पावसाळा सुरू होऊन जेमतेम पंधरा दिवस झाले होते,पण पावसाच्या पहिल्या सरींमुळे झाडांना पालवी फुटून निसर्गाने अगदी हिरवा शालू पांघराला होता.रानफुलांनी रंगबिरंगी चादर ओढली होती, त्या फुलांभोवती भ्रमरांची भ्रमंती चांगली वाढली होती.
अधून-मधून येणाऱ्या पावसाच्या सरी आणि त्यांना वाहून आणणारा थंडगार वारा मोहित करून जात होता.पाठी हात बांधून, खिडकीत उभा राहून 'तो' हे सगळं पाहत होता.
चालता-चालता थंड वाऱ्याची झुळूक शहारे उमटवत होती, तर कधी पानांवर साचलेले पावसाचे थेंब घरंगळत घेऊन अंगावर पडून एक अनामिक भावनेनं प्रफुल्लित करत होते.
संततधार पडणारा तो पाऊस त्याला ना कसली घाई होती ना कसला आततायीपणा , तो अगदी शांतपणे बरसत होता...
पण खिडकीत उभा राहून पाऊस पाहणारा 'तो'..... 'तो' मात्र कुठंतरी हरवला होता...त्याच्या मनात काहीतरी घडत होतं की , जे या शांततेच्या विरुद्ध दिशेने वाहत होतं...!भूतकाळाच्या सावल्यांनी अंगणात मात्र सावल्यांचा खेळ सुरू केला होता..
पाठी हात बांधून खिडकीतून पाऊस पहायचं म्हंटलं तर अगदी दुग्धशर्करा योगच, पण त्यात कुठंतरी कधीतरी काही क्षण उचंबळून येतात, जे की भूतकाळात खेचत राहतात...
खिडकीतुन रातराणीच्या झाडाआडून दिसणाऱ्या कातरवेळीच्या सूर्याची जागा आज पावसाच्या थेंबांनी झुकून गेलेल्या रातराणीच्या झाडाने घेतली होती..जणू ते आज झुकून पाऊस राजाला मुजरा करत होतं असं भासत होतं. त्याच रातराणीच्या पानांवरून अलगद घरंगळत येणारे पावसाचे थेंब मोती बरसावेत तसे मातीत मिसळून जात होते. अगदी काही क्षणांचं त्यांचं अस्तित्व पण त्याचा त्याग करायला ते त्या क्षणाचाही विलंब न करता अगदी खुशीत मातीत एकरूप होत होते... त्यांना कोण्या दुसऱ्या जीवाला संजीवनी देण्याची खुशी होती की...?? पानांवरून घरंगळत जाण्याच्या प्रवासाची कृतज्ञता...?? हे कोड मात्र सुटणारं नव्हतं...
खिडकीत उभा राहून पाऊस पाहताना मात्र वयानुसार पाऊस सुद्धा बदलत गेला असं वाटून गेलं...लहानपणी आईची नजर चुकवून भावंडांबरोबर अंगणात मारलेल्या उड्या, "ये रे, ये रे पावसा, तुला देतो पैसा" म्हणत केलेला दंगा सर्वांग चिखलाने माखे पर्यंत केलेला नाच हे सर्व काही बदलत गेले....!
मोठे होत गेलो आणि सगळं बदलत गेले, आज खिडकीत उभा राहून पाऊस स्वतःमध्ये डोकावून पाहण्यास भाग पाडतो. भूतकाळाचा चित्रपट आपोआप डोकावू पाहतो आणि त्यात कुठंतरी स्वतःला विसरून गेलोय असं प्रकर्षाने जाणवतं...
आणि मग छत्री विसरून राहिल्यावर जी तारांबळ उडते अगदी तसंच काहीसं होतं स्वतःकुठंतरी हरवल्यावर मन चिंब भिजून गेल्याशिवाय राहत नाही.
कधी कोण्या सांजवेळी पडणारा पाऊस विलोभनीय भासतो तर कधी मनात काहूर माजवतो. पानांवरून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाचा कधी अभिमान वाटतो, तर कधी त्यांच्याकडे पाहून अनामिक उदासीनता येते.
पण हे सगळे अगदी मनाचेच तर तरंग.. तेव्हांच अनुभूती येते की, पाऊस कधीच बदलत नाही बदलत जातो ते 'आपण'....!!
परिस्थितीच्या गोंडस शब्दात आपण कुठंतरी 'स्वतःला' खूप दूर सोडून दिलेलं असतं, त्याच्या मनगटाला धरून त्या दूर सोडलेल्या 'स्वतःला' खेचून आणायची ताकद या पावसाच्या सरींमध्ये असते.....आणि तेव्हांच पालवी फुटून निसर्ग बहरून येतो, रंगीबेरंगी फुलांची आरास लागते..
आणि वारा त्यांचा सुगंध भ्रमराच्या साथीने दूर देशी घेऊन जातो..... तो सुगंध अनुभवता आला पाहिजे, रोमारोमात साठवता आला पाहिजे.
जीवनाच्या पश्चिम क्षितिजाकडे जाताना साठवलेली-जपलेली ही फुलं रखरखत्या उन्हात श्रावण सरींचं लेणं घेऊन येतात....!!!
#उन्हातला_पाऊस❣️
#जिंदगी_का_फ़ंडा🍃