Sunday, August 4, 2024

पाऊस, जगणं अन् उमलणं....!!

 

पाऊस,

नुकतच रांगायला लागलेल्या

बाळासारखा अंगाखांद्यावर 

अंगणात खेळणारा...

पायातल्या छुणछुण आवजासम

संततधार सरींचा

कानात नाद घुमणारा...


पाऊस,

कित्येक दिवसांच्या 

'ति'च्या विरहाच्या

प्रश्नांचं उत्तर हलकेच देणारा...

कित्येक दिवसांचा आकस 

काही क्षणात वाहून नेणारा...


पाऊस,

पानांवरून घरंगळताना

'ति'च्या गालावरच्या निखळ खळीची

आठवण देणारा...!!

काहीकाळ खळीतच 

मन गुंतवणारा...!!


पाऊस,

जुन्या मित्रांबरोबरच्या

चहाच्या टपरीवरच्या 

हास्य लहरींमधल्या 

जुन्या आठवणींचा 

वाफाळता चटका देणारा...!!

सिगारच्या धुराबरोबर

आठवणी हवेत धूसर करणारा...!!


पाऊस,

जुन्या-नव्या आठवणींच्या

सरितेवरचा साकव तो जोडणारा...!!

त्याच साकवावर 

चिंब केलेल्या 

पावसाबरोबर 

पापण्या 

ओलावणारा...!!


#पाऊस❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

No comments:

Post a Comment

तिन्हीसांज अन् कॅफे...!!

  वेळ संध्याकाळची,  पिटर कॅफेच्या नेहमीच्या टेबलावरती 'तो' बसलेला....!! त्याची ती नेहमीची जागा , कॅफेत असलातरी समपारदर्शक काचेतून धा...