Friday, March 22, 2019

पाणी पेटतं तेव्हा .....!!!

 

      हेच आग विझवणारं पाणी,
दुष्काळात कधी पेट घेतं हे कळतंच नाही ....!!
'पाणी जपून वापरा' हे वाक्य आम्हांला नवीन नाही माय-बाप...!!
        तरी सुदधा आम्ही पाणी कधी जपून वापरतच नाही ओ ...
कारण आम्ही पाहिलेलं नसतं, माझी माय घागरभर पाण्यासाठी भर उन्हात मैलो न मैल दूर भटकते,तेव्हा कुठं तिला घागरभर पाणी मिळतं ....!!
        माथ्यावर आग ओकणारा सूर्य, अन् पाय पोळवणारी धरती यामध्ये माझी माय भोवळ येत असताना सुद्धा भटकते ओ मैलो न मैल दूर...!!!
       पाण्यासाठी तिची ओढाताण एवढ्याचसाठी असते की
तिची लेकरं अन् लेकरांप्रमाणेच प्रेम करणाऱ्या जनावरांची दुष्काळाच्या झळानीं पाण्याविना लाही-लाही होत असते ओ ...
पण आम्हांला त्याची थोडी पण झळ पोहचत नाही..
आम्ही आमच्या सुखासाठी उन्हाळ्यात शॉवरने दोन दोनदा आंघोळ करतो अन् एका बादली मध्ये होणाऱ्या अंघोळीसाठी 3-4 हंडे वाया घालतो..!
        तर त्याच 3-4 हंड्यासाठी-घागरींसाठी माझी माय भटकत असते ओ; भोवळ येत असतानाही ....!!!
          आम्हांला कल्पनासुद्धा नसते याची म्हणूनच आम्ही उडवतो मुबलक पाणी कॉर्पोरेशन चं समजून ...!! ज्या पाण्यासाठी माझी माय भटकते भर उन्हात..!!!
        हेच पाणी असतं की ज्याच्यामुळे माझ्या बळीराजाकडे एका दाण्याचे हजार दाणे बनवण्याची क्षमता असते...!!
हेच पाणी जे विझवतं आग...!!!
           पण दुष्काळात त्याच पाण्यासाठी , अन् पेंढीभर चाऱ्यासाठी माझा बळीराजा गुरांच्या छावणीत गुरांप्रमाणे राहतो ओ...!!!
         जोपर्यंत पाण्याचा टँकर येत नाही अन् जोपर्यंत त्यांच्या सर्जा-राजाला पाणी पाजत नाही, पेंढीभर खायला घालत नाही तोपर्यंत माझा बळीराजा घास पण मुखात घालत नाही ओ ...!
मग कधी कधी टँकर संध्याकाळी येतो तर कधी रात्री ...!
तर कधी कधी आमचे राजकारणी लोकं, तो चारा सुद्धा खातात ओ ...!! जे कुळ भगवान कृष्णाचं पवित्र यादव कूळ म्हणतो , जिथं महाभारत घडलं असं मानतो,  अशा या पवित्र जागेवर असं घडताना पाहिलयं ओ ...!!
          अन् हे सर्व जवळून बघतील ना, तेव्हा हा प्रश्न पडणार नाही, की माझा बळीराजा का करत असावा आत्महत्या???            'अचलपूर'च्या आमदारांसारखं आमच्या बळीराजाच्या बाजूने खंबीरपणे का कोण उभे राहत नाहीत ओ??
        आमच्या बळीराजाच्या बाजूने कायम विरोधीपक्षच असतो!...हीच शोकांतिका..!!
       निसर्गाने साथ दिली तर तुमच्या थट्टा उडवणाऱ्या पॅकेज ची गरजच नाही ओ ....
       आभाळ भरून आल्यावर खुश होणाऱ्या माझ्या बळीराजाला परीस्थितीचं ओझं कधीच वाटत नाही;कारण मेहनत करुन परिस्थितीवर मात करण्याचा ध्यास फक्त  बळीराजाच्याच रक्तात असतो..!!
       काळ्या आईचं ऊर फाडून शेती कसणाऱ्या माझ्या बळीराजाचा भेगा पडलेला हात,  नि:शब्द पण बोलकी प्रतिक्रिया देऊन जातो...!!
      दुष्काळी दौरा करण्यासाठी तुमचा ताफा येतो,
पण त्या ताफ्यामूळे उडणाऱ्या धुळीतच माझ्या बळीराजाचं दुःख झाकोळून जातं, तुमच्या पर्यंत पोहचतंच नाही ओ ...!!
#SaveWater
#लाखाचा_पोशिंदा_बळीराजा
#जिंदगी_का_फ़ंडा🌿

14 comments:

अटळ 'अर्जुन'तम...!!

  प्रत्येकाची स्वतंत्र ही लढाई, कधी कृष्ण, कधी अर्जुन तर कधी बनून कर्ण करायची उतराई...!! चूक बरोबर , चांगलं वाईट, याच्या परिसीमा व्यक्तीगणिक...