाच्या शोधात असलेलं , नाविण्याला चटावलेलं...!!
मन तोल सांभाळत, आधार घेत उत्साहाने पण घाबरत टाकलेलं पाऊल असतं...त्यात तितकाच अल्लडपणा, अगदी छुन-छुन वाजणाऱ्या पैंजनासारखा...
     मन असतं खळखळत्या झऱ्यासारखं ,परिणामांची पर्वा न करता स्वतःचा प्रवाह स्वतः निर्माण करणारं,
झऱ्यासारखं वाट मिळेल तिकडं धावणारं.
     मन असतं समुद्राच्या शांत दिसणाऱ्या पाण्यासारखं पण असंख्य भूकंपाचे धक्के अन् ज्वालामुखी पोटात साठवून सुद्धा शांत दिसणारं.....झालंच असह्य तर किनाऱ्याला जाब विचारणारं त्सुनामीसह
     मनाच्या वारू वर स्वार झालं तर वास्तविकतेचा लगाम घट्ट असावा लागतो नाहीतर अपघात अटळ असतो.
हेच मन हळवं असतं तर कधी निगरघट्ट मुर्दाड , सतत वास्तविकतेच्या जगात जगणारं.
     यात पायाखाली आलेली मुंगी पाहून डोळ्यात टचकन पाणी येणाराही असतो अन् आत्ताच जगाचा मायावी प्रवास संपलेल्याचं स्वतःच्या हाताने पोस्टमार्टेम करणाराही....!!
     जखमांनी घायाळ झालेला , ज्याने मरण जवळून पाहिलंय म्हणून भावनाशून्य मुर्दाड बनलेला योग्य की हळहळ व्यक्त करणारा, होऊन गेलेल्या क्षणांना कवटाळुन बसलेला...??
     गंभीर आरोप्याला फाशी देणाऱ्या जल्लादाच काय?त्याला  नसेल का मन, कधी फाशी देताना हात नसेल का थरथरला, अंग शहारून नसेल का आलं??
     मग प्रश्न उरतो, तो मन संवेदनशील असणं शाप की वरदान?
योग्य कोण, मुंगी पायाखाली आली म्हणून हळहळत बसणारा अवलिया की हा जल्लाद...?? एक कर्तव्य बजावतोय तर दुसरा सवेदनांनी भरलेला...!.
     दैनंदिन जीवनाच्या प्रवासात जगताना आपण सहज काही बोलून जातो एखाद्याला लागेल अशी कंमेंट्स देऊन मस्तवाल चालत राहतो...!! पण आयुष्यात कधी हा विचार मनाला स्पर्श करून जातो का ओ...!? आपल्या त्या शब्दांमुळे त्याचं मन दुखावलं तर नसेल ना?ते शब्द काटेरी बाणांसारखे त्याच्या काळजात खोलवर रुतले तर नसतील ना ??
                          नाही ना.....?
     बरोबर, एवढा विचार करायला आम्हाला कुठं वेळ आहे.
फोर व्हीलर घ्यायचीय, मस्त घर घ्यायचंय सो called luxurious life जगायचंय?? जसं कधींच या जगातून आपला प्रवास संपणारच नाही. आलीच तशी वेळ तर प्रेमाने कमावलेल्या माणसांच्या आठवणीत, त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात थोडीच राहणार आहोत. दिगंतराचं गाठोडं बांधताना ही luxurious life घेऊन जायचीय होय ना ??
               आपण केलेल्या कृतीचा का विचार होऊ नये??
     त्याच्यावर आपण समर्थनार्थ म्हणतो मी सहज बोललो होतो, मग त्याने ही सहज घ्यावं अन् उपदेशपर आव आणत ऐटीत म्हणतो, असं किती लोकांचं मनावर घेणारयस...
                               गंमत आहे ना ??
      संवेदनशील मन असणारा एकतर रात्र रडत-कढत काढतो, दुःखाने विव्हळत असतो, नाहीतर मग सर्वांवर वार करत सुटतो... यात जवळची म्हणवणारी माणसंही भरडली जातात, दुरावली जातात. यात  आपण दूर जातो नाहीतर ते स्वतःहून दूर होतात.
चांगुलपणावरचा विश्वास डगमगतो. त्यांना मध्य साधता येत नाही, नव्हे नव्हे साधत नाहीत.
 एकतर हृदयात स्थान देतील नाहीतर परत वळुन पाहणार ही नाहीत...!! अशी माणसं जितकी संवेदनशील असतात तितकीच कट्टरही....!!
मग संवेदनशील असणं शाप की वरदान...?
     चालताना एखाद्यावर केलेला विनोद उडवलेली थट्टा योग्य की अयोग्य....त्याचं मन किती विव्हळत असेल याचा आपल्याला पुसटशी ही कल्पना नसावी....!!
     जीवन एवढं क्षणभंगुर असताना, उद्या काय होणार याची कोणतीच शाश्वती नसताना आपण का दुखावतो एकमेकांना...??
     पुढच्या क्षणी काय होणार याची कल्पना नसतानाही आपण एकमेकांविषयी आकस बाळगतो मनं दुखावतो.
'दिल खोलके' गप्पा मारत नाहीत, आपल्याच म्हणवणाऱ्या लोकांशी.....!!
      सहज बघा, तुम्ही दूरच्या प्रवासाला आहात अगदी अनोळखी प्रदेशात .. तिथं तुमचं असं कोणी नाही.
      पण जर तिथं भेटलेल्या व्यक्तीने तुमची आपुलकीने  खुशाली विचारली अन् एक गोड smile दिली तर तुम्हाला किती हायसंं वाटतं ना.
       मग तुम्हीही या प्रदेशात अनोळखीच अन् पाहुणेच आहात
मग का असावं आपण असं...?
का बोलू नये हृदयाच्या तळातून,भरभरून...!!!!
      दूर जाणाऱ्याला एकदा तोंडभरून हाक मारावी अन् एक प्रेमभराने मिठी मारावी, काय माहीत ती दूर चाललेली व्यक्ती परतवून येईल, पुन्हा नव्याने नात्याला पालवी फुटेल, बहरेल नातं पूर्वीप्रमाणे....!!
     प्रत्येकाच्या मनाचा-भावनेचा आदर व्हावा,तर जग खूप सुंदर दिसेल.
     आजच्या धक्काधकीच्या गर्दीत माणसं माणसानं भेटतच नाहीत. भेटतात ते मुखवटे घालून , त्यांना घट्ट चिकटलेल्या असतात आशा,आकांशा महत्वकांक्षा अन् हेतू .....!!
हेतू साध्य झाला की ती माणसं दूर निघून जातात. मग हळव्या मनाची माणस स्वतःचा त्रागा करून घेतात स्वतःला दोष देत राहतात...!! स्वतःला समजवावं ती माणसं कधी आपली झालीच नाहीत मग एवढा त्रागा का, उलट त्यांच्याबरोबर घालवलेल्या सुंदर क्षणांची पुंजी जपून वापराची, संपत आलेल्या कुपितल्या अत्तराप्रमाणे...!! त्यांचं जाणंही अपरिहार्य असेल...!!
म्हणूनच आहेत तोपर्यंत आदराने..मायेने दोन शब्द बोलायला हवेत,काहीही खर्च होत नाही चांगलं बोलण्यात....कशाला उगाच भांडण ? वाद?
   कोणीतरी म्हणून ठेवलंय....!!
"कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई...?
एकदाच ओंजळीत दे ना जाई जुई.........!"
अगदीच हळूवार नको राजरोष,
पाकलीच एक नको डवरले घोस,
पानासाठी कवितेच्या देना खुण काही,
एकदाच ओंजळीत दे ना जाईजुई.
     खरंच कोण जाणे पुन्हा कधी गाठभेट होई...?आयुष्य घटकाभराचं आहे...!!म्हणूनच
त्याला भरभरून प्रतिसाद द्या, प्रेम द्या.
वादाला संवादाची साथ
सादेला प्रतिसाद द्या,
शत्रुत्वाला मैत्रीचा हात,
द्वेषाला प्रेमाची साथ,
अंधारलेल्याला प्रकाशाची वाट,
कडक उन्हाला प्रेमळ थंड सावली ध्या,
कधी आपला प्रवास संपणार आहे हे माहीत नाही.
आहोत तोपर्यंत आकस का ठेवावं,भेटावं,बोलावं अगदी मनाच्या तळातून, खूप दिवसांनी भेटल्यासारखं प्रत्येकवेळी नाविन्यपूर्ण...!!!


