Monday, June 10, 2019

गावाकडची सांजवेळ...!!!

        गावाकडची सांजवेळ ही बेभान करणारी असते..!!
परदेशी जाणारा सुर्य रंगांची उधळण करत जातो,
ती उधळण त्याच्यासाठी महोत्सव असतो.

      पण त्या  रंगांच्या छटांची उधळण मनात एक अनामिक कालवाकालव करत असते..!!
कितीही समजवलं स्वतःला तरी तो महोत्सव एक हुरहूर लावून जातो...!
      यावेळी उगाच कोणाची तरी आठवण येणं,माहीतही नसतं कोणाची आठवण येतेय.पण उगाच एखादी जुनीपुराणी गोष्ट, चित्रपट उभा राहावा तशी इथंभूत डोळ्यासमोर उभी राहते...!
विनाकारण डोळ्यांच्या कडा ओलावतात, अनामिक कसल्यातरी ओढी ने कासावीस होतं..!
      ही अनामिक हुरहूर कमी होते ती सांजवेळ संपल्यावरच..!
गंमत म्हणजे एखाद्या विशिष्ट जागेवर जाऊन बसून तो उत्सव निर्विकार होऊन पाहत बसलं तर आपोआप ती हुरहूर कमी होऊन, शांत वाटतं..!!
     पण ही सांजवेळ अनुभवयास मिळते ती गावाकडेच...!
शहराच्या सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्याला हा महोत्सव, ही निसर्गाची अगाधलीला पाहवयास, अनुभवयास अन् त्याचा आनंद लुटावयास नाही मिळतं. पण हा दैवी सोहळा बघण्याची मज्जा काही औरच...!!
      गावांकडे दिसणारा सांजवेळीचा सूर्याचा लाल गोळा जसा जसा क्षितिजाआड जायला लागतो तसा तसा मनात कल्लोळ उठतो..!
      त्याचं क्षणा-क्षणाला क्षितिजापल्याड जाणं मनांत दुखरी नस रुततेय असं क्षणभर वाटतं...!!
     सगळं आभाळ तांबड्या रंगांनी भरून गेलंय आणि छोटी प्रकाशाची लाल छटाही आवरून निघायच्या तयारीला लागली आहे.
     ती छटा नजरे आड होते न होते तोच वाऱ्याची एक मंजुळ थंडगार झुळूक मनाला खिलवून अन् अंगावर शहारे आणते..!!
ती बोचरी हवहवीशी झुळूक काहीतरी संदेश घेऊन आलीय असा भास होतो.... कदाचित, "सूर्य गेला......" हाच संदेश असावा तो...!!
    महोत्सवातुन जागं करण्यासाठीच आली असावी ती झुळूक ,झुळूक नाहीच ती, ती तर कुजबूज,केलेलं हितगुज...!!
      या सांजवेळी सारेजण परतीच्या प्रवासाला लागतात. मुक्कामाच्या प्रवासाला....!!
     सूर्यास्ताचा अटळ महोत्सव मनात उलथापालथ करतो. खळबळून काढतो. तरीही हवासा वाटतो....
      आयुष्यात अशी सांजवेळ, कातरवेळ अनुभवावी एकदातरी..!!
पहावा महोत्सव नयनभरल्या डोळ्यांनी , प्रसन्न मनाने...!!

#जिंगदी_का_फ़ंडा🍃

2 comments:

माझी आई....!!

 जे जे चांगुले या देहात ती देन तूझीच आई...!! कष्टाळलेल्या घामाची होणार नाही कधीच उतराई...!! जशी शिवबांची जिजाई, तशीच असते लेकरांची आई....!! ...