तिन्हीसांजेचं एकाकीपण डोईवर घेऊन आतमध्ये डोकावू पाहणारं मन हल्ली खूप कमीवेळा भेटावयास येतं. पण जेव्हा भेटतं तेव्हा कित्येक दिवसांची उतराई मात्र करत असतं.
अशीच एक तिन्हीसांज कित्येक दिवसांनी भेटत होती त्यात कसलीही घाई नव्हती. कुठं जायचं नव्हतं ना कुठं थांबायचं बंधन होतं.
तो, त्याची एक बंद खोली अन् खिडकीतून डोकावणारी तिरपी सोनेरी किरणं...
त्याच्याच तंद्रीत तो तिन्हीसांजेस पाठीमागे हात बांधून एकांत अनुभवत होता. पाठी बांधलेल्या हाताच्या बोटांची कसलीशी चुळबूळ मात्र चालू होती. कुठलीशी न सुटणारी आकडेमोड करत बोट चाळत होता कुठला हिशोब होता त्यालाच माहित. बाहेर पावसाळी वातावरण भरून येत होतं, पाहता पाहता तिन्हीसांज ढगांनी आच्छादून जात होती. पण त्याला याचं काही घेणं देणं नव्हतं. त्याला यापासून दूर कोणतरी घेऊन जात होतं. आयुष्यातले कुठलेतरी, बोटांनाही ठाऊक नसलेले कित्येक हिशोब तो चाळत होता. यात
काही पैशांचे, काही उधारीचे, काही मानाचे, काही अपमानाचे, काही प्रेमाचे, काही विरहाचे, काही हुकलेल्या संधीचे, काही हिरावलेल्या घासाचे, काही चुकलेल्या वाटांचे, काही चुकवलेल्या वाटांचे,
काही मिळालेल्या ठेचांचे, रक्ताळलेल्या पावलांचे,
काही आठवणीतल्या क्षणांचे, तर काही क्षण कधीच न सांगता येणाऱ्या आठवणींचे...
असे कित्येक बोटांवर हिशोब न मांडता येणारे, कधीच न उलगडता येणारे कोडी बोटांनी चाळत होता . यात तिन्हीसांज सरून गेल्याचं भान ही त्यास उरले नव्हते. तो मात्र आपल्याच दरवाजा बंद केलेल्या खोलीत येरझाऱ्या मारत होता. अगदी स्तब्ध होऊन....
खोलीत काही जिवंत होतं तर ती फक्त भिंतीवर लटकवलेल्या घड्याळाच्या काट्यांची टिक टिक......
त्याने दरवाजा जरी बंद केला असला तरी मात्र खिडकी बाहेरच्या जगाची चाहूल देत होती... हीचतर कदाचित खासियत असते खिडकीची...
आपल्याला वाटेल तेव्हाच जगाची चाहूल घेण्याची खुबी जपून ठेवलीय तिने.... हेवा वाटला सजीव वाटणाऱ्या निर्जीव खिडकीचा....
घड्याळाच्या टिक टिक शिवाय काहीच ऐकू न येणाऱ्या खोलीत... आता मात्र त्यास खिडकीत आणून उभं केलं होतं....नियतीच ती....वाऱ्याने पानांबरोबर घातलेला संग, कोकिळेने गायलेलं विरहाचं गाणं हे अनुभवता येत होतं...
संगतीला तिन्हीसांजेची वेळ झाली होती नुकत्याच पावसाळी दिवसांची, नैऋत्य मोसमी वाऱ्यांची लगबग चालू होती. काळया ढगांसवे अगदी कोंदटून आलं होतं. पाऊसही कसल्या न सुटणाऱ्या कोड्यासारखा श्वास रोखून घालमेल करत होता. याचा हिशोब मनात दाटून आलेल्या भावनांचा होता तर खिडकीबाहेर त्याचा हिशोब वाऱ्याबरोबर मांडलेल्या ढगांच्या लपंडवांचा होता.
आजची ही सांजवेळ काही तरी खुणावत होती मनातली घालमेल खिडकीपाशी उभा होती...
दरवेळी एकट्याची वाटणारी लढाई आज मात्र कोणतरी सोबती आहे याची ग्वाही देत होती... कित्येक वर्षांनी तो हे सगळं अनुभवत होता... .. त्याचमुळे कदाचित बोटांची चाळण अन् घालमेल आता हळूहळू मंदावली होती...
घड्याळाच्या टिक टिक विना घेतलेला दीर्घ श्वास अन् थंडावा घेऊन येणारा मोसमी गार वारा यांची जाणीव आताश्या होऊ लागली होती.
कोंदटून आलेलं आभाळ आता काहीस शांत झालं कदाचित न सुटणाऱ्या कोड्याचं उत्तर त्यास दूर क्षितिजावर गवसल होतं.
याच तंद्रीत तो अजूनही खिडकीतच उभा होता. तिन्हीसांजेच्या धूसर प्रकाशात वाऱ्याची झुळूक आली येताना त्याने मात्र थंड पावसाची सर घेऊन आली.
हा हा, म्हणता-म्हणता पहिल्या पावसाच्या पहिल्या सरी पुढ्यात पडल्या. वाऱ्याच्या थंड शिडकाव्याने आलेला क्षीणवटा नाहीसा केला.
कोंदटलेलं मन अन् आभाळ बरसू नकळत लागलं....दरवाजाच्या नकळत खिडकीस मात्र ते जाणवलं.
ओसरीच्या सरी कधी दारातून घरात येत नाहीत पण खिडकी मात्र त्यांना अडसर ठरत नाही. मग खिडकीतून दिसणारा लालबुंद गुलमोहर नव्या क्षणाचा आनंद दिल्याशिवाय राहत नाही. त्याच्यावर पडणाऱ्या तिन्हीसांजेच्या सोनेरी किरणांना अजूनच साद देत राहतो. तेच तेजोवलय, टोचणारी जळमटं दूर करून पहिल्या पावसाच्या सरींबरोबर कित्येक आठवणीना उजाळा देऊन नव्या क्षितिजाला भेटावयास पुन्हा सज्ज करत असते.
प्रत्येक वर्षीचा पाऊस पुन्हा नव्याने वेगळा भासतो,
पुन्हा नव्या गुलमोहरासारखं जगणं फुलवत राहतो कितीही न सुटणारी कोडी आली तरी आयुष्याचा गुलमोहर सजवणे सोडायचं नसतं... जगणं हे असंच असतं
मिळालेलं गमावलेलं प्रत्येक सांज विचारत राहते अन् पावसासारखं सगळं वाहून नेते पुन्हा नितळ होण्यासाठी पुन्हा गुलमोहोर फुलवण्यासाठी..... म्हणून एकांतातली सांजवेळ अनुभवता यावी ...!!
#जगणं ❣️
#जिंदगी_का_फंडा 🍃
सुंदर..Keep Writing 🍂
ReplyDeleteThank you 🤩
ReplyDeleteखूपच छान....keep it up...❣️
ReplyDeleteThanks a lot 😊
Delete