#जिंदगी का फ़ंडा🍃

Friday, April 10, 2020

लग्न, बाप अन् बरंच काही....!!!

आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे हे लग्न...!!
अक्षदारूपी तांदळाचे चार दाणे काय अंगावर पडले की, दोन अनोळखी जीव आयुष्याचे जीवनसाथी होतात....!! काय गजब आहे ना...?
     काय ताकद आहे, बघा या अक्षदांमध्ये....!!
आजही बहुतांश ठिकाणी पोह्यांचा कार्यक्रम म्हणजे पाहण्याचे कार्यक्रम होतात..!
     अन् वयाच्या 23-24 वर्षापर्यंत एकमेकांना ओळखणं तर सोडाच पण पाहिलेलं ही नसतं...!!
     त्या 5-10 मिनिटांच्या संभाषणात इथून पुढचं आयुष्य एकमेकांबरोबर घालवायचं की नाही याचा निर्णय होतो...!!
वडीलधारी माणसं त्यात मूला मुलींना मोठ्यामनाने एकमेकांना बोलण्यासाठी गच्चीवर जाण्यासाठी दिल मोठा करतात...!!
काय विशेष आहे ना....??
     आयुष्याचा महत्वपूर्ण निर्णय बहुतांश ठिकाणी असेच 5-10 मिनिटाच्या ओळखीवर घेतले जातात....!!
     मग बघण्याच्या कार्यक्रमानंतर , एकमेकांच्या होकारांनंतर,असतो तो देवाणघेवाणीचा बाजार....!!
होय बाजारच...!!!
      नवऱ्या मुलाच्या बापाच्या अवाजवी मागण्या,हुंडा वैगरे, त्यात खेदजनक हे असते की नवरा मुलगा कितीही शिकलेला असलातरी आई-बापाच्या शब्दाच्या पुढे जात नाही, याच्या आड सर्व गुपचूप स्वीकारत असतो.
     यात मुलीचा बाप, सर्व मागण्या कमी-जास्त करून मान्य करतो.
का.....??
    तर त्याच्या काळजाच्या तुकड्याचं, लेकीचं आयुष्याचं कल्याण होईल..
     ऐपत नसलीतरी सावकाऱ्याच्या दाराचे उंबरठे झिजवतो,
बँकेच्या कारकूनाला व्यथा सांगत,कर्ज काढतो. पण त्या पोटच्या पोरीच्या कल्याणासाठी, भल्यासाठी त्या नवऱ्याच्या, त्याच्या कुटूंबाच्या अवाजवी मागण्या, अन् त्याची हौस पूर्ण करतो....!!
     सावकाराकडून व्याजाने पैसे आणताना स्वतःला समजावत येतो, याने माझ्या लेकरांचं भलं होणार असेल तर असे कर्ज फेडण्यात आनंद असेल....!!
     या बापाच्या काळजाची कल्पना कोणालाच येत नाही,
आतून प्रत्येक क्षणाला तिळ-तीळ तुटत असतो..!!
     काळजाचा तुकडा आपल्यापासून दुरावणार, हे काळजावर दगड ठेऊन स्वतःलाच समजावत असतो...!!
     बापाची पाहुण्यांमडळींच आदरातिथ्य करण्यात दमछाक होत असते...!पण तो ही दमछाक कोणालाच कळू देत नाही.

