Wednesday, September 18, 2019

गाव अन् गावकडचं घर...!!

       कितीही दूर असलंतरीही गाव अन् गावकडचं घर यांचं आकर्षण कमी होत नाही ......!!
       गावातला दगडी बांधकाम असलेला वाडा, त्याच्याच पाठीमागे असलेली परसबाग अन् त्यात आजी-आजोबानीं; लेकरांप्रमाणे वाढवलेल्या वेगवेगळ्या फुलांची झाडं, काही सुगंधाने मोहून टाकणारी, तर काही सौंदर्याने खेचून नेणारी...!!!
आंब्या-फणसाबरोबरच नारळाची अन् औषधी गुणधर्म असलेल्या असंख्य वनस्पती ...!!
        किती छान असतं गावाकडचं जीवन, रात्रीच्या जेवणाला कोणताही डायनिंग हॉल फिका पडेल, अश्या सर्व भावंडे मिळून चंद्राच्या मंद प्रकाशात जेवणावळी बसायच्या; सुसंवाद अन् हास्यांची ललकारी उडून चंद्राला निरोप द्यायला निघून जायची ....!!!
      पण आत्ता काही राहिलं नाही,आत्ता राहिले फक्त आठवणींचे रिकामे सांगाडे......!! पण तीच आठवणींची पुंजी कामी येते; आत्ता कधी-कधी आनंदित करण्यासाठी ....!!
परसबागेतील बकुळीची फुलं जगण्याचं मूल्य सांगून जातं शेवटच्या क्षणांपर्यंत सौम्य सुगंधाची उधळत करत राहणं ...!!
हीच फुलं जीवनाचं तत्वज्ञान सांगून जातात आपण
ज्याला त्याला , ज्याच्या त्याच्या नजरेनं पाहिलं तर सर्व सुंदर दिसतं.
      सुट्टीचे दिवस संपुन गावातुन शहरात परतलं की आपण नक्की कुठले गावातले का शहरातले ? हा छळणारा प्रश्न ??
गाव बदलत नाही , गाव धुळीतल्या रस्त्यांची साथ सोडत नाही, गाव पुढं सरकत नाही ,
       पण त्या गावाने पाहिलेलं असतं तुम्ही मोठे होत असताना, त्या गावाने पाहिलेलं असतं तुमच्यातलं लहान मूल, त्याच गावाने पाहिलेलं असतं तुमच्या अंगातील असंख्य खोडी, तुमच्यातील सुप्त गुण आणि दोष ...!!!!
       ते गावचं शिकवते तुम्हाला तुमचे संस्कार ...
पण , पण त्या गावातही असतात अशी घरं, माणसं सोडून गेलेली मोडकळीस आलेली घरं ....ज्या घराने भोगली असतात तुमच्या बरोबर सुखं आणि अश्रुंचे क्षणही ...त्या घरातील अंगणाने दिला  असतो तुम्हास अनेक खेळांमधून आनंद ...!!! आणि त्याच अंगणाने दिलं असतं तुम्हास खेळताना झालेली जखम ...!!!
पण हीच मोडकळीस आलेली घरं आणि तेच अंगण वाट पाहत असतं कोणाची तरी हे नक्की ...!!
      पण त्याच अंगणातील प्राजक्त आत्ता पूर्वी सारखा बहरत नाही.
       गाव वाढत चाललंय, गावातील घरांच्या  मातीचा वास आत्ता सिमेंटच्या वासाने हरवून जातोय...!!
आत्ता जुनं घर इथं शोधूनही सापडणार नाही  ...!!!
आत्ता फक्तआठवणींचे सांगाडे आहेत ,असतील....!!!
पोपडे आलेल्या घराला पोतेरे मारणाऱ्या आई आणि आजीचं थकलेलं शरीर , तसचं संध्याकाळी शेतातून घरी येणाऱ्या बापाचा थकलेला आराम शोधणारा देह , आजोबांच्या हरिपाठाची आणि तुकोबांच्या अभंगाच्या सुखवणाऱ्या लयी ...!!!
        दारातलं मोठं गुलमोहराच झाड, त्याच्या शेंगा, त्याला उन्हाळयात येणारी लालबुंद फुलं किंवा क्वचित नाजूक हिरवी पानं ...!! ही अशी वाढत जाणारी रांग थांबनार नाही तरीही थांबावच लागणार...!!
      पण गावातील घरासमोरील अंगणातील पारिजातकाच्या फुलं तुला नेहमीच भुलवत राहतील, खेळवत राहतील त्यांच्या सुगंधाचा जोरावर .....अन् वाट पाहतच कोमेजून जातील पण तेही सुगधं देऊनच ......!!!!!

#जिंदगी_का_फ़ंडा🍃

2 comments:

माझी आई....!!

 जे जे चांगुले या देहात ती देन तूझीच आई...!! कष्टाळलेल्या घामाची होणार नाही कधीच उतराई...!! जशी शिवबांची जिजाई, तशीच असते लेकरांची आई....!! ...