Thursday, September 28, 2023

जगणं.... ज्याचं.. त्याचं

 


चहू बाजूंनी आभाळ भरून आल्यावर 

आज तो भरभरून कोसळला,

दाटून आलेल्या मनाला 

हलकेच चिंब करून गेला...!!


संथ कोसळताना त्याने 

एकांताची जाणीव दिली,

तूच तुझा साथी म्हणत 

पाठीवर आश्वासक थाप दिली,

अन् पडताच मातीत मिसळताना

त्याने जगाची रीत सांगितली...!!


वाऱ्यासंग गडगडाट करत,

लढल्याचा शंखात नाद भरत,

कदाचित सांगून गेला कानात,

घेऊन उसनं अवसान  लेका,

उतरायचं नसतं जगाच्या युद्धात...!!


आता आणून लेका बळ मनगटात,

असतो सुकाणू  तोलायचा,

करून जीवनाची मशागत आता

काळ हा रण गाजवायचा..!!


पहा त्या तिथल्या क्षितिजाले,

रान फुललेलं बघण्यास लेका

आई बाचे डोळे आतूरलेले...!!


असेल जरी सूर्य पश्चिमेकडे झुकलेला

पण तरीही कष्टाचा दाह मात्र दुसऱ्या प्रहराचा,

अट्टाहास तयांचा फक्त पूर्ण स्वप्न तुझी पाहण्याचा...

.!!


#जगणं❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

Friday, September 22, 2023

अन् पाऊस...!!


 तिन्हीसांजेच्या वेळी,

'तो' आज बेधुंद बरसला...!


कोणा चाहूल न देता,

तीच्यासवे एकरूप जाहला..!


गरंगळत पानांवरून असा 'तो' आला,

जसा कोणा परीच्या गालांवरून,

कोण्या प्रियकराने अचूक त्याला टिपला..!


जसा शातंतेत 'तो' आला,

तसा शांततेच जाईल...!

पुन्हा अनीच्छित काळासाठी,

विरहाने व्याकुळ होऊन वाट 'ती' पाहिल..!


काही क्षणांच्याच त्याच्या भेटीत,

कुशीत तिच्या फुलं उपजतील..!!

वाऱ्यासवे दुडदुडत राहून,

आसमंतात सुगंध पेरतील..!


याच साठी विरहाच्या काळातही ,

दोहांतला साकव मात्र अतूट राहील...!

अन् अखंडपणे सुगंध पेरीत राहील बकुळासवे

शांत... अन् सौम्य.....!!


#पाऊस❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

Tuesday, September 19, 2023

क्षण कातरवेळीचा...!!


 तिन्हीसांज झाली रंग तांबूस लेवून,

पडत्याला आधार देऊन,

जातो निरोप 'तो' घेवून...!!


लागलेल्या ठेचानां, पोळलेल्या पायांना,

जेव्हा वारा स्पर्शून जातो,

तेंव्हाच जगण्याचं गणित

'तो' पुढ्यात मांडतो....!!


जाताना सुद्धा क्षितिजापल्याड 'तो'

मनी रंग मावळतीचे सोडतो...!!

म्हणूनच क्षण तो कातरवेळीचा

घडवून भेट आपुली , आपुला भासतो...!!


#कातरवेळ❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

Monday, September 11, 2023

रात्र...!!


गडद अंधाऱ्या वाटेवर, 

रातकिडेही भीती दाखवती...!

तेव्हाच काजव्यांच्या साथीने,

अचूक पावले ती पडती...!


अंधाराचा घेऊन फायदा,

तो मात्र धो-धो कोसळला...!

तेंव्हाच रातराणीच्या सुगंधाने,

माझा अंगण मात्र दरवळला...!


साक्षीने, अंधारलेल्या चंद्राच्या,

रात्र मी जागुन काढली...!

स्वप्न उद्याचे रंगवताना,

अश्रूंनी साथ मात्र केली...!


पारिजातकाच्या झाडावरून,

आता रात्र उत्तरेकडे सरली,

स्वप्नांना कुशीत घेऊन,

नवजात बालकासम विसावली..!


काळरात्रीत या आता,

शोध काजव्यांचा घेऊन,

रातराणीचा सुगंध,

पाठीशी बांधून..!

उंचावू विजयाची पताका,

स्वप्नांचं क्षितिज ते गाठून....!!


#रात्र❣️

#जिंदगी_का_फंडा🍃

शोध...!!

शीण दिसाचा तोलायला  सांज अप्रूप भासे, पुनवेच्या चांदण्याला  ओलावल्या पापण्या हलकेच दिसे... भार हा दिसाचा रात अलगद पेलते, उतरणीला जाताना  गूज...