कारण अर्धांगिनी जवळ बोलावं, तर ती खचेल,
पोटच्या लेकरांपुढे सांगावी, तर त्यांना त्यांच्या बापाची व्यथा  डोळ्यात  दिसेल...!!
म्हणून मनोमन पोटात ठेवून सर्व कार्य  करत असतो....!!
लग्नाची गोष्टच न्यारी असते हो..!!
       दोन घराचं नातं जोडलं जातं असं म्हणलं जातं
पण खरंच तसं आहे का....??
मुलीच्या बापाकडून फक्त घेतलं जातं, छोट्या-छोट्या भांडयांपासून ते सर्व मोठया गोष्टी ज्या की प्रत्यक्षता मुलाने कधी पाहिलेल्याही नसतात..!
मग का हा एवढा हव्यास, तो ही दुसऱ्यांकडून, मुलीच्या बापाकडून....??
     त्याने त्याचा काळजाचा तुकडाही द्यायचा, हुंडा द्यायचा अन् अवाजवी मागण्याही मान्य करायच्या ..??
तुम्हाला खाण्यासाठी त्याने दिलेल्याचं थाळीत खायची वेळ यावी...!!
तुमची एवढीशीही ऐपत नाही, तुम्ही घेतलेल्या थाळीत जेवण करता येईल.....??
अन् जर नसेल तर तुम्ही लग्न का करावं...??
    हुंड्याच्या बाबतीतही तेच, कपड्याचं तर सोडाच ,
पुढील वर्षभर पुरतील एवढे ड्रेस घेतले जातात.
कोणाकडून.....?? तर ते मुलीच्या बापाकडून....!!
      सुटा-बुटापासून सर्व गोष्टी मुलीचा बाप देणार असेल तर लग्न करण्याचा काय अधिकार....??
याला बाजार नाही म्हणावं तर आणखी काय...??
   एवढं सगळं करूनही त्या मुलीकडून अजाणतेपणी काही चूक झाली, तर त्या बापाच्या नावाचा उद्गार होतो....!!
कीती अजब आहे ना ....?
     एवढं करूनही जेव्हा बापाचा फोन आल्यावर लेकीचा रडका आवाज येतो ना, तेव्हा बापाला धरणी दुभंगल्याचा भास होत असेल....!!
त्या बापाच्या काळजाचा कोणालाच थांगपत्ता नसतो,
ते क्षणा-क्षणाला तुटत असतं...
     एवढं करूनही लेकीच्या आयुष्यात काही कठीण प्रसंग आले, अघटित घडलं, तरीही पाय रोवून न डगमगता, आतून तुटत असलेतरी, मजुबत असल्याचा भास देऊन आधार देत असतात....!
बाप, जो लडखडत असलेल्या लेकराला आधार देत
बोटाला धरून चालायला शिकवतो, बोबड्या बोलाने बोलायला शिकवतो,नव्हे नव्हे जिंदगी देतो...!!
बाप , जो लग्नाची धामधूम झाल्यावर पाठवणीच्या वेळी, लग्नमंडपाच्या कोपऱ्यातल्या खांबाला डोकं टेकवून गंगा-यमुनेला वाट मोकळी करून देतो....
बाप ,जो कणखर आहे, असं म्हणलं जातं,
तोच बाप इतरांची नजर चुकवून डोळ्यातील अश्रुनां रोखण्याचा-पुसण्याचा भाबडा प्रयत्न करत असतो...!!
बाप, जो वेळोवेळी खड्याबोलात दटावलेलं, धमकावलेलं असतं, त्याच्याच मुखातून आज शब्दच फुटत नसतात कंठ दाटून आलेला असतो...!!
फुलपाखरू उडून जाणार हे माहीत असूनही....
ज्या लेकराला तळतावर बसलेल्या फुलपाखराप्रमाणे नाजुकतेनं सभाळलेलं असतं.
त्याच्या पाठवणीचा क्षण म्हणजे किती कठीण असेल
याचं वर्णन करणं महाकठीण....!!
     सर्वांची हौस करतो ती फक्त लेकीच्या सुखासाठी,
कोणापुढे कधीच न झुकणारा बाप लेकीसाठी झुकतोही....!!
हे सर्व लेकीच्या बापाला , लेकीलाच का सहन करावं लागतं..?
तर त्याला आपला समाजाची मानसिकता कारणीभूत आहे 
हुंडा, स्त्रीला दुय्यम स्थान अन् लग्नाच्या अवाजवी मागण्या यावर सुज्ञतेने विचार व्हावा....!!!


#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Monday, March 16, 2020

प्रवासात भेटलेले 'कवडसे'...!!!

       ईस्पितस्थळी पोहचताना आयुष्याच्या प्रवासात भेटलेल्या काळ्याकुट्ट  घनदाट जंगलातल्या अंधाऱ्या पायवाटेवरून चालताना, इथपर्यंतच्या प्रवासात जगलेल्या क्षणांचे कवडसे डोकावत असतात..!
        आपण त्या कवडसांबरोबर थोडाकाळ का होईना रमत गमत चालायचं असतं...! पण कितीवेळ रममाण व्हावं यालाही मर्यादा येतेच....
       काळ्याकुट्ट अंधाऱ्या वाटेवरुन चालताना , पाऊलवाट अगदी दिसेनाशी झाली तर हेच कवडसे वाटेत आशेचा किरण दाखवतात....अन् थोडावेळ का होईना, पाऊलवाट प्रकाशित करतात.. आपल्या साथीला आहेत याचा अभासातील भास देतात...!!
        त्यामुळे आयुष्यात जगलेले क्षण हे या कवडश्यांसारखं  काम करत असतात.....!
       कधी वाटलं, वाट दिसेनाशी झालीय तर, या क्षणांना जवळ करणं आवश्यक असतंय...!! वाट दिसेनाशी होते म्हणजे त्यात त्या वाटेचा दोष नसतोच, गरज असते ती दिव्य दृष्टीने पाहण्याची...!! गरज असते साथीची, आपल्या म्हणवणाऱ्या कोणाचीतरी...!!
अन् गरज असते ती स्वतःचा हात स्वतः आवेगाने घट्ट पकडण्याची, जो कोणत्याही कठीण प्रसंगी साथ सोडत नाही. दरम्यानच्या काळात जगलेल्या क्षणांच्या पाऊलखुणाच, आपली साथ निःसंकोचपणे देऊ शकतात अन्य कोणीही नाही अन् शहाण्याने ती अपेक्षा ही धरू नये...!!
         कवडश्यानीच का साथ द्यावी...??, कवडश्यांमुळेच अंधुक वाट का दिसावी...??  पूर्ण वाट लक्खं प्रकाशित का होऊ नये..?? याच्या फ़ंद्यात आपण पडायचं नसतं...!!
          दमून आलेल्या पंथास्त्याला वटवृक्षाने विचारलं आहे का की, तू माझ्याच सावलीत का विसावला...??  असं कधी ऐकीवात आहे का....? नाही ना, मग आपण ही निसर्गाची निर्मिती आहोत, आपण ही मीच का ?  हा सवाल विचारू नये, त्यात अडकू नये .....!!काही मिळणारही नाही ....!!! 
         जेव्हा प्रवासाला चालायला सुरुवात केली तेव्हापासूनच दऱ्या-खोऱ्यातल्या चढ-उतारांची, दगड-धोंड्यांची साथ होती, काट्या-कुपाट्या असणाऱ्या पाऊलवाटेवर रक्तबंबाळ झालेल्या पायांनी , माथ्यावर सूर्य आग ओकत असतानाही ईस्पितस्थळापर्यंतच्या प्रवासाचा महोत्सव करण्याचा निर्धार केलाय..
           यात माहीत नसतं  मुक्कामाचा थांबा कधी येणारय,अन् नंतर हळहळ व्यक्त करायला संधी नसावी म्हणून या प्रवासाचाही महोत्सव करत रमतगमत चालायचं , अनपेक्षित वळणं आलीतर वेगाला आवर घालायचा अन् एक-एक पाऊल टाकत राहायचं....!!
       यात चांगल्या-वाईट गोष्टींच्या पाऊलखुणा, उमटणारच आहेत.....!!
चांगल्या पाऊलखुणा, कोणालातरी प्रेरणा देत राहतील,

