Saturday, May 23, 2020

आम्ही गावाकडचे की शहराचे...??


     भौतिकशास्रामध्ये पदवी पूर्ण केली, पदव्युत्तर शिक्षणासाठी युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश मिळाला , त्यात उत्सुकतेची बाब म्हणजे नावाजलेल्या भौतिकशास्र विभागात पदव्युत्तर शिक्षण घेता येणार यामुळे प्रचंड खुश...!!
     त्याचबरोबर उदासीनतेनेही पाठ सोडली नाही, पहिल्यांदाच घर सोडावं लागणार , आई-आण्णांपासून दूर जावं लागणार...!!
नवीन मित्र-मैत्रिणी , हॉस्टेलला जमेल का...?? वैगरे, वैगरे असंख्य प्रश्नांनी डोक्यात विचारांचं काहूर माजवलं होतं.
     पण उत्साह होताच काहीतरी नवीन शिकायला मिळणार, जयकरसारखं लाखोंचं पुस्तक भांडार वापरायला मिळणार......!!
आजपर्यंत रिझल्टवरच दिसलेली युनिव्हर्सिटीची मेन बिल्डिंग अनुभवास मिळणार वैगरे वैगरे....!!
      तालुक्याचं गाव सोडून दुसऱ्या मोठ्या शहरात जाण्याचा/राहण्याचा कधी सबंध आला नव्हता, नव्हे नव्हे योगच नव्हता..!!
     आता पहिल्यांदाच पुण्यात जावं लागणार होतं, मनाच्या एका कोपऱ्यात कुतुहुल ही होतं तर दुसऱ्या कोपऱ्यात असुरक्षितता....!!
     कुतुहुल का...?? तर विद्येचं माहेर घर म्हणलं जाणाऱ्या शहरात M.Sc करायला मिळणार होती अन् त्यात भरीसभर युनिव्हर्सिटीमध्ये..., आणि  असणारं पुण्याचं आकर्षण वेगळंच...!!!
     तर हे शहर आपल्याला स्वीकारेल का..?? याबाबत असुरक्षितता, आपण काहीतरी विभिन्न आहोत काय की ...?? हा न्यूनगंड....
     अशी एकंदरीत अवस्था असतानाही आई-आण्णांपासून कधीही दूर न जाणारा मी , जेव्हा पुण्याला निघालो तेव्हा आईच्या डोळ्यात अश्रू होते अन् तीच गत माझीही होती...!! 
     अश्रू नयनांनी लाल डब्याने धावपळीचा प्रवास सुरु झाला , ओळखीची माणसं, ओळखीची धुळीची वाट, गावातली ती गल्ली अन् वळणावरील गप्पांचा कट्टा हा सर्व ओळखीचा प्रदेश झटपट मागे टाकत एसटी भरभर शहर जवळ करत होती...!!
     मायानगरी भल्यापहाटे चालू होणारी अन् रात्री 12-1 पर्यंत जागी असणारी पुण्य नगरी....अन् यामध्ये आत्ता सुरू होणार होता, स्पर्धेच्या जगातील  जीवघेण्या गर्दीतला कायमच धावपळीचा प्रवास......! जसं एसटीची चाकं फिरत होती, तसं डोक्यात विचारांचं काहूरही गरगर फिरत होतं.
     आता गाव , गावातील गल्ली, घर अन् अंगण हे सगळं सुटणार होतं, सुट्टी भेटली म्हणून कधी गावी आलोच तर तो ही कायमचा पाहुणा म्हणूनच येणार होतो, स्वतःच अंगण आता परका म्हणून पाहणार होतं, ज्या अंगणाने पाहिलंय माझं पहिलं पाऊल टाकताना लटपटणारे पाय, ऐकलंय माझ बोबड बोलणं अन् हासलही असेल मनोमन, हे तेच अंगण ज्याने पाहिलंय सुखद क्षण अन् दुःखद आठवणीही, यानेच दिल्या होत्या काही सुखद तर काही दुःखद जखमा आता त्याच अंगणात मी पाहुणा म्हणून परका तर होणार नाही ना....?? या विचारांनी डोकं सुन्न होत होतं अन् डोळ्यांच्या कडा ओलसर...!!
     गावातील उनाडक्या केलेले दिवस, अंगणातली बाग , पारावर बसणारी जेष्ठ मंडळींची बैठक अन् त्यांच्या गप्पा...!! सर्व -सर्व डोळ्यासमोर तरळत होतं, जसं-जसं एसटी शहर जवळ करत होती तसं तसं या माझ्या गावाच्या गोष्टीपासून दूर जात होतो...!!
जेव्हा कधी शहरातल्या गर्दीत एकटा हरवून जातो ना तेव्हा- तेव्हा प्रत्येकवेळी हाच प्रश्न आजही पडतो.
                    आपण गावाकडचे की शहराकडचे...?
     गावाकडचे म्हणावं तर आपण इथे फक्त सुट्टी मिळाली तर काही काळासाठीच येतो म्हणजे पाहुणे बनुनच...!!
अन् शहराचे म्हणावं तर शहर कधी आपलंसं वाटलंच नाही, इथं दिसते ती फक्त जीवघेणी स्पर्धा, जीव गुदमरून टाकणारी, इथली माणसांमध्ये कधी मायेचा ओलावा, आपलेसे पण कधी जांवलंच नाही...!!
     मात्र ना गाव सुटलं गेलं, ना शहराने स्वीकारलं....!!
     गावाकडचं निरागस प्रेम इकडं कधी दिसलं नाही अन् शहर बदलत गेली पण माझ्या गावाने धुळीची वाट सोडली नाही. आई-आजीने सारवलेली भिंतीतून येणारा पहिला पावसाचा सुगधं आजही विसरत नाही...
     आजोबांनी गायलेले भल्या पहाटेचे ज्ञानोबा-तुकोबांचे अभंग अन् दिवे लागणीच्या वेळेचा हरिपाठ कानात आजही गुणगुणत राहतो, एक मृत्तिमंत भास देतो...!!बापाचा काम करून थकणारा देह आजही अंगणात आला की उत्साहित होतो...!!
कातरवेळीची शांतता अन् प्रसन्नता जाणवत नाही.
हे सर्व-सर्व आता चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोर तरळत होतं
तसं शहरात यातलं काहीच अनुभवता येणार नव्हतं, इथं फक्त गर्दीतलं जीवमुठीत धरून जगणं अन् गाड्यांचे कर्कश आवाज, शांत झोप ही न येऊ देणारे... हे सगळं वास्तव होतं ते स्वीकारावच लागणार आहे....
अन् परत शहराकडे पावलं टाकावीचं लागणार आहेत .
न थकता ......!!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

No comments:

Post a Comment

जगण्यातलं विश्व अन् विश्वातले आपण..!!

वाचलेलं अनुभवणं,  अनुभवलेलं लिहिणं, त्यातून भावलेलं  आत्मसात करणं, आत्मसात केलेलं टिकवून ठेवणं, टिकवलेलंच जगणं होणं, त्याच जगण्याचा हेवा वाट...