वाईट पाऊलखुणा,कोणालातरी शिकवण देत राहतील...!
पण या चांगल्या वाईट पाऊलखुणांचा, गणिताचे नियम वापरून हिशोब लावायचा नसतो , हाती काही लागत नाही.....

      जेव्हा कधी हा दिगंतरापर्यंतचा प्रवास सुरू केला, तेव्हाच कोणाच्या साथीची अपेक्षा नव्हती तरीही प्रवासात भेटलेल्या घनदाट जंगलातल्या अंधाऱ्या पायवाटेवर, काहीकाळ का होईना कवडश्यानीं साथ दिलीय, हेच ऊर्जा देणारं आहे, नवचेतना देणारं असतंय...त्यात समाधान मानावं....!!
         समाधानी जगण्यासाठी कशाचीच आवश्यकता नसतेय, गरज असते ती आपल्यावर असणाऱ्या दृढ विश्वासाची अन् जिद्दीची......!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Monday, March 2, 2020

दुनिया स्वप्नांची....!!!

       Hey hey जिंदगी हा तूच-तूच...तुझ्यापेक्षा सध्या कोण आहे हाक द्यायला...!!
 कशी आहेस न तू...??
        किती ते स्वप्न बघण्यास भाग पाडते....
कितीतरी रंगरंगोटी करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे रंग, रंगपेटीमध्ये आणून ठेवते...!!
      आम्हीही भाबडी माणसं, त्या स्वप्नांच्यामागे जीव ओतून पळतो....!! मनलावून रंग भरतो, का...??, तर माझ्या स्वप्नातला दिवस अगदी रंगेबिरंगी उत्साहित, प्रेरित करणारा असावा...!!
यात तुझा तो काय दोष....!?
      तुझं तू काम केलंस रंग दिले, रंग पेटीही दिली, आत्ता आम्हाला ते रंग कोणत्या पृष्ठभागावर उमटवायचे, ते आमचं-आम्हीचं ठरवलं पाहिजे...!!!
       किती असतो, हा स्वप्नांचा पसारा, किती छान बेत असतात जगण्याचे...!!! आप्तस्वकीयांची, आपली, आपल्या म्हणवणाऱ्या आपल्या लोकांची, भरमसाट स्वप्ने ...!!
         पण ही स्वप्ने सत्यात उतरवण्याची धमकही असतेच की आपल्याकडे...!
      पण जीवनात कधी-कधी अश्या गोष्टी घडतात की,आपली स्वप्नच स्वप्नांच्या हवाली करून, आपली वाट सोडून, आपल्या माणसांसाठी, काही काळासाठी, आपली स्वप्ने बाजूला ठेवावी लागतात ...!!
          पण मग कधी एकांत मिळालाचं तर आयुष्यात आठवणी बनून गेलेली, जीवनरुपी पुस्तकाची पान चाळायला घेतली तर अगदी हरवून गेल्यासारखं होतं..!!
         जीवन जगण्याचे किती छान बेत होते,
         किती तो स्वप्नांचा पसारा...!!!
         कुठंतरी मी जात होतो, तर कुठं नियती घेऊन जात होती..!!
         काय योजलं होतं अन् काय मिळालं?
         कुठं पोहचायचं होतं अन् कुठं येऊन पोहचलोत?
        याचा हिशोब लागता लागत नाही, या विचारांच्या भाऊगर्दीत  अनुभुती येते ती गर्दीतल्या एकांताची....आत्मपरीक्षणाची.... स्वप्नांच्या रंगरंगोटीची...!!
          पण पुन्हा स्वप्नाच्या पाठीमागे नक्की धावू, तेवढी ऊर्जा नक्कीच आहे.नव्या जोमाने कामाला लागू तीच ऊर्जा तीच धमक...!!
         जीवनातल्या थोड्या गोष्टी स्थिरस्थावर झाल्यानंतर स्वप्नांवर तुटून पडून ते नक्कीच वास्तवात आणू एवढी धमक नक्कीच आहे....!!
         हरलोय का जिकलोय हाच प्रश्न ठाण मांडून उभा असतो तो उसंत घ्यायला तयारच नसतो..!!
     अश्यावेळी गरज असते आत्मपरीक्षणाची स्व-ओळख करण्याची...!!
पुन्हा नव्याने रंगपेटीत रंग भरण्याची अन् नव्या जोमाने स्वप्न रंगवण्याची ....!!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, February 23, 2020

वसुंधरेकडून घेऊ काही ....!!!


      कसा असतो ना निसर्ग ....!! झाडाची पूर्ण पानं गळून गेले तरी नाउमेद न होता, नव्या जोमाने सुरवात करतो अन् तीच ऊर्जा तोच गोडवा घेऊन सर्वांना आनंदित करतो...!!
       झाडाचं गळून पडलेलं प्रत्येक पान जाता-जाता छान संदेश देऊन जातं, मी  जातो आहे, पण माझ्या जाण्याने नवनीनिर्मितीचा कोंब फुटणार आहे,नवीन पालवी फुटणार आहे अन् याच आनंदात मातीत मिसळून जातं मातीचं होतं.!!
     नवनिर्मितीची हे संक्रमण हे कोणाच्यातरी त्यागातून कोणाच्यातरी निस्वार्थी,समर्पणाच्या भावेतूनच चालू राहत असतं.
याच गोष्टी जर निसर्गाची निर्मिती असणाऱ्या मानव मध्ये आल्यातर निसर्ग जसा नवप्रेरीत करणारा , नाविन्याचा ध्यास असणारा सृजनशील आहे. तसाच मानव ही सृजनशील, नवप्रेरीत अन् नाविन्यपूर्ण असेल..!
पण आपल्याला स्वतःची तर सोडाच पण निसर्गाकडूनच मिळालेली गोष्ट देण्यास आपण कचरतो.
निसर्गाकडे पाहीलं तर खूप प्रेरणा मिळते, पण आपण चांगलं लवकर घेत नाहीत, स्वीकारत नाहीत.
जे स्वीकारायला पाहिजे, ते अंगवळणी पडत नाही अन् पडलंच तर ते समाजात रुचत नाही.
म्हणूनच माणूस हा प्राणी निसर्गाची निर्मिती असूनही निसर्गासारखं पारदर्शक, दानशूर, निस्वार्थी कधीच होत नाही, होता येणारही नाही...!
   आपणास विंदा करंदीकरांची कविता पूर्णत्वाने लागू होते.
        "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे"
        "घेता-घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे"
माणसाला आणखी एक  भा.रा. तांबेच्या कवितेचं बिरुद लावलं जातं की जे साजेसंच आहे...!!
        'जो तो वंदन करी उगवत्या,'
        'जो तो पाठ फिरवि मावळत्या,'
        'रीत जगाची ही रे सवित्या'
       "स्वार्थपरायणपरा |"
पण त्याच निसर्गाची निर्मित्ती असणारी पानं, फुलं, फळांच्या बाबतीत असं कधी होत नाही.
      त्यांचा परोपकारी, निस्वार्थी बाणा आपणास छान संदेश देऊन जातो. फक्त पाहणाऱ्याने त्या-त्या नजरेनं पाहावं....!!
      काही सुगंधी फुलांकडे सौंदर्य असेलचं असं नसतं अन्
काही दिसायला मोहक असतात पण ते सुगंधी असतातच असं नाही..!!
पण आपण इथंही अपेक्षा करतो की सुंदर दिसणाऱ्याने सुगंधितही करावं
कसं शक्य आहे....!!??
       ज्या झाडाने फळातील गोडवा द्यावा त्यानेच कसं वाटसरूस शीतल छाया द्यावी....!!
       भल्या पहाटे उठून निसर्गाच्या सानिध्यात एक फेरी मारली तर  निसर्गाचा नवीन आविष्कार अनुभवण्यास मिळतो.
तो पक्ष्यांचा किलबिलाट, दूरवरून ऐकू येणारी कोकिळेची कुहुकुहू , असाच दूरवरून संदेश घेऊन येणारा, पानांची शीळ वाजवणारा, मंद थंडगार वारा..! त्याची झुळूक जेव्हा सर्वांगाला स्पर्श करून जाते ना, तेव्हा कोण्या एका प्रियकराने किंवा प्रियसीने फुंकर मारल्या नंतर जी आवर्तने निर्माण होतात अन् पूर्ण अंग शहारले जातं तसा भास होतो...!!
        नंतर पूर्वेकडून क्षितिजाआडून आकाशाला त्याच्या रंगानी नाहून टाकणारा सुवर्णगोल पूर्ण आभाळ तांबूस रंगाने रंगवतो अन् आदल्या दिवसापेक्षा जास्त तेजोमय उत्तेजित दिसतो. तेव्हा तो क्षण पाहणं अवर्णनीय असतं ...!!!
तेव्हाच पक्षी आपल्या पिल्लांसाठी खाऊ आणण्यासाठी उंच आकाशी फरारी घेतात, तो क्षणही  तांबूस रंगात लोभनिय वाटतो...!!
      अन् हीच निसर्गाची देणगी दिवसभरासाठी पुरून उरते....
पण माणूस दिवसभराच्या कटकारस्थानाने थकतो
त्याला परत उत्तेजित करण्यासाठी असते ती कातरवेळ..!!
   दिवस आणि रात्र यांना जोडणारी वेळ म्हणजे कातरवेळ.
पश्चिम क्षितिजापासून हातभरावर सूर्यगोल दिसू लागला की सुरू होतो सूर्यास्ताचा अटळ उत्सव. लाल-तांबड्या रंगाच्या अक्षरशः अगणित छटांचा मनसोक्त उधळण होते . नारिंगी, केशरी, भगव्याची उधळण होते.
      सूर्यास्ताचा अटळ उत्सव असं मनाला उलथंपालथं करतो. खळबळून काढतो. तरीही हवासा वाटतो....... या कातरवेळी प्रत्येकाला हवा असतो एकांत ....एक स्वतःचा क्षण....त्यावेळेस त्याला भान हरपून शांत बसणं पसंद असतं....!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Monday, December 23, 2019

अडगळीतलं सोनं...!!!!

      आज रात्रीचं जेवण झाल्यानंतर, मांजरी रोड वर शतपावली करावी म्हणून चालत होतो...!!
      तेव्हा एक दृश्य मनाला छेदून गेलं , त्याच्यांकडे लक्ष जायला कारणही तसंच होतं...!
       साधारणतः 70-75 वय वर्षे असणारे आजोबा हातगाडीवर मेथीच्या 20-25 जुड्या घेऊन विकण्यासाठी बसले होते , त्यांना साधं उभाही राहता येत नव्हतं, तरीही ते स्वतः ला संभाळत हातगाडी पुढे-पुढे ढकलत चालत होते....!!!
मग मनात असा प्रश्न पडला , कुठून येते यांच्याकडे एवढी ऊर्जा...!?
     आयुष्यभर कष्ट केलेलं असतं, कारण की आयुष्याच्या संध्याकाळी थोडे-थोडके सुखाचे दिवस येतील, दोन घास आनंदाने खाता येतील, नातवंडांबरोबर लहान होऊन जगता येईल, कोडकौतुक करता येईल...!!!
     या आजीं-आजोबांनीही हीच स्वप्ने पहिली असतील, यांनीही ऐशोआरामी जीवन जगण्याचे छान बेत केले असतील, आयुष्याची संध्याकाळ आपल्या प्रियजनांबरोबर घालवण्याची स्वप्न रंगवली असतील . पण मग या वयातही का असावी ही व्यथा ...!!
त्यांना पोटाची खळगी भरण्यासाठी तर इतर खूप साधनं होतीच की, वृद्धाश्रम होते, मंदिर -मज्जीद होती....!!
पण मग त्यांनी ही वाट का निवडावी...??
      तर याच्यासाठी माझ्या आकलनांनुसार एकच शब्द होता अन् तो म्हणजे "स्वाभिमान"...!
     "उतार वयातील व्यक्ती म्हणजे वय झालेलं उपजत बालकचं...!!"
      सगळं साथीनं करत असताना काबाड कष्ट करून त्यांच्या लेकरांची पोटाची खळगी भरवलेली असतात.
      आयुष्यभर केलेल्या तडजोडी, उपभोगलेले मान , पचवलेलं अपमान, झेललेली अवहेलना, अन् भोगलेली दुःखं....!!!
यामुळे त्यांची सहन करण्याची क्षमता संपलेली असते. आपल्याचं लोकांकडून आलेले बोल, त्यांना अनुकूचीदार बाणांसारखे हृदयात खोलवर रुतत जातात अन् ती जखम घेऊन चालणं आता अशक्य होतं...!
      ज्या लेकासाठी रात्रीचा दिवस अन् दिवसाची रात्र केली,  त्याच्याकडुनच आज अवहेलना सहन करावी लागतेय...!
      मग जागा होतो तो स्वाभिमान, जो जपण्यासाठी आयुष्यभर धडपडत होते, आयुष्यभर त्या स्वाभिमानाचा चक्काचूर झाला , म्हणून मग आतातरी होऊ द्यायचा नाही...!! समाजातील असे आजोबा-आजी सत्तर पंचाहतरीनंतरही तरुण असलेले, आयुष्याच्या संध्याकाळचं चिरतरुण जीवन जगतात.......!!
       कोण हातगाडीवर भाजी घेऊन बसतं, कोण केळी घेऊन खणखणीत आवाजात केळी घेण्यासाठी आरोळी देतंय तर कोण आणखीही गावातल्या वाण्याकडे भाकरी वारी हमाली करतंय...!!
कोण मंदिराची साफ -सफाई करतंय, कोण मार्केटवर काही काम करून, पण स्वाभिमानाने ताठ मानेने तरण्याबांड पोरासारखं ऐटीत चालतंय...!
     पण काही जीवनात हार मानतात, आहे ते दिवस ढकलायचेत म्हणून चालतायतं, आधुनिक म्हणणाऱ्या गर्दीतल्या समाजाबरोबर....
      तर काही आजी-आजोबांच्या आयुष्याच्या संध्याकाळी वृद्धाश्रमात गर्दी करताना दिसतेय हो ..!!
      पेपरात , दूरचित्रवाणी वर खूप कहाण्या वाचायला , बघायला मिळतात. नोकरीच्या ठिकाणी घेऊन जातो म्हणून आलेला लेक गावकडचं घरदार, शेत विकून, आई-बापाला स्टँड वर सोडुन गेलेल्या घटना जेव्हा घडतात तेव्हाही हाच प्रश्न पडतो , "हेच का लेका तुझे प्रेम...तुझ्या आई-बापावरचं ...!!"
हे दिवस बघण्यासाठीच का रे, त्यांनी तुझ्यासाठी पोटाला चिमटा घेऊन तुला तालुक्याच्या ठिकाणी महिन्याच्या पहिल्या तारखेला एसटी ड्रायव्हरकडे कापडात गुंडाळून पैसे पाठवले ...?
अरे लेका त्यांना तुझ्याकडून काहीच नकोय रे, फक्त दोनवेळची भाकरी अन् दोन आपुलकीचे शब्द..!!
        पण समाजात खूप विदारक चित्र आहे , नातवाकडे जे संस्कारांचं संक्रमण होतं, त्यासाठी आजी-आजोबांसारखं प्रभावी माध्यम दुसरं कोणतंच नाही.
       पण खेदजनक हे आहे की या आजी आजोबांची जागा मोबाईलने घेतलीय असं वाटतंय.....!!
     समाधानी आयुष्य जगण्यासाठी कशाचीच गरज लागत नाही...
जिद्दीला तरुण ठेवलं तर कायम समाधानी आयुष्य जगता येतं...!!
स्वाभिमानी माणसं अशीच असतात सदा सर्वदा तरुणाई फुललेली असते ....!!
    जी दिसतेय या जेष्ठांकडे, अनुभवाचं भांडार अन्  आयुष्यभर पुरून उरेल अशी संस्काराची शिदोरी असलेल्या आजी-आजोबांमध्ये....!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Wednesday, September 18, 2019

गाव अन् गावकडचं घर...!!

       कितीही दूर असलंतरीही गाव अन् गावकडचं घर यांचं आकर्षण कमी होत नाही ......!!
       गावातला दगडी बांधकाम असलेला वाडा, त्याच्याच पाठीमागे असलेली परसबाग अन् त्यात आजी-आजोबानीं; लेकरांप्रमाणे वाढवलेल्या वेगवेगळ्या फुलांची झाडं, काही सुगंधाने मोहून टाकणारी, तर काही सौंदर्याने खेचून नेणारी...!!!
आंब्या-फणसाबरोबरच नारळाची अन् औषधी गुणधर्म असलेल्या असंख्य वनस्पती ...!!
        किती छान असतं गावाकडचं जीवन, रात्रीच्या जेवणाला कोणताही डायनिंग हॉल फिका पडेल, अश्या सर्व भावंडे मिळून चंद्राच्या मंद प्रकाशात जेवणावळी बसायच्या; सुसंवाद अन् हास्यांची ललकारी उडून चंद्राला निरोप द्यायला निघून जायची ....!!!
      पण आत्ता काही राहिलं नाही,आत्ता राहिले फक्त आठवणींचे रिकामे सांगाडे......!! पण तीच आठवणींची पुंजी कामी येते; आत्ता कधी-कधी आनंदित करण्यासाठी ....!!
परसबागेतील बकुळीची फुलं जगण्याचं मूल्य सांगून जातं शेवटच्या क्षणांपर्यंत सौम्य सुगंधाची उधळत करत राहणं ...!!
हीच फुलं जीवनाचं तत्वज्ञान सांगून जातात आपण
ज्याला त्याला , ज्याच्या त्याच्या नजरेनं पाहिलं तर सर्व सुंदर दिसतं.
      सुट्टीचे दिवस संपुन गावातुन शहरात परतलं की आपण नक्की कुठले गावातले का शहरातले ? हा छळणारा प्रश्न ??
गाव बदलत नाही , गाव धुळीतल्या रस्त्यांची साथ सोडत नाही, गाव पुढं सरकत नाही ,
       पण त्या गावाने पाहिलेलं असतं तुम्ही मोठे होत असताना, त्या गावाने पाहिलेलं असतं तुमच्यातलं लहान मूल, त्याच गावाने पाहिलेलं असतं तुमच्या अंगातील असंख्य खोडी, तुमच्यातील सुप्त गुण आणि दोष ...!!!!
       ते गावचं शिकवते तुम्हाला तुमचे संस्कार ...
पण , पण त्या गावातही असतात अशी घरं, माणसं सोडून गेलेली मोडकळीस आलेली घरं ....ज्या घराने भोगली असतात तुमच्या बरोबर सुखं आणि अश्रुंचे क्षणही ...त्या घरातील अंगणाने दिला  असतो तुम्हास अनेक खेळांमधून आनंद ...!!! आणि त्याच अंगणाने दिलं असतं तुम्हास खेळताना झालेली जखम ...!!!
पण हीच मोडकळीस आलेली घरं आणि तेच अंगण वाट पाहत असतं कोणाची तरी हे नक्की ...!!
      पण त्याच अंगणातील प्राजक्त आत्ता पूर्वी सारखा बहरत नाही.
       गाव वाढत चाललंय, गावातील घरांच्या  मातीचा वास आत्ता सिमेंटच्या वासाने हरवून जातोय...!!
आत्ता जुनं घर इथं शोधूनही सापडणार नाही  ...!!!
आत्ता फक्तआठवणींचे सांगाडे आहेत ,असतील....!!!
पोपडे आलेल्या घराला पोतेरे मारणाऱ्या आई आणि आजीचं थकलेलं शरीर , तसचं संध्याकाळी शेतातून घरी येणाऱ्या बापाचा थकलेला आराम शोधणारा देह , आजोबांच्या हरिपाठाची आणि तुकोबांच्या अभंगाच्या सुखवणाऱ्या लयी ...!!!
        दारातलं मोठं गुलमोहराच झाड, त्याच्या शेंगा, त्याला उन्हाळयात येणारी लालबुंद फुलं किंवा क्वचित नाजूक हिरवी पानं ...!! ही अशी वाढत जाणारी रांग थांबनार नाही तरीही थांबावच लागणार...!!
      पण गावातील घरासमोरील अंगणातील पारिजातकाच्या फुलं तुला नेहमीच भुलवत राहतील, खेळवत राहतील त्यांच्या सुगंधाचा जोरावर .....अन् वाट पाहतच कोमेजून जातील पण तेही सुगधं देऊनच ......!!!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Sunday, August 4, 2019

प्रवासातलं जगणं...!!

     आयुष्यातला प्रवास सपंतच नाही हो ...!!
     जन्मापासून सुरू झालेला हा प्रवास , जिंदगी ला फुलस्टॉप भेटल्यावरच काय तो संपतो ....!!
     बालपणातलं स्वतःशीच खेळणं सर्वांना आवडतं, पण जेव्हा मोठे होतो, जबाबदारी येते, तेव्हा स्वतःशी खेळणं अन् पचवणं जिकिरीचं असतं,  कठीण जातं...!!
     नंतर थोडे मोठे झालो तर कुतूहलाने रांगत रांगत जाऊन आई अण्णांच्या (बाबांच्या) पायाला धरून उठण्याचा प्रयत्न करणं, आपल्यासाठी अन् आपलं कौतुक करणाऱ्या हितचिंतकांसाठी आनंदाचा क्षण असतो. पण आत्ता प्रवासात चालताना कुठं धडपडल्यासारखं झालं तरी आई बाबांना खुशालीत आहे हे पटवून देण्यात आंनद वाटतो ...!!
    आणखी वर्ष-सहा महिन्यांचं झाल्यावर आधार घेऊन उठून, छुण-छुण घातलेल्या पायांनी पहिलं पाऊल टाकताना,आण्णा-आईने वाजवलेल्या टाळ्या अन् चेहऱ्यावर ओथंमबुन वाहणारा आनंद आज ही हर्षभरीत करून जातो. पण आत्ता प्रवासात आधार घ्यावा वाटत नाही आधार व्हावा वाटतो , त्यांतच आनंद वाटतो...!!
     या प्रवासात वाट चालत असताना अडखळत , बोबडयाने टाकलेला पहिला शब्द ऐकताना घर अगदी आनंदाने नाहून निघालं असेल ....!! पण आज अडखळत बोललं तर आई बाबांना कळेल "कुछ तो हुवा है".....त्यामुळे मजेत बोललं जातं..
बालपणी चे दिवसचं भारी होते ते ....!!
     पण जीवनातला प्रवास संपत नाही हे तितकंच खरं...!!
शिक्षणासाठी आई बाबांच्या कुशीतली ऊब सोडावी लागली , घर, घरासमोरील अंगण सोडावं लागलं, गावातली गल्ली अन् गाव सोडावं लागलं, मित्र मंडळी,जाता येता आजी-आजोबांच्या तब्बेतीची चौकशी केल्याने निर्माण झालेलं, एक जिव्हाळ्याचं नातं , हे सगळं-सगळं विसरून जड पावलाने अन् तितक्याच जड अंतःकरणाने,भरल्या डोळ्याने, एका नव्या प्रवासाला सुरवात झालेली आजही डोळ्यासमोर तरळते, आत्ता प्रत्येकवेळी घरी जाताना आई-अण्णांबरोबरच , अंगण अन् गावातली गल्ली आतुरतेने वाट पाहते ...!!
     शिक्षण झाल्यावर कामानिमित्त हॉस्टेल ही सुटलं जातं
याच हॉस्टेलने खूप गोष्टी शिकवल्या , खूप आठवणी दिल्या.
आयुष्याच्या जडणघडणीत महत्वाचा वाटा या हॉस्टेलचा आहे
घरापासून दूर असल्यावर हेच हॉस्टेल आपलं घर मानायचं
अन् सुरवातीचे काही दिवस बळेच घालवायचे...!!
अन् तेच हॉस्टेल सोडताना, जेवढं घर सोडताना वाईट वाटलं  तेवढंच हॉस्टेल ची रूम सोडताना अन् शेवटच कुलूप लॉक करताना वाईट अन् डोळ्यात थेंब तरळून गेले..!!
पण त्या हॉस्टेल ने खूप आठवणी दिल्या....!!
     शिक्षणाच्या काळात युनिव्हर्सिटी मध्ये खूप चांगले मित्र मैत्रिणी  झाल्या. जीवनात कधी वाटलं ही नव्हतं एवढे जीवाला जीव देणारे मित्र होतील ....आज काही कारणास्तव त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कमी झाला असलातरी ते विसमूर्तित जाणं शक्य नाही...!
प्रवास काटत असताना काही गोष्टी सुटल्या जातात, सोडव्या लागतात...पण त्या कधी विसमूर्तित जात नसतात ...!!
    अश्या या प्रवासाचा हव्यास पांथस्त्याला सुटत नाही.
अनंत अडचणीतून मार्ग काढत, करावा प्रवास आनंदात
...! स्वतःबरोबर इतरांनाही करावी वाटप आनंदाची अन् याच प्रवासाचा महोत्सव करता यावा, महोत्सव व्हावा .....!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

Wednesday, July 24, 2019

आभासी जगातला "प्रवास"

      जीवनातल्या प्रवासात कधी कोणाचा थांबा येईल सांगता येत नाही.त्या थांब्यापर्यंतच्या प्रवासात खूप सारे त्याच वाटेने जाणारे वाटसरू एकमेकांना भेटतात..!!
      काहींचा प्रवास आनंदात होतो, कधी कोणाचं थांब्याच ठिकाण आकस्मित येतं. त्यांचा प्रवास संपतो, पण त्या प्रवासात त्याच्या बरोबर मागे राहिलेला प्रवासी हतबल होतो ,त्या थोड्या प्रवासात खिडकीतून बाहेर डोकावून खूप गोष्टी पाहिलेल्या असतात, काही अनुभवलेल्या अन् काहींविषयी स्वप्न पाहिलेली असतात.
पण अर्ध्याअधिक वाटेवर आपल्या सहप्रवाश्याने नाईलाजास्तव त्याच्या थांब्यावर उतरून घेतलेलं असतं. त्याचं उतरणं त्यालाही सोप्प नसतं, पण नियतीपुढे कोणालाच विजय मिळवता येत नाही, येणार नाही. या प्रवासात माणसं एकमेकांना भेटतात , पण त्या प्रवासाचा आनंद लुटण्याचं सौभाग्य सर्वांच्याच भाळी लिहिलेलं असतंच असं नाही .
      काहींच्या प्रवासातील रस्ता कापत असतांनाच स्वप्नांचे दोर ही तुटले जातात. तो थांबा कधी येणार हे पांथस्थ्याला ही माहीत नसतं त्यामुळे त्याचा कोणता शब्द, कोणतं वाक्य हे शेवटचं असेल हे सांगता येत नाही. जीवनाच्या या प्रवासात फिरून तो वाटसरू मिळेलच असं अजिबात नाही. म्हणून उगवलेला प्रत्येक दिवस हा प्रवासातील शेवटचा दिवस आहे असचं जगता आलं तर त्याने आयुष्यात सारं कमवल्यासारखं होतं.
     आपण स्वाभिमानाच्या गोंडस नावाखाली अहंकारच विष कधी जपून ठेवतो हे आपल्यालाही कळत नाही. कारण नसताना एकमेकांविषयी आकस ठेवतो. आपण या पृथ्वीवरील पाहुणे आहोत हेच विसरले जातो.अन् मग इथूनच चालू होते तीअहंकारी वृत्ती.
      स्वतःला या भल्यामोठ्या विश्वाच्या पसाऱ्यातील छोट्याश्या ग्रहावरील एक छोटा क्षुद्र प्राणी आहोत हे मान्य केलं तर प्रवास नेटका जरी असला तरी आनंदाचा होईल.
      कोणता कॉल, कोणता sms , कोणता शब्द शेवटचा असेल हे माहीत नसतं कदाचित तो कॉल कधीच न येण्यासाठी असू शकतो किंवा परत तो कॉल रेसिव्ह ही होऊ शकत नाही. तुमच्या मोबाईल मध्ये नंबर सेव्ह असेल पण तो कधीच लागणार नाही.
     त्यामूळे मिळालेला प्रत्येक क्षण भरभरून जगता यावा.
          भेटावं तेही शेवटची भेट असल्यासारखं
          बोलावं भरभरून शेवटच्या शब्दासारखं
      परत वेळ निघून गेल्यावर हळहळ व्यक्त करण्यापेक्षा अन् गोडवे गाण्यापेक्षा, आहेत तोपर्यंत ego, स्वाभिमान, अहंकार बाजूला ठेऊन बोलाच सर्वांशी अगदी भरभरून मन मोकळे पणानं...!!
      अहंकाराला बाजूला ठेऊन एकदा मारा हाक तुमच्याच जिवाभावाच्या माणसांना, वेळ निघून जाण्या अगोदर, दूर निघून जाण्याअगोदर.....!!!
      अन् हा जीवनाचा प्रवास आनंदात करण्यासाठी प्रयत्नवत असावं.....!! जीवनाच्या प्रवासात आनंद देत चालत राहावं दिगंतरापर्यंत...!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

जग अन् जगणं...!!!

  नैऋत्य मोसमी वारे चालू होऊन बरेच दिवस झाले होते पण अजून मान्सून म्हणावा तसा चालू झाला नव्हता. हा, पण या वाऱ्यांमुळे हवेतला उकाडा कमी होऊन ...